मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय २५ वा

काशी खंड - अध्याय २५ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥
विमान चालिलें शीघ्रगती ॥ तंव लोक देखिला पुढती ॥ गण सविस्तर सांगती ॥ शिवशर्म्याप्रती ॥ तेधवां ॥१॥
स्थूल देखिलें जी विस्तीर्ण ॥ सप्त लक्ष योजनें प्रमाण ॥ तेथें स्थिर करूनियां विमान ॥ विष्णुगण उतरले ॥२॥
तो देखिला सत्यलोक ॥ अवघे गायत्रीजपकारक ॥ कीं ते धामीं धामीं अर्क ॥ उदेले जैसे ॥३॥
अवघ्या पतिव्रता कुलांगना ॥ स्वामिभक्त तरुण सगुणा ॥ कोणे काळीं त्या न दिसती भिन्न ॥ प्राण प्रकृती जैशा ॥४॥
भूमिका बांधिल्या हेमरत्नीं ॥ घामीं घामीं दुभती दुभणी ॥ कामधेनु निशिदिनीं ॥ स्त्रवती पीयूष त्रिकाळ ॥५॥
चौसष्टिक जांबूनद ॥ त्यावरी जडिले गोमेद ॥ मंडप आणि प्रासाद ॥ दिव्या तेजोमय विराजती ॥‍६॥
जैसीं व्योमीं शुभ्र अभ्रपुटें ॥ तैसीं मंदिरें दिसती एकवटें ॥ द्दष्टी लागतां दिसे नेटें ॥ मुक्ताहारचि पैं ॥७॥
ध्वजा विद्युल्लतांचिया परी ॥ जैशा कां क्षीरार्णवाच्या लहरी ॥ तेथें गर्जना होतसे भारी ॥ वेदध्वनींची द्विजमुखें ॥८॥
शिवशर्मा पुसतसे गणांसी ॥ थोर आश्चर्य वाटतसे मानसीं ॥ येथें लोक दिसती तेजोराशी ॥ सूर्यमूर्ती जैशा कां ॥९॥
येथें विमान केलें निश्चळ ॥ ऐसें हें कोण दीर्घ स्थळ ॥ कोण येथींचा लोकपाळ ॥ तो सांगा आम्हांसी ॥१०॥
ऐसी हे कोणाची पुरी ॥ सप्त लक्ष विस्तीर्ण थोरी ॥ कल्पवृक्ष घरोघरीं ॥ असत्यासी जेथें नाहीं प्रवेश ॥११॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ सत्यलोक नाम या भुवनासी ॥ हे तंव ब्रह्मपुरी निश्चयेंसीं ॥ येथींचा निवासी चतुरानन ॥१२॥
तो सप्तऋषींचा पितर ॥ या ब्रह्मलोकाचा राज्यधर ॥ चतुर्विध खाणींचा मूळविस्तार ॥ याजपासूनि जाण पां ॥१३॥
हा सृष्टिकर विधाता ॥ आणि या त्रैलोक्याचा पिता ॥ चरी खाणींचा उद्भविता ॥ हाचि असे एक पैं ॥१४॥
हा सर्व जंतूंची करीतसे ॥ परी हा करूं नेणें शांती ॥ ऐसा असे वेदमूर्ती ॥ सत्यलोकासी ॥१५॥
जैं कल्पान्त होय संपूर्ण ॥ तो विधीचा एक दिन ॥ तेव्हां प्रळय होतसे दारुण ॥ सकळ जीवजंतूंसी ॥१६॥
मग हा दुसरी सृष्टि करी ॥ ऐशा सृष्टि शत संवत्सरीं ॥ तैं हा विदेही शरीरी ॥ होतसे चतुरानन ॥१७॥
तैं महाप्रलयाचें अवसान ॥ होय पंचमहाभूतांचें दहन ॥ हें पूर्वीं केलें निरूपण ॥ भवानीनें अगस्तीसी ॥१८॥
अगस्ति म्हणे लोपामुद्रेसी ॥ ऐसें गणीं कथिलें शिवशर्म्यासी ॥ तो हा सत्यलोकनिवासी ॥ विधि जाणावा ॥१९॥
शिवशर्मा पुसे गणोत्तमां ॥ मज निरूपावें करूनि पूर्ण क्षमा ॥ कोणापासाव हा ब्रह्मा ॥ कैसा याचा जन्मवृत्तांत ॥२०॥
गण म्हणती हो ब्राह्मणा ॥ कैसा जन्म या चतुरानना ॥ आतां तूं एकाग्र होईं गा श्रवणा ॥ करूं निरूपण सविस्तर ॥२१॥
चतुर्दश कल्पांची गणना ॥ तैं एक महाकल्प जाणा ॥ चौदा महाकल्पांचिया प्रमाणा ॥ बोलिजे एक मन्वंतर ॥२२॥
चौदा मन्वंतरें गणिजे ॥ तो एक वराहकल्प बोलिजे ॥ ऐसे चौदा कल्प बोलिजे ॥ तें एक युग जाण पां ॥२३॥
चौदा अर्धयुगांची गणना ॥ एक धुमधुमाकारयोग जाणा ॥ इतुक्या संख्या पंचानना ॥ समाधि होती होती संपूर्ण ॥२४॥
मग तो समाधि विसर्जून ॥ ब्रह्मांड अवलोकी त्रिनयन ॥ तंव इच्छा जाहली पूर्ण ॥ समाधीची ॥२५॥
श्रीतीं कीजे हो एकाग्र मन ॥ हे कथा जुनाट पूर्ण ॥ हरि-विरिंचींसी अयागमन ॥ जाहलें असे कोटीवरी ॥२६॥
जैं इच्छा केलीं शूळपाणी ॥ तैं महदादि व्यापिलें त्रिभुवनीं ॥ मग तो शिवइच्छेपासुनी ॥ जन्मला पुरुषोत्तम ॥२७॥
शिवाची इच्छा ते माया महदादिमा ॥ तयेपासाव जन्म पुरुषोत्तमा ॥ तेंचि गुणनाम जाहालें मेधश्यामा ॥ इच्छाविष्णु ऐसें ॥२८॥
उद्कें व्यापिलें होतें भूमंड्ळ ॥ त्या उदकीं पहुडला घननीळ ॥ त्याचे नाभिस्थानीं कमळ ॥ उद्भवले एक जाणिजे ॥२९॥
तो पुरुषोत्तमाचा नाभिअंकुर ॥ परियेसीं त्या कमलाचा पसर ॥ नव्याण्णव कोटी विस्तार ॥ त्या कमलाचा बोलिजे ॥३०॥
अष्ट जीं द्ळें त्या कमळासी ॥ त्याचि अष्टदिशा परियेसीं ॥ त्या कमळामाजीं विरिंचीसी ॥ जन्म जाहाला पाहें पां ॥३१॥
ऐसें तें कमळ अष्टदिशाकृती ॥ तेथें जो जन्मला प्रजापती ॥ तो सत्यलोकींचा अधिपती ॥ केला शंकरें स्वइच्छें ॥३२॥
जो सप्तऋषींचा पूर्वज ॥ जो सृष्टिकर्ता त्रैलोक्यपूज्य ॥ हा विरिंची हंसध्वज ॥ शिवइच्छेपासाव जन्म याचा ॥३३॥
हा त्रैलोक्याचा पितर ॥ यासी करावा नमस्कार ॥ मग ते गण आणि द्विजवर ॥ ब्रह्मपुरीमाजीं प्रवेशले ॥३४॥
तंव तो मृगाजिनीं सावित्रीकांत ॥ सृष्टिक्रमें असे जपत ॥ त्यांहीं देखिला साक्षात ॥ गभस्तिसमान प्रभा जयाची ॥३५॥
मग विष्णुगण आणि शिवशर्मा ॥ त्यांनीं नमस्कारिला तो ब्रह्मा ॥ मग तयांसी कुशलक्षेमा ॥ पुसता जाहाला विधि तो ॥३६॥
मग विरिंची म्हणे विष्णुगणांसी ॥ वैकुंठीं हरि असे क्षेमरूपेंसीं ॥ आमुचें नमन हरिचरणांसी ॥ समर्पावें बद्धकरें ॥३७॥
आणि प्रार्थावा नारायण ॥ त्यासी कथावा एक प्रश्न ॥ तुमचिये कृपें चतुरानन ॥ चालवीत सृष्टिक्रमातें ॥३८॥
ऐसी विज्ञापना पुरुषोत्तमा ॥ विरिंचिदेवासी कीजे क्षमा ॥ मग चतुराननासी शिवशर्मा ॥ नमिता जाहला बद्धकरें ॥३९॥
मग त्यासी म्हणे चतुरानन ॥ तुज भेटेल रे नारायण ॥ पृथ्वीचे ठायीं सत्त्वगुण ॥ देखिला नाहीं तुजऐसा ॥४०॥
शिवशर्म्या तुवां जें पुण्य केलें ॥ तें संचित फळासी आलें ॥ ऐसें कोणासी नाहीं घडलें ॥ या महीतळीं असतां ॥४१॥
तुज घडल्या या सप्त पुरिया ॥ काशी कांची मथुरा माया ॥ अयोध्या अवंतिका द्वारावतिया ॥ तेणें पावलासी मोक्ष तूं ॥४२॥
तुज मृत्यु जाहाला मायापुरीसी ॥ म्हणोनि जाणें वैकुंठासी ॥ मृत्यु जरी होता वाराणशीसी ॥ तरी पावतासी मोक्षपद ॥४३॥
जरी कल्पिजे राज्यपदार्थ ॥ व्हावें म्हणे छत्रपति समर्थ ॥ तरी सफळ नव्हे मनोरथ ॥ प्रयागावांचूनि सर्वथा ॥४४॥
जैसा हा सत्यलोक ॥ तैसाचि बोलिजे प्रयाग एक ॥ तेथें भिन्नभावें आणिक ॥ तुळों न शके सर्वथा ॥४५॥
विंध्याचळ आणि हिमाद्री ॥ या दोहींमध्यें असती दोन सुंदरी ॥ जयांच्या पवित्रतेची उत्तम थोरी ॥ सिता असिता नामें ज्या ॥४६॥
या ब्रह्मांडामाजी पाहातां ॥ ऐशा नाहींच पुण्यसरिता ॥ असिता ते बोलिजे हरिकांता ॥ सूर्यकुमरी यमुना जे ॥४७॥
दुसरी शिवांगना सिता ॥ ती हिमाद्रीची दुहिता ॥ ह्या मीनल्या दोघी सरिता ॥ गंगायमुनासंगम तो ॥४८॥
त्या त्रिवेणीसंगमीं जाण ॥ विधि म्हणे म्यां केलें अनुष्ठान ॥ तेंचि प्रयाग ब्रह्मभुवन ॥ माझेंही मन इच्छीतसे ॥४९॥
विरिंचि म्हणे गा ब्राह्मणा ॥ तेथें म्यां केली लिंगस्थापना ॥ सहस्त्र चौकडया पंचानना ॥ लक्षिलें ध्यानीं ॥५०॥
जें लिंग स्थापिलें शूलटंकेश्वर ॥ तेथें मज प्रसन्न झाला शंकर ॥ देऊनियां अपूर्व वर ॥ दिधला हा लोक मजलागीं ॥५१॥
आणिक दिधलें प्रयागस्थान ॥ तेथें म्यां केलें हवन ॥ तें त्रिवेणीचें जीवन ॥ दुर्लभ जाण प्रमथांसी ॥५२॥
विरिंचि म्हणे गा ब्राह्मणा ॥ या प्रयागतीर्था आणि ब्रह्मभुवना ॥ या दोनी असती नामधारणा ॥ परी भिन्नता नाहीं सर्वथा ॥५३॥
तेथें जरी घडे माघस्नान ॥ आणि शूलटंकेश्वरीं घडे अर्चन ॥ तरी मी तयासी ब्रह्मभुवन ॥ प्राप्त करीन जाण पां ॥५४॥
मज प्रसन्न झाला शंकरु ॥ तैं निर्मिला तो रुद्रतरु ॥ जरी तेथें देह त्यागी नरु ॥ तरी तो होय छत्रपती ॥५५॥
त्या रुद्रतरूचिया मूळें ॥ व्यापिलीं असती सप्त पाताळें ॥ व्योमीं लक्षितां तयाचीं रुळें ॥ एकवीस स्वर्गपर्यंत ॥५६॥
ऐसा तो जाण रुद्रतरु ॥ त्यासी असे शिवाचा वरू ॥ तेथें देह विसर्जी जो नरू ॥ तो पावेल राज्यपद ॥५७॥
राजभोग सरलियावरी ॥ पुत्रासी जोडे हरिसुंदरी ॥ ऐसा लक्ष संवत्सरवरी ॥ वर असे शिवाचा ॥५८॥
म्हणोनि हें प्रयागस्थान ॥ साक्षात बोलिजे ब्रह्मभुवन ॥ तेथींचे लोकां गमन ॥ सत्यलोकीं निर्धारें ॥५९॥
जो ब्राह्मसंख्या होतसे कल्प ॥ त्या कल्पीं न भंगे तो रुद्रवृक्ष ॥ प्रळयीं हरिनिद्रा प्रत्यक्ष ॥ वटपत्रीं बोलिली ॥६०॥
ऐसा सिता-असितांचा मेळ ॥ तेथें न बाधे प्रळयकाळ ॥ म्हणोनियां तमालनीळ ॥ त्या वटपत्रीं शयन करी ॥६१॥
या रुद्रवृक्षातळीं ॥ देह त्यागी जो याचे मूळीं ॥ तरी तयाचे वंशीं सिंधुबाळी ॥ अक्षयी वसे ॥६२॥
अवतरोनि मनुष्यजन्मीं ॥ माघस्नान घडे त्रिवेणीसंगमीं ॥ तो कृतांताहूनि पराक्रमी ॥ जिंकीतसें शिवलोकातें ॥६३॥
असतां दूरदेशांतरीं ॥ प्रयाग तीर्थ न घडे संसारीं ॥ तरी नाम स्मरावें निर्घारीं ॥ त्रिकाळ त्रिवेणीचें ॥६४॥
त्यासी घडे माघस्नान ॥ आणि वाचेसी करी उच्चारण ॥ तरी महादोषांचें होय दहन ॥ सहस्त्र संवत्सरींच्या ॥६५॥
प्रयागतीर्थ जो करी संसारी ॥ आणि शूलटंकेश्वरासी नमस्कारी ॥ तो वसे जी चंद्रार्कवरी ॥ सत्यलोकीं जाण पां ॥६६॥
संसारी होय प्रयागवासी ॥ त्रिवेणीस्नान घडे त्रिकाळ ज्यासी ॥ तो पूर्वजांसह ब्रह्मलोकासी ॥ वसे कल्पवरी ॥६७॥
प्रयागीं जो बैसे अनुष्ठानीं ॥ दोन घटिका क्रमी ध्यानीं ॥ तरी अनेक तीर्थींचे धूम्रपानी ॥ न तुळती त्यासीं शत वर्षांचे ॥६८॥
प्रयागी करी वस्त्रदान ॥ धर्मर्जित वेंची एक मुष्टि धान्या ॥ तरी त्यासी घडे सर्वथा पुण्य ॥ शत एक यागांचें ॥६९॥
दुर्बळ समर्पी द्रव्यांश ॥ तरी तेणें केला जी तुलापुरुष ॥ ते मुख्य पुरी अविनाश ॥ म्हणोनि जोडे पुण्यवृद्धी ॥७०॥
प्रयागीं समर्पी शिरकमळ ॥ तरी प्राप्त होईल भूमंडळ ॥ जेथें असे महापुण्यजळ ॥ गंगा-कालिंदींचें ॥७१॥
जो जळार्णवींचा पाणबुडा ॥ रत्नें मुक्तें काढीतसे पुढां ॥ मृत्यु जाहाला तरी बापुडा ॥ व्यर्थ गेला संसारीं ॥७२॥
तैसी नव्हे त्रिवेणीची बुडी ॥ हे तंव भूमंडळराज्य रत्न काढी ॥ देह समर्पूनि केली त्याची जोडी ॥ तेणें चंद्रार्कवरी ॥७३॥
पाहातां प्रयागाचें महिमान ॥ जैं पृथ्वी व्यापें पूर्णजळेंकरून ॥ तैं येथींचा वटपत्रीं नारायण ॥ निद्रा करी प्रळयावसानीं ॥७४॥
हा तरु अभंग प्रलयजीवनीं ॥ म्हणोनि बोलिजे वेदपुराणीं ॥ सर्व वाखाणिती मुनी ॥ अक्षयवट हा ॥७५॥
पूर्वभाग्य जयासी घडे ॥ तरीचि प्रयागपरीस जोडे ॥ तणेंचि कर्मकाळिमा उडे ॥ या देहधातूची सर्वही ॥७६॥
तीर्थें असती पृथ्वीवरी ॥ तीं न तुळती प्रयागाची थोरी ॥ पाषाण केवीं पावें सरी ॥ चिंतामणीची ॥७७॥
जैसा दीप आणि अर्क ॥ कीं जैसा भूपती आणि रंक ॥ तैसा तीर्थांमाजी श्रेष्ठ एक ॥ तीर्थराज प्रयाग तो ॥७८॥
जेवीं निशी विध्वंसावया ब्रघ्न ॥ कीं तृण दग्धावया अग्न ॥ तैसा महादोष करावया भग्न ॥ तीर्थराज प्रयाग जाण पां ॥७९॥
मात्रागमन सुरापानें ॥ गोत्रहत्या गोहननें ॥ तीं पराभवती एकाचि स्नानें ॥ या त्रिवेणीसंगमीं ॥८०॥
मेरूसमान दोषराशी ॥ ज्या घडती लक्षचौर्‍यायशीं ॥ त्या चुकती प्रयागासी ॥ दर्शनमात्र झालिया ॥८१॥
ऐसा त्या शिवशर्म्यासी ॥ कथीतसे सत्यलोकनिवासी ॥ अरे हा प्रयाग सकळ तीर्थांसी ॥ श्रेष्ठ असे जाण पां ॥८२॥
हा सकळ तीर्थांचा राजा ॥ सर्व तीर्थें याचिया प्रजा ॥ हा राज्यपद देतसे वोजा ॥ म्हणोनि बोलिजे तीर्थराज ॥८३॥
मग पुरस्कारूनि वदे सुशीळगणा ॥ आणिक ऐक रे शिवशर्म्या ब्राह्मणा ॥ कैसी जाहाली प्रयागाची रचना ॥ तो परियेसीं मूळ वृत्तांत ॥८४॥
कोणे एके प्रळयावसानीं ॥ सर्व देवांसी जाहाली पळणी ॥ जळ व्यापलें त्रिभुवनीं ॥ नभपर्यंत ॥ पैं ॥८५॥
उदकीं आच्छादलें त्रिभुवन ॥ कैलास वैकुंठ सत्यभुवन ॥ पृथ्वी जाहालीसे परिपूर्ण ॥ जळार्णवीं ते काळीं ॥८६॥
मग त्या प्रळयजीवनीं ॥ रुद्रतरु उद्भवला कोठूनी ॥ ऊर्ध्व पाहातां गगनीं ॥ एकवीस स्वर्गपर्यंत ॥८७॥
शेषें सांडिली महीतळी ॥ तो प्रळयजीवनीं धुंडाळी ॥ तंव देखिली सप्तपाताळीं ॥ मुळी त्या वृक्षाची ॥८८॥
ऐसे प्रळयजीवनीं ॥ आम्ही बुडतां वांचलों ते स्थानीं ॥ शेष ब्रह्मा आणि चक्रपाणी ॥ या असती त्रिमूर्ती ॥८९॥
मग त्या वृक्षाचे तळीं ॥ शेष राहिला सप्तपाताळीं ॥ तरुपेड धरोनियां जळीं ॥ राहिलों मी ॥९०॥
मग  त्या वटपत्रावरी ॥ निद्रित जाहाला मुरारी ॥ जे कां कुमुदिनी जळधारीं ॥ तिचे कमळीं जैसा मधुकर ॥९१॥
जेव्हां वटपत्रीं पहुडला नारायण ॥ तेव्हां आम्ही सर्व समाधिस्थ जाहालों पूर्ण ॥ जोंवरी होतें तें जळ पूर्ण ॥ पृथ्वीवरी ॥९२॥
ऐसें आठ सह्स्त्र युगवरी ॥ मी ब्रह्मसमाधि साधन करीं ॥ ध्यान-विसर्जन इतुक्यावरी ॥ करिता जाहालों देवाचें ॥९३॥
ऐसा समाधि विसर्जून ॥ या जळार्णवाचा ग्रास करून ॥ मग सृष्टीची इच्छा उद्भवून ॥ करिता जाहालों पूर्ववत ॥९४॥
त्या उदकाचें केलें आचमन ॥ मग विधीनें मांडिलें अनुष्ठान ॥ जपता जाहालों पूर्ण ॥ गायत्रीमंत्र तेधवां ॥९५॥
मग जपाच्या दशांश जाण ॥ हवन करूनि केलें तर्पण ॥ मग मांडिलें यागहन ॥ सृष्टिकार्याकारणें ॥९६॥
तेथें केला म्यां सूर्ययाग ॥ तेंचि गुणनाम झालें प्रयाग ॥ मग तेथें आला श्रीरंग ॥ प्रयागमाधव तोचि हा ॥९७॥
मग म्यां केलें आचमन ॥ आणि तरुमूळीं घातलें जीवन ॥ तेथें सरिता उद्भवली पूर्ण ॥ सरस्वती ब्रह्मात्मजा ॥९८॥
ऐसी त्या तरुमूळापासोनी ॥ सरस्वती निघाली पुण्यजीवनीं ॥ मग आली पश्चिमेहूनी ॥ कलिंदी ते ॥९९॥
हे जन्मली अस्ताचळापासोनी ॥ पश्चिमेचे सप्तसागर भेदुनी ॥ आलीं असे प्रयागस्थानीं ॥ कालिंदी ते साक्षात ॥१००॥
मग रुद्रतरु घेऊनि उत्तरपारीं ॥ यमुना सरस्वती महासुंदरी ॥ वाहावया पूर्वसागरीं ॥ त्या आल्या काशीतें ॥१०१॥
मग सरस्वती आणि यमुना ॥ दोघी गेल्या मणिकर्णिकेच्या स्नाना ॥ मग त्यांहीं केली लिंगस्थापना ॥ आपुलालिया नामें ॥१०२॥
ब्रह्मकन्येनें स्थापिला शारदेश्वर ॥ कालिंदीनें स्थापिला यमुनेश्वर ॥ ऐसा त्यांहीं पूजिला हर ॥ पांच लक्ष वर्षें ते ठायीं ॥१०३॥
तंव प्रकटला पंचानन ॥ दोघांसी बोलतां जाहाला वचन ॥ तुम्हीं मागावें वरदान ॥ जाहालों प्रसन्न एकभावें ॥१०४॥
तंव शारदेनें प्रार्थिला महेश ॥ मज दीजे हो विद्याभ्यास ॥ शंकर म्हणे तुज प्रकाश ॥ होईल सर्व विद्यांचा ॥१०५॥
तुझें लिंग जे जे पूजिती ॥ त्यांसी प्रसन्न तूं सरस्वती ॥ ते सर्व विद्या अभ्यासिती ॥ राजमान्य होती सर्वकाळ ॥१०६॥
मग कालिंदीसी वदे शंकर ॥ ब्रघ्नात्मजे तुज दिधला वर ॥ जो चतुर्भुज शार्ङ्गधर ॥ पावसी भ्रतार प्रीतीनें ॥१०७॥
आतां हिमाद्रीची कुमरी ॥ गंगा प्रकटली सुंदरी ॥ ती कथा असे जी पुढारी ॥ गंगामाहात्म्य जें कां ॥१०८॥
ऐसे कथीतसे ब्रह्मा ॥ परिसती गण आणि शिवशर्मा ॥ ऐसा प्रयागाचा महिमा ॥ पूर्वापार जो चालिला ॥१०९॥
विरिंचि म्हणे गा द्विजवरा ॥ त्रिभुवन वेष्टिलें या तरुवरा ॥ याचे अंगीं राहाणें शार्ङ्गधरा ॥ तेंचि जाणावें वैकुंठ ॥११०॥
याचें मूळ सप्तपाताळीं जाण ॥ पेंढीं सत्यलोक ब्रह्मभुवन ॥ म्हणोनि सर्वथा नाहीं भिन्न ॥ सत्यलोक या प्रयागासी ॥१११॥
मग विधीची आज्ञा घेऊन ॥ शिवशर्मा आणि विष्णुगण ॥ पुढें चालते जाहाले विमानीं बैसून ॥ श्रोतीं आतां परिसावें ॥११२॥
अगस्ति म्हणे लोपामुद्रेसी ॥ हें विरिंचीनें कथिलें शिवशर्म्यासी ॥ हें प्रयागमाहात्म्या परिसतां श्रोतयांसी ॥ सत्यलोकीं वास जाणावा ॥११३॥
पुढें चालतां विमान ॥ लोक देखिला कोण ॥ ते कथा परिसतां पुण्यपावन ॥ म्हणे शिवदास गोमा ॥११४॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे सत्यलोकवर्णनं ॥ नाम पंचविंशतितमाध्यायः ॥२५॥ श्रीरस्तु ॥ ॐ ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 28, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP