मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ९ वा

काशी खंड - अध्याय ९ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव देखिली मनोरम नगरी ॥ शिवशर्मा पुसे ते अवसरी ॥ सुशील पुण्यशील गणांतें ॥१॥
विमान कमितां जी सहज ॥ पुढारीं दृश्य होतसे मज ॥ निशी हरपे ऐसें तेज ॥ सांगा हे कवण पुरी ॥२॥
तंव बोलिले हरीचे गणोत्तम ॥ कीं ते साक्षात मेघश्याम ॥ कीं ते सर्व शास्त्रीं पूर्ण आगम ॥ कथिते झाले द्विजातें ॥३॥
गण म्हणती द्विजा अवधारीं ॥ हे पुढें दिसे अग्निपुरी ॥ येथें कृशानु वास्तव्य करी ॥ साक्षात द्विमूर्धा तो ॥४॥
परियेसीं द्विजवरा मात ॥ या गार्हपत्याचें तेज सत्त्व ॥ युगानुयुगीं याचें महत्त्वा ॥ त्रैलोक्यामाझारी ॥५॥
हा ते तेहतीस कोटी देवांचें मुख ॥ हा यज्ञनारायण सुखकारक ॥ हा त्रैलोक्यासी कर्ता परम दुःख ॥ महाप्रळयकाळ जाणोनी ॥६॥
देवांचें मुख कैसा वन्ही ॥ जे जे यज्ञ करिती पृथ्वीस्थानीं ॥ नाना द्रव्यें होमिती हवनीं ॥ तेणें तृप्ति होय देवांसी ॥७॥
तरी हा त्रैलोक्यपरोपकारी ॥ सर्वव्यापक चराचरीं ॥ याचें गुणगौरव पृथ्वीवरी ॥ तें कैसें आतां परिसावें ॥८॥
दुग्ध संतप्त होय अग्नीवरी ॥ तें देवांसी पिय पीयूषापरी ॥ मग हा पंचामृतासी करी ॥ निवाडा पृथक्‍ पृथक्‍ ॥९॥
आणि षड्र्सांचिया पंक्ती ॥ यापासाव निपजती ॥ यासी अर्पिजे तरीच तृप्ती ॥ होय देवां पितरांसी ॥१०॥
इक्षुदंडाचिया रसधारा ॥ हा पाक करीतसे निर्धारा ॥ मग निपजे शुद्ध शर्करा ॥ देवांप्रती मान्य जे कां ॥११॥
हा मिष्टान्न भक्षीतसे देहीं ॥ आणि गर्भास होऊं नेदी कांहीं ॥ ऐसा हा कनवाळू पाहीं ॥ चौर्‍याशीं लक्ष जीवजंतूंसी ॥१२॥
ऐसा परोपकारी गार्गपती ॥ घरोघरीं याचिया दीपज्योती ॥ प्रकाश करिती सर्वांप्रती ॥ उपकारास्तव जाण पां ॥१३॥
यासी पूजिती जे जे पाडे ॥ ते ते पावती चिंतिलें कोडें ॥ हा कल्पीतसे सुरवाडें ॥ हा निर्विकल्प जाणावा ॥१४॥
ओलें कोरडें भक्षावयासी ॥ बहु थोडें हा सर्व ग्रासी ॥ अमंगळ चोखडें मानसीं ॥ असेना याचिया ॥१५॥
हा वन्ही पेटे गिरिकुटीं ॥ तेथें जीव संहारे कोटन्यनुकोटीं ॥ चेतला तरी अवघी सृष्टी ॥ दग्ध करी क्षणमात्रें ॥१६॥
हा बोलिजे चारी वर्ण ॥ क्षत्रिय वैश्य शूद्र ब्राह्मण ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ जाण ॥ सर्वही रूप असे तो ॥१७॥
आणिक पहा त्या वनस्पती ॥ अग्नीमाजीं सर्व सिद्ध होती ॥ मग त्या मात्रा उपचारिती ॥ रोगियांसी आवडीनें ॥१८॥
शीतकाळीं अग्नीचें दान ॥ दीजे योगीश्वरांकारण ॥ शिवालयीं दीपोत्साह पूर्ण ॥ याचेनि सदा होतसे ॥१९॥
एक पूजितांचि चंद्रमौळी ॥ पंचारती कनकपात्रीं उजळी ॥ सहस्त्र दीपमाळा शिवाचे देउळीं ॥ पावकाच्या एकसरां ॥२०॥
आणि अष्ट लोहें उपजती ॥ अग्निसंगें सिद्ध होती ॥ मग तीं व्यापारीं वर्तती ॥ जनांचिया कार्यांसी ॥२१॥
जांबूनदाचें जें जें भूषण ॥ तें तें सिद्ध करी हुताशन ॥ भाग्यवंत स्त्रियांकारण ॥ होतसे श्रृंगार अनेकपरी ॥२२॥
शस्त्रें नानाविध क्षत्रियांचीं ॥ त्यांसी दिव्यप्रभा ते पावकाची ॥ राज्यें चालवितो भूपाळांचीं ॥ हा गार्हपती सर्वदा ॥२३॥
वैश्वदेवाचें जें आराधन ॥ माध्यान्हीं पूजितां हुताशन ॥ मग तें भक्ष्य पावन ॥ होतसे जाण द्विजोत्तमा ॥२४॥
राजस तामस सात्त्विक भाव याचा । अधिपती हा अग्निपुरीचा ॥ हा भालचक्षु विश्वेश्वराचा ॥ साक्षात जाणावा ॥२५॥
शिवालयीं याचे दीप ॥ शिवालयीं याचें सुगंधधूप ॥ आणि हा पराभवी पाप ॥ पतिव्रतेचें साक्षात ॥२६॥
ज्या पतिव्रता दोषें मळती ॥ मग त्या अग्नीमाजी स्नान करिती ॥ तयांसी होय पदप्राप्ती ॥ पतिव्रताधर्माची ॥२७॥
आणिक हा गोमय दग्ध करी ॥ तें भस्म होय क्रिया थोरी ॥ तें सर्वगात्रीं त्रिपुरारी ॥ लावीं मंत्रेंकरोनियां ॥२८॥
योगाभ्यास गोराजन ॥ एक साधिती धूम्रपान ॥ मग हा करी पद पावन ॥ सायुज्यतेचें आवश्यक ॥२९॥
एक सूर्यातें आराधिती ॥ द्रव्ययज्ञें प्रसन्न करिती ॥ ते यागशक्तीनें अवघी क्षिती ॥ जिंकिती भूपाळ ते ॥३०॥
हा असत्यां दोषियां पावक ॥ हा सत्य पुण्यशील एक ॥ हा पापपुण्यांचा दाहक ॥ अतिनिर्मळ हा एक ॥३१॥
हा कृशानु शूद्र मत्स्याआहारी ॥ ऐसा चारी वर्ण भक्षी निर्धारीं ॥ परी निर्दोष द्विमूर्धा ॥३३॥
हा वैश्वानर सर्व भक्षण करी ॥ परंतु निर्दोष शरीरीं ॥ मग शिवशर्मा याउपरी ॥ प्रश्न करी गणोत्तमां ॥३४॥
शिवशर्मा पुसे गणोत्तमांसी ॥ एवढें सामर्थ्य काय जी यासी ॥ हा अग्निपुरीचा निवासी ॥ कैसा झाला दाहक ॥३५॥
येणें पूर्वीं कवण तप केलें ॥ म्हणोनि हें सामर्थ्य जोडलें ॥ हें पद प्राप्त यासी झालें ॥ कोणत्या साधनें ॥३६॥
यासी सुफळ झाला कवण मंत्र ॥ हा असे कवणाचा पुत्र ॥ हा शिवाचा कैसा तिजा नेत्र ॥ तें निवेदावें मजलागीं ॥३७॥
गण म्हणती विप्रवत्सा ॥ बरवी केली तुवां पृच्छा ॥ आतां असेल जे जे तुझी इच्छा ॥ ते ते करूं निरूपण ॥३८॥
तरी परियेसीं गा मथुरावासी ॥ यासी मूळकथा निरोपूं तुजसी ॥ तुझे प्रश्न आमुचे मानसीं ॥ आनंदकारक होती पैं ॥३९॥
सांगों या दाहकाचें मूळ उपपन्न ॥ द्विजा ऐक एकाग्र मन करून ॥ पूवी वैश्वानर नामें ब्राह्मण ॥ होता सर्वज्ञ अग्निहोत्री ॥४०॥
तो महासुशीळ अति नेमी ॥ नित्याचारी आणि गृहस्थाश्रमी ॥ नाना द्रव्यें हवनीं नित्य होमी ॥ वैश्वदेवउपासक जो ॥४१॥
शिवशर्म्यासी वदती देवगण ॥ आश्रम चार असती जाण ॥ तरी ते आतां कोण ॥ परियेसीं द्विजोत्तमा ॥४२॥
गृहस्थाश्रम श्रेष्ठ अवधारा ॥ ब्रह्मचर्य आश्रम दुसरा ॥ संन्यास आश्रम तिसरा ॥ चौथा बोलिला वानप्रस्थ ॥४३॥
तरी हे ऐसे चार आश्रम ॥ पुढें निरोपूं तुज उत्तम ॥ वैश्वानर तो द्विजोत्तम ॥ होता जाण गृहस्थाश्रमी ॥४४॥
स्नान होम जप वैश्वदेव करी ॥ ऐसिया नीतीं अन्न स्वीकारी ॥ स्थानादिरहित जो अन्न स्वीकारी ॥ तो जाण अमंगळभक्षक ॥४५॥
नित्य न करी शौचस्नान ॥ जपाविरहित भक्षी अन्न ॥ त्यासी घडे रुधिरपान ॥ मत्स्याआहारी तो साच ॥४६॥
म्हणोनि वैश्वानर महामंत्री ॥ वैश्वदेवउपासक अग्निहोत्री ॥ पतिव्रता तयाची स्त्री ॥ शुचिष्मती नामेंसीं ॥४७॥
महापतिव्रताशिरोमणी ॥ लक्ष्मीसमान सुलक्षणी ॥ तिचे हातीं अन्नसत्रदानीं ॥ तृप्त करी द्विजवरां ॥४८॥
तरी ते षोडशोपचारीं ॥ आपुले स्वामीची सेवा करी ॥ मग वैश्वानर ते अवसरीं ॥ प्रसन्न झाला प्रियेतें ॥४९॥
मग म्हणे माग माग हो कांते ॥ तुज प्रसन्न मी पतिव्रते ॥ ब्रह्मवाचा रुद्रवाचा सत्य ते ॥ घेईं भाषावचन पैं माझें ॥५०॥
मग बोलिली शुचिष्मती ॥ स्वामी प्रसन्न झालेत मजप्रती ॥ आतां जो भाव माझे चित्तीं ॥ तो तुम्हांवांचूनि पूर्ण नव्हे ॥५१॥
तरी हेचि माझी आर्त देखा ॥ मज पुत्र व्हावा शिवासारिखा ॥ हें परिसोन सम्यका ॥ स्तब्ध राहे तो वैश्वानर ॥५२॥
म्हणे काय मागीतला वर ॥ कोठें तो शिव त्रिशूलधर ॥ आणि त्यासारिखा कुमर ॥ होईल कोणें सुदैवें ॥५३॥
ऐसी चिंता उदेली तयासी ॥ म्हणे स्त्रीकामना पुरविजे कैसी ॥ जाइजे कवणा तीर्थासी ॥ पूजिजे देव कोण तो ॥५४॥
त्रिलोकींचे देव विचारितां ॥ न दिसेचि या शिवापरता ॥ तो शंकरचि फलदाता ॥ एकचि असे जाण पां ॥५५॥
त्यासारिखा पुत्र हे आर्त ॥ पुरवी ऐसा कोण समर्थ ॥ कांतेनें मागीतले व्यर्थ ॥ आतां कवण उपाय तो ॥५६॥
गोटा देऊनि मागिजे हिरा ॥ कल्पतरूसि केवीं तुळे पांगारा ॥ शिवासारिखा पुत्र वैश्वानरा ॥ हें केवीं घडे नेणवेचि ॥५७॥
पांगारा लाविजे महाबळें ॥ त्यासीं मागिजे द्राक्षफळें ॥ कुक्कुटापोटीं शार्दूळें ॥ केवीं उपजती ॥५८॥
आतां स्त्रियेचा मनोरथ पुरविजे ॥ तरी ब्रह्मवाक्यासी काय कीजे ॥ शिवाऐसा पुत्र पाविजे ॥ ऐसें विचारूं स्थळ पैं ॥५९॥
जरी पूर्ण नव्हे मनाचा भावो ॥ तरी कातया पूजावा देवो ॥ भाव पुरे ऐसा ठावो ॥ तो केवीं पाविजे ॥६०॥
पाहातां एकवीस स्वर्गमंडळ ॥ परी सिद्धि पाविजे ऐसें नाहीं स्थळ ॥ धुंडाळितां सप्त पाताळ ॥ न मिळेचि सिद्धिठावो ॥६१॥
मृत्युलोक नव्यायशीं कोटी क्षिती ॥ सप्तद्वीप नवखंडें असती ॥ तेथें एक भासतें चित्तीं ॥ जंबूद्वीप दहावें खंड ॥६२॥
तेथें असे मंदाकिनीचे तीरीं ॥ तत्काळ मुक्ती ते काशीपुरी ॥ तेथें असे तो स्मरारी ॥ विश्वनाथ विश्वकर्ता ॥६३॥
तरी आतां तेथवरी जाइजे ॥ सनोरथ पुरे ऐसा देव पूजिजे ॥ आणिक निर्वाणमुक्ति पाविजे ॥ ते स्थानीं तत्काळ ॥६४॥
मग तो वैश्वानर ब्राह्मण ॥ प्रिया शुचिष्मती सगुण ॥ आनंदवनाचा पंथ लक्षून ॥ क्रमिते जाहाले ॥६५॥
ऐसीं दंपती मार्ग क्रमिती ॥ शतसहस्त्र शकुन होती ॥ वाम नेत्र दक्षिण बाहू स्फूरती ॥ ऐसीं आलीं काशीपुरीं ॥६६॥
मग ते मणिकर्णिकेचा मार्ग ॥ क्रमोनि जाती मनोवेग ॥ ते दृश्य झालिया तत्काळ भंग ॥ महाक्लेशांसी पावला तो ॥६७॥
मग उभयवगें त्या गंगेसी ॥ स्नानें केलीं संभ्रमेंसीं ॥ नित्यकर्म सारिलें वेगेंसीं ॥ मग निघालीं पूजनातें ॥६८॥
प्रथम पूजिला तो देहलीगण ॥ आशाविनायकाचें दर्शन ॥ विकटविनायकासी नमन ॥ पूजिला तो चतुर्दंत ॥६९॥
षोडशोपचारें पूजूनि त्यासी ॥ वैश्वानर वदे विनायकासी ॥ तूं सर्व जनांची आशा पुरविसी ॥ म्हणोनि नाम आशाविनायक ॥७०॥
तुज नमन जी सिद्धिबुद्धी ॥ तुजपाशीं अष्टसिद्धी नवनिधी ॥ तूं पूर्ण पीयूषाचा क्षीराब्धी ॥ म्हणोनि आशाविनायक ॥७१॥
तंव झाली प्रसादवाणी ॥ फळ प्राप्त होईल चिंतिलें मनीं ॥ मग काळभैरवासी तेथूनी ॥ आलीं जाण उभयतां ॥७२॥
तुज नमूं गा उग्रमूर्ती ॥ ब्रह्मकपाल त्रिशूल हातीं ॥ त्रिजटा त्रिनेत्राकृती ॥ काळभैरवा तूं एक ॥७३॥
मग पूजिला तो दंडपाणी ॥ आणिक पूजिल्या यक्षिणी ॥ उग्र पूजिली भवानी ॥ दुर्गानामें महाशाक्ती ॥७४॥
पूजिली हयग्रीवा सुंदरी ॥ पूजिता झाला विकटगौरी ॥ कोटराक्षी परमेश्वरी ॥ काळरात्री दीर्घदेवी ॥७५॥
ऐशा पूजिल्या सर्व देवता ॥ मग जी शुचिष्मती पतिव्रता ॥ वैश्वानर त्या प्रियेचिया अर्था ॥ आला विश्वेश्वरासी ॥७६॥
मग ते शुचिष्मती आणि वैश्वानर ॥ वंदूनि मणिकर्णिकेचें नीर ॥ मग स्तविता झाला बद्धकर ॥ त्रिपुरहरासी तेधवां ॥७७॥
असंख्य ब्रह्मांडें होती जाती ॥ हे तंव इच्छा तुझी उमापती ॥ अनाथनाथा पशुपती ॥ भाललोचना विश्वेशा ॥७८॥
ऐसा स्तविला तो शंकर ॥ मग बाहेर आला वैश्वानर ॥ यानंतरें झाला चिंतातुर ॥ ह्रदयामाजीं आपुले ॥७९॥
म्हणे आतां स्मरूं कवण देव ॥ जो पूर्ण करी आमुचा भाव ॥ काशी तरी पूर्णसिद्धिठाव ॥ ऐसें देव बोलती ॥८०॥
असंख्य ब्रह्मांडां माझारीं ॥ नाहीं अविमुक्तीऐसी पुरी ॥ आतां जो पुत्रभाव आमुचे शरीरीं ॥ तो कैसा परिपूर्ण होईल ॥८१॥
आतां स्मगवे कवण कवण ॥ धर्मेश्वर कीं पूजूं त्रिलोचन ॥ कीं शैलेश्वराचें पूजन ॥ कीं रत्नेश्वर पूजावा ॥८२॥
कीं पूजूं अविमुक्तेश्वर ॥ कीं धर्म कर्ण अमृतेश्वर ॥ कीं आराधूं मध्यमेश्वर ॥ पूर्णभावेंकरूनी ॥८३॥
कीं आराधूं रामेश्वरासी ॥ कीं हिमालय केदारासी ॥ कीं महाभावें गोकर्णासी ॥ समर्पूं शैलादिगणां उपचार ॥८४॥
ब्रह्मेश्वराचें स्मरण करूं ॥ कीं शुक्लेश्वरा पूजा उपचारूं ॥ बुधेश्वर वाचस्पतीश्वरू ॥ पूजूं आतां अहर्निशीं ॥८५॥
कीं पूजूं भवानीशंकरासी ॥ कीं नर्मदेश्वरा शुद्धमानसीं ॥ व्याघ्रेश्वर-लांगूलेश्वरांसी ॥ शरण जाऊं या वेळीं ॥८६॥
सोमनंदेश्वर जपूं ॥ कीं मागधेश्वरासी तपूं ॥ कीं हा भाव पूर्ण समर्पूं ॥ कृत्तिवासेश्वरासी ॥८७॥
कीं आराधूं तो संकर्षण ॥ कीं मयूरेश्वर सगुण ॥ कीं द्रुमचंडेश्वर पूजूं एकाग्र मन ॥ कीं नमस्कारूं कपर्दीश्वरू ॥८८॥
स्मरूं तो उग्रलिंग उत्तम ॥ तेथें शोभती पूर्वागम ॥ कीं शाखविशाखेश्वरनिर्गम ॥ कीं चक्रेश्वर पूजूं साक्षेपें ॥८९॥
वीरभद्रेश्वर पूज्य पूजन ॥ कीं वृद्धेश्वराचें अनुष्ठान ॥ ऐसा वैश्वानर ब्राह्मण ॥ स्मरे दिव्य देवांतें ॥९०॥
ऐसा विप्र झाला चिंताग्रस्त ॥ मग क्षणएक राहिला ध्यानस्थ ॥ तंव आठवलें अकस्मात ॥ वीरेश्वरलिंग तें ॥९१॥
मग विचारोनि मानसीं ॥ म्हणे जावें वीरेश्वरासी ॥ तेथें सिद्धि झाली बहुतांसी ॥ ऐसें वेद बोलती ॥९२॥
तेथें पूर्वीं आलिया अष्टनायिका ॥ महानृत्य करिती त्या देखा ॥ षड्‍रागीं तृप्त केलें त्र्यंबका ॥ मग तया प्रसन्नता उद्भवली ॥९३॥
एकाएकी अप्सरा कामिनी ॥ संतुष्ट करूनि शूलपाणी ॥ मग लीन झाल्या तत्क्षणीं ॥ वीरेश्वरलिंगाजवळिकें ॥९४॥
ऐसें वीर्य त्या लिंगाचें ॥ सूर्यासम तेज ज्याचें ॥ व्योमीं महातेज मार्तंडाचें ॥ हे त्या लिंगाची जाण शक्ती ॥९५॥
मग वैश्वानर शुचिष्मती ॥ वीरेश्वरलिंग पूजूं म्हणती ॥ त्यावीण आमुची मनोवृत्ती ॥ पूर्ण नव्हे सर्वथा ॥९६॥
म्हणोनि आलीं वीरेश्वरापाशीं ॥ साष्टांगें नमिलें शिवासी ॥ मग स्तवितीं झालीं भावेंसीं ॥ स्त्रीपुरुषें तेधवां ॥९७॥
उत्तरवाहिनीचोनि शुद्धजळें ॥ हेमकुमुदिनीचीं शुद्ध कमळें ॥ जांबूनदाचे तेजागळे ॥ चौक भरिले सुंदर ॥९८॥
त्यामाजी रत्नांच्या पीठिका ॥ भोंवत्या मुक्तांच्या वोळिका ॥ गोमेद पुष्करागांच्या पांकोळिका ॥ चौकीं वेष्टीत सुंदर पैं ॥९९॥
ऐसा पूजाविधि केला वैश्वानरें ॥ विधियुक्त नाना उपचारें ॥ मग ते दपती बद्धकरें ॥ स्तविते झाले शिवासी ॥१००॥
म्हणे जय जय उमाकांता ॥ त्रिपुरांतका त्रैलोक्यकर्ता ॥ तूंचि कर्ता पाळिता संहारिता ॥ परमलिंगा स्वामिया ॥१०१॥
तूं सर्व इच्छेचा कल्पतरू ॥ अनाथासी देसी अभयवरू ॥ निराधारियां होसी आधारू ॥ ऐसा समर्थ अससी तूं ॥१०२॥
ऐसा स्तविला स्मरारी ॥ विधियुक्त पूजिला उपचारीं ॥ मग उपवास पारणें करी ॥ कांतेसमवेत ते समयीं ॥१०३॥
पंच अहोरात्र जागरण ॥ पक्षव्रतें आणि चांद्रायण ॥ कृच्छ्रादिकें मासउपोषण ॥ केलें त्या वीरेश्वरप्रीत्यर्थ ॥१०४॥
नित्य स्नान मंदाकिनीजवळीं ॥ अविंधमुक्तीं सुवर्णकमळीं ॥ शुचिष्मती कनकपरिमळीं ॥ दीप उजळी पंचारती ॥१०५॥
ऐसा द्विज आणि शुचिष्मती ॥ कुशाग्रतोय भक्षिती ॥ ऐसा पूजिला पशुपती ॥ संवत्सर एक सर्वदा ॥१०६॥
मग कोणे एके समयीं वैश्वानर ॥ पूजीत होता वीरेश्वर ॥ तंव महादीप्त तेजाकार ॥ प्रकटला जाण प्रासादीं ॥१०७॥
हिरण्यदीप्ति महाकल्लोळीं ॥ तेज उद्भवलें प्रासादमंडळीं ॥ वैश्वानर शुचिष्मती ते काळीं ॥ झालीं मानसीं भयभीत ॥१०८॥
मग भीत भीत वैश्वानर ॥ शिवासी करी नमस्कार ॥ तंव लिंगामाजी देखे अंकुर ॥ बाळकाचा साक्षात ॥१०९॥
कीं तो प्रकटला शूलपाणी ॥ तंव तेथें झाली प्रसादवाणी ॥ वैश्वानर नाभीं नाभीं म्हणोनी ॥ तुज वर दीधला ॥११०॥
तुझी पूजा पावली ब्राह्मणा ॥ सिद्ध होईल तुझी मनकामना ॥ मग तो आदेश सर्व जनां ॥ सांगीतला द्विजोत्तमें ॥१११॥
मग पूजा घेऊनियां करीं ॥ दंपती स्तविती नानापरी ॥ म्हणती जयजयाजी त्रिपुरारी ॥ भक्तेच्छाकल्पद्रुम तूं होसी ॥११२॥
तूं हिमनगजामाता ॥ तूं एक त्रैलोक्याचा कर्ता ॥ तूं भक्तजनांच्या अर्था ॥ बहु त्वरें पूर्ण करिसी ॥११३॥
श्रुतिशास्त्र उद्भविता शंकर ॥ तूं एक स्थापित आधार ॥ त्रैलोक्यीं तूं सबराभर ॥ भरोनि उरलासी ॥११४॥
तूं सर्वांतरात्मा समर्थ ॥ धर्ममोक्षादि चारी पुरुषार्थ ॥ तुझे भक्तीविण मनोरथ ॥ पूर्ण कल्पांती न होती ॥११५॥
तूं भावार्थाचा परम भोक्ता ॥ स्वयें दानी स्वयें मागता ॥ परमात्मस्वरूप तत्त्वतां ॥ तो तूंचि एक शिवा होसी ॥११६॥
तूं पृथ्वी आप तेज पवन ॥ तरणी तारापती गगन ॥ ऐसा तूं कर्ता सर्वकारण ॥ पिंगाक्षा त्रिलोचना शिवा ॥११७॥
ऐसें वैश्वानरें करूनि स्तवन ॥ म्हणे जी कामना करावी पूर्ण ॥ म्हणोनि घातलें लोटांगण ॥ प्रियापुरुषीं तेधवां ॥११८॥
तंव लिंगगर्भींचें बाळ सगुण ॥ वैश्वनरासी वदे वचन ॥ तुज दिधलें पुत्रदान ॥ सत्य वचन पैं माझें ॥११९॥
येरू पाहे न्याहाळून ॥ तों लिंगीं देखिलें बाळ सगुण ॥ आणिक वदे अभय वचन ॥ प्रसादवाणीनें ॥१२०॥
ऐसा प्राप्त झाला अभयवर ॥ मग शुचिष्मती वैश्वानर ॥ नमस्कारोनि वीरेश्वर ॥ मार्ग क्रमिते जाहाले ॥१२१॥
मग आपुले गृहीं स्वस्थ असतां ॥ गरोदर झाली शुचिष्मता ॥ महापुण्यें प्राप्त झाली पुत्रार्था ॥ कामिनी ते ॥१२२॥
मग पुत्र झाला तिये ॥ कीं तो मार्तंड तेजोमय ॥ किंवा शंसरचि पूर्ण होय ॥ भक्तजनकृपाळू ॥१२३॥
ऐसा पुत्र झाला वैश्वानरा ॥ तंव तेथें आल्या अप्सरा ॥ कनकपरिमेळीं परिकरा ॥ सहस्त्रज्योती साक्षात ॥१२४॥
उर्वशी आणिक मेनिका ॥ सुकेशी तिलोत्तमा मंजुघोषा ॥ पद्मावती लीलावती या अनेका ॥ साक्षेपें आल्या ते ठायीं ॥१२५॥
आणिक सहस्त्र एक इंद्राणी ॥ आल्या सहस्त्र ज्योति घेऊनी ॥ तेजें जैशा तरणी ॥ लोपलीं ग्रामदीपकें ॥१२६॥
उजळोनियां रत्नज्योती ॥ त्या बाळकापुढें मंद दिसती ॥ तंव आलिया शक्ती ॥ त्रिदेवांचिया ते ठायीं ॥१२७॥
सावित्री आणि कमला ॥ सखियांसह आली शैलबाला ॥ आणिक त्रैलोक्यमंडळा ॥ हरि-हर-विरिंचीही आले ॥१२८॥
उत्साह झाला महाथोर ॥ आनंदभरित वैश्वानर ॥ तों आले ऋषीश्वर ॥ आशीर्वाद द्यावया ॥१२९॥
वसिष्ठ आणि विभांडक ॥ गाधिसुत आणि ऋचीक ॥ कौंडिण्य आणि उद्दालक ॥ मांडव्य महाऋषी तो ॥१३०॥
दधीचिऋषी आणि मार्कंडेय ॥ पराशर आणि गर्गाचार्य ॥ दुर्वास आणि मैत्रेय ॥ कपिलादि मुनी ते ॥१३१॥
भृगु भारद्वाज महाऋषी ॥ उन्मनी आले ब्रह्मऋषी द्त्तेंसीं ॥ शिखिमुनी आले महातापसी ॥ कण्वऋषी मांडव्य ते ॥१३२॥
व्यासऋषी आणि कर्दम ॥ मैत्रावरुणी बकदाल्भ्य उत्तम ॥ कलिंग आणि ऋषींद्रम ॥ जन्हु आणि इतर ते ॥१३३॥
भार्गव आणि ऋषी अंगिर ॥ पुलस्त्य स्वायंभुव मुनिवर ॥ अत्रि पिप्पलायन ते ब्रह्मकुमर ॥ मरीचि आणि कश्यप ॥१३४॥
ऐसे महाऋषी आले ॥ ते वैश्वानरें संमानिले ॥ तयांसी बैसकार केले ॥ देवांमाजीं सन्मानें ॥१३५॥
तेथे बैसले वेदाध्ययनतापसी ॥ आणि ब्रह्मादिक महाज्योतिषी ॥ वैश्वानरें उपचारिलें त्यांसी ॥ तें किती काय सांगावें ॥१३६॥
आणिकही अरण्यवासी ॥ तपोधन पुण्यराशी ॥ तेही आले त्या ठायासी ॥ नामें वर्णूं किती ते ॥१३७॥
गंधर्वांचीं झालीं नृत्यगायनें ॥ लक्ष्मीआदि करिती अक्षय वायनें ॥ बाळका देती आशीर्वचनें ॥ त्रिदेव शक्ती तेधवां ॥१३८॥
विरिंचिदेवें जातक वर्तवूनी ॥ नाम ठेविलें गार्हपत्याग्नी ॥ तंव जयजयकारें मंत्रध्वनी ॥ गर्जिन्नली ऋषिमंडळी ॥१३९॥
मग त्या वैश्वानरें ॥ दानें केलीं अपारें ॥ देवांसी सन्मानिलें आदरें ॥ बोळविलें मग तयांसी ॥१४०॥
मग तो ब्राह्मण आनंदला ॥ जैसा सागर उचंबळला ॥ किंवा परीस प्राप्त झाला ॥ रंकासी सहजगतीनें ॥१४१॥
ऐसा आनंदला ब्राह्मण ॥ झाली पुत्रकामना पूर्ण ॥ मग शुचिष्मतीप्रती वचन ॥ वदता झाला तेधवां ॥१४२॥
म्हणे पुत्रसौभाग्यें ऐश्वर्य अपार ॥ सदा सर्वदा मान्यता थोर ॥ पुत्राविण तो आश्रमाचार ॥ विशोभित दिसे या जगीं ॥१४३॥
रत्नखचित महामंदिरें ॥ जांबूनदमयें शोभती परिकरें ॥ भासती जैसीं गिरिकंदरें ॥ पुत्राविण तीं सर्व ॥१४४॥
गृहीं लक्ष्मीचा बडिवारू ॥ परी पुत्राविण तो वृथा नरू ॥ जैसा सरितातीरींचा तरू ॥ उत्पाटितां नुरे कांहीं ॥१४५॥
जरी असे तो दीर्घमानें ॥ द्विजां समपीं सुवर्णदानें ॥ तरी पुत्राविण सर्वही सुनें ॥ निष्फळ जाण संसारीं ॥१४६॥
जैसा तो पांगारा तरुवर ॥ पुष्पा मिरवतसे सुंदर ॥ तैसा पुत्रसत्तेविण जो नर ॥ शोभे परी तो विशोभित ॥१४७॥
पुत्राविण असे जरी बहु दशा ॥ ते पूर्ण जाणावी अवदशा ॥ शरीर तपदानें व्यवसा ॥ वृथाचि संपूर्ण ॥१४८॥
कीं शिराविण कलेवर ॥ कीं सोमसूर्यांविण अंबर ॥ कीं जळेंविण सरिता थोर ॥ तैसा तो नर पुत्राविण ॥१४९॥
म्हणोनि पुत्रप्रजांचे जे नर ॥ ते अवलक्षणी परी सुंदर ॥ भला सात्त्विक गंभीर धीर ॥ नसतां मान्य म्हणिजे तो ॥१५०॥
ऐसें वैश्वानर ब्राह्मण ॥ शुचिष्मतीसी वदे वचन ॥ मग केलें त्याचें व्रतबंधन ॥ पंचम संवत्सरीं ॥१५१॥
जंव सप्त वर्षें झालीं पूर्ण ॥ तंव सर्व विद्या अभ्यासिल्या तेणें ॥ नववे वर्षीं सर्व जाण ॥ अभ्यास परिपूर्ण जाहाला ॥१५२॥
तंव सत्यलोकींहूनि नारदमुनी ॥ आला वैश्वानराच्या भवनीं ॥ मग त्या मुनीसी सन्मानूनी ॥ पूजिलें जाण वैश्वानरें ॥१५३॥
मग नारदमुनी सुखव्यवस्था पुसे ॥ पुत्र आज्ञेमाजीं असे कीं नसे ॥ पुत्राविणें पुरुष जैसे ॥ उपलक्षी गर्भांध ॥१५४॥
नारद म्हणे हे ब्राह्मणा ॥ पुत्र सातांपरींचे असती जाणा ॥ स्वस्त्रीचा तो औरस मुख्य गणा ॥ आणिक एक विक्रीत ॥१५५॥
आपत्कालीं रक्षिला तो पोषित ॥ कन्यादानीं संकेतित तो पुत्रिकासुत ॥ नियोगविधीनें जो प्राप्त ॥ तो जाणावा क्षेत्रज ॥१५६॥
कोणें दिलेला घ्यावा तो दत्तक ॥ स्वसंतोषें प्राप्त झाला तो स्वयं दत्तक ॥ या सातांमाजी तरी एक ॥ पुत्र असावा पुरुषासी ॥१५७॥
म्हणोनि पुत्रेंविण ऐका ॥ संसार स्मशानभूमिका ॥ तेथें आतळतां श्रीमंतलोकां ॥ घडे थोर दूषण ॥१५८॥
मग त्या ब्राह्मणें पुत्रासी ॥ हर्षें पाचारिलें नारदापासीं ॥ नारदें आलिंगूनि ह्रदयासीं ॥ मग पाहिलीं सामुद्रिकें ॥१५९॥
सर्वलक्षणीं सांलकृत ॥ विद्यापात्रगुणें पूर्ण भरित ॥ होईल हा शिवभक्त ॥ युगानुयुगीं निरंतर ॥१६०॥
हा सर्वलक्षणीं संपूर्ण ॥ परी गंधर्वनगरींची जे सौदामिन ॥ ते विद्युल्लसेपासाव आदान ॥ असे या बालकासी ॥१६१॥
द्वादश वर्षानंतर यासी ॥ वीज बाधेल निश्वयेंसीं ॥ हें ऐकातां वैश्वानर कांतेसी ॥ म्हणे चिंता प्रवर्तली ॥१६२॥
ऐसें वदोनि मुनीश्वर ॥ मग निघाला सत्वर ॥ तंव तीं थोर चिंतातुर ॥ प्रियापुरुषें होतीं झालीं ॥१६३॥
वदोनि गेला ब्रह्मसुत ॥ तेणें ब्राह्मण झाला परम दुःखित ॥ जैसा हाणिला वज्राघात ॥ सुरनाथें शैलावरी ॥१६४॥
जैसा वातस्पर्शें शाखामूळीं ॥ तरु उत्पाटे क्षितितळीं ॥ तैसें वैश्वानरकांतेनें भूमंडळीं ॥ टाकिलें अंग निचेष्टित ॥१६५॥
करुणास्वरें करिती दीर्घध्वनी ॥ तंव पुत्र आला गार्हापत्याग्नी ॥ तेणें मातापितयां करीं धरूनी ॥ उठविलीं सत्वर दोघेंही ॥१६६॥
गार्हपत्याग्नि पुसे जनकासी ॥ आणि माता शुचिष्मतीसी ॥ म्हणे तुम्ही चिंता कायसी ॥ करीतसां व्यर्थ आतां ॥१६७॥
तुम्हीं करावें एकाग्र मन ॥ आणि परिसावें माझें वचन ॥ मज तरी असेचिना मरण ॥ त्रैलोक्यामाजी सर्वथा ॥१६८॥
आपण शिवाचे भक्त पूर्ण ॥ जैसे शाख विशाख शिवाचे गण ॥ त्यांसी देखोनि यमगण ॥ वंदिती थोर प्रयत्नें ॥१६९॥
माझ्या धाकें सर्वही देवगण ॥ मज येताती शरण ॥ माझेनि मुखें भागदान ॥ प्राप्त असे तयांसी ॥१७०॥
जो शिवाचा प्रिय भक्त ॥ यम तयासी शरणागत ॥ शिव पूजितां पुरे आयुष्याचा अंत ॥ हें शिवभक्तां केवीं घडे ॥१७१॥
तरी तुम्ही परिसा पूर्ववृत्तांतु ॥ शिवभक्त होता नामें श्वेतकेतु ॥ शिवभक्ती करितां पूरला अंतु ॥ पूजासमयीं ॥१७२॥
तंव यम आज्ञा करी दूतांसी ॥ अंत पुरला श्वेतकेतूसी ॥ तरी आणा जाऊनि त्यासी ॥ यमपुरीसी सत्वर ॥१७३॥
मग धांवले यमकिंकर ॥ करीं वसविलें पाशयंत्र ॥ ऐसे पावले वेगवत्तर ॥ श्वतकेतूजवळिकें ॥१७४॥
तो शिवाचा पूर्ण दास ॥ एकाग्रमनें पूजी महेश ॥ तंव त्यावरी टाकिला पाश ॥ यमगणीं स्वहस्तें ॥१७५॥
तंव धांविन्नला गजवदन ॥ पाश टाकिला तोडून ॥ शतचूर्ण केले यमगण ॥ मुद्नरप्रहारें ते ठायीं ॥१७६॥
ते यमासी जाणविती मात ॥ तुम्हीं आणविला श्वेतकेत ॥ तंव गणाधीशें केला घात ॥ यमकिंकरांचा जाण पां ॥१७७॥
ऐकोनि दूतांच्या उत्तरा ॥ क्रोध आला सूर्यकुमरा ॥ म्हणे आम्हीं नेतां आडवारा ॥ दुजा कोण करणार ॥१७८॥
मग पालाणिला महिष वाहन ॥ कृतांत निघाला वेगेंकरून ॥ तंव मुकुट पडला मस्तकाहून ॥ सूर्यसुताचा ते समयीं ॥१७९॥
जेथें गणाधीशें मारिलें दूतां ॥ तेथें कृतांत आला मागुता ॥ जैसा पतंग विचार करितां ॥ पडे दीपावरी पैं ॥१८०॥
म्हणे कोणें वधिला भृत्य आमुचा ॥ ऐसा पुरुषार्थ असे कोणाचा ॥ यममार्गीं नेतां ब्रह्मादिकांचा ॥ केवीं निघे आडवारा ॥१८१॥
श्वेतकेतूचा असतां पूर्ण भावो ॥ त्यावरी पाश टाकी यमरावो ॥ तंव उठिला कोपोद्भवो ॥ षण्मुखस्वामी तेधवां ॥१८२॥
पाश तोडिला तत्क्षणीं ॥ मग यमराया ताडिलें धांवोनी ॥ शतखंत केला त्यालागुनी ॥ पाडिलें जाण क्षितितळीं ॥१८३॥
षण्मुखें घेतला यमाचा प्राण ॥ तंव काय करी तो गजवदन ॥ शस्त्रसामुग्रीशीं क्रोधायमान ॥ जाता झाला यमपुरीसी ॥१८४॥
तेथें चौर्‍यायशीं लक्ष बंदीजन ॥ फरशें म्हणोनि केले चूर्ण ॥ लक्षकोटी होते यमगण ॥ ते सर्वही पराभविले ॥१८५॥
तेथें जे दुष्ट महापातकी ॥ पचत होते रौरवादिकीं ॥ ते सोडविले थोर कौतुकीं ॥ विघ्नहरें येऊनी ॥१८६॥
ऐशा यमपुरींच्या शृंखला ॥ गणाधीशें तोडूनि सोडिल्या बंदिशाला ॥ यमगण गेले कुलाचला ॥ महाविवरीं साक्षेपें ॥१८७॥
ऐसा खवळला गजवदन ॥ यमपुरीं चेतविला अग्न ॥ अवघी यमपुरी जाळून ॥ केली रक्षा सर्वही ।१८८॥
जाळिलीं यमाचीं मंदिरें ॥ रत्नखचित मनोहरें ॥ विश्वकर्म्यानें रचिलीं स्वकरें ॥ तीं गणेशें भस्म केलीं ॥१८९॥
ऐसें करोनि अनन्य ॥ मग आला तो गजवदन ॥ तेणें केलें नमन ॥ शंकरासी ते समयीं ॥१९०॥
होतांचि वृत्तांत श्रवण ॥ मनीं होऊनि प्रसन्न ॥ श्वेतकेतूसी केलें नामधारण ॥ शंकरें ते समयीं ॥१९१॥
तुज मृत्युपासोनि झाला रे जयो ॥ यमासी पूर्ण केला रे क्षयो ॥ तुज नाम योजिलें मृत्युंजयो ॥ षण्मुखगणेशें ॥१९२॥
तंव सुर्यासी जाणविली मात ॥ दूत म्हणती स्वामी वधिला तो कृतांत ॥ गणाधीशें समस्त ॥ यमपुरी जाळिली ॥१९३॥
एका श्वेतकेतूसाठीं ॥ दूत झोडिले कोटयनुकोटी ॥ कुंभीपाक जाळूनि आगटी ॥ केली तत्काळ शिवसुतें ॥१९४॥
ऐसी ऐकतां मात ॥ खद पावला संज्ञाकांत ॥ म्हणे मृत्यु पावला सुत ॥ न चले बळ शिवापुढें ॥१९५॥
मग निघाला तो सहस्त्रकिरण ॥ जेथें होता चतुरानन ॥ तेथें जाऊनि निरूपिलें वर्तमान ॥ श्वेतकेतु-यमांचें ॥१९६॥
म्हणे कोपला धूर्जटी ॥ यमपुरीची केली आगटी ॥ आतां राहिली तुमची सृष्टी ॥ विरिंचिदेवा ॥१९७॥
आमुचे पुत्राचा केला क्षयो ॥ ऐसा प्रवर्तला महाप्रळयो ॥ इतुकें कथोनियां सूर्यदेवो ॥ गेला आपुले स्थानासी ॥१९८॥
तंव ब्रह्मदेव विचारी चित्तीं ॥ म्हणे कोपारूढ जैं पशुपती ॥ तंववरी त्या विनंती ॥ करूं नये सर्वथा ॥१९९॥
महावाताचिया झुंझुकारीं ॥ केवीं दीप प्रकाश करी ॥ जंव क्रोधायमान असे त्रिपुरारी ॥ तंव न चले सामर्थ्य कोणाचें ॥२००॥
म्हणोनि कांहीं न चले बुद्धी ॥ आतां करूं तपःसिद्धी ॥ जेणें संतोषे गुणनिधी ॥ स्मरहर तो ॥२०१॥
ऐसी एक सहस्त्र वर्षवरी ॥ उद्वस झाली यमपुरी ॥ वांवरें पडलें होतें शिवद्वारीं ॥ कलेवर त्या यमाचें ॥२०२॥
तोवरीं तो चतुरानन ॥ तपःसिद्धी करी संपूर्ण ॥ मग तपावसानीं त्रिनयन ॥ आला विरिंचीजवळिकें ॥२०३॥
देव भक्तांचा ऋणाईत ॥ देव भक्तांचें दास्य करीत ॥ भक्तीं पाचारितां धांव घेत ॥ येतसे जवळी भक्तांच्या ॥२०४॥
देव भक्तिऋणें कर्जला ॥ म्हणोनि भक्तांचा आर्जवी झाला ॥ मग तो शिव पुसता झाला ॥ विरिंविदेवासी ॥२०५॥
आमुचें केलें जें आराधन ॥ तें मज पावलें संपूर्ण ॥ आतां करावा जी प्रश्न ॥ चतुर्मुखा तुम्हीं स्वयें ॥२०६॥
मग विरिंचि म्हणे पशुपती ॥ तूं उदार भोळा चक्रवर्ती ॥ हें त्रैलोक्य तुझी इच्छाकृती ॥ सह्ज असें ॥२०७॥
तरी हाचि प्रश्न जी धूर्जटी ॥ तुमचे आज्ञें चालवितों सृष्टी ॥ पापी जाताती वैकुंठीं ॥ यमपुरी तंव उद्वस ॥२०८॥
आतां उठवावा जी सूर्यकुमर ॥ त्यासी द्यावा अभयवर ॥ चालूं द्यावा सृष्टिव्यापार ॥ पूर्वापार जो असे ॥२०९॥
मग शंकर म्हणे ब्रह्मन्यासी ॥ माझा भक्त नेतां यमपुरीसी ॥ तरी ऐसी आज्ञा हे तुम्हांसी ॥ कवणें दिधली मज सांगा ॥२१०॥
माझा उपासनी परमभक्त ॥ तयासी यमपुरी केवीं प्राप्त ॥ म्हणोनि क्षयातें पावला कृतांत ॥ विपरित करणी करितांचि ॥२११॥
ब्रह्मन्यासी वदे चंद्रमौळी ॥ जे शिवनामें लविती भस्मधुळी ॥ विभूतित्रिपुंड्र चढवि भाळीं ॥ ते माझे परमभक्त ॥२१२॥
शिवालयीं जाऊनि बैसती ॥ शिवकथा श्रेष्ठांसी पुसती ॥ ते म्हलेच्छवंशिक न होती ॥ तरी वर्ज्य त्यां यमपुरी ॥२१३॥
नित्य जपे शिवस्तोत्रें ॥ आणि भस्म लावी जो शिवमत्रें ॥ इतुक्यांसी वंदावें सूर्यपुत्रें ॥ शिवासमान जाणोनी ॥२१४॥
ऐसें शिवतपी ऐका ॥ तयां वर्जावें यमलोका ॥ ऐसियाची लिखित पत्रिका ॥ घ्यावी गा त्वां चतुर्मुखा ॥२१५॥
इतुक्यांस यमलोक वर्जिले ॥ ऐसें विधीनें लिखित दिधलें ॥ मग शंकरें गणांकडे पाहिलें ॥ उठवावा तो यमरावो ॥२१६॥
मग शैलादिगणें धांविन्नलें ॥ तिंहीं मंदाकिनीचें जळ आणिलें ॥ तें शिवमंत्रेंकरूनि शिंपिलें ॥ दूतांसहित यमावरी ॥२१७॥
ऐसा शैलादिगणें यम उठविला ॥ श्वेतकेतु चरणांजवळीं स्थापिला ॥ मृत्युंजय नाम पावला ॥ शिवमुखें पैं ॥२१८॥
हे श्वेतकेतूची कथा ऐसी ॥ गार्हपत्याग्नी सांगे पित्यासी ॥ आणि माता शुचिष्मतीसी ॥ केलें निरूपण सर्वही ॥२१९॥
ऐसी शंकराची भक्ती करितां ॥ वंद्य होती ते कृतांता ॥ मग संतोषती माता पिता ॥ गार्हपत्य अग्नीचीं ॥२२०॥
ऐसा तो गार्हपत्याग्नी ॥ तप करूं येईल आंनदवनीं ॥ ते कथा परिसावी पापनाशिनी ॥ म्हणे शिवदास गोमा ॥२२१॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे गार्हपत्याग्निउत्पत्तिर्नाम नवमाध्यायः ॥ ९ ॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥


N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP