मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय २८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । देव कश्यपादींसी शरण जाती । दैत्यांसी करणी त्यास सांगती। विहवल भयभीत होते चित्तीं । प्रार्थना करिती नम्रपणें ॥१॥
दुष्टें मत्सरें जिंकिले देव । अपवाद नसे त्या वासव । इंद्रा पकडुनी नेता कीव । आमुची कोण करणार? ॥२॥
कश्यपा तूं आमुचा पिता । मुनिशार्दूला राखी आतां । भयविहवलां जीवनाश दुःखितां । सोडवी मत्सरापासून आम्हां ॥३॥
देवांचे वचन ऐकून । वसिष्ठादी मुनींसह गमन । केलें ब्रह्मलोकीं तत्क्षण । कश्यपें शवृद्धीसाठीं ॥४॥
सत्यलोकांत जाऊन । ब्रह्मदेवांसि भेटून नमन । विविधपरींची स्तुति करुन । करांची ओंजळ जोडून म्हणे ॥५॥
मत्सरानें देववर जिंकिले । इंद्रासही पकडून नेलें । देव लोकीचें राज्य घेतलें । स्वामित्व आतां त्या दैत्याचें ॥६॥
त्या परमदारुणा दंडावें । देवदैत्यांचे स्वपद त्यांसी द्यावें । स्वामी जगन्नाथा ऐसें करावें । तुजविण अन्य गती नसे ॥७॥
तूंच आमुचा त्राता । तूंच आमुचा रक्षणकर्ता । त्यांच्या या करुण वचनां ऐकतां । द्रवलें चित्त पितामहाचें ॥८॥
प्रजानाथ बोले देवऋषींसी । ऐका असुरांच्या रहस्यासी । शिववरानें प्राप्त तयासी । अजेयत्व सर्वलोकींचें ॥९॥
म्हणोनि मीं असमर्थ असत । विष्णूस शरण जाऊया त्वरित । तुम्हा सर्वां समवेत । बोलून ऐसे निघाला ॥१०॥
देवमुनींसह प्रजापती । जाऊन वैकुंठलोकाप्रती । नमस्कार करुन स्तुती । करिता झाला विष्णूची ॥११॥
हे पालका विष्णुदेवा । आमुचा वृत्तान्त ऐकावा । इंद्र देववर सोडवावा । मत्सरासुरें त्यांसी पकडिलें ॥१२॥
युद्धांत सारे देव पराजित । महाविष्णो आपण स्वस्थचित्त । पालक सार्‍या जगाचे तात । रक्षण आता करावें ॥१३॥
विष्णु तेव्हां उत्तर देती । ब्रह्मदेवाची ऐकून उक्ती । प्रजापते मज न शक्ती । मत्सरासुरा जिंकण्याची ॥१४॥
तो दैत्यपुंगव झाला मत्त । शिवाच्य वरदानें विश्वांत । म्हणुनी शरन जाऊया त्वरित । शंकरासीच निःसंशय ॥१५॥
ते सर्वांसी मान्य झालें । सारे कैलासावरी गेले । शंकरा वंदून विष्णू म्हणाले । ऐका प्रार्थना शिवशंभो ॥१६॥
शूलपाणे जगन्नाथा नमन । शंभो सर्वसाक्षी तुज वंदन । भगवंता महादेवा नमन । भक्तिपूर्वक आमुचें ॥१७॥
राजसरुपें तूच निर्मिसी । म्हणोनी तूं ब्रह्मा अससी । तूंच पालक विष्णुरुप होसी । रुद्रस्वरुपीं संहर्ता ॥१८॥
पंचमुखा योग्या योग्यासी । निर्गुणा निरुपा ब्रह्मभूतासी । नमन आमुचें तुजसी । मत्सरासुरें केला आकान्त ॥१९॥
त्यानें सुरऋषींस पीडा दिली । समस्त पृथ्वी जिंकली । इंद्रासी पकडून स्थापिली । प्रभूता आपुली स्वर्गांत ॥२०॥
आम्हीं सारे भयभीत । आलों शरण तुला आर्त । देवदेवेशा संरक्षणा त्वरित । करी श्रेष्ठा देवपालका ॥२१॥
विष्णूचें वचन ऐकून । शिव चिंतायुक्त उन्मन । म्हणे विष्णुमुख्यांस त्या वचन । दैत्यास त्याच मीच वर दिला ॥२२॥
त्याच्या उग्र तपें संतुष्ट झालों । महादुर्लभ वर देऊन चुकलों । आतां जनार्दना कष्टी झालों । तरी अशक्य दैत्यनाश ॥२३॥
विषवृक्ष जो मीच वाढविला । तो तोडणें शक्य न मजला । तेव्हा देवेशा उपाय तुजला । अन्य सुचे का विचार करी ॥२४॥
शिवांचें वचन ऐकून । विष्णु परमकंपित म्हणती तत्क्षण । दुःखपूर्ण हृदयीं होऊन । शंकरा तू कर्ता अकर्ता ॥२५॥
तूं ऐसे विपरीत वदसी । आम्हीं काय करावें या समयासी । आता राहूं कैलासीं । तुझ्या सन्निध महादेवा ॥२६॥
आम्हीं दैत्यवश कैसे राहूं । वैकुंठादि लोकांसी कैसे जाऊं । तुझ्या सान्निध्यांतच पाहू । जीविताचा वनवास ॥२७॥
वैकुंठ सत्यलोक जिंकील । मत्सर सुखें तेथ राहील । परी येथ कैलासीं न येईल । भक्तिभावामुळें तुझ्या ॥२८॥
विष्णु वचन ऐसें ऐकून । शिव निश्वासयुत बैसला उन्मन । मत्सराची कृती महान । ऐक दक्षा दुर्दम्य ॥२९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुरनोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते मत्सरासुरचेष्टितं कथनं नाम अष्टाविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP