खंड ९ - अध्याय २५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ विकल्प विजयाचा उपाय । मुद्‍गल सांगती सर्वज्ञेय । म्हणती गणेश्वरास ह्रद्य । स्मरण करून तोषविलें ॥१॥
त्या वेळीं त्यास प्रार्थूंन । सुरर्षिनी विकल्प निर्माण । केलात महाभागांनी उत्सुकमन । आतां तोच अप्रिय कैसा ॥२॥
जो गणेश्वरास प्रार्थून । तुम्हींच केलात निर्माण । आतां त्याचेंच हनन । करू इछितां हें नवल वाटे ॥३॥
परी मजला आलात शरण । प्रिय करीन तुमचें प्रसन्नमन । माझ्या सन्निध रहा सर्वजण । विकल्प तरी काय करील ॥४॥
महर्षी कश्यपादी वसत । शिवादि देवही समस्त । आश्वासन लाभून राहत । मुद्‍गलासन्निध आनंदानें ॥५॥
मुद्‍गलाच्या आश्रमांत । विकल्पास प्रवेश न लाभत । त्यायोगें देवमुनि समस्त । सिःसंशय तेथ झाले ॥६॥
देवर्षींचा हा वृत्तान्त । जेव्हां विकल्पास ज्ञात होत । तेव्हां तो अत्यं त क्रोधयुक्त । आला त्यांना मारावया ॥७॥
मुद्‍गलाच्या आश्रमासन्निध । उभा ठाकला विकल्प सक्रोध । त्यास पाहून भयप्रद ।  देवेंद्र भयभीत जाहले ॥८॥
ते मुद्‍गलास सांगती । मुद्‍गल योगींद्रा वाटे भीती । विकल्प क्रोधयुक्त चित्तीं । आला सांप्रत आश्रमाजवळीं ॥९॥
तरी त्वरित काय तें करावें । आम्हां सर्वांसी रक्षावें । त्याचें वचन ऐकून आघवें । मुदुगल म्हणे तयांसी ॥१०॥
चिंता करू नका मनांत । प्राज्ञहो मीं वधीन त्वरित । विकल्पास त्या नष्ट करित । प्रतिज्ञा माझी ही असे ॥११॥
ऐसें बोलून मुद्‍गल जात । विकल्पास त्या भेटत । तेजःपुंज जो सर्व संशयनिर्मित । विकल्प गणेंशप्रभावें ॥१२॥
तो महायोगी परमार्थज्ञ । दयायुक्त मनें गणेशरहस्यज्ञ । गणपानें प्रेरित सुज्ञ । विचारी त्या विकल्पासी ॥१३॥
अरे विकल्पा सांग सांप्रत । येथें कां आलास अनाहूत । या स्थळास सोडून जगांत । जाई तूं आवडेल तेथें ॥१४॥
अन्यथा या आश्रमांत । प्रवेश करण्याचें साहस तूं करित । तरी होशील भस्म त्वरित । यांत संशय कांहीं नसे ॥१५॥
मुद्‍गलाचें ऐकून वचन । विकल्प झाला क्रोधायमान । आपुल्या प्रखर तेजें जणूं हनन । करण्या धावला मुद्‍गलाचें ॥१६॥
विकल्प म्हणे मुद्‍गलाप्रत । मज पाहून संशयग्रस्त । विष्णु शंभु आदि देव समस्त । महर्षीही क्षणांत झाले ॥१७॥
तुज योगीन्द्रा मीं न जाणत । अरे वाडवा तूं कुठे गुप्त । होतास जो मज जिंकण्या इच्छित । मुर्खासम बडबड कां करिसी ॥१८॥
चराचर माझ्या अधीन । मीं केलें असे संपूर्ण । आतां तुझें करीन हनन । माझा परम द्वेष्टा तूं ॥१९॥
देवेंद्वमुख्यास मुनिजनांस । आश्रय तूं दिलास । विकल्पविहीन तयास । कां केलेस आपुल्या आश्रमीं ॥२०॥
तुझ्या आश्रमांत आगमन । केलें मी हेतू चित्तीं धरून । तुझ्या गर्गाचें हनन । करीन मी आज क्रोधें ॥२१॥
अन्यथा हें समजून । त्या देवमुनींस करी माझ्या स्वाधीन । भस्म नाहीं तर करीन । मुद्‍गला तुला क्षणार्धांत ॥२२॥
विकल्पाचें ऐकून वचन । तो मुद्‍गल कुपितमन । स्मरे गणपास भक्तियुक्तमन । साहाय्य मागे विकल्पवधार्य ॥२३॥
गणेशाच्या स्मरणमात्रें निःसृत । मुद्‍गलच्या चित्तांतून त्वरित । प्रलयकारी अग्नि तेजोयुत । सर्वदाहक भयंकर ॥२४॥
महाक्रूर विकल्पावरी धावत । त्या खळास केवळ पाहत । त्या दर्शनमात्रें दाहयुक्त । विकल्पास त्यानें केलें ॥२५॥
तेव्हां शांतिस्तव यतत । विकल्प शौनका अत्यंत । जरी अग्नितेज प्रखरतर भाजत । सर्वांग अधिकचि तयाचें ॥२६॥
अति दाहयुक्त होत । तेव्हां विकल्प खेडयुक्त । गर्व सोडून मुद्‍गलाच्या पुढयांत । लोटांगण घालितसे ॥२७॥
त्या महाविप्रास वंदित । विकल्प अत्यंत भयभीत । म्हणे मुनिसत्तमा रक्षण त्वरित । आतां माझें करावें ॥२८॥
तुझ्या तेजें दाह होऊन । आलों मीं तुज शरण । शरणागताचें करी रक्षण । वत्सलभावें योगींद्रा ॥२९॥
शिव विष्णु प्रमुख देवांस । वसिष्ठादि मुख्य मुनींस । मीं जिंकिलें विनासायास । संदेह अल्पही न वाटला तैं ॥३०॥
परीं तूं साक्षात्‍ गजानन । वाटसी मज सर्वोत्तम महान । तुज जिंकण्या मज बळ नसून । शरण तुला मीं आलों असे ॥३१॥
दयासिंधो रक्षण करी । हा महाताप माझा हरी । तुझ्या तेजानें नष्ट मीं तारी । अपराध माझा क्षमा करी ॥३२॥
विकल्पाचें हें वचन ऐकत । त्याची व्याकुळता पाहत । तेव्हां मुद्‍गल दयायुक्त । गणेश तेजोद्‍भव अग्नि शांत करी ॥३३॥
तेव्हां सावध होऊन । विकल्प झाला दाहहीन । स्वस्थचित मुद्‍गलास नमून । योगिवरा त्या प्रार्थितसे ॥३४॥
विप्रा मज तूं रक्षिलेंस । अग्निभय दूर केलेंस । आतां तुझ्या स्वाधीन पी विशेष । राहीन सन्निध सदैव तुझ्या ॥३५॥
मज स्थान दाखवी उचित । तेथ मीं राहीन निश्चलचित्त । होऊन तुझा आज्ञांकित । तुझा दास मीं निश्चयें ॥३६॥
त्याचें तें ऐकून वचन । मुद्‍गलें लाविलें ध्यान । विघ्नेश्वराचेंच तें कृत्य जाणून । मोदें म्हणे विकल्पासी ॥३७॥
निकल्पा जे नराधम जगांत । योगाकार गणेशा न जाणत । देहधारी सामान्य मानित । गुण पराक्रम त्या देवाचे ॥३८॥
ऐशा नराधमांच्या चित्तांत । सदैव तूं रहा बाहेर स्थित । त्यांना नाना संशययुक्त । विशेषें तूं करी आनंदानें ॥३९॥
त्या गणपद्वेष्टया योग्यांच्या मनांत । राहून करी संशययुक्त । मौद्‍गलपुराण महिमानयुक्त । माझ्या आज्ञेनें विकल्पा ॥४०॥
परी गणेशास योगरूप मानिती । योगी अयोगी वा जगतीं । त्यांना बाधा न करावी निश्चिती । माझ्या आज्ञेवरून ॥४१॥
मौद्‍गलपुराणांत श्रद्धायुक्त । होतील गणेशयोगी जगांत । अन्य योग्यांस या पुराणांत । श्रद्धा प्रेम न वाटले ॥४२॥
हें माझें वचन स्मरण । करी विकल्पा विनम्रमन । ऐसें बोलून मुद्‍गल मौन । धरिते झाले योगींद्र तैं ॥४३॥
विकल्प त्यांस वंदून । गेला निघून तेथून । देवमुनि हर्षयुक्तमन । प्रणाम करिती मुदगलास ॥४४॥
नंतर तेही स्वस्थानीं जाती । कर्म क्रमप्राप्त आचरती । त्या दिवसापासून जगतीं । मौद्‍गल न वाचित दोषयुक्त जन ॥४५॥
त्या पापी जनांच्या चित्तांत । विकल्प सदा वसत । त्यायोगें मौद्‍गलपुराणांत । रस न वाटे तयांसी ॥४६॥
कलियुगांत मौद्‍गल विनष्ट । होईल उपलब्ध गणेशभक्ताप्रत । जन होतील दोषयुक्त । घरोघरीं कलियुगीं ॥४७॥
गणेश योगीजन परी सतत । सेवतील मुदगलपुराण श्रद्धायुक्त । गणेशरूप बोधांत । जे चतुर सर्व पावन ॥४८॥
परी जे पाखंडी लुब्धजन । नाना छद्मधर दुःखित मन । ते मोहयुक्त होऊन । मौद्‍गलपुराणांस न भजतील ॥४९॥
ज्या देवांनी विघ्न निर्मिलें । मौद्‍गलांत मुनीनीं पाहिलें । ते सर्व त्यायोगें झाले । जन्ममरणयुक्त नर ॥५०॥
ऐसें हें रहस्य परमाद्‍भुत । सांगितलें तुज समस्त । जो ऐकेल अथवा वाचित । तो विकल्परहित होईल ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगचरिते योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे विकल्पप्रतापखंडनं नाम पंचविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP