मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शौनक मुनी तेव्हां विनवित । सूता पुढे सांग संवाद अविरत । शिवपार्वतीमध्ये जो होत । पारशर्यशिष्या सर्वज्ञा ॥१॥
सूत म्हणती तयास । मुद्‌गले दक्षास कथिलें सुरस । तेचि आख्यान तुम्हांस । सांगेन मी भक्तिभावें ॥२॥
शिव म्हणती पार्वतीस धन्य तूं देवी अतुला सुरस । महत्पुण्यें गणेशज्ञानलालस । बुद्धी तुझी जाहलीसे ॥३॥
तुजसमान सद‌रुची लाभतां । माझे मनी प्रेरणा आतां । गाणपत्यप्रिया दारी असता । महद्‌भाग्य तें मज वाटे ॥४॥
गणेशाला नमन करुन । कथानक तुज सांगेन । कूट ते सुलभ करीन । मायामय ब्रह्म तुजसाठीं ॥५॥
मायातीत तदनंतर सांगेन । योगमार्गी साधनें करुन । द्विविध विशेष जाणून स्वस्वरुपमय सर्व ॥६॥
देवी प्रथम ब्रह्म स्थित । एक अनेकादि वर्जित । स्वतःपासून उत्थान प्राप्त । द्विविध झालें त्या वेळीं ॥७॥
स्वतःपासून उत्थान होत । विकल्प तत्सदृशची निर्मित । ‘मी’ आहे या भावें निर्मित । बिम्ब-भिन्नता म्हणोनी ॥८॥
सकल अभेदरुप असत । जें निराकार स्वभावें वसत । ‘अहं अस्मि’ ह्या भावें प्रोक्त । ब्रह्मरुप शाश्वत ॥९॥
त्यानेंही स्वस्वरुप पाहिलें । आत्मात्मक तें वहिले । मीं कोण ह्या विकल्पे वाटलें । मोह पडोनी तत्क्षणी ॥१०॥
चार विधींचे जे पदार्थ संस्थित । योगरुपें अभेद त्यांत । सर्वात्मक पर तो असत । ऐसें रहस्य जाणावे ॥११॥
चार ब्रह्में चार अवस्थात्मक । चार वेद चार वर्णाश्रमात्मक । ऐशा चार रुपें सर्वात्मक । तें परमरुप जाणावें ॥१२॥
मायेनें बिंबरुप होऊन । जन्मला नामरुप घेऊन । माया बिंबरुपें म्हणून । द्वितीय प्रकार जाणावा ॥१३॥
मोह होऊन जीव । स्वस्वरुपाचा विचारी ठाव । ऐहिक सुखांत सावयव । रुची उपजे मनांत ॥१४॥
मायेचे दोन प्रकार । सर्वाकार निराकार । बुद्धिरुप महाभागा उदार । तिचा सर्व हा खेळ असे ॥१५॥
वेद वेदान्त जाणण्यास । ‘त्वं’ पद परिचय होण्यास । माया हीच साधन त्यास । ऐसें रजस्य जाणावें ॥१६॥
या बुद्धीनेंच जाणती । निराकार साकार भेद जगती । बुद्धीनेंच देवि हे जाणती । म्हणोनि जाण ते बुद्धिरुप ॥१७॥
आता सिद्धीचें रुप तुजप्रती । सांगेन देवि निश्चिती । मी साकार ऐसी प्रचीती । निराकार ही अन्य असे ॥१८॥
मोहहीन तो निराकार । मोहयुक्त तो साकार । ऐसें उभय भ्रांतीचे प्रकार । निर्माण तेव्हां जाहलें ॥१९॥
सिद्धी मोहकर्मी एका । विविध भ्रांतीची प्रकाशिका । एक असोनी अनेका । स्वरुपातें ती घेत असे ॥२०॥
सिद्धीनें बुद्धि संमोहित । हे पार्वति, होता भरान्त । साकार मोह संयुक्त । निराकार ती विमोहिता ॥२१॥
बुद्धी मोहधारक । सिद्धी मोह प्रदायक । त्यांचा प्रकाशदाता एक । स्वयं भगवान गणेश ॥२२॥
तो गणेश तेथ न आला । निजरुपानें न त्यागिता झाला । बिंब प्रतिबिंब भावें भासला । सिद्धिबुद्धींना त्या वेळी ॥२३॥
सर्वात्मक बिंब विलसे । अन्यत्र ते प्रतिबिंब भासे । आत्मरुप निराकार असे । बिंब प्रतिबिंब संयोगे ॥२४॥
सूर्याचें प्रतिबिंब जळांत । पडतां सूर्य जळीं भासत । परी तो सत्यरुपें तेथ नसत । तैसी अवस्था येथ असे ॥२५॥
पाण्यांत तरंग उठत । तेव्हां प्रतिबिंब हेलावत । परी बिंब तें अचल असत । नभस्थ सूर्य देवाचें ॥२६॥
तैसेचि स्थिती येथ असे । तो गणराज खेळत असे । तयाच्या इच्छेनें विलसे । निराकार तैसें साकार ॥२७॥
तो मायेचा विधाता । तियेसी होय खेळविता । सूत्रधार जैसा हालविता । हालती बाहुल्या तयापरी ॥२८॥
एक भाव त्रिविध झाला । हे पार्वति तो मोहें विनटला । तेणें विकल्प पसरविला । एक मी बहु हा जगांत ॥२९॥
विकल्पानें द्विधाभूत । देहदेही अन्य भासत । तें ब्रह्म मी ही यथार्थोक्त । वेदवाणी परी असे ॥३०॥
देहाच्या मोहें करुन । देही झाला भरान्त मन । बिंदुमात्र प्रकाशून । देहरुपें भासतसे ॥३१॥
चतुर्विध देहांचे ब्रह्मरुप । जाणते प्राचीन बहुरुप । देह-कैवल्य निष्पाप । तें ब्रह्म मी एकरुप ॥३२॥
जे बहुरुप बिंदुयुक्त असत । ते सत्ताहीन स्वकार्यी अशक्त । ‘त्वं’ पद तत्‍ पद तप आचरित । हे सुंदरि ते अघोर ॥३३॥
तें तूं ब्रह्म आहेस । तत्त्वमसि या वाक्यास । येथ आठवावें स्मृतीस । जेणें विचार स्पष्ट होय ॥३४॥
‘त्वं’ पद ‘तत्‍’  पद आकारादिहीन । तपाचरण त्यांचें न संभवें म्हणून । ज्ञानमय तप घ्यावें समजून । आत्मरुप जाणावया ॥३५॥
त्वं पद तत्‍ पद आचरित । तप ऐसें दिव्य वर्षसहस्त्रवर्षपर्यंत । गजानन तें प्रसन्न होत । स्वयं विराजे त्या समयीं ॥३६॥
शुंडादंड विराजत । लंबोदर महाकर्णयुक्त । चार बाहू त्रिनेत्र विलसत । सगुण रुप देवाचें ॥३७॥
त्याच्या दर्शनमात्रें तयांस प्राप्त । स्फूर्ती अद्‌भुत अवचित । गजानना नमूनी रचित । स्तोत्र प्रसन्न तेधवां ॥३८॥
त्वं पद तत् पद रुपें वर्णित । प्रकृति प्रसन्नचित्त । गणनाथा तुज प्रणाम अविरत । स्वसंवेद्या निराकारा ॥३९॥
कंठावरती ज्याचा देह । गजरुपी साकार निःसंदेह । कंठावरी निराकार स्वदेह । म्हणोनि म्हणती गजानन ॥४०॥
चतुर्विध निजानंद वेदोक्त । शिव विष्णु सूर्यशक्ति रुप असत । प्रथम अव्यक्त रुप असत । समरुपक अन्य असे ॥४१॥
तिसरें तें सतस्वरुप म्हणती । चवथें तें तुरीय जाणती । चार हात तुझे विलसती । रहस्य तेथ हेंचि असे ॥४२॥
पहिलें तें शिवाचें रुप । दुसरें विष्णूचें स्वरुप । तिसरें असे सौररुप । शक्तिरुपी तुरीय तें ॥४३॥
तुझ्या उदरीं सर्व स्थित । म्हणोनि लंबोदर प्रख्यात । माया मायिक चरण असत । गणनाथा तुझे जगीं ॥४४॥
ढुंढे हे सर्व तुझे गण असत । म्हणोनी गणनाथ तूं विराजत । आमुच्या आत्मस्वरुपांत । ध्यानीं अनुभविला तुला ॥४५॥
भक्तांवरी कृपा करिशी । भक्तांभिमान तू बाळगिशी । म्हणोनि देह धारण करिशी । ऐंशा लक्षणें युक्त जो ॥४६॥
गणेशा स्वामि धन्य केलें । तूं देहरुप जें धारण केलें । स्वानंदवासा मम हृदयीं झालें । नित्य स्थिर तुझें रुप ॥४७॥
विघ्नराजा नमस्कार । विघ्नहर्त्या नमस्कार । अभक्तांना विघ्नकर । ऐशा तुला नमो नमः ॥४८॥
कर्मांचे फल तूं देशी । ज्ञानांची सिद्धी पावविसी । अमेयशक्ति तू अससी । सर्वाधीशा नमस्कार ॥४९॥
दयासिंधो काय करावें । तें सत्वरीं सांगावें । महातीव्र भक्तियुक्त असावें । आम्ही ऐसे करी सदा ॥५०॥
ऐसी स्तुती ऐकून । गणाधिप मनीं संतोषून । मेघगंभीर बोले वचन । आनंद वाटे तयांना ॥५१॥
अति सुंदर स्तोत्र उत्तम । गाऊन प्रसन्न चित्त मम । केलें म्हणोनी सर्व काम । पुरतील हे वाचोनिया ॥५२॥
धर्म अर्थ काम मोक्ष देईल । पुष्टीचे वर्धन करील । कारागृहीं जे असतील । सुटतील ते लक्षपाठें ॥५३॥
मारण उच्चाटणादींचे भय । नष्ट होईल निःसंशय । एकवीस वेळां जो भक्तिमय । वाचील एकवीस दिवसांतरी ॥५४॥
भक्तिपूर्वक वाचील । इष्ट काम त्या लाभले । ब्रह्मरुप तो होईल । निष्कामचित्तें वाचितां ॥५५॥
तुमच्या या स्तवनें संतुष्ट । झालों आता मागा इष्ट । तपाचरणें दूर झालें अनिष्ट । देईन मागाल तें तुम्हां ॥५६॥
बिंदुमात्र स्वरुपें स्थित । ऐसें जें ब्रह्म शाश्वत । त्यांपासून चतुर्विध विश्व प्रकटत । ऐसें वरदान देतो तुम्हां ॥५७॥
सर्वांची कृतिशक्ति त्यापासून । निर्माण झाली म्हणून । प्रकृती नामें आजपासून । लोक तुला जाणतील ॥५८॥
चतुर्विध सृष्टी रचून । होशील तू बंधहीन । अचल भक्ती पावन । ध्रुवस्थान तुज लाभेल ॥५९॥
तुझी भक्ती जन करतील । सकाम निष्काम जी असेल । सर्वदात्री ती होईल । ऐसें करी तू शोभने ॥६०॥
चतुर्विध पुरांत राहसी । तेणें तूं पुरुष ख्यात अससी । सोऽहं मात्रात्मक नाम पावसी । यापुढें तूं जगतात ॥६१॥
सर्व आकार विहीन । यंत्र तंत्र भरांत होऊन । बिंबबिंबित भावें मोहून । प्रकृतिरुपीं आकृष्ट ॥६२॥
सयं मोहविहीन । सोऽहं मात्रात्मक असून । माझ्या प्रसादें करुन । सोऽहं सुख पावशी ॥६३॥
माझी भक्ति अचल । तूही नित्य करशील । बंधमुक्त तूं मान्य होशील । जगतामाजी सर्वदा ॥६४॥
तुझी भक्ति जे जन करिती । त्यांना ईप्सित फल प्राप्ती । होईल ऐसें करी निश्चिती । माझ्या वचनें तूं पुरुषा ॥६५॥
योगसेवनें ब्रह्मभूयपद देशील । साक्षात्‍ पुरुष तूं होशील । सर्व सत्तात्मक पद लाभशील । ऐसा वर माझा असे ॥६६॥
प्रकृतीस वीर्य दान करी । सर्व सत्तात्मक ते सत्वरीं । जेणें ती विश्वरचना करी । यांत संशय कांहीं नसे ॥६७॥
चतुर्विध सृष्टी निर्मून । करा तियेचें पालन । अंतीं हरण तिचे करुन । कालचक्र फिरवावें ॥६८॥
सर्वांची प्रकृति माता । पुरुष हा जाणावा पिता । नानारुपें नामें तत्त्वता । ओळखती जन त्यांना ॥६९॥
ऐसा वर देऊन अंतर्धान । पावला गणराज तेथून । प्रकृतिपुरुष यथोक्तकरुन । गणेश सेवेंत मग्न झाले ॥७०॥
प्रकृतिपुरुष वरप्रदान । वर्णिलें या अध्यायी पावन । वक्रतुंड चरित्रीं महान । प्रथमखंडांत षष्ठाघ्यायीं ॥७१॥
इतिश्री ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‍ मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंडचरिते प्रकृतिपुरुषवरप्रदानो नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP