मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|

खंड १ - अध्याय ५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नम्ह । सूतासी शौनक म्हणत । ऐकिलें आम्ही दक्षचरित । यज्ञध्वंसादिक अति अद्‌भुत । आता पुढिल कथा सांगा ॥१॥
मुद्‍गलदक्षांचा संवाद । करावा आणखी विशद । वाटे आम्हांसी तो सुखप्रद । म्हणोनि सविस्तर सांगावा ॥२॥
सूत तेव्हा शौनका सांगती । ब्रह्मभूयकर जो पूर्णमती । मनीं भावें जो स्मरती । हृदया आनंददाता जो ॥३॥
दक्ष मुद‌गला प्रार्थित । मुद्‌गल गणपप्रिय सांगत । योग्यांमाजी जो श्रेष्ठ असत । गणेशाचें महिमान ॥४॥
सर्वांची गणप माता । निःसंशय तोची पिता । त्यामुळें त्याची सर्वपूज्यता । देवराजा आदिपूज्य जो ॥५॥
ज्येष्ठराजा वेदवर्णित । ज्येष्ठभावें पदवी लाभत । जाहली जी सर्वसंमत । तयामाजी सर्व कलांशही ॥६॥
त्याच्या कला जगतांत । कुठेही संपूर्ण न दिसत । त्या अनंत कलांतून उदय पावत । विनायक भगवन्त ॥७॥
विशेषेंकरुन सर्वांचा असत । नायक गणधिप शक्तियुत । ह्याचा नायक कोण नसत । स्वेच्छाचारी विनायक ॥८॥
स्वानंद लोकवासी । ब्रह्माविष्णु शिवासी । असे पूजनीय योग्यांसी । स्वप्रभावे जगतीं जो ॥९॥
धर्म अर्थ काम मुक्ती । लाभावी म्हणोनी पूजिती । सर्वही ह्या देवा वंदिती । ‘अहंकार’ हाची शाश्वत ॥१०॥
शिवादींना जेव्हा गर्व होत । अहं ब्रह्माऽस्मि ज्ञानें चित्तांत । त्यांचा मदहरण करित । विघ्नकर्ता गणराज ॥११॥
ज्याच्या आधारें विश्व वर्तत । तो हा स्वयं विघ्नप असत । मद हरुन ज्ञानार्थ सिद्धी देत । देवादिकां द्विजांसी ॥१२॥
सर्वांसी पदभरष्ट तो करित । तेव्हां समाधी लावून पहात । ते सारे देवादि द्विज त्वरित । जगताचा कोण मूलाधार ॥१३॥
तेव्हां योगपर चित्तें पहात । पंचवृत्तींचा आश्रय घेत । त्यांच्या बुद्धीचा प्रकाशक असत । चिंतामणि हा ज्ञात सर्व ॥१४॥
हा सर्व-सत्तात्मक असत । ऐसा विघ्नराज नामें ख्यात । म्हणोनी गणेशाहून नसत । जगी अन्य श्रेष्ठ कोणी ॥१५॥
तूं झालास विघन्युक्त । त्यालाचि शरण जावें निश्चित । त्या चिन्तामणी विघ्नहरा त्वरित । गणेश विनायका शरण जाई ॥१६॥
सूत पुढे गोष्ट सांगत । प्रजापति दक्ष ती ऐकून मुदित । विनयपूर्वक विचारित । पापनाशिनी पुढिल कथा ॥१७॥
दक्ष तेव्हां प्रश्न करित । कोण हा स्वानंदवासी असत । तो मी कसा जाणावा जगांत । ह्याचा मार्ग सांगा झणीं ॥१८॥
महाराजा त्या मार्गानें सतत । मी भजन करीन त्याचें अविरत । मुद्‌गल मुनी तेव्हा म्हणत । पुरातन इतिहास सांगेन तुला ॥१९॥
शिवपार्वतीचा संवाद झाला । तो सर्वही मज आठवला । सांगतो सर्वही तो तुजला । जैसा घडला तैसाची ॥२०॥
एकदा कैलास गिरीवर । सुखांत बैसला महेश्वर । पार्वती होऊन ते विनमर । स्मितमुखी तेव्हा विचारिते ॥२१॥
शिवा तुम्ही पूज्य स्वामी असता । सकल देवनागराक्षसांचे तत्त्वतां । त्यांचे सर्वाधीस स्वामी संशयातीता । पदप्रदाता पुरातन ॥२२॥
माया विकारविहीन । म्हणोनी शिवनामें ख्यात महान । ऐसें असून ध्यान । कोणत्या देवाचें करता तुम्ही? ॥२३॥
समाधी कोणाची लाविता । चित्ती कोणातें स्मरता? । तुम्हांहून श्रेष्ठ देव कोणता । ऐकला वा न पाहिला ॥२४॥
हें सारे स्पष्ट सांगावें । तुम्ही कोणाचे गुण गावे । ज्याला वंदितें मनोभावें । सारे जग निरंतर ॥२५॥
ऐसें विचारितां महादेव सांगत । आदरें वेदमान्य जें सार असत । ब्रह्मभूयकर परम शाश्वत । पार्वतीसी त्या वेळीं ॥२६॥
ज्याचें ध्यान अहर्निश करितो । त्या देवाचें नाव सांगतो । गणेशास हृदयीं आठवितों । स्वानंदवासी जो आत्मरुप ॥२७॥
गणेश तो ना साकार । परी सर्वथा ना निराकार । मनोवाणी विहीन अपर । मनोवाणी अतीत तो ॥२८॥
शिवाचें वचन ऐकून । पार्वती प्रेमें बोले नमून । भावपूर्वक आस्था ठेवून । कोण हा गणेशनामक प्रभू ॥२९॥
तो कैसा राहतो हृदयांत । स्वानंदवासी कोठे असत । जेथें सदैव तो निवसत । तें सर्व सांगा मजलागी ॥३०॥
तो जरी ना साकार । तैसाचि नसे निराकार । जनांसी ज्ञात कैसा तर । मनोवाणी जो ॥३१॥
मनोवाणीचा ईश असत । ध्यान त्याचें अशक्य वाटत । जरी महेश्वरासीही सतत । आपण कैसें ध्यान करता ॥३२॥
हें सर्वही मज सांगावें । प्रभो तव दासीस कृतार्थ करावें । गणेशाचें ध्यान बरवें । महादेवा कैसें करुं? ॥३३॥
जरी तुम्ही ध्यान करता । तरी मीही तें करीन आतां । साक्षात्कारें कृतकृत्यता । तुमच्या प्रसादें मिळवीन ॥३४॥
यांत संशय कांहीं नसे । ऐसे पार्वते म्हणतसे । मुद्‌गल तेव्हा सांगत असे । महादेवाचें उत्तर ॥३५॥
भक्तीनें आदरयुक्त विचारित । देवी म्हणोनी तुष्ट होत । गणेशमार्गानुकरणा सुपात्र वाटत । म्हणोनी वदती प्रेमभावें ॥३६॥
कथिन तुजला प्रिय तूं मम । गुह्यांतले गुह्य परम । वेदशास्त्रांचे रहस्य अनुपम । ज्यांहून श्रेष्ठ अन्य नसे ॥३७॥
दक्ष मुद्‌गला तेव्हां म्हणत । तुझ्या वाक्यामृतानें मी तृप्त । उमामहेशसंवाद पुनीत । योगीन्द्रा मज आणिक सांगा ॥३८॥
सोत म्हणती मुद्‌गल मुनी । दक्षाचें भावयुक्त वचन ऐकोनी । मानसीं संतोष पावोनी । सांगू लागले कथा पुढें ॥३९॥
गणेशाचें हृदयीं ध्यान । तैसेंची स्मरण महायशें त्या करुन । प्रतापी गाणपत्य बोले वचन । महादेवी पार्वतीसी ॥४०॥
जें जें चित्तापासून उत्पन्न । तें तें मायामय असून । जें जें चित्तप्रवेशहीन । मायातीत तें ते सारें ॥४१॥
ऐसें मायामय मायातीत । द्विविध रचिलें तो ससंवेद असत । गणनायक तो तेजयुक्त । त्याचा विशेष जाणावा ॥४२॥
अंतर्यामी तो असे दिसत । योगपारंगत योग्यांसि त्वरित । म्हणोनी वेदवादी त्या संबोधित । स्वानंदवासी नांवाने ॥४३॥
चित्ताच्या पंचभूतींचा । प्रकाशकर तो साचा । चिन्तामणि ह्या ख्यातीचा । हृदयीं तो प्रभू राहातसे ॥४४॥
गणधातू समूहार्थ । त्या गणांचा स्वामी समर्थ । गणेश्वर हा परमार्थ । अभेदयोगें ध्यायिजे ॥४५॥
मुद‌गले तेव्हां सांगत । पार्वती बोले विनयान्वित । शिववच रम्य ऐकून पुनीत । चकित होऊन हितकर ॥४६॥
भगवन्ता कूटवचन । कथिलें योगभावित परम पावन । परी माझें समाधान । पूर्णपणें न जाहले ॥४७॥
तरी कृपया सुलभ करी । ब्रह्म मायामय जरी । मायाहीनही तें कैसें तरी । विस्तारानें सांगा मज ॥४८॥
मुद्‌गल तेव्हां म्हणत । शक्तीचा प्रश्न ऐकून तृप्त । शंभू सुयोगज्ञ रोमांचित । साश्रुनेत्र भक्तिपूर्ण ॥४९॥
महायश तो प्रशंसून । आदिमाया ती प्राचीन । उद्युक्त झाला आनंदून । योगमाग वर्ण करण्या ॥५०॥
योगमार्गाचें विवरण । सांगतों तुज त्याची खूण । बरवा प्रश्न केलास म्हणून । मोद वाटला मानसीं ॥५१॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोनिषदि श्रीमन्‌मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुंड चरिते पार्वतीप्रश्नविचारो नाम पंचमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP