खंड ९ - अध्याय २३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशा नमः । सूत सांगती महिमान । मुद्‍गलपुराण श्रवणाचें पावन । सुमति नाम एक ब्राह्मण । गालववंशी जन्मला ॥१॥
त्यास कुष्ठ रोग होत । त्यायोगें पीडा दारूण लाभत । सर्वांगीं किडे त्याच्या पडत । दुर्गंधयुक्त शरीर ॥२॥
पूरक्त घामादींनीं वाप्त । तो विप्र झाला संत्रस्त । तेव्हां स्वदेहघातार्थ उद्यत । तो स्मरण करी गणेशाचें ॥३॥
विघ्न नष्ट व्हावें म्हणून । आदरें करी भजन । एवढयांत तेथ आगमन । धौम्य मुनींचें जाहलें ॥४॥
ते सर्वार्थवेत्ते साक्षात । दुसरा जातवेद वाटत । तेजानें अग्निसम ज्वलंत । त्यास सुमति प्रणाम करी ॥५॥
त्यांच्यापुढें दुःखयुक्त । तो अत्यंत विलाप करित । त्यास पाहून एवढा व्यथित । धौम्य म्हणे दयार्द ॥६॥
चिंता करूं नको मनांत । नको करूं देहाचा घात । मौद्‍गल पुराण ऐक एकचित्त । होशील त्यानें रोगमुक्त ॥७॥
सर्वसिद्धिकर पूर्ण । ब्रह्मभूतत्वदायक संपूर्ण । मौद्‍गलश्रवणार्थ करी गमन । माझ्यासह शीघ्र तूं ॥८॥
ऐसें बोळ्लून मुनींसहित । धौम्य त्यास धरून नेत । पुलहाच्या आश्रमांत । तेथ होतें पारायण ॥९॥
ज्येष्ठमास लागतां हर्षित । पुलह मुद्‍गलपारायण करित । होऊनियां हर्षभरित । शुक्त प्रतिपदा तिथीला ॥१०॥
नाना जनांच्या समवेत । उपोषणपर तो प्रारंभ करित । श्रवण तत्पर सारे असत । मुद्‍गल वाची आनंदानें ॥११॥
सुमति धौम्यमुनींसहित । तेथ तें पुराण ऐकत । गणेशास मनीं ध्यात । चार दिवसपर्यंत ॥१२॥
चार दिवसांनीं समाप्त । तें पारायण होत । पंचमीस पारणा करित । पुलह सर्वांसहित तैं ॥१३॥
सुमति जाहला कुष्ठहीन । तत्क्षणीं हें आश्चर्य महान । पाहून हर्षभरित मन । विस्मित सारे जाहले ॥१४॥
पुलहास प्रणास करित । धौम्य स्वाश्रमीं परतत । तेथ धौम्यस पूजून म्हणत । सुमति तो ऐसें वचन ॥१५॥
या देहाचा कर्ता पिता । महामुने तूंचि माता । यंत संदेह नसे चित्ता । काय करूं मीं तुम्हांसाठीं ॥१६॥
हा माझा देह स्वाधीन । केला असे मीं विनीतमन । रक्षण कर माझें दया वाटून । उपदेश मजला करावा ॥१७॥
त्यापरी मी वागेत । धौम्य हें ऐकून वचन । म्हणे गणेशाचें करी भजन । मौद्‍गल पुराण वाचोनियां ॥१८॥
त्यायोगें कृतकृत्य विमल । मज तूं प्रिय होशील । ऐसा उपदेश करून निर्मल । धौम्य परतला आश्रमीं आपुल्या ॥१९॥
महायोगी तो परत जात । त्यानंतर सुमति सतत । मौद्‍गल पुराण साहाय्यें भजत । तया गणनाथासी ॥२०॥
अंतीं तो ब्रह्ममय होत । इहलोकीं सर्व भोग भोगित । ऐसें हें ज्येष्ठ पारायण फळ ख्यात । ऐक आणखी एकवृत्त ॥२१॥
पुलह हर्षसंयुक्त । मुद्‍गल पारायण करित । तेथ । चांडाळ कोणी येत । अवचित तो दूर उभा ॥२२॥
तेथून पाहे तें स्थान । म्हणे हें कौतुक काय महान । दुरून ऐके पुराण । एका श्लोकाचें एक पद ॥२३॥
तदनंतर तो विस्मित । गेला स्वेच्छेनें प्रेरित । पापकर्मा पुनः पाप करित । विविध प्रकारें शौनकमुने ॥२४॥
तो मरता यमदूत । त्यास नेती त्वरान्वित । यमराजाच्या पुढयांत ठेवित । वंदूनिया यमधर्मास ॥२५॥
तेव्हां महाबुद्धि चित्रगुप्त । यमास हिशोव सांगत । महापापी हा चांडाळ असत । महाभागा हा विशेषें ॥२६॥
न पुण्याचा लवलेश । त्यानें केला कधीं विशेष । परी मौद्‍गल पुराणाचें पद एक शेष । यानें ऐकिलें असे पूर्वीं ॥२७॥
याचें सर्व पूर्व चरित ।  पापपूर्ण असे दुश्चित्त । आतां धर्मसंयुक्त । दंड यास सांगावा ॥२८॥
चित्रगुप्ताचें ऐकून वचन । महामति धर्म स्मरे एकमन । ध्याऊनिया गजानन । विचार करी मनांत ॥२९॥
आतां काय करावें सुखप्रद । तोंच सत्यवाणी सांगत विशद । त्या चांडाळास नरक दुःखद । दाखवी केवळ यमधर्मा ॥३०॥
तदनंतर करून तर्जन । यांस स्वर्गभूमीत स्थापन । यथासुख त्यास ठेवून । आनंदवी या चांडाळाला ॥३१॥
धर्मराज प्रतापवंत । हर्षभरें तैसें करित । स्वस्थनीं भोगयुक्त । करून स्थापिलें त्या चांडाळा ॥३२॥
परी सूर्यपुत्रास वाटे मनांत । आश्चर्यकारक तें वृत्त । तेवढयांत आश्चर्य घडत । परम अद्‍भुत त्या वेळीं ॥३३॥
गणेशदूत तेथ येत । त्या चांडाळास घेऊन जात । स्वानंदलोकांत त्वरित । धर्मादि सर्व विस्मित झाले ॥३४॥
ऐसें फळ एकच पद ऐकत । मुद्‍गल पुराणाचें पुनीत । त्याचें एवढें फळ लाभत । संपूर्ण श्रवणाचें फळ केवढें ॥३५॥
तें वर्णनातीत असत । ज्येष्ठ मासांत पारायण करित । ते नर या लोकांत । भोगिती अखिल सुखभोग ॥३६॥
अंतीं स्वानंदलोकीं जात । स्वानंदपद लाभत । ऐसें माहात्म्य अद्‍भुत । वर्णन अशक्य अयुत वर्षांतही ॥३७॥
ऐसे मुद्‍गल पारायण महिमान । सूतांनीं केलें कथन । सौनक मुनि तें ऐकून । धन्य कृतकृत्य झाले ॥३८॥
ओमित श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे नवमे खंडे योगामृतार्थशास्त्रे दक्षमुद्‍गलसंवादे ज्येष्ठमासपारायणमाहात्म्यवर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः ।  श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP