मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ३४ वा

काशी खंड - अध्याय ३४ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
अगस्ति म्हणे गा शिवसुता ॥ फलश्रुतीनें दोषियां मुक्तता ॥ परी पूजने त्या भवानीकांता ॥ विशेष थोर पैं ॥१॥
दोषी जरी जाहाले मुक्त ॥ तरी कां भोगिती अधःपात ॥ सत्य करुनि हा फलश्रुत्यर्थ ॥ दाखवीं मज स्वामिया ॥२॥
तंव बोलिला स्वामी समर्थ ॥ बरवा प्रश्न केला जनहितार्थ ॥ परी येविषयी मानावा विश्वार्थ ॥ अल्पप्रंसगेंकरुनी ॥३॥
पुण्य होतां श्रवण ॥ तेव्हां महादोषां होतसे दहन ॥ परी जे मंदमती अज्ञान ॥ वर्तो नेणती मानव ॥४॥
पुण्यकथा होतसे सहज ॥ परिसती जन धरोनी लाज ॥ तेंचि शरीरीं राखिलें बीज ॥ दोषांचे जाण सर्वथा ॥५॥
एक परिसती एकाग्र मन ॥ कथेसी देती चित्त श्रवण ॥ मग कथा झालिया संपूर्ण ॥ न करिती यज्ञदानें ॥६॥
चित्त ओढीतसे व्यापार ॥ कथा परिसती लोकाचार ॥ तो दोषें मळला नर ॥ नव्हे शुद्ध कवणे काळीम ॥७॥
अथवा जरी गोदानें देती ॥ तरी द्वैतभाव कल्पोनि चित्तीं ॥ दान दिधलें तरी नेणती ॥ संमानें सत्पात्री ॥८॥
हेंचि मूळ जाणावें दोषा ॥ म्हणोनि पडती यमाचे पाशा ॥ संसारमायेचा वळसा ॥ नव्हे शुद्ध कोण काळीं ॥९॥
आणिक योगमायेचें आवरण ॥ तेणें द्विभाव होतसे मन ॥ तो एकाग्र करी परी भिन्न ॥ होतसे बलात्कारें ॥१०॥
श्रवण देतां कथेसी ॥ एक सत्य न घेती मानसीं । हेंचि मूळ अधःपातासी ॥ जावया मानवां ॥११॥
म्हणोनि करावें शुद्ध अंतःकरण ॥ धर्मकथा परिसावी सत्त्वगुण ॥ तरी निरुपिलें पावन ॥ होइजे तत्काळ ॥१२॥
हे धर्मकथा परिसिलिया ॥ तेणें सारांशपुण्य जोडिलिया ॥ पातकें जाती विलया ॥ ठावोचि न उरे सर्तथा ॥१३॥
नातरी जैसा  क्षीरामृतरस ॥ मध्यें पडे लवणाचा अंश ॥ तैसा पुण्यराशींचा होय नाश । दोषकल्पनेकरुनियां ॥१४॥
जैशी लक्ष्मी असे संचितपूर्ण ॥ अकस्मात जोडे अवगुण ॥ मग ते नेइजे हिरोन ॥ गृहस्थापासोनियां ॥१५॥
तैसें जोडलें पुण्य वितळे ॥ मग तें काही केल्या न मिळे ॥ जैसा अन्य यातीसी न मिळे ॥ षट्‍कमीं ब्राह्मण ॥१६॥
म्हणोनि पाहिजे एकाग्र मन ॥ आणि पाहिजे यज्ञ दान ॥ मग वर्तिजे नीतिप्रमाण ॥ तरीचि सत्य फलश्रुती ॥१७॥
परी हें नाहीं गा अनृत ॥ हें अनादि मानवी असे मर्त्य ॥ युगानुयुगीं अनुमत ॥ सहजचि पालटे बुद्धी ॥१८॥
तेथें दोषांचा प्रवेश ॥ आणि अनृतयोगाचा वास ॥ त्या काळीं पुढें सत्यांश ॥ न करीचि सत्वगुण ॥१९॥
परी हें सत्य धर्मशास्त्र ॥ आपणाऐसें करी पवित्र । जरी हें लोटे जन्मांतर ॥ परी न होय ऐसें नाहीं ॥२०॥
हे कथा जाहालिया श्रवण पठन ॥ परी ते काशी सर्वांसी पावन ॥ परी असाध्य हें त्रिनयन ॥ अनुवादला नसे कीं ॥२१॥
म्हणोनि हें शिवनिर्मित ॥ कवण करुं शकेल विपरीत ॥ तंव प्रार्थिला तो शिवसुत ॥ अगस्तिऋषींने ॥२२॥
अगस्ति वदे षडानना ॥ तूं ज्ञानचक्षूंचिया अंजना ॥ परब्रह्मसाध्य निधाना ॥ दीननाथा कृपासिंधू ॥२३॥
तरी प्रश्न असे जी विकटाकृती ॥ काशीमध्ये जो उग्रमूर्ती ॥ त्या कालभैरवाची उत्पत्ती ॥ कैसी जाहाली पैं ॥२४॥
हा कवणाचा जी कोण ॥ काशीमध्यें राहिला काय म्हणोन ॥ क्षेत्रपाळ महादारुण ॥ तें निरुपा समूळ मज ॥२५॥
स्वामी म्हणे गा कुंभोद्भवा ॥ हें भवानी नें प्रश्निलें महादेवा ॥ कैसा उद्भव काळभैरवा ॥ तें परिसावें जी अगस्ती ॥२६॥
अगस्तिमुनि कोणेएके वेळीं ॥ आश्चर्य वर्तले त्रैलोक्यमंडळीं ॥ महदादि मायेचें मौन ते काळीं ॥ पडिलें ब्रह्मादिकांसी ॥२७॥
तैं वर्तलासे थोर कल्पान्त ॥ विरिंचि आणि सिंधुजाकांत ॥ ते योगमायेनें अकस्मात ॥ भुलविले जाण दोघेही ॥२८॥
उद्भवलिया विपरीत बुद्धी ॥ असाध्य जाहाल्या सर्व सिद्धी ॥ ते पडिले अहंबुद्धिसंधी ॥ पालटलिया चित्तवृत्ती ॥२९॥
प्रहरिला शुद्ध सत्त्वमार्ग ॥ घडला अहंमतीचा संसर्ग ॥ विवादों लागले उभय वर्ग ॥ हरि विरिंचि परस्परें ॥३०॥
हरि म्हणे गा विरिंचिनाथा ॥ तूं आत्मबुद्धी प्रहारीं सर्वथा ॥ मीं सर्व कर्ता करविता हे कथा ॥ कथूं नको तूं आम्हांपुढें ॥३१॥
वृथा जाण हें तुझें यज्ञतप ॥ निष्फळ कां करिसी साक्षेप ॥ विसरलासी निजस्वरुप ॥ मजऐसें परब्रह्म ॥३२॥
मजपरता नाही पूर्ण देव ॥ नाहीं मजपरता भक्तीसी ठाव ॥ मज सांडूनिया अन्य भाव ॥ ऐसा पशु कोण थोर ॥३३॥
ऐसें परिसोनि हरिवचन ॥ मग वदता झाला चतुरानन ॥ सर्व सृष्टिकर्ता जो पूर्ण ॥ तो मीचि असें ॥३४॥
मजपासाव पुण्यक्षेत्र ॥ मजपासोनि सर्व सृष्टिसूत्र ॥ सोम सूर्य ग्रह नक्षत्र ॥ हे जाण माझी उत्पत्ती ॥३५॥
मजपासूनि पृथ्वी कुलाचल ॥ मी क्षराक्षर सूक्ष्म स्थूळ । चतुर्विध खाणी त्रैलोक्यमंडळ ॥ हे माझीचि रचना ॥३६॥
नाहीं मजपरतें दीर्घ तत्त्व ॥ नाहीं मजपरतें अन्य सत्त्व ॥ तुवां कां अवलोकिलें मिथ्यात्व ॥ अहंब्रह्म मुरारी ॥३७॥
मी चालवितों सृष्टिकर्म ॥ मीचि पिपीलिका विहंगम ॥ नाहीं मजपरतें आन ब्रह्म ॥ तत्त्वस्वरुप तें मीचि असें ॥३८॥
तूं कां भुललासी गा श्रीहरी ॥ कां बुडतोसी संकल्पसागरीं ॥ आत्मबुद्धि सांडोनियां स्मरीं ॥ मजऐसें पूर्णब्रह्म ॥३९॥
हरि म्हणे रे सावित्रीपती ॥ तुवां हारविल्या वेदश्रुती ॥ ते दैत्य वधोनियां पुनरावृत्ती ॥ स्थापिला म्यांचि कीं ॥४०॥
मी झालों रे साक्षात जीवन ॥ तेथें तू करिसी सचैल स्नान ॥ मग तेणें होसी तूं पावन ॥ सृष्टीचे अधिकारासी ॥४१॥
तंव बोलिला चतुरानन ॥ मी जेव्हां आरंभितों महायज्ञ ॥ तुज समर्पितों भागदान ॥ ऐसा मी गृहस्थ तुझा ॥४२॥
ऐसें विरिंचि हरि परस्परें ॥ विवादते जाहाले प्रत्युत्तरें ॥ पृथ्वीसी जाहाला आकांत एकसरे ॥ विवाद होतां दोघांसी ॥४३॥
विरिंचि म्हणे हो नारायणा ॥ मीचि उद्भविता सुरगणां ॥ माझी संतती या त्रिभुवना- ॥ माजी भरुनि उरली असे ॥४४॥
यक्ष राक्षस आणि सुरपती ॥ गण गंधर्व दिक्पती ॥ हे सकळ माझी उत्पत्ती ॥ तूं नेणसी नारायणा ॥४५॥
हरि म्हणे गा चतुरानना ॥ उद्भविता तूं सुरेंद्रगणां ॥ त्वां केली नवग्रहांचा रचना ॥ मेरुपाठारीं जाण पां ॥४६॥
द्वादश लक्ष अमरपुरी ॥ समग्र कोंदलो देवसुरीं ॥ सप्त लक्ष ब्रह्मपुरी ॥ विस्तीर्ण सत्यलोक ॥४७॥
तरी एवढें तुझें ओडंबर ॥ त्यासी असे माझाचि आधार ॥ मेरुस्वरुपें मीचि घेतला भार ॥ तुजसहवर्तमान ॥४८॥
मग बोलिला तो चतुरानन ॥ दश लक्ष वैकुंठभवन ॥ आणि बत्तीस कोटी प्रमाण॥ मेरु नाम रुप तुझें ॥४९॥
ऐसें तुझें स्वरुप महामेरु ॥ वैकुंठग्राम शार्ङ्गधरु ॥ ऐसा तुझा घेतला भारु ॥ पृथ्वीरुपें समग्र म्यां ॥५०॥
विधि म्हणे हो शार्ङ्गधरा ॥ माझें साक्षात रुप हे वसुंधरा ॥ तिनें पृष्ठी घेतलें गिरिवरा ॥ जो सुवर्णाचळ मेरु तूं होसी ॥५१॥
तंव हरि म्हणे गा विरिंची ॥ ही वृथा उत्तरें तुझे वैखरीचीं ॥ तरी हे पृथ्वी धरिली म्यांची ॥ उदकरुपें होऊनियां ॥५२॥
हरि म्हणे गा चतुरानना ॥ ही पृथ्वी स्वरुप तुझें जाणा ॥ म्यां धरिली जैशे तरुपर्णा ॥ वातरुपें आकाशीं ॥५३॥
मग सृष्टिकर म्हणे गा हरी ॥ सैरा धांवतसे तुझी वैखरी ॥ विचारणा देखोनि शरीरीं ॥ काय न वदसी सत्य तूं ॥५४॥
कश्यप माझा पुत्र सुकुमार ॥ तयाचा नंदन तो समीर ॥ तेणें धरिलें असे निर्धार ॥ रुप तुझें हरी रे ॥५५॥
तंव हरि म्हणे गा नाभ्यकुंरा ॥ वृथा कां बोलिलासी सृष्टिकरा ॥ तेजरुप होऊनि म्यां समीरा ॥ धरिलें असे स्वअंगीं ॥५६॥
तंव बोलिला तो सृष्टिकर ॥ कश्यपाचा पुत्र तो फणिवर ॥ तेणें घेतलासे भार ॥ भूमंदळाचा सर्वही ॥५७॥
तंव बोलों आदरिलें पुरुषोत्तमें ॥ सर्व भार घेतला भोगीद्रोत्तमें ॥ तरी म्यां रक्षिला बहुत नेमें ॥ सत्त्वरुपें तो फणिवर ॥५८॥
भूमंडळ मी धरिलें अधरीं ॥ शेष समग्र तो पृष्ठीवरी ॥ जैसा आणिला गरुडें पृष्ठीवरी ॥ सिंधुमथनीं मंदराचळ ॥५९॥
ऐशीं सप्त पाताळें प्रचंड ॥ सत्त्वें रक्षिलें म्यां ब्रह्मांड ॥ तें उसनें घ्यावया सहस्त्रमुंड ॥ झालासे शयन माझें ॥६०॥
मग ब्रह्मा वदे अधिकत्व ॥ सप्त पाताळें रक्षी सत्त्व ॥ तरी सत्त्वें धरिलें निजतत्त्व ॥ ब्रह्मस्वरुप होऊनि मी ॥६१॥
ऐसे-हरि-विरिंचि परस्परें ॥ विवाद करिते जाहाले निष्ठुरें ॥ ऐशा परस्परसंवादे थोरें ॥ पडलें भुरळें योगमायेचें ॥६२॥
विरिंचि म्हणे मी ब्रह्म साक्षात ॥ हरी म्हणे मी निर्गुण निजतत्त्व ॥ ऐसें मौन जाहालें अकस्मात ॥ महदादीचें दोघांमाजीं ॥६३॥
तंव आला नारद मुनीश्वर ॥ तेणें देखिला विधि शार्ङ्गधर ॥ मग प्रणाम करी मुनीश्वर ॥ हरि-विरिंचिदेवांसी ॥६४॥
मुनि म्हणे गा हरिविरिंची ॥ संख्या पुरली ब्रह्मकल्पाची ॥ म्हणोनि विपरीत बुद्धि तुमची ॥ नेणवे तो हा विनाशकमळ ॥६५॥
तरी विरिंची आणि पुरुषोत्तमा ॥ आतां तुम्हीं जावें बद्रिकाश्रमा ॥ तेथें मुनिवर महा आगमा ॥ कथितील ब्रह्मस्वरुपा ॥६६॥
तेथें होईल तुमचा निर्धार ॥ मग जाणवेल कवण थोर ॥ ते वेळीं हरि आणि सृष्टिकर ॥ जाते जाहाले बद्रिकाश्रमा ॥६७॥
तेथें जुनाट मुनिश्वर बैसले ॥ ब्रह्मस्वरुपीं जे मिळाले ॥ ब्रह्मपदी मिश्रित जाहाले ॥ सरिता सागरीं जेवीं ॥६८॥
घेऊनि मनमुद्रेची मोहनी ॥ बैसले अंतरात्मा साधूनी ॥ विमुख जाहाले अयागमनी ॥ जितेंद्रिय जैसे कां ॥६९॥
वसिष्ठ वामदेव अत्रि मुनी ॥ मार्कंडेय बकदाल्भ्य ब्रह्मज्ञानी ॥ दधीचि मरीचि पिप्पलाद मुनी ॥ महाज्ञानी बैसले जे ॥७०॥
ते निर्वाणमागीचे महावीर ॥ पदीं करिती पापांचा संहार ॥ ज्यांहीं प्रेतवत हें शरीर ॥ देखिलें स्वस्थ असतां ॥७१॥
ऐसें जिंकोनियां ब्रह्मगिरी ॥ सामावले आपणांमाझारी ॥ त्यांहीं देखिले विरिची हरी ॥ जे भुलविले योगमायेनें ॥७२॥
ऋषींमाजीं श्रेष्ठता जयांचा ॥ ते वदते जाहाले अत्रि दधीची ॥ तुम्हां प्रणाम हरि-विरिंची ॥ बद्धपाणी साष्टांगी ॥७३॥
तंव बोलिला वैकुंठवासी ॥ तुम्ही साष्टांग वंदिलें कवणासी ॥ आतां परब्रह्म वस्तू ते आम्हांसी ॥ सांगा तुम्ही श्रेष्ठमुनी ॥७४॥
तंव बोलिला श्रेष्ठाधिप ॥ युगें क्रमिलीं करितां जप ॥ तरी तुम्हां गम्य ब्रह्मस्वरुप ॥ हरि किंवा विरिंची ॥७५॥
ऐसी योगमायेची भुलवणी ॥ भुलविले विरिंचि चक्रपाणी ॥ तंव वदते झाले महामुनी ॥ बकदाल्भ्य दधीची ॥७६॥
ऐसे ऋषीधर परस्परें ॥ अनुवादते जाहाले प्रत्युत्तरें ॥ पहा हो संख्या पुरली एकसरें ॥ ब्रह्मकल्पाची पैं ॥७७॥
ब्रह्मकल्प जयाचा क्षण ॥ हरीचा अंत जो जयाचा दिन ॥ तो अगम्य ईश्वर निर्गुण ॥ जो अगोचर वेदांसी ॥७८॥
असंख्य ब्रह्मांडे जयाचा खेळ ॥ घडितां मोडितां न लगे वेळ ॥ तो ब्रह्मस्वरुप मृगांकभाळ ॥ अकथ्य झाला शिव तो ॥७९॥
तंव अत्रि म्हणे हरि - विरिंची ॥ नेणों हो विपरीत बुद्धि तुमची ॥ तरी महदादि इच्छा शिवाची ॥ नेणों कैसी असेल ॥८०॥
जेथें विरिंचिदेवाची उत्पत्ती ॥ तेथें हरीनें कीजे कृपाप्रीती ॥ ऐसें बोलिलें असे वेदांतीं ॥ स्मरहर विरुपाक्ष ॥८१॥
मग बोलता झाला मेघश्याम ॥ तुम्ही जपतां क्रमिला रे जन्म ॥ परी तुम्हां सुचेना आगम ॥ ब्रह्मस्वरुपाचा ॥८२॥
सांडूनि साक्षात विष्णुतत्त्व ॥ किमर्थ जपतां मिथ्या शिवतत्त्व ॥ तुम्हांसी नाहीं रे ज्ञानतत्त्व ॥ आजन्मपर्यंत कैसें ते ॥८३॥
तंव बोलिला मार्कंडेयऋषी ॥ वेदीं ब्रह्म निरुपिलें जें आम्हांसी ॥ जपतां तें आम्हां बहुतांसी ॥ देखिल्या होय महामुक्ती ॥८४॥
असंख्य्य प्रलयीं असे अचळ ॥ अनंत ब्रह्मांडें व्यापक सकळ ॥ तेंचि शिवस्वरुप केवळ ॥ महदादिसंगें ॥८५॥
तें विपरीत नव्हे गा ब्रह्मादिकां ॥ कोण अमान्य त्या वेदश्लोकां ॥ आतां विरिंचि वैकुंठनायका ॥ परिसी प्रत्युत्तरें ॥८६॥
तुम्हीं घेइजे वेददर्शन ॥ ते करितील ब्रह्मनिरुपण ॥ वेदीं भूत भविष्य वर्तमान ॥ काय पां न होईजे ॥८७॥
वेदांपासूनि शास्त्र पुराण ॥ वेदवाक्यें तरलें त्रिभुवन ॥ आम्ही झालों जपतां पावन ॥ हेचि साक्ष आम्हांसी ॥८८॥
वेदांपासाव सृष्टिसूत्र ॥ वेदांपासाव ज्ञान ध्यान मंत्र ॥ त्यांचें आम्हांसी लिखित आणा पत्र ॥ तरी तें ब्रह्म तुम्हीच ॥८९॥
ऐसें मार्कंडेयाचें वचन ॥ परिसती विरिंचि नारायण ॥ मग विधि-हरींनी गमन ॥ केलें वेदांजवळिकें ॥९०॥
मग त्या सुवर्णाचळाचिया पाठारीं ॥ ईशानभागीं असे वेदपुरी ॥ तेथींचे अधिपती वेदाचारी ॥ त्रैलोक्यरहस्यमार्ग ॥९१॥
तेथें प्रवेशले हरि-विरिंची ॥ त्यांसी क्षोभली महदादि शिवाची ॥ तिणें सामर्थ्ये हरुनि त्यांची ॥ घातलें मौन-मायेचें ॥९२॥
मग वेदांसी म्हणे चतुरानन ॥ आम्हांमध्ये ब्रह्म तें कोण ॥ लक्ष्मीकांत किंवा सावित्रीरमण ॥ निरुपा चतुर्वेद हो ॥९३॥
तंव बोलिला वैखरीपती ॥ जो दर्दुरवेष मुखाकृती ॥ पीतवर्ण जो आकारश्रुती । ऋग्वेद नामें जो होय ॥९४॥
ऋग्वेद म्हणे गा सृष्टिकरा ॥ उत्पत्ति व्यवसाय या मायांकुरा ॥ केवीं पां तुळसी तया परात्परा ॥ विश्वरुपासी सांग पां ॥९५॥
शिवाची इच्छा ते महदादिमा ॥ ते उद्भवविती विधि-पुरुषोत्तमां ॥ तुम्हां लाविलें सृष्टिकार्यक्रमा ॥ ऐसी आज्ञा त्या शिवाची ॥९६॥
तैं बोलिला तो पुरुषोत्तम ॥ तुज ठाउकें नाहीं रे ब्रह्म अगम्य ॥ मग ऋग्वेद म्हणे तरी ब्रह्म ॥ प्रश्नावें यजुर्वेदासी ॥९७॥
मग हरि विरिंची ते काळीं ॥ गेले तय यजुर्वेदाजवळी ॥ त्यांहीं देखिला तो चक्षुमंडळीं ॥ यजुर्वेद कैसा तो ॥९८॥
तो श्वेतवर्णे अश्वमुखाकार ॥ मध्यमा वाचेचा प्रियवर ॥ तयासी हरी आणि सृष्टिकर ॥ प्रश्निते जाहाले ते समयीं ॥९९॥
मग हरि म्हणे गा यजुर्वेदा ॥ मध्यमावरा द्वितीय पदा ॥ आतां विधि-हरींचिया भेदा ॥ कथावें ब्रह्म समूळ तें ॥१००॥
यजुर्वेद वाचे वदता जाहाला ॥ तो भाळाक्ष सांग वेदें कथिला ॥ भस्मधारीं व्रध्नं प्रकाशला ॥ कोटिरुपें होऊनियां ॥१०१॥
ऐसा तो शिव सवराभर ॥ तेंचि ब्रह्म जाणावें परत्पर ॥ हरि विरिंची हें मायांकुर ॥ आज्ञाधारक शिवाचे ॥१०२॥
ऐशीं यजुर्वेदाचीं वचनें ॥ निषेधिलीं हरि-विरिंचीनें ॥ म्हणती तुम्हांपाशीं नाहीं गा पावन ॥ ब्रह्मस्वरुप तें सर्वथा ॥१०३॥
मग सांगता जाहाला यजुर्वेद ॥ तुम्हीं निषेधिला आमुचा शब्द ॥ तरी पूर्णब्रह्म हा अनुवाद ॥ प्रश्न करा आतां सामवेदासी ॥१०४॥
मग हरि-विरिंची वेगेंसी ॥ तत्काळ गेले सामवेदापाशीं ॥ कैसे देखिलें त्या श्रुतिमार्गासी ॥ हरि-विरिंचींनी ॥१०५॥
देखिला श्यामवर्ण दिव्यदीप्ती ॥ जो पश्यंती वाचेचा अधिपती ॥ स्वामी कथीतसे अगस्तीप्रती ॥ कैसें रुप सामवेदाचें ॥१०६॥
श्वानमुखाकृति अजाकर्ण ॥ मग त्यासी वदले हरि चतुरानन ॥ आम्हांमध्ये जे परब्रह्म पूर्ण ॥ तें कथा सामवेदा ॥१०७॥
सामवेद वदे उभयमूर्ती ॥ ब्रह्मा हरी हे मायाकृती ॥ हे असंख्य होत जात असती ॥ ध्यानामाजी शिवाचिया ॥१०८॥
तोचि एक परब्रह्म निर्गुण ॥ असंख्य प्रलय जयाचें ध्यान ॥ जयाची हे महदादि सगुण ॥ तुम्ही अंकुर तयेचें ॥१०९॥
ऐसें वदला श्रुतिसाम ॥ मग त्यासी वदला कर्ता सृष्टिकर्म ॥ तुम्हांसी नाहीं रे शुचि आगम ॥ आम्हांऐसें ब्रह्मरुप ॥११०॥
तंव वदला तो पश्यंतीवर ॥ जरी आम्हांसी अगम्य सर्वेश्वर ॥ तरी आता पूर्णब्रह्म निर्धार ॥ पुसा अथर्वण वेदासी ॥१११॥
मग क्रमितां विधि नारायण ॥ त्यांही कैसा देखिला अथर्वण ॥ अगस्तीसी वदे षडानन ॥ शिवसुत कार्तिकेय जो ॥११२॥
तो सुनीळवर्ण दिव्यतेज कैसा ॥ देखिला तो जंबुकाऐसा ॥ तो पराधिपता स्मरतां विशेषा ॥ देखिला तेव्हां विधि-हरींनी ॥११३॥
मग हरि म्हणे गा अथर्वणा ॥ तुम्हीं कथावें ब्रह्मा निर्गुणा ॥ हरि-विरिंचांमध्ये पूर्ण ज्ञाना ॥ कोण ब्रह्म पाहें पा ॥११४॥
मग अथर्वण वदे प्रत्युत्तर ॥ विश्वरुप तो आदिशंकर ॥ अनन्यभावें तो परात्पर ॥ शिवचि ब्रह्म केवळ जो ॥११५॥
विधि-हरींसी वदे अथर्वण ॥ जैसा दीर्घ अधिपती तैसेंचि स्थान ॥ शिवकैलास असे भुवन ॥ कोण सामर्थ्य  असे पैं ॥११६॥
तंव बोलिले विरिंची हरी ॥ तुम्ही भुललां रे वेदां चारी ॥ दर्शनें पुराणें त्रैलोक्यांतरीं ॥ ते भांबावले नाहीं शुद्धी ॥११७॥
अथर्वण वदे हरि विरिंची ॥ कोण स्पर्धा करी त्या शिवाची ॥ आतां आर्त पुरवील तुमची ॥ ओंकारपिता आमुचा जो ॥११८॥
तो चतुर्वेदांचा उद्भविता ॥ तुम्हांसी कथील ब्रह्मवार्ता ॥ मग हरि विरिंची ते क्रमितां ॥ चालले ओंकारभेटी ॥११९॥
कैसा देखिला ओंकार प्रणव ॥ तो परमात्मा साक्षात शिव ॥ कीं निर्धारितां तो ज्ञानउद्भव ॥ होईल त्रिपदातें ॥१२०॥
ओंकार नव्हे ते त्रिपदा ॥ कीं ते शिवइच्छा उद्भविती वेदां ॥ ब्रह्मांड घडी मोडी हे सुशब्दा ॥ शिवाआधीन वर्तत ॥१२१॥
तेचि म्हणिजे त्रिपदा ओंकार ॥ तियेसी प्रश्निती हरे सृष्टिकर ॥ आम्हांमध्ये जो सबराभर ॥ तो कोण ब्रह्मतत्त्व ॥१२२॥
मग बोलिली त्रिपदा सिद्धी ॥ म्हणे परियेसीं गा सत्यलोकाधी ॥ वेदीं निरुपिला पूर्ण विधी ॥ तो नव्हे विपरीत पैं ॥१२३॥
हरि विरिंची हे मायांकुर ॥ ते मायेसहित होतसे संहार ॥ परमात्मस्वरुप निरंतर ॥ सकळां साक्षी ॥१२४॥
म्हणोनि मायाकार्य तें मिथ्याची ॥ उत्पत्ति प्रलय कीर्ति तुमची ॥ नव्हे ब्रह्माड हरि विरिंची ॥ परी शिवाआधीन हें ॥१२५॥
तो निजतत्त्व स्वरुप प्राज्ञ ॥ त्यासी नेणती विधि नारायण ॥ ऐसें वदली ते कामधेनु पूर्ण ॥ ओंकार त्रिपदा जे ॥१२६॥
मी असें त्याचे मुकुटीं ॥ परी तो आगम्य मज धूर्जटी ॥ जेवीं नागिणी सरोवरतटीं ॥ नेणोचि पद्मिणीकमळाप्रती ॥१२७॥
ऐसें त्रिपदेचें बोलणें ॥ निषेधिलें हरि विरिंचीनें ॥ तूं नेणसी हो ब्रह्म निर्गुण ॥ निजतत्त्व ते आम्ही ॥१२८॥
ऐसे जे चतुर्वेद-त्रिपदा-ओंकार ॥ त्यांतें निषेधिते जाहाले हरि सृष्टिकर ॥ म्हणती तुम्हांसी नाहीं तत्त्वस्मर ॥ तुम्ही भुललां रे समस्त ॥१२९॥
निर्भत्सिला चतुर्वेदांचा मान॥ त्रिपदा प्रणव केले अमान्य ॥ मग जाहाला तो क्रोधायमान ॥ त्रिपुरहंता जो म्हणवीत ॥१३०॥
कीं ब्रह्मकल्पाची पुरली संख्या ॥ म्हणोनि कोप उद्भवला विरुपाक्षा ॥ वेदनिर्भत्सना देखोनि महेशा ॥ न सांवरे तो ते काळीं ॥१३१॥
नातरी शार्दूळाचिया अपत्यांसी ॥ जैसी कपोतें पीडा करिती अहर्निशीं ॥ तें देखोनि महामृगेशासी ॥ देवीं पारधित्वा ये ॥१३२॥
कीं रायाचा जैसा प्रियकर सेवक ॥ त्यासी पीडा करी मंडळनायक ॥ तैसा वेद निर्भर्त्सिता त्र्यंबक ॥ कोपला विधि-हरींसी ॥१३३॥
तो क्रोध आसनीं नव्हे निश्चळ ॥ क्षितीं त्राहाटिले दक्षिण करतळ ॥ त्या दोर्दंडापासाव महाकाळ ॥ उद्भवला तो भैरव पैं ॥१३४॥
तो कैसा उद्भवला उग्रमूर्ती ॥ जटा पिंगट त्रिशूळ हातीं । कंठीं रुंडमाळा दिव्य दीप्ती ॥ श्रवणीं कुंडलें विराजमान ॥१३५॥
ऐसा तो उद्भवला भूतेंद्र ॥ तपश्वर्ये जैसा पूर्णचंद्र ॥ कीं तो उद्भवला वीरभद्र ॥ दक्षयागाविध्वंसक ॥१३६॥
जटाजूट करपात्र त्रिनेत्र विशाळ ॥ सधन दोर्दंड महाशक्तिकाळ ॥ मग बद्धकरें जाश्वनीळ ॥ प्रार्थिला भैरवें ॥१३७॥
म्हणे आज्ञा कीजे हो शिवलिंगा ॥ मी उद्भवलों कवणें प्रसंगा ॥ तरी मी आर्त त्या कार्यभागा ॥ बहु त्वरा तंव पहा हो ॥१३८॥
मग बोलिला तो विश्वभर ॥ भाललोचन जगदीश्वर ॥ म्हणे हरि आणि सृष्टिकर ॥ प्रवर्तले अहंमर्ती ॥१३९॥
त्यांहीं वेदांची केली निर्भत्सा ॥ विसरले परम पुरुषा ॥ त्रिपदा निंदोनियां वळसा ॥ केला ऋषीश्वरांसी ॥१४०॥
ते त्रिपदा माझी इच्छा पूर्ण ॥ वेद उद्भविती जाहाली सगुण ॥ ते उत्थापिली हरि-विधीनें ॥ मोडिले त्रैलोक्यरहस्यमार्ग ॥१४१॥
तरी तूं काळभैरवा ऐसें करीं ॥ चतुर्वेद स्थापावें वेदपुरीं ॥ त्रिपदा आश्वासूनि पूर्वापारीं ॥ चालवावे सृष्टिकर्मातें ॥१४२॥
स्थापित्यांसी दीजे अभयवर ॥ उत्थापित्यां दीजे खङ्गप्रहार ॥ मग त्रिदेवांमध्यें ईश्वर ॥ महाश्रेष्ठ तों कां नव्हे ॥१४३॥
त्या उभभतांचा पाहिजे अन्याययोग ॥ मग विचारणा कीजे नीतिमार्ग ॥ ऐसा निरुपिता जाहाला प्रसंग ॥ शिव काळभैरवासी ॥१४४॥
मग दक्षिणकरें मौळीं स्पर्शून ॥ विश्वंभरासी केलें अभिवंदन ॥ ऐसी शिव आज्ञा अंगीकारुन ॥ निघता जाहाला भैरव तो ॥१४५॥
वेगीं पावला तो वेदपुरीं ॥ तेथें अनुवादती विरिंचि हरी ॥ ते वारिले उभयकरीं ॥ मध्यें उभा ठाकोनियां ॥१४६॥
तो कैसा देखिला विधि-हरीनें ॥ सप्तपाताळ पुटीं त्यची चरणें ॥ मौळीमुकुटें स्पर्शिले संपूर्ण ॥ एकवीस स्वर्ग पैं ॥१४७॥
मग तो विरिंची आणि हरी ॥ महाकाळासी पृच्छा करी ॥ तूं कवण गा एकसरीं ॥ उद्भवलासी अकस्मात ॥१४८॥
तंव बोलिला भूताधिपती ॥ त्रैलोक्यमंडळी ॥ जे विवादती ॥ त्यांमध्यें दीर्घ न्यून ऐसी गती ॥ जाणतसे सर्वाची ॥१४९॥
ऐसें ऐकोनिं प्रतिवचन ॥ आनंदले विधि नारायण ॥ म्हणती आम्हांमध्यें कोण ॥ निरुपावें ब्रह्म हें ॥१५०॥
मग भैरव वदे प्रतिवचन ॥ माझ्या नखाग्रीं असे तुमचा विवाद पूर्ण ॥ आतां तत्काळ सांगेन खूण ॥ तुम्हांमाजीं कोण श्रेष्ठ ॥१५१॥
सप्तपाताळीं माझिया चरणा ॥ तूं पहावया जाईं नारायणा ॥ मुकुट पाहावया गगना ॥ विरिंची तुंवा जाइंजे ॥१५२॥
मुकुट एकवीस स्वर्गमंडळीं ॥ पादुका असती सप्तपाताळीं ॥ जो त्वरावंत तत्काळीं ॥ पाहूनि येईल तो श्रेष्ठ ॥१५३॥
ऐसीं त्या भैरवचीं वचनें ॥ मनिलीं विरिंचि नारायणें ॥ पहा हे देव वेष्टिले अज्ञानें ॥ ऐसें मौन मायेचें ॥१५४॥
मग ब्रह्मा निघे स्वर्गमंडळीं ॥ विष्णूनें क्रमिनें सप्तपाताळीं ॥ तेणें भैरव देखिला ते काळीं ॥ ब्रह्मांडभरी सारिखा ॥१५५॥
विष्णु क्रमीतसे चरणाधारें ॥ उल्लघीतसे सप्तपाताळविवरें ॥ शक्ति सांडिला शार्ङ्गधरें ॥ झाला खेदें क्षीण तो ॥१५६॥
मुखीं ब्रह्मतत्त्वाचा विचार ॥ पाताळें क्रमितां शार्ङ्गधर ॥ तंव देखिला सिद्धिबुद्धिवर ॥ पाताळकंदगण तो ॥१५७॥
तो गण बैसलासे पद्मासनीं ॥ हृदयीं जपतसे शूलपाणी ॥ तो विष्णूनें देखिला नयनीं ॥ अक्स्मात ते ठायीं ॥१५८॥
मग हरि गेला तयाजवळी ॥ म्हणे कोण तूं या पाताळीं ॥ किंनिमित्त बैसलासी ये स्थळीं ॥ तें सांग आताम मजलागीं ॥१५९॥
मग बोलिला तो शिववृंद ॥ म्हणे माझें नाम पाताळकंद ॥ मी जण्तसें सुशब्द ॥ पर ब्रह्मस्वरुप तें ॥१६०॥
मी बैसलोंसे याचिकारण ॥ मज ब्रह्म जोडलें असे निर्गुण ॥ मग मी सामावलों परतोन ॥ उगमीं आपुलिया ॥१६१॥
ऐसा पातालकंद आणि श्रीअनंत ॥ करिते झाले परस्परें मात ॥ श्रोतीं परिसावा तो वृत्तांत ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१६२॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंड पाताळकंददर्शन नाम चतुस्त्रिंशाध्यायः ॥३४॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पनमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु॥
॥ इति चतुस्त्रिंशाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 29, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP