मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ४० वा

काशी खंड - अध्याय ४० वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
अगस्ति वदे षडानना ॥ मम मनांकुरासी पूर्ण जीवना ॥ माझिया वियोगभागदाना ॥ समर्पिता तूं एक ॥१॥
तरी वानप्रस्थाश्रम तो कैसा ॥ कैसें क्रमिजे अरण्यवासा ॥ तरी निरुपा हो पूर्ण ईशा ॥ मजप्रती स्वामिराया ॥२॥
स्वामी म्हणे गा ऋषि समर्था ॥ ऐसा गृहस्थाश्रमीं वर्ततां ॥ शांति क्षमा नित्य शीलता ॥ आवागिजे हो गृहस्थें ॥३॥
पुढिलां संतोष तेंचि बोलिजे ॥ जीवूनि आत्मपद पाविजे ॥ संसारदुःखास्तव न कीजे ॥ आत्मनिंदा गृहस्थें ॥४॥
द्रव्य पाहूनि साहित्य कीज दानाचें ॥ तरी ते द्रव्य वेंचावे न्यायाचें ॥ ल्तें अल्पचि परी पूर्वजांचें ॥ पराभवा बंधन ॥५॥
स्वामी म्हणे गा अगस्ति सज्ञाना ॥ तूं श्रवणाचा परिपूर्ण जाणा ॥ हें सर्वही भाग्येंविण न पाविजे जना ॥ शुद्ध क्रियेवांचूनी ॥६॥
क्रियेविण नोहे सुबुद्धी उत्तम ॥ सुबुद्धीविण नेण गा धर्म ॥ धर्मैविण निष्फळ हा जन्म ॥ जे सुख नोहे अनुमात्र ॥७॥
म्हणोनि धर्म तो सर्वांसी कारण ॥ धर्म तो सत्पात्रीं दान ॥ तरी ऐहिकं पारत्रिकासी पावन ॥ तोचि सुखी गृहस्थ म्हणावा ॥८॥
ऐसें गृहस्थाश्रमाचें आचरण ॥ जरी वैराग्य उद्भवे मन ॥ स्त्री पतिव्रता असे सुगुण ॥ तरी समागमें घेइजे ॥९॥
नातरी स्वयें गमन कीजे ॥ आरण्यवासी गुंफा असिजे ॥ शीत उष्णकाळ क्रमिजे ॥ ब्रह्मचर्येसी असावें ॥१०॥
संवत्सर एक वा षण्मासांची ॥ मांस अथवा एक पक्षाची ॥ संग्रहीं कंदमूळें ठायींची ॥ असावी सामुग्री ॥११॥
अतीत जरी आला ते काळीं ॥ तरी तो पूजिजे कंडफळी मूळीं ॥ जरी वैश्वदेव कीजे ते स्थळीं ॥ तरी हविजे कंदमूळें ॥१२॥
धान्य मिळाल्या अकल्पित ॥ तरी न कीजे आपणासी अन्न सिद्धवत ॥ तेणें घडें पूर्ण अधःपात चंद्रार्कवरी सर्वदा ॥१३॥
वैश्वदेव पूजिजे माध्यान्हीं ॥ कंदमूळें पूजावा वन्ही ॥ त्यावरी अन्नपाक निपजे म्हणोनि ॥ दूषण थोर म्हणवीतसे ॥१४॥
म्हणोनि दशन उखळ मुसळ ॥ धान्याचा मुखीं घालिजे कवळ ॥ न भक्षवे तरी अध ऊर्ध्व उपळ ॥ वरी कुटिजे साक्षेपें ॥१५॥
मग ते कवळ धान्यकूटाचे ॥ तेचि भाग देईं वैश्वदेवाचे ॥ तेणें मनोरथ अतीताचे ॥ पूर्ण कीजे अरण्यवासीं ॥१६॥
वैश्वदेव करावया कारण ॥ अरण्यांत न मिळे हुताशन ॥ तरी समर्पिज भागदान ॥ जठराग्नीसी ॥१७॥
जें काळीं मिळे अकल्पित ॥ तेंचि भक्षिजे तेंचि हुत ॥ तेणेंचि पूजावा अतीत ॥ अरण्यवासियें सन्मानें ॥१८॥
तरी तो अतीत कैसा कवण ॥ जो नित्य षट्‌कर्मी ब्राह्मण ॥ कीं तो नित्य चतुर्थकर्माधीन ॥ संन्यासी एक ॥१९॥
अरण्यावासी जो सर्वकाळीं ॥ आसन स्थापी जो वृक्षातळीं ॥ तो तृतीय प्रहराचे काळीं ॥ करीतसे भिक्षातन ॥२०॥
निर्धूमनस्थळीं अपाकस्थान ॥ ना जंतु जागेना द्रुमभुवन ॥ इतुकिया स्थळीं करी जो भिक्षाटन ॥ तोचि संन्यासी जाणावा ॥२१॥
अतिक्षुधापीडित ॥ अल्पचि भक्षावें अकल्पित ॥ कूपिका असार दंड धृत ॥ तुंबिनीफळ कमंडलू ॥२२॥
ऐसा दंड कमंडलू कूपिका ॥ त्याहूनि असों नये आणिका ॥ जरी नाना वस्तु कल्पी आणिका ॥ तरी गोहननबाधा तयासी ॥२३॥
गुरु देखतां आधीं वंदावा ॥ न्यून शब्द कोणा न सांगावा ॥ काम क्रोध दंभ प्रहरावा ॥ अहर्निशीं ॥२४॥
स्वप्नीं शुल्क जरी ॥ कर्कश उद्भवे घ्राणस्वरीं ॥ तरी अदृश्य असतां रविकरीं ॥ कीजे कर्म स्नाने संध्या ॥२५॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ हे चार आश्रम योगस्थितो ॥ आतां योगाभ्यासमुद्रा साधिती ॥ ते कैसे निरोपूं तुज आतां ॥२६॥
प्रथम कीजे मूळबंधन ॥ तेथें ऊर्ध्व कीजे अपान ॥ मग त्यापुढें समरस होय व्यान ॥ पावनकमीं जाण पां ॥२७॥
तेथें शिंकावें शंखिनीनाळ ॥ ओढियाबंद घालिजे सबळ ॥ मग भेदोनियां दशदळ ॥ मिश्रित करावें समानासी ॥२८॥
तेथें गार्हपत्या आव्हानिकासी ॥ ऊर्ध्व करीतसे समानासी ॥ मग समरसे त्या दशम दलासीं ॥ भेदी द्वादश दळातें ॥२९॥
ऐशा मूळ ओढिल्या जालंधरी ॥ हें त्रय बंध साधन करी ॥ समरसे कारणशरीरीं ॥ प्राण मिश्रित तेधवां ॥३०॥
मग लंघिजे षोडश दळ ॥ तेथें उदानासी कीजे मेळ ॥ मग उद्भवी महाज्वाळ ॥ तया ब्रह्मग्नीची ॥३१॥
तेथें चेतविजे उदानपवन ॥ मग होय ब्रह्मग्नीचें आव्हान ॥ तो ब्रह्माग्नि करी गा हवन ॥ शरीरीं मळमूत्रांचें ॥३२॥
भेदूनि ब्रह्मरंध अग्निचक्रासी ॥ मग त्या पवनाचे स्थानीं समरसी ॥ ब्रह्मसुखसोहळे उन्मनीसी ॥ भोगी तो राजयोगी ॥३३॥
ऐसा योगाभ्यास केलियावरी ॥ तत्काळ ज्ञान होय शरीरीं ॥ काळ प्रवेशे जवळ कीं दुरी ॥ होय जी स्मरु ॥३४॥
हें म्हणिजे षाषांड थोर साधना ॥ मग कुंभज म्हणे गा षडानना ॥ मज निरुपा जी शिवनंदना ॥ काळाचें ज्ञान जें ॥३५॥
काळ आलिया जवळ दूरी ॥ हें कैसें जाणावें शरीरीं ॥ मग तो अगस्तीसी ब्रह्मचारी ॥ कथीतसे षडानन ॥३६॥
स्वामी म्हणे जी अगस्तिऋषी ॥ बा हें कैसे जाणावें काळासी ॥ तरी तें सत्ताविसां नक्षत्रांसी ॥ गणित असे पूर्वीचें ॥३७॥
अगस्तीसी म्हणे षडानन ॥ परिसें गा नक्षत्रकाळांचें ज्ञान ॥ सर्व जीवांचे चुके गा मरण ॥ मग आपुलियाचे काय ते प्रयास ॥३८॥
आतां जन्म होय अश्विनीवरी ॥ त्यासी विघ्र पंचवीसं  संवत्सरीं ॥ अश्व टाकी अथवा चोर मारी ॥ पंचविसावे वर्षी ॥३९॥
या विघ्नास्तव आरंभिजे दान ॥ तेणें निवारे तो महादोष जाण ॥ आम्रवृक्षाचें बीज जाण ॥ रुजूं घालिजे अर्कदिनीं ॥४०॥
मग तो अर्धशत संवत्सर ॥ आरोग्य स्वस्थ असे शरीर ॥ मग न बाधी सूर्यांचा कुमर ॥ विनाशकाळ तो न होय ॥४१॥
जन्म होय भरणीनक्षत्रीं ॥ तो नवव्या वरुषीं पडे काळसूत्री ॥ त्यासी विघ्न असे जळयंत्री ॥ तिसां वरुषांमाजी ॥४२॥
त्या विघ्नास्तव कीजे गोदान ॥ शुद्ध मुक्तें कीजेति समर्पण ॥ मग तो आरोग्यता पूर्ण ॥ जन्मवरी पावे सत्य पैं ॥४३॥
आतां कृत्तिकांवरी होय जन्म ॥ तया नक्षत्रा असे भौम ॥ तो राजमान्य होय उत्तम ॥ जीवे साठ संवत्सर ॥४४॥
पंचविचावे संवत्सरीं असे विघ्न ॥ त्यासी महादुगी होय मरण ॥ तरी पाटांव दीजे दान ॥मग स्वस्थ शरीर होय पैं ॥४५॥
वृषभाचे नक्षत्रीं उद्भवत ॥ त्यासी षष्ठ दिनीं असे घात ॥ म्हणोनि श्वेतांबरें दीजे त्वरित ॥ दानसंकल्प करोनी ॥४६॥
मग तो अर्धशत त्रिसंवत्सरीं ॥ नव दिन गा स्वस्थशरेरीं ॥ काळ बाधी इतुक्यावरी ॥ यमराव तो ॥४७॥
रोहिणीवरी जन्म होय जया ॥ त्यासी पांच पुत्र दोन कन्या व्हाव्या ॥ यासी दश वर्षे पूर्ण जाहलिया ॥विघ्न पन्नगाचें थोर पैं ॥४८॥
त्यासी सुवर्णमुक्तें कीजे दान ॥ तेणें निवारे तें विषविघ्न ॥ मग पंचविसावे वर्षी पूर्ण ॥ काळ बाधी तयासी ॥४९॥
मृगनक्षत्रीं जन्म होय जयासी ॥ तो अधिपती होय सुंदर दासी ॥ तीन कन्या तीन स्त्रिया सप्तपुत्रांसी ॥ होय पितर तो एक ॥५०॥
तो मृत्यु करी पितरांकरण ॥ धेनु वृषभ त्या विघ्रासी दान ॥ मग न बाधी सूर्याचा नंदन ॥ त्र्याहत्तर वर्षेवरी तो ॥५१॥
माघमासीं शुल्कपक्षीं ॥ द्वितीय गुरु मंगळ आठवा मुहूर्ती ॥ षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ तैं काळ बाधी साक्षेपें ॥५२॥
आश्लेषा कर्कावरी जन्म होय ॥ तया पंच वर्षे वाचा बंद होय ॥ मग कंबलादि दान देतां पाहें ॥ काळ बाधी अर्धशतीं ॥५३॥
आश्लेषांवरी जन्म जयासी ॥ शेचाळीस वर्षांती विघ्न तयासी ॥ शस्त्रें छेद होईल शरीरासी ॥ तया कैसा उपचार ॥५४॥
त्यासी वैदूर्य दीजे गा दान ॥ तेणें निवारे तें महाविघ्न ॥ मग शाण्णव वर्षे तयाचा प्राण ॥ स्वस्ति क्षेम निर्भय ॥५५॥
एकचि कन्या पुत्र त्यासी ॥ मग माघ मास कृष्णद्वादशी ॥ भृगु मृग चतुर्थ घटिकेसी ॥ काळ बाधी तयातें ॥५६॥
अगस्ति म्हणे स्वामी अवधारीं ॥ हे नक्षत्रकाळ असती दूरी ॥ परी मास घटिका प्रहरीं ॥ जाणिजे कैसें काय तें ॥५७॥
स्वामी म्हणे गा ऋषिउत्तमा ॥ मुक्ति अशक्त होय मध्यमा ॥ तरी जवळी जाणावें यमा ॥ षष्ठमासीं काळ बाधी ॥५८॥
मध्यमेचिया पूर्वपुटें ॥ शम करोनियां उभय अंगुष्ठे ॥ उचलती अनामिकांची बोटें ॥ तरी काळ होय एकविसावे दिनीं ॥५९॥
अहोरात्र घटिका चौसष्टीं ॥ समीर वाहे वाम नासापुटी ॥ तरी यमफांसा पडे दृष्टी ॥ तीन संवत्सरी पैं ॥६०॥
रवि वाहे चौसष्टी घटिका ॥ तरी यम जाणावा संवत्सर एका ॥ पवनस्वरुपें साम्य नासिका ॥ तैं काळ बाधी येऊनी ॥६१॥
उभयतां समचि सोम सूर्य ॥ तरी मृत्यु जाण दिनत्रया होय ॥ पंचदशावे मुहूती निश्चय ॥ काळ प्रवेशे ॥६२॥
शुक्र पडे जरी वक्रद्वारीं ॥ तरी मृत्यु षोडशावे प्रहरीं ॥ ऐसा काळ प्रवेशे शरीरीं ॥ जाणावें हो कुंभजा ॥६३॥
लघुशंकां दीर्घशंका कर्कश ॥ मूत्रीं जरी पडे शुक्राचा अंश ॥ तरी होय गा काळाचा प्रवेश ॥ वर्षे एका निश्चयें ॥६४॥
जिव्हाग्र न दिसे नासापुटें ॥ द्वादशांगुळें गणिजे पीनकुटें ॥ त्यामाजी जाहालीं एक दोन घटें ॥ तरी तेचि मुहूर्त काळाचे ॥६५॥
कुंभजासी वदे षडांनन ॥ ऐसें हे योगाभ्यासनिरुपण ॥ बाह्याभ्यंतरी महाज्ञान ॥ यासी म्हणिजे ॥६६॥
तोचि जाणावा पूर्ण ज्ञानी ॥ हा सर्वही योगाभ्यास करुनी ॥ मग ऐसिया संकटीं निर्वाणीं ॥ होइजे मुक्ती पावन ॥६७॥
स्वामी म्हणे कुंभजा अवधारीं ॥ ऐसी नीति निरुपिजे कल्पवरी ॥ परी अविमुक्तीची स्पर्धा करी ॥ ते एकही न देखेंचि ॥६८॥
तरी ऐसी अभ्यासितां योगासिद्धि ॥ परम निरोधे विषम सिद्धि ॥ तरी महाज्वर उपजे व्याधी ॥ तेणेंचि नासे योग हा ॥६९॥
तेणें अप्राप्त होय निर्वाण ॥ विग्रह जोडे साधितां निधान ॥ मग तो प्रयासीं रक्षितां प्राण ॥ होइजे भूतां वरपडा ॥७०॥
म्हणोनि तयाचा मानिजे त्रास ॥ सर्वही त्यजूनि कीजे काशीवास ॥ तेथें सहजचि मुक्ती महेश ॥ उपदेशी ब्रह्म तो ॥७१॥
तेथें असे षडंगयोग ॥ नाहीं करणे प्रयासप्रसंग ॥ सहज मुक्ति असे ज्ञानमार्ग ॥ तो कैसा काशीवास ॥७२॥
कैसा तेथींचा योगाभ्यास ॥ तेथें काळासी नाहीं प्रवेश ॥ तेथींचें गम्य तें महेश ॥ स्वयें जाणे शंकर तो ॥७३॥
विश्वनाथ आणि दंडपाणी ॥ काळभैरव चौथा गजाननी ॥ विशाळाक्षी दिव्य मंदाकिनी ॥ स्वर्गसरिता जे ॥७४॥
नित्य अभिवंदन करे जो यांसी ॥ तो दीर्घ जाणावा योगाभ्यासी ॥ स्वामी म्हणे गा अगस्तिऋषि ॥ हाचि थोर षडंगयोग ॥७५॥
आणि जो षडंगयोग साधी ॥ तो जाणावा मंदबुद्धी ॥ हे काशीस्थळीं सर्वही सिद्धी ॥ तत्काळचि असती हो ॥७६॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ काशीमध्यें मुद्रा त्या कवणी ॥ त्या साधितां काशीस्थानीं ॥ प्रयास नाहीं सर्वथा ॥७७॥
काशीचिया सैरावैरा फिरणें ॥ ते खेचरीमुद्रा साधिलीं ज्याणें ॥ किंवा कीजे भवा नीदर्शनें ॥ ते चाचरी मुद्रा जाणावी ॥७८॥
काशीमध्यें बैसे जो अरुणी ॥ शुभ अथवा अशुभ मनीं ॥ तेणें साधिली हो अगस्तिमुनी ॥ भूचरी मुद्रा जाणावी ॥७९॥
गंगास्नानाचा जो मार्ग ॥ तोचि अगोचरी मुद्रायोग ॥ आतां महामुद्रासाधनप्रसंग ॥ परिसावा जी अगस्तिमुनी ॥८०॥
स्नान घडे स्वर्गतरंगिणीचें ॥ तेणें साधन केलें महामुद्रेचें ॥ आतां ओढियाजालंधराचें ॥ कैसें बंधनसाधन ॥८१॥
जेणें काशीस्थळीं वास केला ॥ तेणें पूर्ण मूळबंधन साधिला ॥ दूर देशींहूनि काशीमध्ये आला ॥ तोचि ओढियाबंध म्हणावा ॥८२॥
जरी काशीस्थळीं घडे मरण ॥ तोचि जालंधरीबंध साधिला पूर्ण ॥ ऐसें योगाभ्याससिद्धीचें स्थान ॥ नाहीम त्रिलोकीं कोठेही ॥८३॥
षट्‌कर्म संन्यास योगाभ्यासी ॥ गृहस्थाश्रमी ब्रह्मचारी तापसी ॥ वानप्रस्थ सर्वसिद्धी अभ्यासी ॥ तोचि काशीवास जाणावा ॥८४॥
नाहीं काशीविना सर्व विद्या ॥ नाहीं भागीरथीसम सर्व नद्या ॥ काशीवास तो सर्वसाध्या ॥ सिद्धि मुक्तिस्थान ॥८५॥
नाहीं काशीऐसें स्थान ॥ जेथें असे विश्वनाथाचें राहाणें ॥ आणिका स्थळीं तों त्रिनयन ॥ गौप्य असे सर्वथा ॥८६॥
ऐसी अविमुक्ती काशीनगरी ॥ प्रळयीं अविनाश ते शिवपुरी ॥ तिच्या योगें दाटे तो श्रीहरी ॥ अहर्निशी ॥८७॥
स्वामी म्हणे हो अगस्ती ॥ काशीचा वियोग झाला तुजप्रती ॥ ऐसाचि पूर्वी झाला होता पशुपतीप्रती ॥काशीवियोग जाण पां ॥८८॥
तुजपरीस सहस्त्रगुणा ॥ काशीवियोग झाला त्रिनयना ॥ ऐसी ते काशीची वर्णना ॥मुक्तीची खाणी प्राणिमात्रांसी ॥८९॥
आतां सर्व इंद्रियें जो स्वस्थ सर्वत्र ॥ दूरी जंव आहे काळाचें सूत्र ॥ तंव तूं एक वेळ तरी काशीक्षेत्र ॥ सेवीं जन्मांतरीं ॥९०॥
इंद्रपदाइऐसा राज्यार्थ ॥ हे सर्व प्रहरिजे स्वार्थ ॥ स्त्री आपण एकचि मनोरथ ॥ क्रमिजे काशीमार्ग ॥९१॥
तेथें स्वर्गसरितेचें स्नान ॥ आणि विश्वंभराचें स्तवन ॥ न्यायिक द्रव्याचें कीज दान ॥ संकल्प करी सत्पात्रीं ॥९२॥
दान तें दीजे काशीप्रयागीं ॥ अवदान तें हविजे यागीं ॥ तृप्त होती त्या यज्ञभागीं ॥ प्रमथादिक थोर थोर ॥९३॥
आणि तीर्थी भार हिरण्य ॥ काशीस्थळीं जो संकल्पी मुष्टिधान्य ॥ ते समता तुळे गा समान ॥ सूर्ययागाचें फळ ॥९४॥
क्षेत्रावांचूनि अफळ दान॥ क्षेत्रावांचूनि नव्हती ब्राह्मण ॥ राहिले क्षेत्र-संन्यास घेऊन ॥ काशी प्रयागीं आवश्यक ॥९५॥
सर्वत्र वृष्टी करीतसे स्वाती ॥ परी ते मुक्तीमणी सागरींचि होती ॥ जैशा ग्रामसरितेचिया शुक्ती ॥ न प्रसवती मुक्तें सहसाही ॥९६॥
म्हणोनि काशी-प्रयागींचे दान ॥ पत्रपुष्पांचे तेचि शतयज्ञ ॥ अन्य तीर्थी वेंचिजे निधी सुवर्ण ॥ परी किंचित फळ ॥९७॥
जैसी परीस धातूंची एक दृष्टी ॥ साक्षित्वेंचि वळे सुवर्णखोटी ॥ तैसी तीर्था झालिया भेटी ॥ तीं दानें फळती पैं ॥९८॥
क्षुधा हरे सत्यचि भोजनें ॥ तृषा शांत सेविल्या जीवनें ॥ तैसी तीर्था झालिया भेटी ॥ तीं दानें फळाती पैं ॥९९॥
आणिका स्थळीं मृत्यूचा प्रयास ॥ अति क्रूर ते यमाचे पाश ॥ मग कवण कैसे गर्भवास ॥ भोगणें तया थोर भय ॥१००॥
काशीमध्यें सहज मृत्य ॥ पशू मानवादि सर्व जीव जंत ॥ मरती ते सायुज्य पावोनि मुक्त ॥ होती तत्काळचि पैं ॥१०१॥
जेथें ब्रह्मतारकाचा उपदेश ॥ सर्व जंतूंसी देतसे महेश ॥ नाहीं म्हणेल तो पशु निर्विशेष ॥ युगानुयुगीं होतसे ॥१०२॥
काशीविरहित उपजे जो जंतु ॥ त्यासी बाघीतसे कृतांतु ॥ मग पंचक्रोशीमध्यें होय मृत्यु ॥ तो अगभ्य देवांसी पैं ॥१०३॥
म्हणोनि काशीचे जें मरण ॥ तें सायुज्यतामुक्तीपावन ॥ सर्व जंतूसी ब्रह्मानिरुपण ॥ होतसे शिवमुखें सर्वदा ॥१०४॥
ब्रह्मादिक देव सुरपती ॥ ते काशीचे ठायीं मृत्यु इच्छिती ॥ आतां सर्वही त्यजूनि भ्रांती ॥ सेविजे काशीमार्ग ॥१०५॥
जप तप दान क्रियापंचत्व ॥ हे सर्वही अफळ काशीविरहित ॥ द्रव्यार्थी झाला गृहस्थ ॥ तरी यज्ञ कीजे प्रयागीं ॥१०६॥
परी हें सर्वही स्त्रियेविण ॥ वृथा जप तप यज्ञ दान ॥ स्त्री असावी सगुण ॥ तरीचि साध्य सर्वही सिद्धि ॥१०७॥
जया गृहीं स्त्रिया दुर्दशावेष ॥ शरीरीं नाहीं शुभ गुणांचा वास ॥ तो जाणावा अल्पायुषी पुरुष ॥ तें गृह जाणावी स्मशानभूमी ॥१०८॥
शुभलक्षणी स्त्रिया चंद्रवदना ॥ त्या चंद्रकळेसम सुलक्षणा ॥ जैसें शशिदर्शनें पाषाणा ॥ जीवन स्त्रवे तत्काळ ॥१०९॥
म्हणोनि स्त्री असावी सुबुद्धी ॥ तेणें साधती सर्व सिद्धी ॥ स्त्री अवलक्षणा तरी सुबुद्धी ॥ हरपे तया पुरुषाची ॥११०॥
स्वामीसी म्हणे अगस्तिमुनी ॥ स्त्रिया सुलक्षणा त्या कवणी ॥ मज निरुपा जी कृपादानी ॥ षण्मुखस्वामी दयाळा ॥१११॥
स्वामी म्हणे हो अगस्तिऋषी ॥तरी त्या स्त्रियांची लक्षणें कैसीं ॥ जीं शि निरुपलीं भवानीसी ॥ तींचि निरोपूं तुज आतां ॥११२॥
आतां शुभाशुभ स्त्रीलक्षणें ॥ अगस्तीसी निरुपिलीं षडाननें ॥ श्रोतीं परिसिजे भावपूर्ण ॥ म्हणे शिवदास गोमा ॥११३॥
इति स्कंदपुराणे काशीखंड वानप्रस्थाश्रम-योगाभ्यासादिवर्णनं नाम चत्वारिंशत्तमाध्यायः ॥४०॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति चत्वारिंशत्तमाध्यायः ॥ समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP