मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ३६ वा

काशी खंड - अध्याय ३६ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
अगस्ति म्हणे गा स्वामिनाथा ॥ तूं जाणसी ज्ञानमोक्षादि चतुरर्था ॥ एक प्रश्न करणें असे आतां ॥ कूपोद्धवा तुम्हांसी ॥१॥
दंड धरोनियां करतळीं ॥ जो उभा असे शिवाजवळी ॥ तो दंडपाणी नामें काशीस्थळीं ॥ कोण कवणाचा निरुपा जीं ॥२॥
त्याचें सामर्थ्य काय जी अत्यंत ॥ जें शिवाजवळी सदा राहाणें प्राप्त ॥ त्यानें शिवाची भक्ती कैसी केली सत्य ॥तें निरुपावें मज आतां ॥३॥
तंव बोलिला सर्वसिद्धी ॥ ज्ञानरत्नांचा पूर्ण क्षीराब्धी ॥ तो षण्मुख गंभीरबुद्धी ॥ वदता जाहाला तेधवां ॥४॥
ते कैसी कथा वदे शिवसुत ॥ परिसावा तयाचा मूळ वृत्तांत ॥ हा शिवाचा जाहाला पूर्ण भक्त ॥ तो कैशापरी ऐकें अगस्ती ॥५॥
गंधमादन नामें गिरिवर ॥ त्यावरी असती यक्षी किन्नर ॥ पूर्णभद्र नामें राजेश्वर ॥ त्या किन्नरांचा पैं होय ॥६॥
तो पूर्णभद्रराजा ब्राह्मण ॥ महापुण्यशील विद्यासंपूर्ण ॥ गृहीं लक्ष्मी कल्पतरु कामधेनु जाण ॥ परी पुत्रसंतती नाहीं तया ॥७॥
तयाची स्त्री नामें कनककुंडला ॥ तियेसी राजा पूर्णभद्र वदला ॥ पुत्रेंविण व्यर्थचि क्रमिला ॥ संसार दुसत्र कामिनी ॥८॥
पूर्णभद्र वदे प्रिये ॥ पुत्रसंततीविण संसार करुं नये ॥ पुत्रेंविण सुख सौंदर्य ॥ तृणासमान व्यर्थ तें ॥९॥
वृथा तें सुंदर निजधाम ॥ वृथा लक्ष्मी गज तुरंगम ॥ जप तप ज्ञान नेम । पुत्राविण जाण हो ॥१०॥
पुत्रेंविण तो अशोभ्य नर ॥ निष्फळ त्याचा संचार ॥ जैसें तरुपर्ण तो समीर ॥ वृथाचि उडवी नभीं ॥११॥
तंव बोलिली पतिव्रता ॥ जे कनककुंडला भद्रकांता ॥ म्हणे स्वामी ऐसें जरी मनीं विचारितां ॥ तरी परिसा एक शब्द माझा ॥१२॥
शरीर नाशवंत क्षणभंगुर ॥ निश्चलत्वें स्मरिजे विचार ॥ आपुलें पूर्वार्जित साचार ॥ भोगणें लागे आपणांसी ॥१३॥
पूर्वाजिताचा न कल्पिजे विचार ॥ वृथा जाणावा त्याचा संसार ॥ पूर्वपुण्य हाचि विचार ॥ आपण केला पाहिजे ॥१४॥
अदृष्टाचा जरी कल्पिजे नेम ॥ तरी तें कोणें केलें पूर्वक्रर्म ॥ ऐसें न कळे तरी वृथा जन्म ॥ अशुचि नरांचा जाण पां ॥१५॥
कुंडला म्हणे राजेश्वरा॥ तुम्ही निश्वळ होऊनि विचारा ॥ तरी बरवें केलें पूजन शंकरा ॥ त्यासी म्हणावें पूर्वार्जित ॥१६॥
तरी नाना भक्ती यज्ञ होम ॥ आतां काय न होती ऐसे नेम ॥ कासया कल्पावें पूर्वकर्म ॥ आतां काय एक न होय ॥१७॥
पूर्वकर्मे होय संतती ॥ तरी आतां काय नव्हे भक्ती ॥ शंकरकृपें पुत्रसंतती ॥ कोणासी नाहीं कां ॥१८॥
तो शंकर इच्छेचा दानी ॥ चिंतिल्या अर्थाचा चिंतामणी ॥ शंकराचे कृपेंकरुनी ॥ कोणा सिद्धि नसे काय ॥१९॥
षण्मुख म्हणे हो अगस्ती ॥ शिवासी प्रश्न करी हैमवती ॥ तरी आगम हे चित्तीं । न धरावा संशय तो ॥२०॥
हें भूत भविष्य वर्तमान ॥ आधींचि कथिलें त्रिनयनें जाण ॥ ती अद्यापि वदती पुराण ॥ शिववाक्य जें कां ॥२१॥
तें कुंडला म्हणे रायासी ॥ मांधाता चक्रवर्तीं होता अयोध्येसी ॥ त्याणें आराधिलें शंकरासी ॥ पुत्रइच्छा धरोनियां ॥२२॥
मुचुकुंदनामा महावीर ॥ तो मांधात्यासी दिधला कुमर ॥ ऐसा पूर्णवर सर्वेश्वर ॥ प्रसन्न होय भक्तीनें ॥२३॥
कृष्णें पूजिला त्रिशूलधर ॥ त्यासी दिधला मदन कुमार ॥ हें भवानीप्रती शंकर ॥ अनुवादला भविष्य पैं ॥२४॥
जैसें रावणें पूजिलें त्र्यंबका ॥ काशीमध्यें तप केलें ऐका ॥ दोन सहस्त्र वरुषें बेलकंटका ॥ अग्रीं उभा तो होता ॥२५॥
गंगास्नान करी निशांचर ॥ लिंग स्थापिलें रावणेश्वर ॥ मग प्रसन्न जाहाला सर्वेशर ॥ दिधली तया हिरण्यपुरी ॥२६॥
बळीसी प्रसन्न जाहाला हर ॥ पुत्र दिधला बाणासुर ॥ सुखी केला वैश्वानर ॥ अग्निपुत्र देऊनियां ॥२७॥
कुडला म्हणे राजयासी ॥ ऐसें पूजिलें शंकरासी ॥ तो भक्तीनें प्रसन्न व्हावयासी ॥ साधारणाचि असे ॥२८॥
म्हणोनि पूजिल्या पशुपती ॥ सर्व कामना सिद्धीतें पावती ॥ तरी आपण आन न धरावें चित्तीं ॥ शिवभक्तीवांचोनियां ॥२९॥
ऐसें अनुवादली ते कुंडला ॥ तेणें राजा हृदयीं संतोषला ॥ मग तो तीर्थासी निघता जाहाला ॥ कांता समागमें घेऊनियां ॥३०॥
मग तो आला ओंकारेश्वरासी ॥ संगमीं नर्मदा कावेरीसी ॥ तेथें पूजिनियां शिवासी ॥ अष्टादश दिन क्रमियेल ॥३१॥
मग द्विजांतें पाचारुनि राजेंद्र ॥ आरंभिता जाहाल महारुद्र ॥ नाना दानें करी पूर्णभद्र ॥ सत्पात्रांसी पाहोनियां ॥३२॥
शिवपूजा महा उपचारेंसी ॥ नाना भक्तीने केली ओंकारेश्वरासी ॥ मग प्रसन्न जाहाला त्रिपुरारी त्यासी ॥ दिधला पुत्र तयालागीं ॥३३॥
तयाचें नाम ठेविलें हरिकेश ॥ त्याते बालपणापासूनि अभ्यास ॥ शिवभक्तीचा लागला लवलेश ॥ आणिक दुजें नाठवी तो ॥३४॥
तो नित्य खेळे बाळकांमाजीं ॥ मृत्तिकालिंग नित्य पूजी ॥ तो आपुले मित्रांचीं नामें योजी ॥ शिवासरिखींचि ॥३५॥
स्वमित्रांतें नित्य पाचारी ॥ आरता ये रे महेशा त्रिपुरारी ॥ शिवा महादेवा पाचारी ॥ आपुले मित्रांसी प्रीतेनें ॥३६॥
ऐसीं नामे पाचारी मित्रांचीं ॥ मग तो लिंगें करी मृत्तिकेचीं ॥ कनकदूर्वा आणोनि शिवाची ॥ नित्य पूजा करीतसे ॥३७॥
ऐसा बाळपणींचा अभ्यास ॥ सर्वदा शिवभक्तीचाचि हव्यास ॥ ऐसा पूजितां महेश ॥ द्वादशं वर्षे क्रमियेलीं ॥३८॥
मग पूर्णभद्र म्हणे पुत्रासी ॥ तूं अंगीकारीं राज्यपदासी ॥ या सर्व द्रव्यभांडारासी ॥ होई स्वामी तूंचि पैं ॥३९॥
मग बोलिला तो हरिकेश ॥ आतां बरवें पूजावा महेश ॥ राज्यलक्ष्मीनें शरीरीं प्रवेश ॥ होतसे दुर्बुद्धीचा ॥४०॥
मग हरिकेश वदे पितयासी ॥ या राज्यलक्ष्मीचा भाव परियेसी ॥ शिवाची भक्ती प्रहरुनि जो इच्छी ॥ त्या राजया अधःपात ॥४१॥
लक्ष्मीं हें अधःपातासी मूळ ॥ करी महादोषांचा सुकाळ ॥ लक्ष्मी हें मोहनास्त्र केवळ ॥ हरवीतसे सुबुद्धींतें ॥४२॥
लक्ष्मी हा गर्वाचा बडिवार ॥ शांतिक्षमेचा पडे विसर ॥ नम्रता स्वधर्माचा आधार ॥ अल्पही नसे जाण पा ॥४३॥
म्हणोनि हा लक्ष्मीअर्थ कल्पितां ॥ तो विसरे जी आत्महिता ॥ परी पूर्वकर्माची जे वार्ता ॥ न सुचे कांही तयासी ॥४४॥
नाना पूर्वजन्मीचें सुकृत ॥ तेणें राज्यलक्ष्मी होतसे प्राप्त ॥ सहजाचे पावे अकल्पित ॥ ही कल्पना व्यर्थाचि ॥४५॥
पूर्वार्जितास्तव लक्ष्मी पाविजे ॥ तरी आतांही तैसेंचि वर्तिजे ॥ सुवर्णी पदार्थ जडिजे ॥ तैसेंचि जोडे अधिकत्व ॥४६॥
जैसें बीज पेरिजे भूतळीं ॥ मग वृक्ष पावे बहुतां फळीं ॥ तैसें न्यायिक द्रव्य दानकाळीं ॥ वेंचिती अल्प थोडेंचि ॥४७॥
जें न्यायिक द्रव्यदान साचार ॥ तेणें अकल्पित द्रव्य येतसे अपार ॥ जे म्हणती काय करावें वेंचूनि भांडार ॥ ते जन पीडेनें संपूर्ण ॥४८॥
म्हणोनि राज्यलक्ष्मी सर्वही ॥ आत्महितोपयोगा न वेंचिजे कांहीं ॥ लक्ष्मी असोनि सुबुद्धी देहीं ॥ ऐसे अल्पं असती भूमीसी ॥४९॥
हरिकेश म्हणे जी पितृसमर्था ॥ आम्ही शिवचि पूजुं सर्वथा ॥ राज्यभोग भोगूनियां यमपंथा ॥ क्रमिजे राजेंद्रा अहित तें ॥५०॥
अथवा राज्य जरी भोगिजे ॥ तरी वेदनीतिमार्गे वर्तिजे ॥ तेणें राज्यामध्यें उद्धरिजे ॥ जनांते सुबुद्धीनें ॥५१॥
आम्हांसी अत्यंत प्रिय काशीवास ॥ ऐसें वदला तो हरिकेश ॥ मग कोपला तो नराधीश ॥ पूर्णभद्र राजेंद्र ॥५२॥
मग राजा म्हणे अज्ञान बाळा ॥ जैसी लता मृगा न रुचे रत्नमाला ॥ कीं अंत्यजजातीसी राजसोहळा ॥ न सांडी तो देहभाव ॥५३॥
राजा क्रोधायमान पुत्रावरी ॥ पहा हा मूर्ख राज्य न अंगीकारी ॥ विपत्ति भोगूं पाहे वनांतरीं ॥ कैसें पूर्वसूत्र न कळे याचें ॥५४॥
दरिद्रपीडा असे कवणासी ॥ कीं कोण पंचमहादोषी ॥ जेणें जाइजे तीर्थतपासी ॥ अप्रमादें जाणोनी ॥५५॥
पुत्र म्हणे त्वा केलेंई तप ॥ म्हणोनि झालासी रे राज्याधिप ॥ आतां अव्हेरिला हा साक्षेप ॥ तपसिद्धीचा तुवां ॥५६॥
तुवां धरिला राज्याचा स्वार्थ ॥ ऐसा म्यां जाणिला राजा अर्थ ॥ तरी पूर्वजां चुकवीन यमपंथं ॥ शिवभक्ती करोनियां ॥५७।
तुवां एकाग्र पूजिला पशुपती ॥ कायसे राज्यसंपत्ति संतती ॥ शिव अर्चिल्याची फलप्राप्ती ॥ अनुपम जाण सर्वथा ॥५८॥
मग स्मरोनियां महेश ॥ आनंदवना निधे हरिकेश ॥ गृहममता व्यवसायपाश ॥ तोडिला तेणें समूळ पैं ॥५९॥
हरिकेश आला आनंदवनीं ॥ मौळीं वंदिली ते उत्तरवाहिनी ॥ मणिकर्णिकेसी स्नान करुनी ॥ स्थापना केली लिंगाची ॥६०॥
लिंग स्थापिलें हरिकेशेश्वर ॥ हृदयीं हरनामाचा उच्चार ॥ गलितपत्रांचा करी आहार ॥ दर्बहग्रतोयपान पैं ॥६१।
स्वामी म्हणे गा कुंभजां ॥ तेणें आराधिलें वृषभध्वजा ॥ नामें पाचारीतसे मित्रांचीं ॥ शिवासारिखींचि ॥ ६३॥
ऐसी तयाची पूर्णभक्ति जाणूनी ॥ शिव प्रसन्न जाहाला अल्पदिनीं ॥ वामांगे ते दाक्षायणी ॥ वृषभध्वज बैसला ॥६४॥
उमेनें देखिलें आनंदवन॥ अवघे पुण्यतरुचि विस्तीर्ण ॥ तेथें मार्तंडाचीं प्रभाकिरणें जाण ॥ न शकती संचरुं ॥६५॥
तरी तें आनंदवन कैसें ॥ उमेसी निरुपिलें महेशें ॥ त्याचें मूळ उत्पत्तिसूत्र ऐसें ॥ परिसावें श्रोती आदरें ॥६६॥
शंकराचे इच्छेपासूनी ॥ उत्पत्ति पावला तो चक्रपाणी ॥ मग विरिंचि जन्मला ॥ नाभिस्थानीं ॥ त्या महाविष्णूचिया ॥६७॥
तो ब्रह्मा चौंखाणींचें बीज ॥ तेणें उद्भविले अंडज जारज ॥ स्वेदज आणि उद्भिज्ज ॥ चौर्‍यायशीं लक्ष जीवयोनी ॥६८॥
त्या चहूं खाणींमाजीं व्यापक ॥ असती हरि विरिंची त्र्यंबक ॥ षण्मुख म्हणे हें नावेक ॥ परियेसीं गा अगस्ती ॥६९॥
रचिलें नव लक्ष फणिवरां ॥ मग चार लक्ष त्या जळचरां ॥ वरी आठ लक्ष सपरिवारां ॥ विहंगमादिक सर्व याती ॥७०॥
ऐसी निर्मिली अंडजखाणी ॥ एकवीस लक्षांचे प्रमाणीं ॥ त्यांमाजीं ब्रह्मा हरि हर तीनी ॥ कैसे व्यापक असती ॥७१॥
हंस तो जाणावा सृष्टिकर ॥ विष्णु तो जाणावा गरुड पक्षीश्वर ॥ महातेजःपुंज तो शंकर ॥ अरुणरुप जाणावा ॥७२॥
नव लक्ष मानव द्विचरणी ॥ अष्ट लक्ष श्वापदें वनीं ॥ चार लक्ष संख्या गणूनी ॥ रचिले ते चतुष्पद ॥७३॥
ऐसे जारज एकवीस लक्ष ॥ त्यांमाजीं कैसे हरि विरिंचे त्र्यक्षं ॥ हें अगस्ती परियेसीं प्रतिसाक्ष ॥ जारज खाणींचें ॥७४॥
वाजिरुपें तो चतुरानन ॥ भद्रजाती तो लक्ष्मीरमण ॥ नर मानवी तो पंचानन ॥ परिसावें हो अगस्तिमुनी ॥७५॥
रचिलें नवलक्ष तारामंडळ ॥ आठ लक्ष रचिले कुलाचल ॥ चार लक्ष केल्या सकळ ॥ रस नामधातू ॥७६॥
एकवीस लक्ष स्वेदजखाणी ॥ त्यांमध्यें श्रेष्ठ देव तीनी ॥ ते परिसें गा मैत्रावरुणी ॥ अगस्ति स्वामिया ॥७७॥
ताम्ररुप तो विरिंचिनाथ । चंद्रकांत तो कमळजाकांत ॥ हिरण्यरुप जाणावा जी समर्थ ॥ विश्वरुप पंचानन ॥७८॥
नव लक्ष रचिलें जी तृण ॥ क्षीरसागरीं आठ लक्ष पूर्ण ॥ चार लक्ष केलिया निर्माण ॥ वल्लीनामें सुगंध त्या ॥७९॥
ऐसी एकवीस लक्ष गणितां ॥ उद्भिज्जखाणी रची तो विधाता ॥ त्यांमध्यें श्रेष्ठ जाती त्या आतां ॥ परिसाव्या जी कुंभजा ॥८०॥
सर्व अन्न तो बोलिजे सृष्टिकर ॥ हरि तो बोलिजे चंदनतरुवर ॥ कुसुमरुप तो पार्वतीवर ॥ त्रिपुरांतक म्हणवी जो ॥८१॥
ऐशा चौर्‍यायशीं लक्ष चार खाणी ॥ उमेनें देखिल्या आनंदवनीं ॥ त्यांसी चिंता झाल्या काशीस्थानीं ॥ शिव देखिनियां ॥८२।
त्यांही पूजिलें त्रिनयना ॥ मग केल्या एकेक लिम्गस्थापना ॥ त्या कुंभजा कवणकवणा ॥ परियेसीं आतां सांगेन ॥८३॥
अंडजें स्थापिला अंडजेश्वर ॥ जारजें स्थापिला जारजेश्वर ॥ उद्भिज्जे स्थापिला उद्भिज्जेश्वर ॥ स्वेदजें स्वेदजेश्वर तो ॥८४॥
या चहूं खाणींमाजीं निवाडें ॥ लिंगस्थापना केली कोडें ॥ चौर्‍यायशीं लक्ष जन्मांचें सांकडें ॥ फिटोनि जावया तत्काळ ॥८५॥
निधीं स्थापिला नवनिधीश्वर ॥ अष्टसिद्धीं स्थापिला अष्टसिद्धीश्वर ॥ पर्वती स्थापिला पर्वतेश्वर ॥ ऐसियापरी शिव ते ॥८६॥
पृथ्वीनें स्थापिला पृथ्वीवर ॥ जलें स्थापिला जीवनेश्वर ॥ स्वर्गे स्थापिला खगेश्वर ॥ तेजें तेजेश्वर स्थापिला ॥८७॥
तेथें वनस्पति आल्या सर्वही ॥ वनस्पतीश्वर स्थापिअल तिंही ॥ अगस्ति एक अर्पूर्वता पाहीं ॥ तृणें स्थापिला तृणेश्वर ॥८८॥
कुंभजा ऐसें आनंदवन ॥ तेथें तृण तेंही पावन ॥ उमेनें देखिलें पुण्यवन ॥ पुण्यवल्ली पुण्यतरु तेथींचे ॥८९॥
या वनस्पतींमध्यें बैसला ॥ उमेनें हरिकेश देखिला ॥ तेणें एकाग्र आत्मा स्थिर केला ॥ शिवस्वरुपीं ॥९०॥
मग उमेनें प्रार्थिले त्या महेशा ॥ प्रसन्न व्हावें ह्या हरिकेशा ॥ येणें सर्वही तारुण्यदशा ॥ वेंचिला जी भक्तीकाजीं ॥९१॥
यासी प्रसन्न व्हावें वेगवत्तर ॥ हा कीजे आपुला वरदपुत्र ॥ मग आनंदला पंचवक्र ॥ प्रियाशब्द ऐकोनियां ॥९२॥
हरिकेश बैसला होता ध्यानीं ॥ लक्ष लावूनियां हरचरणीं ॥ मग शिवें करीं धरोनी ॥ उठविला तो हरिकेश ॥९३॥
मग तो उमेनें झाडिला अंचळें ॥ दजभुजीं स्पर्शिला जाश्वनीळें ॥ मग आभरणें दिधलीं सकळें ॥ शंकरें स्वहस्तें तयासी ॥९४॥
हरिकेशासी म्हणे त्रिपुरारी ॥ तूं कैलासीं माझा दंडधारी ॥ मग दंड अर्पिला त्याचे करीं ॥ शंकरें उठोनि ते काळी ॥९५॥
जेवीं सर्वाभरणीं पंचानन ॥ वामांगी उभा वृषभवाहन ॥ त्यासी नाम ठेविलें त्रिनयनें जाण ॥ दंडपाणी ऐसें प्रसिद्ध ॥९६॥
शंकर म्हणे गा दंडपाणी ॥ तूं आनंदकर्ता माझिया मनीं ॥ तरी काशी हे निजधामिनी ॥ इच्छा माझी एकरुप ॥९७॥
तरी हे म्यां केली तुज आघीन ॥ तुज समर्पिले अग्रपूजन ॥ तरीचि हे काशीयात्रा पावन ॥ सुरेंद्रादिकां मानवांसी ॥९८॥
तुझी जे न करिती पूजाविधी ॥ त्यांसी तुवां दंडावें काशीमधीं ॥ तुज समर्पिली विशेष बुद्धी ॥ सर्व गणांमाजी अधिक ॥९९॥
संभ्रम विभ्रम माझे गण ॥ गोकर्ण शंकुकर्ण षडानन ॥ शाख विशाख आणि गजानन ॥ कीर्तिमुख वीरभद्र तो ॥१००॥
नंदी भृंगी शैलादि विख्यांत ॥ भैरव चंडीश मणिमंत ॥ बाण मृत्युंजय महाअद्‌भुत ॥ हे माझे गण श्रेष्ठ पैं ॥१०१॥
या समस्त गणांचा तूं अधिपती ॥ हे अवघे करितील तुझी स्तुझी ॥ ऐसें वदला पशुपती ॥ त्या दंडपाणीसी ते वेळीं ॥१०२॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ ऐसा तो स्थापिला दंडपाणी ॥ त्याची स्तुति करितों अजूनी ॥ मी षण्मुख आदरें ॥१०३॥
कुंभजा तुजऐसा तपेश्वरी ॥ तुज अप्राप्त केली काशीपुरी ॥ मजही घातलें काशीबाहेरी ॥ तो दंडपाणीच होय कीं ॥१०४॥
काशीमध्यें दंडपाणी पूजिती ॥ जे सुमनीं गंगाजळीं स्नपिती ॥ त्यांची सुफळ जाहाली अविमुक्ती ॥ ते वसती शिवलोकीं ॥१०५॥
कुंभजा काशीमध्यें असोनी ॥ जरे न पूजिती दंडपाणी ॥ तरी तो राहों नेदी काशीस्थानीं ॥ ब्रह्मादिका सर्वथा ॥१०६॥
ऐसी हे दंडपाणीची उत्पत्ती ॥ तुज निरुपिली गा अगस्ती ॥ श्रवणपठनमात्रें होय तृप्ती ॥ शिवदर्शनेंकरुनियां ॥१०७॥
आताम श्रोतीं व्हावें समाधान ॥ पुढें कथेसी अर्पिजे श्रवण ॥ हे कथा करी तापत्रयदहन ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१०८॥
इति श्रीस्कंदपुराणे काशाखंडे दंडपाणिमाहात्म्यकथनं नाम षट्‌त्रिंशाध्यायः ॥३६॥
श्रीसांबासाशिवार्पनमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति छप्तर्त्रिशाध्यायः समाप्त ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP