खंड ९ - अध्याय २९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ सूत महिमा आणखी सांगत । पुंड्र देशाचा राजा शास्त्रवेत्ता असत । नानाधर्मपर विचक्षण असत । नाम त्याचें सुग्रोव ॥१॥
एकदां त्याच्या राज्यांत । अनावृष्टि घोर होत । मेघ जळ न वर्षत । अति दुःखित तो झाला ॥२॥
इंद्राच्या तैसा वरुणाच्या अनुष्ठानीं । ब्राह्मणांसी त्यानें योजूनी । दक्षिणा देऊन द्विजां तो धनी । तोषविता झाला मेघपतीसी ॥३॥
परी मेघ न वर्षत । पापानें त्याच्या प्रेरित । त्यायोगें अति दुःखित । जाहला तो सुग्रीव ॥४॥
राज्य त्यागून विश्वामित्राप्रत । जाऊन त्यास प्रणाम करित । नंतर तयास विचारित । मेघवृष्टीचा उपाय तैं ॥५॥
त्यानें राजानें ब्राह्मण । योजिले लिहून घेण्या तें पुराण । मुद्‍गल पुराण घेऊन । नंतर परतला स्वनगरासी ॥७॥
समीपस्थ जनांसमवेत । तें पुराण तो ऐकत । तेव्हां वृष्टी उत्तम होत । मुद्‍गल वाचतां प्रारंभीं ॥८॥
तें पाहून नृप विस्मित । सर्व लोकही हर्षयुक्त । पुंड्रनिवासी ते समस्त । गणेश्वरासी पूजिती ॥९॥
भाद्रपद प्रतिपदेस सुरुवात । करून ऐके नृप आनंदयुक्त । सिद्धिप्रद हें पुराण अद्‍भुत । एक वर्षभर भक्तीनें ॥१०॥
पुनः भाद्रपद मास लागत । शुक्ल पंचमीस पूर्ण होत । राजा पुनरपि प्रारंभ करित । मुद्‍गल पुराण श्रवणाचा ॥११॥
शुक्ल प्रतिपदेस पुनः प्रारंभ करित । सुग्रीव तें नित्य ऐकत । आषाढांत अमावास्येस समाप्त । करितसे तो एकदां ॥१२॥
श्रेष्ठ जनांसमवेत । वार्षिक क्रमें तो नृप ऐकत । प्रतिवर्ष महाभक्तियुक्त । सर्व नगर जनांसह ॥१३॥
भक्तिभावें सारे गणेशास भजत । झाले दुःखविवर्जित । त्या राज्यांत वंध्यादोषयुक्त । कोणीही ना राहिला ॥१४॥
न रोगशोकसंयुक्त । जैं सुग्रीव राज्य करित । सर्व संपत्तिसंयुक्त । लोक सारे तैं झाले ॥१५॥
रोगदोषभावें हीन । भय सारें लय पावून । अन्तीं सर्वांसहित गमन । करी स्वानंदलोकासी ॥१६॥
तेथ तो ब्रह्मभूत होत । निज लोकाप्रत जेव्हां जात । तेव्हां त्याच्या अंगावरून वाहत । वायू तो वाहे रौरवावरी ॥१७॥
रौरव नरकस्थ पापी जन । पीडाहीन जाहले तत्क्षण । त्यांस घेऊन गेले गणेशगण । ब्रह्मीभूत त्यांसी करिती ॥१८॥
तें पाहून यमादि विस्मित । मुद्‍गल पुराणास प्रशंसित । वार्षिक वाचनाचें फळ अद्‍भुत । सांगितले तुज सर्वसिद्धित ॥१९॥
सुग्रीवाच्या देशांत । एक नर कुष्ठयुक्त । तो एकदां भावें जात । पुराणश्रवण करावया ॥२०॥
वार्षिक वाचन प्रारंभ करित । नृप तैं तो ऐके नियमित । ऐकतां त्याचें कोड जात । जाहला अत्यंत हर्षित ॥२१॥
आपुल्या पायांनीं तो परत । गेला आपुल्या घरीं मुदित । स्वकार्य करी तो प्रेमयुक्त । इच्छित भोग सारे भोगिले ॥२२॥
अंतीं गजाननाकडे जात । ब्रह्मीभूत तो होत । श्रवणफल ऐसे असत । विविध जन तरून गेले ॥२३॥
येथें अखिल भोग भोगून । जाहले अंतीं स्वानंदांत विलीन । वर्षशतांनीं परिपूर्ण । कथन हें न होणार ॥२४॥
म्हणॊनि मुद्‍गल पुराण श्रवण फल । कथिलें संक्षेपें वर्षश्रवण विमल । केवळ ऐकतां हें वार्षिक सफळ । मनोरथ समस्त होतीं ॥२५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्ष मुद्‍गलसंवादे वर्षेण मौद्‍गलश्रवणमाहात्म्यवर्णंनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP