मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ६८ वा

काशीखंड - अध्याय ६८ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्तीसी वेद शिव कुमर ॥ म्हणे परियेसीं दक्षाचा अध्वर ॥ श्रवण पठनें होतसे संहार ॥ मनोमळाचा ॥१॥
राजा महादानी प्रजापती ॥ यागीं पाचारिले त्रैलोक्य भूपती ॥ स्वामींसी म्हणे मुनि अगस्ती ॥ तें परियेसीं आतां ॥२॥
प्रथम पाचारिले दधीचि ऋषी ॥ एकांतीं आलोच केला तयासीं ॥ दक्ष राजा म्हणे गा महा ऋषी ॥ परिसा वचन माझें ॥३॥
सर्व देव अत्यंत प्रीतीं ॥ पाचारीन इंद्रा दिक भूपती ॥ परी तो माजे यज्ञीं पशुपती ॥ आणीं नाचि मी सर्वथा ॥४॥
दधिचि म्हणे गा ब्रह्म सुता ॥ जें अत्यंत प्रिय तुमच्या चित्ता ॥ तेंचि आरंभूं परी विलंब आतां ॥ न कीजे यागासी ॥५॥
सहस्त्र वर्षे पर्यंत गीर्वांण ॥ त्यांसी अप्राप्त जाहालें भाग दान ॥ त्यांचा तपतरणि उदय जो यज्ञ ॥ तुझिया गृहीं ॥६॥
हर्षें निर्भर दक्ष प्रजापती ॥ पाचारिले देव दिक्पती ॥ मग ते ब्रह स्त्पतिपुराप्रती ॥ आले कवण कैसे ॥७॥
तेहतीस देव परिवार ॥ सत्यवती सुंदरी जयंत कुमर ॥ कश्यप अदितींचा सुत वज्र धर ॥ आला गज वहनें ॥८॥
तीन कोटी सैन्येंसीं मेषवाहन ॥ ज्वालिनी दहनी प्रियांसीं हुता शन ॥ तो शुचिस्मिता वैश्वानराचा नंदन ॥ आला गार्हपती ॥९॥
चतु र्दश कोटी सैन्य ॥ धर्म राज महिष वाहन ॥ तो संज्ञा-मार्तंडाचा नंदन ॥ यम आला असे ॥१०॥
चार कोटी सैन्य अति क्रूर ॥ सूकर वाहन त्रिषिणी सूंदर ॥ तो शिव गौरींचा कुमर ॥ निऋति आला ॥११॥
अष्ट कोटी जयाचें परिवार सैन्य ॥ पावनी प्रिया सहित शशकवाहन ॥ तो कश्यप-दितींचा नंदन ॥ मरुत आला ॥१२॥
साठ कोटी जयाचा परिवार ॥ वाहन पालाणिला जी मगर ॥ जलसेना प्रियेसीं कर्दम कुमर ॥ वरुण आला ॥१३॥
अत्रि ऋषीचा जो वीर्यांकुर ॥ रोहिणी-कृत्तिकांचा प्रिय्वर ॥ तो मृग वाहन अमृतकर ॥ आला सहप्रियांसीं ॥१४॥
ऐसे दिक्पती महादू भुत ॥ आले दक्षाचे जामात ॥ परी नाहीं आला तो कांत ॥ दाक्षा यणीचा ॥१५॥
त्रयो दश पति व्रता जयासी ॥ तो कश्यप आला सकळ स्त्रियांसीं ॥ दक्ष राजाचे बंधु प्रियांसीं ॥ आलें कैसे ॥१६॥
श्रेष्ठ बंधु आला मरीचि ज्ञाता ॥ संभूतिनामें जयाची पति व्रता ॥ तो विधीचा कुमर सृष्टिकर्ता ॥ आला यागासी ॥१७॥
दुसरा बंधु वसिष्ठ महामुनी ॥ अरुंधती पति व्रता घेऊनी ॥ आला दक्षाचे याग स्थानीं ॥ यज्ञासिद्धी कारणें तो ॥१८॥
यक्ष रजाचा जो पितर ॥ तो पौलस्ती नाम प्रियेचा वर ॥ महायज्ञकारक मुनिवर ॥ त्रैलोक्य मंडळी ॥१९॥
अंगिरा आला जी महाविधाता ॥ जो महासाधु देव गुरूचा पिता ॥ सवें स्मृतिनामें पति व्रता ॥ तयाची अंगना ॥२०॥
क्रतु आला जी महा विधानी ॥ संतती नामें जयाची गृहिणी ॥ तो सर्व ज्ञासिंधु महा मुनी ॥ आला यागासी ॥२१॥
अत्रि ऋषि आला महा सिद्धू ॥ जो सूर्य याग कारक महासाधू ॥ अन सूया पति व्रता वधू ॥ बंधू दक्षाचा ॥२२॥
नाना यागीं दिव्य पूज्य ॥ तो शुक्रच्य वनांचा पूर्वज ॥ सवें पुलोमा स्त्री धात्रात्मज ॥ तो भृगु आला यज्ञासी ॥२३॥
ऐसे हे दक्षरायाचें बंधू ॥ महाज्ञानी पतिये साधू ॥ ते सप्त ऋषी मंत्र सिंधू ॥ आले यागासी ॥२४॥
आतां असो हा यागाचा परिवार ॥ दक्षानें केला प्रदीप्त अध्वर ॥ यज्ञ दीक्षा घेऊनि तत्पर ॥ बैसला विधिनेमें ॥२५॥
भृगु आचार्य केला हवनीं ॥ महा ऋषीश्वर गर्जती वेदध्वन ॥ अवदानें समर्पिती हवनीं ॥ काळवंडला याग ॥२६॥
कीं तेथें नाहीं तो त्रिपुरहंत ॥ म्हणोनि अवदानें न भक्षी हुत ॥ रुद्र भागेंविण त्यासी आकांत ॥ जाणावला पैं ॥२७॥
तंव हें ठाऊक झालें नारदासी ॥ तेणें पूर्वद्वंद्व स्मरिलें मानसीं ॥ म्हणे कलह जोडला अनायासीं ॥ आनंदे मनीं ॥२८॥
म्हणे दक्षें कैसा मांडिला याग ॥ शिवाविण कैसे भक्षिताती भाग ॥ बरवा ओढवला हा प्रसंग ॥ माझें इच्छेचा ॥२९॥
मग आनंदला नारदमुनी ॥ कांहीएक स्मरता जाहाला मनीं ॥ मग उमपला कैलासभुवनीं ॥ क्षणमात्रें पैं ॥३०॥
मग मेरुचे शृंगी चारी कोटी योजन ॥ तेंचि स्थापिलें कैलासभुवन ॥ तेथें त्रिपुरांतकाचें निजस्थान ॥ ध्यानस्थळ जें कां ॥३१॥
तंव नारदें देखिली योग माया ॥ सांगातें षोडश जणी सखिया ॥ वेदव्ययाख्यानीं शिव प्रिया ॥ क्रीडती सर्व काळ ॥३२॥
शिव गेला होता निरंज नवनीं ॥ नार दासी देखती जाहाली भवानी ॥ ते हर्षली पितृबंधु म्हणोनी ॥ केला बहु आदर ॥३३॥
मग वदती जाहाली दक्ष दुहिता । काया पां कृपा केली जी ताता ॥ कांहीं श्रवण कीजे पां वार्ता ॥ त्रैलोक्यांतील आम्हां ॥३४॥
तंव नारद म्हणे दक्ष बाळी ॥ आम्हांसी गमन करितां भूमंडळीं ॥ कांहीं अपुर्वता देखिली ॥ त्या नैमिषारण्या माझारी ॥३५॥
याग मांडिलासे तुझ्या पित्यानें ॥ सर्व देव भक्षिताती अवदानें ॥ तेथें मी नदेखें त्रिनयन ॥ आणि तुज दक्षा यणी ॥३६॥
तुझ्या बहिणी आलिया समस्ता ॥ यज्ञ मंडपीं मिरवती पुण्यलता ॥ नाना रत्न दिव्यांबरीं पूर्णता ॥ श्रृंगारें आथिलिया ॥३७॥
प्रसूता जननी तुजकारणें ॥ थोर उत्कंठित झालीसे मनें ॥ म्हणेनि तिनें सेविलें वन ॥ चिंतार्णवीं ॥३८॥
इतुकें बोलोनि सरला नारद ॥ तंव उमा बोलिली प्रति शब्द ॥ आमुचा मानिला दीर्घ खेद ॥ दक्षराय पितयानें ॥३९॥
आम्हांसी न पाठवीचि अक्षता ॥ तरी परिसें गा महामुनि ताता ॥ प्रति आदरेंविणा जतां ॥ दीर्घ अपमान ॥४०॥
ऐसें अनुवादिली दाक्षायणी ॥ मग उछवास सोडिला उद्वेगुनी ॥ तंव प्रत्युत्तर वदला मुनी ॥ भवानी प्रती ॥४१॥
आपुले पितृगृहासी क्रमितां ॥ कासया प्रती आदर अक्षता ॥ दक्ष याग आतां करील मागुता ॥ कोणे काळीं कवण जाणे ॥४२॥
आतां शिवा घेऊनि वेगेंसीं ॥ तुवां जावें यागासी ॥ इतुकें सांगोनि दाक्षा याणीसी ॥ निघाला नारद ॥४३॥
तंव शिव होते निरज नवनीं ॥ त्या ब्रह्माक्षर अजपाध्यानीं ॥ जैसा तत्पदार्थ देहदर्पणीं॥ लक्षी तसे चैतन्यासी ॥४४॥
तैसा ध्यानस्थ होता गजांबरी ॥ उमा गेली ज्ञान शक्ती चिया परी ॥ तंव तो सहजेंचि त्रिपुरारी ॥ विसर्जी ध्यान ॥४५॥
उमा येतां देखिली सामोरी ॥ तों श्वासें स्फुंदतसे घ्राणस्वरीं ॥ चक्षु स्त्रवती पूर्ण नीरीं ॥ सोमकांत जैसे ॥४६॥
श्रोता कोपेल या द्दष्टांत उपमा ॥ तेथें सोमकांत कैंचा तो चंद्रमा ॥ परियेसी जी श्रोतोत्तमा ॥ द्दष्टांत युक्ती ॥४७॥
सोमकांत भवानीचे चक्षु मंडळी ॥ तो शशि देखिला शिवाचे मौळीं ॥ कीं ते कुमुदिनी जैसी कमळीं ॥ शशि प्रकाशें ॥४८॥
तैसी प्रेमभरित दक्ष नंदिनी ॥ शिवा जवळी आली अधोवदनी ॥ तंव प्रश्निता जाहला शूलपाणी ॥ दक्ष कुमारीसि ॥४९॥
तंव ते गहिंवरें अति दाटली ॥ अधिकाधिक स्फुंदों लागली ॥ कीं रवि प्रकाशें काळवंडली ॥ शशिकळा जैसी ॥५०॥
शिव म्हणे वो माझे प्राणेश्वरी ॥ किमर्थ आक्रंदसी दीर्घस्वरी ॥ कवण इच्छा उद्भवली शरीरीं ॥ ते श्रवण करवी आम्हां ॥५१॥
परी प्रत्युत्तर न करीचि जगन्माता ॥ व्योम गर्जवीतसे आक्रं दतां ॥ ह्रदय निरोध करी मागुता ॥ योग लक्षणें ॥५२॥
मग शंकरें हस्तीं स्पर्शिली ॥ मग जानूवरी नैसविली ॥ मुख चुंबो नियां कुरवाळिली ॥ आपणा सन्मुख ॥५३॥
मग शंकर म्हणे द्क्षात्मजे ॥ माझिजे चित्त वृत्तीं तूं इच्छा सहजे ॥ योगियां परमज्ञानबीजे ॥ करीं प्रत्युत्तर मज ॥५४॥
शिव भक्तिरत झाला जाणोनि ॥ मग आरंभिली मधुरवाणी ॥ प्रत्युत्तर वदे दाक्षा यणी ॥ शंकरा प्रती ॥५५॥
म्हणे अनाथ चक्रवर्ती ॥ भकां देसी सायुज्यमुक्ती ॥ इच्छा पूर्ण करी पां पशुपती ॥ सर्व भक्तज नांची ॥५६॥
मी क्रीडत होतें निज मंदिरीं ॥ गद्यपद्यनिधि सखिया सुंदरी ॥ तंव म्यां जातां देखिलिया कुमारी ॥ सुरवरां चिया ॥५७॥
शिव मी कथूं किंचित ॥ जें विज्ञा पावें तें तुम्हां आधीचि श्रुत ॥ तुम्ही समर्पितां अकल्पित ॥ तें सहजार्थ असे ॥५८॥
तरी माझिया पितृ मंदिरीं ॥ याग आरं भिला बरवियापरी ॥ सर्व देव गेले सुंदरी ॥ सहवर्त मान ॥५९॥
तरी आपणही जाऊं यागासी ॥ शोभाय मान करूं मंडपासी ॥ बह्य काळ झाले प्रसूता मातेसी ॥ भेटी झाली नाहीं ॥६०॥
तंव शंकर वदे प्राणेश्वरी ॥ आम्ही न जाऊं दक्षाचे अध्वरीं ॥ अक्षते विरहित यागस्वयंवरीं ॥ न जाइजे सर्वथा ॥६१॥
जेथें नाहीं आदर सन्मान ॥ तो काय कामाचा सज्जन ॥ ऐसा तो प्रापंचिक दुर्जन ॥ दुरा विजे दूरी ॥६२॥
तंव भवानी वदे शंकरा ॥ सन्मा नेंविण जाय तोचि सोयरा ॥ तरी शिवा तया चिया उपकारा ॥ तुळिजे मेरुस्पर्धा ॥६३॥
तो सखा अनुपम मानिजे ॥ तंव शंकर वदे दक्षात्मजे ॥ ऐसें ज्ञान जयासी तेथें क्रमिजे ॥ यथोक्त भावें ॥६४॥
तरी दक्षासी नाहीं ऐसें ज्ञान ॥ ज्या यागीं नाहीं आदर सन्मान ॥ तो आपणांसी देखोनि होईल क्रोधाय मान ॥ पर्वतीं अग्नि जैसा ॥६५॥
तरी प्रहरिजे तो अति निंद्क ॥ कीं घृतें शिंपिजे पावक ॥ कीं उरग पक्षीं पडे रंक ॥ ऐसा गर्विष्ठ तो ॥६६॥
तरी दाक्षायणी या कार्यासी ॥ तुम्हीं न जावें निश्चयेसी ॥ आतां दक्षमुख तें आम्हांसी ॥ कदाही न व्हावें दृश्य ॥६७॥
मग दाक्षायणी म्हणे शंकरा ॥ आम्हां तरी आज्ञा कीजे हरा ॥ मी तुम्हांआधीन असें विश्वंभरा ॥ न व्हावें कठोर तुम्हीं ॥६८॥
माझी परिसा जी विनवणी ॥ तुम्ही निष्ठुर जी भाललो चनीं ॥ तुम्हांसी नाहीं जनक जननी ॥ सर्वां अगोचर तुम्ही ॥६९॥
अष्टादश पुराणें कथितां ॥ चतुर्वेदवाक्य श्रवण करितां ॥ परी तुमचा जो जनक जनिता ॥ नायकों श्रवणीं ॥७०॥
माता पितरांचा जो कळवळा ॥ तें ममत्व तुम्हां अगम्य जाश्व नीळा ॥ तूं अलिप्त सुखदुःखां वेगळा ॥ हें न कळे तुम्हां ॥७१॥
पुत्र प्रजा नाहीं तुमचें पोटीं ॥ वांच्छानिर्भर्त्सना करितां धूर्जटी ॥ हे माया लोभाची पूर्ण आगटी ॥ ते भासे जी तुम्हां ॥७२॥
तुम्ही हरितां त्रिविधता पज्वर ॥ म्हणोनि नाम तुम्हांसी सगुण हर ॥ तुम चिया प्रत्युत्तरा होतां फेर ॥ परी न व्हावा दक्षदंड ॥७३॥
तुम्ही अलिप्त जी सुखदुःखांसी ॥ माझे साष्टांग तुमचे चरणांसी ॥ शिवा मी जन्मो जन्मीं होईन दासी ॥ मज आज्ञा दीजे स्वामिया ॥७४॥
ऐसें गिरिजेचें प्रत्युत्तर परिसोनी ॥ ममत्वें झळं बला शूल पाणी ॥ म्हणे आजि तूं मज दाक्षा यणी ॥ अंतरलीस सर्वथा ॥७५॥
आतां भेटसी कवणिये जन्मीं ॥ स्वस्थ असतां असतां कां पडसी होमीं ॥ बोळवीत निघाले शिव स्वामी ॥ ते दक्ष बाळीसी ॥७६॥
ते मागुती न ये जी परतोन ॥ शरीराचें करील अवदान ॥ दक्ष यागासीं करा वया विघ्न ॥ निघाली उमा ॥७७॥
नंदी पालाणिला महा दूभुत ॥ सवें सैन्य दिधलें जे बहुत ॥ अष्ट भैरव आणि मणिमंत ॥ पूर्ण भद्र तो ॥७८॥
भृंगी रिटी भूत भार अमित ॥ झेलितां त्रिशूळ पत्रें उसळत ॥ म्हणती हवनी होऊं गा तृप्त ॥ भवानीचे पितृ गृहीं ॥७९॥
शिव गेला निरंन वना ॥ परी त्याग केला गृह भवना ॥ म्हणे या काळा पासूनि अंगना ॥ विभक्त जाद्दली आम्हा ॥८०॥
भवानी आरूढली नंदी पृष्ठीं ॥ उतरली मेरूच्या तळवटीं ॥ नैमिषारण्य लक्षूनियां द्दष्टीं ॥ आली बृहस्पातिपुरा ॥८१॥
याग धूम्र देखिला दुरूनी ॥ ऐकोनि वेदाची दीर्घ ध्वनी ॥ मंत्र विधीचा निर्घेष हवनीं ॥ पडती अव दानें ॥८२॥
तंव रूप पालटूनि नंदिकश्वर ॥ अति संकीर्ण जाहाला शरीर ॥ मुखीं लाळ प्रवाहे घ्राणीं स्वर ॥ धीरत्व नाहीं ॥८३॥
अंगीं संपूर्ण रोमावळी ॥ गोम याचा सडा गुद मंडळी ॥ मूत्रीं निरोध नाहीं यागस्थळीं ॥ भणाणिले भंगाट ॥८४॥
सखोल झाले नेत्र गळती लशी ॥ व्योपम पर्यंत शृंगनळिका जैसी ॥ मंडपीं स्शिर करूनि भूतें पिशीं ॥ आपण गेली मंदिरी ॥८५॥
मंदिरी प्रवेशली दक्ष नंदिनी ॥ प्रीतीनें भेटली प्रसूता जननी ॥ शृंगार मंडित जाहाल्या बहिणी ॥ छत्र मंचकीं बैसल्या ॥८६॥
मातेनें ह्रदयीं आलिंगिली ॥ भवानीचीं आभरणें अवलो किलीं ॥ कन्येचीं भूषणें देखोनि जाहाली ॥ दुःखित मनीं ॥८७॥
भगवीं परि धाने शंख मुद्रिका ॥ श्रवणीं ताड पत्राची कर्णिका ॥ भस्म लेपिलें रुद्राक्षमालिका ॥ मिरविती कंठीं ॥८८॥
एकचि जटा जाहा लीसे वीर गुंठी ॥ शंखमण्याचे हार कंठीं ॥ विभूतीचा त्रिपुंड ललाटीं ॥ अर्धशशी जैसा ॥८९॥
ऐसी देखोनि ते द्क्ष बाळी ॥ प्रसूतीसी आली कळ वळी ॥ तेव्हां न सांवरेचि चक्षु मंडळी ॥ आले अश्रुपात ॥९०॥
शंखमणी टाकिले तोडूनि तिनें ॥ मग आपुले करींचीं ककणें ॥ रत्न जडित बांधिलीं प्रसूतीनें ॥ पार्वतीचें करीं ॥९१॥
प्रसूता वदे गृहस्थ कन्यांसी ॥ तुम्ही क्षेम दीजे अंबेसी ॥ येरी म्हणती आमुचे वस्त्रांसी ॥ भगवा गेरू लागेल ॥९२॥
तंव नावेक सन्मुख ठाकली अदिनी ॥ प्रश्निती जाहाली धरोनि हस्तीं ॥ कवण वस्तु आणिली आम्हां प्रती ॥ श्रेष्ठ बहिणी ॥९३॥
तुझ्या गृहीं भांडारी वो कुबरू ॥ आणि तुज कां शंख मण्यांचा शॄंगारू ॥ कल्पतरु असतां वस्त्रांसी गेरू ॥ लाविली कां वो ॥९४॥
तुझिया गृहीं काम धेनूंचीं गोधनें । म्हणतांचि स्त्रवती इच्छा भोजनें ॥ आणि तूं का कृश जाहालीस शक्तीनें ॥ भक्ष्यें विण जैसी ॥९५॥
तंव कद्रू म्हणे वो बहिणी ॥ तूं काय पुससी पिशा चिणी ॥ इच्या गृहीं कल्प वृक्ष चिंतामणी ॥ ते तुज ठाउके नाहीं ॥९६॥
काम धेनूचें गोमय नित्य यांसी ॥ भस्म धूळी पाहिजे लेपाव यासी ॥ कल्प वृक्ष पाहिजे बैसावयासी ॥ छाये कारणें ॥९७॥
त्रिशूळ पत्र टेंकोनियां मूळीं ॥ द्रुमल तेसी घालो नियां झोळी ॥ अमित चिंतामणी पडले जवळी ॥ शंखमणी स्फटिक ॥९८॥
वस्तु काय आणिली प्रश्निसी तरी ॥ आतां भिक्षाटन करील नगरीं ॥ याग होताती बहुतां घरीं ॥ आणील भूक्ति आतां ॥९९॥
तंव बोलती दिति आणि षण्नेत्रा ॥ हे काय भाळली त्या पंचवक्त्रा ॥ चर्मपरिधान तो तरु पत्रां ॥ वरी शयन करितो ॥१००॥
तो ठाऊक आहे हो भस्म धारी ॥ भक्ष्य भोज्याचें तरी दैन्य घरीं ॥ इनें आवडीनें घेतला भिकारी ॥ जन्मां तरींचा पैं ॥१०१॥
हे नांवासी भाळली तो ईश्वर ॥ सवें चाले पिसाटांचा भार ॥ यांचें थोर भाग्य तो ढोर ॥ सभामंडपीं बांधिलासे ॥१०२॥
मग बोलिली ते हिरण्य प्रभा ॥ इनें मंद केली मंडप शोभा ॥ मातेसी म्हणती त्वां वायां गर्भा ॥ यत्न कां केला ॥१०३॥
दक्षतिता लाज विला इनें ॥ या मंडपीं दवडिला आमुचा मान ॥ आम्हांसी हे बहीण भिकारीण ॥ आली कोणी कडोनी ॥१०४॥
ऐशा आपुलाले परी चित्त ॥ त्यांहीं निंदिली जगन्माता ॥ ते ऊर्ध्व न पाहेचि तत्वतां ॥ राहिली अघोद्दष्टी ॥१०५॥
मंडपीं भूतें धांवती सैरें ॥ सूक्ष्म करचरण दीर्घोदरें ॥ मंदिरी प्रवेशतां भयासुरें ॥ भैरवपिसाटें ॥१०६॥
एक भय भीत जाहाल्या कुमरी ॥ एकी मारूनि घालिती बाहेरी ॥ नंदी सोडू नियां दंडावरी ॥ ताडिती एकी ॥१०७॥
ऐसा अपमान देखोनि अंबिका ॥ ह्रदयीं संतप्त जाहाली देखा ॥ मग ते बाहेरी आली नायिका ॥ त्रिपुरां तकाची ॥१०८॥
दक्षें यज्ञ दीक्षा घेतली साचार ॥ म्हणोनि मौन धरिलें निरंतर ॥ द्दष्टीं देखिली परी प्रत्युत्तर ॥ न करीचि अंबिकेसी ॥१०९॥
क्रोधें आली यज्ञकुंडा जवळी ॥ यागस्थिति पाहे चक्षु मंडळीं ॥ तंव रुद्र भाग ते काळीं ॥ न देखोचि तेथें ॥११०॥
दक्षासी वदे प्रतिवचन ॥ कैसेनि सिद्धी पावेल हें हवन ॥ येथें नाहीं रुद्राचें भाग दान ॥ निष्फळ हा याग ॥१११॥
दक्षा तुवां निंदिला रे शंकर ॥ आणि अविधि आरंभिला रे अध्वर ॥ तूं नेणसी हा त्रिविध अंगार ॥ शिवचि बोलिजे ॥११२॥
तूं कैसा आरंभिला याग ॥ कां राखिला शिवाचा यज्ञ भाग ॥ असतां चक्षु तूं आड मार्ग ॥ जातोसी कैसा ॥११३॥
अरे हा मृगे शाचा कवळ ॥ कैसा जीर्ण करील जंबुक बाळ ॥ परी तो वमूनि काढील शार्दूळ ॥ आपुलेनि प्रतापें ॥११४॥
अरे गर्विष्ठा महा अविचारा ॥ तूं जवळीचि पाहें पां शंकरा ॥ जो त्रिगुणात्मक शरीरा ॥ कवण व्यापक असे ॥११५॥
ऐसें अनुवादली दक्ष कुमारी ॥ परी तो न बोलेचि प्रत्युत्तरीं ॥ यज्ञ दीक्षा घेतली मौनाचारी ॥ जाहालासे म्हणोनी ॥११६॥
मग उमा जाहाली कोपें क्रूर ॥ तेथें स्तब्ध देखती सुरवर ॥ यानंतरें ऋषि मुनिवर ॥ क्षण एक हवितां रहिले ॥११७॥
अंबिका म्हणे दक्ष राजा ॥ मज देखोनि मानि तोसी लज्जा ॥ तरी तुझें वक्त्र मी सहजा ॥ न देखें आतां ॥११८॥
दग्धोनि हें निंद्य शरीर माझें ॥ न दिसे आत्महित तुझें ॥ तुज शिर कमळाचें जाहालें ओझें ॥ यागगर्वे करोनी ॥११९॥
तुवां गर्वें अविचार केला ॥ परी तो शंकर मज विमुख झाला ॥ तुझा अभिमान आडवा आला ॥ तिहीं तालांचा ॥१२०॥
दक्ष तुवां गर्वें अविचार केला ॥ परी तो शंकर मज विमुख झाला ॥ तुझा अभिमान आडवा आला ॥ जैसा रंजे सूर्य लोपे ॥१२१॥
मज निषेधिलें देखती सुर ॥ तेणें अपात्र जाहालें माझें शरीर ॥ आतां अग्निपुटीं करीन सार ॥ विश्वनाथा योग्य ॥१२२॥
दक्ष न बोले न पाहे नयनीं ॥ मंत्र विधीनें हवित होते हवनीं ॥ त्या अवदा नाचे हावक मुनी ॥ स्थिर जाहाले तेथें ॥१२३॥
ऐसिया कठिण प्रत्युत्तरीं ॥ बोलूनि आवे शली क्रोंधें थोरी ॥ याग पात्रें विध्वं सिलीं प्रहारीं ॥ उभय पदीं ॥१२४॥
मन हव नाचे पूर्व पारीं ॥ पद्मा तनीं बैसली पाठमोरी ॥ मूळ साधूनि आधारीं ॥ घातला मूळबंध ॥१२५॥
तेथें अपानासी प्रीति करूनी ॥ प्रदीप्त केला ब्रह्माग्नी ॥ कीं योगेश्वर साधी गोरांजनी ॥ महासिद्धीतें ॥१२६॥
तो जैसा करी मळ मूत्रांचें दहन ॥ सप्तघातु शरीर होय शुद्ध सुवर्ण ॥ तैसें त्या अध्वरीं योग साधन ॥ मांडिलें भवानीनें ॥१२७॥
वोडी बंद घातला दशदळीं ॥ जालंधर पडिला विशुद्ध मंडळी ॥ मग त्रिबंध उन्मनी तत्काळी ॥ काकिनी मुख ॥१२८॥
मग कुंडलिनी वंकनाळातें ॥ गळाली पवनाचेनि उन्मतें ॥ ते एकवीसही मन कुळातें ॥ भेदूनि गेली ॥१२९॥
तेथें मिश्रित केले त्रय वन्ही ॥ दक्षिण आहवनीय गार्ह पत्याग्नी ॥ क्षर भाव शरीरेंसीं हवनीं ॥ केला रुद्र भाग ॥१३०॥
त्रय अग्नि चेत विले शरीरीं ॥ ज्वाला उद्भवल्या घ्राणस्वरीं ॥ चक्षु मंडळी व्योमद्वारीं ॥ प्रदीप्त झालिया ॥१३१॥
जैसा कर्पूररा शीचा दीर्घ कोष्ठ ॥ दग्धितां न दिसे सुनीळ शिष्ट ॥ कीं तो तमो गुणेंचि नील कंठ ॥ दग्धींत तियेसी ॥१३२॥
नातरी शिवाची आज्ञा करूनी ॥ दक्ष यागासी आली भवानी ॥ यास्तव कोपला तो शूळपाणी ॥ दग्घिली यागरूपें ॥१३३॥
कीं जैसें जीवनीं मिळे जीवन ॥ कीं वन्हीस मिळे हुता शन ॥ तैसी ते शंकराची इच्छा पूर्ण ॥ मोडिली शंकरें ॥१३४॥
शिव तो ब्रह्म होता निराकार ॥ निराकार तें बोलिजे अक्षर ॥ इच्छा उद्भवली मग तो क्षर ॥ सहजेंचि असे ॥१३५॥
या प्रत्युत्तराचे साक्षीकारणें ॥ जेथें वेदांत सिंहाचें गर्जणें ॥ मग अनृत कीं वदती पुराणें ॥ जंबु करूपें ॥१३६॥
अगस्ति वदे जी शिव कुमरा ॥ निराकार बोलिजे अक्षरा ॥ तरी तें क्षर कैसें बोलिजे दातारा निरूपावें मज ॥१३७॥
अगस्तीसी वदे शिव नंदन ॥ तरी ऐसे ते पर ब्रह्मीं निर्गुण ॥ जैसें चौसष्टिक सुवर्ण ॥ अलकार क्षर ॥१३८॥
बहुतां शिळां पाहिजे कसवटी ॥ परी अलंकारांसी न ये तुटी ॥ तैसें ब्रह्म सगुण घटो घटीं ॥ परी न सरे निगुण ॥१३९॥
तडागीं वाषीं कूपोदकीं पाहातां ॥ प्रतिबिंबतसे सवितां ॥ तेंचि गा क्षर अगस्ति महंता ॥ न सरे तो दिनमणी ॥१४०॥
म्हणोनि क्षर हेचि इच्छा घट ॥ यास्तव सगुण जाहाला नीलकंठ ॥ हें अनृत करा वया काय संकट ॥ धीत पणें प्रसादिकांच्या ॥१४१॥
आतां असो हे परमार्थ वाणी ॥ यागीं हुत जाहाली ते भवानी ॥ सर्व देव ऋषीं देखतांचि वन्हीं ॥ हविलें शरीर ॥१४२॥
बैसले महा मंत्री मुनिवर । दक्ष करीचा ना प्रत्युत्तर ॥ ऐसें देखोनि नंदिकेश्वर ॥ क्रोधायमान झाला ॥१४३॥
भूतें आवेशलीं तये काळीं ॥ विग्रह केला यागस्थळीं ॥ यज्ञ मंडपीं धांवती हाडळीं ॥ भूतें भैरवांची ॥१४४॥
यज्ञ समिधा होत्या संपूर्ण त्या ॥ भूतीं विध्वांसिल्या समस्ता ॥ कचोळें भरल्या होत्या अक्षता ॥ त्या करीं घेतल्या भूतीं ॥१४५॥
एक ते त्राहाटिती क्षितितळीं ॥ एक फोडिती यज्ञकारकांचीं मौळीं ॥ स्त्रुवे आसडोनि भूतळीं ॥ फोडिले भूतीं ॥१४६॥
यागणत्रें स्तंभीं आदळिती ॥ आचार्यांचे भार आसुडती ॥ दक्ष मंडपीं दीर्घ ध्वानीं गर्जती ॥ भैरवादिक ते ॥१४७॥
भूतीं विंध्वा सिला तो अध्वर ॥ मग काय करी तो नंदिकेश्वर ॥ स्त्रुवें ताडिले द्विजवर ॥ यज्ञ मंडपांत ॥१४८॥
नंदिकेश्वर कोपला जाणोनी ॥ माणिमंत महादभुत होता मंडप स्थानीं ॥ तेणें मंडपाचे स्तंभ झकटूनीं ॥ पाडिले क्षितितळीं ॥१४९॥
मंडप मिरवत होते दिव्यांबरें ॥ ते नंदीनें छेदिलें घ्राण स्वरें ॥ मंडप उडविप एक सरें ॥ गगनोदरीं ॥१५०॥
ध्वज पाडिला शृंगांवरी ॥ अन्योन्य केले धूळिधूसरी ॥ परी भुगु आचार्य ते अध्वरीं ॥ होता दीर्घ विंदानी ॥१५१॥
तेणें याग चेतविला मंत्र शक्तीं ॥ हवनीं महा ज्वाळा उदभवती ॥ शिव सैन्य जाळिलें किती ॥ भृगुवें तेणें ॥१५२॥
भूतांचे अंगीं दीर्घरो मांचकुळ ॥ तेणें झगटली अग्निज्वाळ ॥ मणिभद्र परा भविला तत्काळ ॥ भैरवदेवीं ॥१५३॥
नंदिकेश्वर वदे भूत भैरवां ॥ आतां मी विघ्न करीन सर्व देवां ॥ परी अनारिसें वाटेल शिवा ॥ दक्ष मारितां ॥१५४॥
दक्षें भवानीची केली निर्भर्त्सा ॥ मग देहें दग्धलीं अति क्रोशा ॥ तरी श्रुत करावें महेशा ॥ वहिलें चला ॥१५५॥
पुढें होणें असे घोरांदर ॥ यागीं पडेल दक्षाचें शिर ॥ ते कथा किल्षि दहन सविस्तर ॥ परिसा पुढें ॥१५६॥
भूतांसी ताडिलें होतें यागीं ॥ एकाचें रोम दग्ध केले होते अंगीं ॥ ते नंदीनें पुढें करो नियां मार्गीं ॥ लाविले कैला सींच्या ॥१५७॥
निघाले भूतें नंदी मणि भद्र ॥ आतां कोपारूढ होईल रुद्र ॥ कैसा उद्भवेल वीर भद्र ॥ दक्ष मर्दन तो ॥१५८॥
आतां एकाग्र श्रोता महा ज्ञानी ॥ काशीखंडकथा हा अविंध मणी ॥ तो बहुतां प्रयत्नें घालिजे श्रवणीं ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१५९॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दक्षचरित्रे दाक्षयणीदेहविसर्जनं नाम अष्टषष्टितमाध्यायः ॥६८॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP