खंड ९ - अध्याय ३१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत कथा पुढती सांगत । कुत्स नामक विप्रवर असत । नाना तपपरायण वर्तत । सुद्धभाव तो ब्रह्मश्रद्ध ॥१॥
शमदमयुक्त होऊन । जडोन्मत्तादिक अवस्थ लाभून । शाक्त ब्रह्मांत तन्मय होऊन । संचार करी इतस्ततः ॥२॥
नामरूपात्मकांचें जें ब्रह्म ख्यात । असत्संज्ञक वर्तत । तें जाणून शांतिहीन होत । खेदयुक्त तो झाला ॥३॥
तेथ याज्ञवल्क्य येत अवचित । कुत्स त्यास प्रणाम करित । यथाविधि त्यास पूजित । नंतर विचारी विनयनम्र ॥४॥
म्हणे सांगा सांप्रत । योग शांतिप्रद मजप्रत । आपण महायोगी प्रख्यात । अनुग्रह एवढा करावा ॥५॥
याज्ञवल्क्य त्यास सांगत । पंचचित्तमय बुद्धि असत । संयोगअयोगरूप ज्ञात । भ्रांतिप्रदा सिद्धि असे ॥६॥
नाना सिद्धिप्रदर्शक असत । तेथ गणेशाचें बिंब पडत । मोहधारक तें ज्ञात । बिंबभाव सोडित ब्रह्मभाव ॥७॥
त्यास्तव वक्रतुंडास आराधून । करी तूं सर्वदा एकमन । त्यानें शांतियुक्त होऊन । उद्धार तुझा होईल ॥८॥
बिंब मायायुक्त ख्यात । सिद्धिबुद्धिग उक्त । त्याचा भाव तोंडानें नष्ट करित । म्हणून हा देव वक्रतुंड ॥९॥
मायामुख तदाकार । म्हणून परंमुख वक्र । त्या ब्रह्मसमायोगें थोर । वक्रतुंड हा ख्यात असे ॥१०॥
कंठाखालीं मायायुक्त । मस्तक माया वर्जित । वक्राख्य त्यायोगें ज्ञात । म्हणोनी विप्रेशा हा वक्रतुंड ॥११॥
या अर्थानें संयुक्त । वक्रतुंडास जरी तूं भजत । तरी होशील शांतियुक्त । गाणपत्य सदा जगांत ॥१२॥
ऐसें सांगून याज्ञवल्क्य जात । परत आपल्या आश्रमाप्रत । कुत्स होऊन हर्षयुक्त । वक्रतुंडपूजक झाला ॥१३॥
तदनंतर स्वल्प काळानंतर लाभत । महामुनीस त्या शांति सतत । गाणपत्य स्वभावें भजत । वक्रतुंडास भक्तिभावें ॥१४॥
कुत्स महायोगी वाचित । वक्रतुंडाचें चरित्र सतत । मौद्‍गलपुराणीं प्रख्यात । वक्रतुंड खंड असे ॥१५॥
एकदा कुत्साच्या दारीं येत । एक पापी भगंदर पीडित । त्या पीडा होती बहुत । आंतिरम कुलोद्‍भव तो होता ॥१६॥
दुःखयुक्त तो नमित । कुत्सास योगश्रेष्ठाप्रत । स्नान करून तेथेंच राहत । त्याच्या सन्निध दुःखजर्जर ॥१७॥
कुत्स गणेशास पूजून । बाची वक्रतुंड चरित महान । तो दुःख पीडित ब्राह्मण । मुद्‍गलपुराण श्रवण नित्य करी ॥१८॥
संपूर्ण मुद्‍गल पुराण । ऐकता झाला रोगहीन । आगिरस तो प्रणाम करून । नंतर गेला स्वस्थाना ॥१९॥
विविध भोग ऐहिक भोगून । नंतर गेला गणेश्वरासमीप पावन । ऐसें हें आश्चर्यंकर वृत्त शोभन । शौंनका असे तुज नमन ॥२०॥
ऐसें नानाजन सिद्धि पावले । मुद्‍गलस्थ वक्रतुंड चरित ऐकून तरले । त्या सर्वांचें वर्णन झाले । अशक्यप्राय तें जाणा ॥२१॥
म्हनून संक्षेपें कथिलें तुजप्रत । वक्रतुंडचरित श्रवणाचें पुनीत । माहात्म्य जें अद्‍भुत । शब्दातीत सर्वदा ॥२२॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थंशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे वक्रतुंड वरितश्रवणमाहात्म्यवर्णंनं नामैकत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP