मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७ वा

काशी खंड - अध्याय ७ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥
आतां विमान जाईल वैकुंठासी ॥ श्रोते हो सावध व्हावें अहर्निशीं ॥ येथें एक पृच्छा असे जी ऐसी ॥ ती परिसावी एकाग्र मनें ॥१॥
विदेही झाला शिवशर्मा ॥ तरी कैसा नेला जीवात्मा ॥ सुरगण नेती उत्तमधामा ॥ कवण तो मार्ग तयांसी ॥२॥
स्थूल देह मृत्युलोकीं निमाले ॥ दुसरे देह कैसेनि झाले ॥ कीं ते सृष्टिकर्त्यानें निर्मिले ॥ त्वरित ते समयीं ॥३॥
ऐसा वक्ता वदे प्रश्न । तंव श्रोता अत्यंत विचक्षण ॥ म्हणे दुसरे देह कोठून ॥ तत्काल झाले नेणवे तें ॥४॥
जरी मानवी सांगतसे ग्रहण ॥ जलधरांची वृष्टि अवर्षण ॥ तरी दुसरा देह श्रेष्ठाचेन ॥ केवीं पां न करवे ॥५॥
शोणित-शुक्रांचे देह दावी ॥ दावूनि मागुती लपवी ॥ तरी श्रेष्ठा न होय केवीं ॥ दुसरा देह निर्माण ॥६॥
कपित्थफळ मातंग भक्षिती ॥ तैसेंच पडे पीत क्षितीं ॥ तरी सृष्टि करी हे परी क्षिती ॥ केवीं न होय सर्वथा ॥७॥
परी तो गुप्त न दिसे जाण ॥ जैसा अद्दश्य विचरे पवन ॥ न दिसे तरी त्यासी जन ॥ काय अनृत वदती ते ॥८॥
जैसी निद्रा कीजे भूमिशयनीं ॥ आणि स्वन्पीं आरूढे सुखासनीं ॥ तरी तो देह जी कोठूनी ॥ होतसे दुसरा पैं ॥९॥
देहत्रय स्थूळ लिंग कारण ॥ चौथें शरीर महाकारण ॥ याचें चतुर्विध विवरण ॥ तें सांगेन सर्व आतांचि ॥१०॥
या शरीरत्रयाचें जें मूळ ॥ तें हाचि म्हणिजे देह स्थूळ ॥ तेथींची वर्तणूक सकळ ॥ ते उमटे देहत्रयीं ॥११॥
शुभाशुभ कर्में स्थूळापासुनी ॥ जें जें वर्ते तें तें दिसे स्वन्पीं ॥ नाना दाखवी जें दर्पणीं ॥ तेंचि दिसे सद्दश ॥१२॥
असत्य कर्म स्थूळीं करी ॥ ते सांपडे जी लिंगशरीरीं ॥ मग बांधोनि यमकिंकरीं ॥ नेइजेती यमपुरीं ॥१३॥
जें सत्कर्म इच्छी मानसीं ॥ तें कारणदेहें पावे सुषुप्तीसी ॥ तो न सांपडे जी यमपाशी ॥ पुण्यशील ॥१४॥
ज्यासी समचि पापपुण्य ॥ त्यासी मनुष्यजन्म पावन ॥ हें प्रहरूं इच्छी ज्ञान ॥ तो महाकारण देहमुक्ती ॥१५॥
महापुण्यें महाकारण जोडे ॥ महापापें लिंगदेह सांपडे ॥ मग बांधोनि नेती बळियाढे ॥ यमपुरीसी ॥१६॥
द्वादश लक्ष योजन ॥ ते यमपुरी असे विस्तीर्ण ॥ तितुकी कोंदली दिसे यमसैन्यें ॥ अघोरादिकीं ॥१७॥
पांच सहस्त्र योजनें बहुरंगीं ॥ प्रदक्षिणा असे यमदुर्गीं ॥ शत एक योजनें नभमार्गीं ॥ उंच हुडे असती पैं ॥१८॥
तरी त्यास्तव कीजे पुण्य ॥ करावें कृष्णधेनुदान ॥ क्षुधाकाळीं मिष्टान्न ॥ वोगरिजे अनाथासी ॥१९॥
महातीर्थीं दीजे दान ॥ विधियुक्त करूनि पूजन ॥ पुण्ये तरिजे पापभोगण ॥ केलिया फळाचें ॥२०॥
द्वादश सहस्त्र यमपुरीसी ॥ अघोर कुंडें असती दोषियांसी ॥ तें असो आतां कथेसी ॥ होतसे विलंबू ॥२१॥
भिवोनियां दुस्तर पापासी ॥ शिवशर्म्यानें जोडिलें पुण्यासी ॥ तो दिमानीं बैसोनि वैकुंठासी ॥ जात असे महाप्रेमें ॥२२॥
जेवीं महायागाचा धूम्र जाण ॥ उद्भवतांचि सेवी गगन ॥ तैसें उचललें विमान ॥ क्षण एक न लागतां ॥२३॥
ते सुशील पुण्यशील गण ॥ तैसाचि शिवशर्मा ब्राह्मण ॥ वैकुंठा जातां कवण कवण ॥ लोक देखिले ते वेळीं ॥२४॥
शिवशर्मा पुसे गणांसी ॥ हेमवर्ण दिसतसे आम्हांसी ॥ येथील लोकांची गति कैसी ॥ तें मजसी निरूपावें ॥२५॥
मग ते सुशील पुण्यशील गण ॥ म्हणती शिवशर्म्या सद्‍गुण ॥ विदेही झालासी तूं पूर्ण ॥ मायापुरीस ये वेळीं ॥२६॥
काय वर्णावें तव सामर्थ्य ॥ तुवां चुकविला यमपंथ ॥ आतां सांगों तुज यथार्थ ॥ जें जें पुससी आम्हांसी ॥२७॥
हेमवर्ण दिसतसे अटक ॥ येथें असती पिशाचलोक ॥ जे मृत्युलोकीं दूषक ॥ त्यांस हा लोक प्राप्त होय ॥२८॥
नाना दुष्णर्में मृत्युलोकीं ॥ आचरले जे महापातकी ॥ ते घातले या अटकी ॥ ब्रह्मारण्यवनामाझारी ॥२९॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ यांचिया कर्माची गति कैसी ॥ हा लोक प्राप्त झाला यांसी ॥ तें परिसा जी द्वीजवर्या ॥३०॥
नित्य कपटव्यापारी ॥ मान्यांचा अपमान करी ॥ लांचेनें द्रव्य अंगीकारी ॥ ऐसे एक दीर्घदोषी ते ॥३१॥
मान्य असे स्वामीचा सेवक ॥ दोषाविण दुखवी लोक ॥ दोषियांमाजी मुख्य नायक ॥ दीर्घदोषी तो एक ॥३२॥
लोकांचें ऐश्वर्य हरी ॥ आणि सहकुटुंब उदर भरी ॥ पाप पुण्य जो न विचारी ॥ ऐसा एक दोषी तो ॥३३॥
श्रेष्ठपणें अन्यासी दुखवावें ॥ आणि कल्पी आपुलेंच बरवें ॥ परवस्तु हरावया जी दैवें ॥ रात्रंदिवस जपे जो ॥३४॥
उगीच देहीं मान्यता आवंगे ॥ आणि सर्वांसी क्लेश देई अंगें ॥ एकाचें उणें एकासी सांगे ॥ ऐसा एक दीर्धदोषी ॥३५॥
एक निंदिती महामतासी ॥ एक नाशिती स्वामिकार्यासी ॥ एक लक्षिति कुलस्त्रियांसी ॥ ऐसे हे महादोषी ॥३६॥
एक विरोधी कपटशरीरी ॥ भल्याचे घरीं वळसा करी ॥ ब्रह्मस्वाचा अभिलाष धरी ॥ ऐसे एक दीर्घदोषी ॥३७॥
ऐसे जे दीर्घदोषी ॥ करिती अमान्य स्वामिकार्यासी ॥ एक लक्षिती परन्यूनासी ॥ ते वसताती या स्थळीं ॥३८॥
जे सदा दुसर्‍याचा द्वेष करिती ॥ त्यांसी ही पिशाचलोकप्राप्ती ॥ राक्षसाऐसे देह पावती ॥ महारण्यीं ते जाण पां ॥३९॥
तीस सहस्त्र संवत्सर ॥ त्यांसी दंडिती यमकिंकर ॥ तरी तें आतां सविस्तर ॥ सांगूं तुजप्र्ती साक्षेपें ॥४०॥
तेव्हां यमदूत काय करिती ॥ दशसहस्त्र योजनें भूमि जळती ॥ उष्णकाळीं पापियां बैसविती ॥ तेथें छळिती रात्रंदिवस ॥४१॥
शीतकाळीं ते उष्ण कल्पीत ॥ तेव्हां काय करिती दूत ॥ मुसळधारीं जलवृष्टि करीत ॥ पिशाचांवरी तेधवां ॥४२॥
जेव्हां कल्पिती भोजन ॥ तेव्हां क्षुधा पर्वतासमान ॥ भक्ष्य न मिळे द्वादश योजन ॥ तेथें नेती पिशाचलोकां ॥४३॥
जेव्हां कल्पिती निद्रेचें स्थळ ॥ तेव्हां अवनी सरांटे विपुल ॥ तीक्ष्ण शूळांवरी सकल ॥ निजविती दुष्टांसी ॥४४॥
ऐसे तीस सहस्त्र संवत्सर ॥ त्यांस जाचिती यमकिंकर ॥ मग मागुती यमनगर ॥ प्राप्त होय तयांसी ॥४५॥
ऐसे पिशाचलोक देखिले ॥ शिवशर्म्य़ासी गणीं सांगितलें ॥ पुढें विमान जंव चालिलें ॥ तंव देखिला स्थूललोक ॥४६॥
स्थूल तयांचीं शरीर कृष्णवर्ण महाभयंकरें ॥ परी तीं आचारें ना विचारें ॥ वर्तत असती सर्वदा ॥४७॥
शिवशर्मा पुसे गणांप्रती ॥ कैसी या स्थूललोकांची गती ॥ मग ते विष्णुगण सांगती ॥ शिवशर्म्याप्रती तेधवां ॥४८॥
हे जन्मातरींचे सत्य कृपण ॥ नेणती पाप ना पुण्य ॥ लक्ष्मीच्या स्वार्थें धर्मदान ॥ न करिती हे अविचारें ॥४९॥
महाधनाढन्य जन्मपर्यंत ॥ अमंगल असती वर्तत ॥ धर्त करावयासी ज्यांचें चित्त ॥ स्वन्पींही नातुडे ॥५०॥
जें जें द्रव्य मिळविती ॥ तें तें क्षितीमाजी आच्छादिती ॥ मिष्टान्न भक्षावयाचें पंक्तीं ॥ जन्मांतरीं घडेना ॥५१॥
ऐसे जे जन्मांतरींचे कृपण ॥ अमंगळ वस्त्रें भूमिशयन ॥ परगृहीं भक्षिती अन्न ॥ आपण कधीं न वेंचिती ॥५२॥
ऐसे जे धर्माधर्म नेणती ॥ मानअपमानांची लाज न धरिती ॥ त्यांसी ह्या स्थूललोकाची प्राप्ती ॥ होत असे निश्वयें ॥५३॥
एक लक्ष संवत्सर ॥ तेथें वसती ते दोषी नर ॥ त्यनंतरें यमपुर ॥ प्राप्त होय तयांसी ॥५४॥
यम पाहूनी धर्माधर्म ॥ जैसा दोष तैसा दैतसे जन्म ॥ त्या दोषियांचा गुणधर्म ॥ बोलिजेल पुढारी ॥५५॥
ऐसे ते सुशील पुण्यशील गण ॥ शिवशर्म्यासी स्थूललोक दाविती पूर्ण ॥ मग पुढें चालतें झालें विमान ॥ तंव तो देखिला गंधर्वलोका ॥५६॥
हे देवलोकींचे विद्याधर ॥ संगीत-गायन-नृत्यकार ॥ जेणें संतोषती सुरवर ॥ ऐसें तें नवरसपूर्ण नगर पैं ॥५७॥
तरी ते महादिव्यशरीरी ॥ सर्व जाणती कळाकुसरी ॥ विमान चालतसे जंव पुढारी ॥ तंव देखिली यमपुरी पैं ॥५८॥
तेथें अपूर्वं वर्तले ते क्षणीं ॥ धर्म बैसलासे सिंहासनीं ॥ तो भृत्यांसी वदला वचनीं ॥ चला पाहूं तें आश्वर्य ॥५९॥
मृत्युलोकीं मायापुरीसी ॥ मृत्यु झाला शिवशर्म्यासी ॥ म्हणोनि विष्णुगण तयासी ॥ नेताती जाण वैकुंठा ॥६०॥
म्हणोनि धर्मराज सहपरिवारीं ॥ आला यमपुरीं बाहेरी ॥ तंव शिवशर्म्यासह गण झडकरी ॥ आले समीप ते समयीं ॥६१॥
शिवशर्मा आणि विष्णुगण ॥ समीप आले निमानी बैसून ॥ तें देखूनि सूर्याचा नंदन ॥ मग काय बोले तें परियेसा ॥६२॥
म्हणे शिवशर्म्या परियेसीं ॥ तुवां जोडिल्या पुण्यराशी ॥ म्हणोनि मायापुरीसी ॥ पडला देह पुण्यभूमीं ॥६३॥
मग धर्मराज बद्धकरीं ॥ शिवशर्म्यासी नमस्कारी ॥ म्हणे तुवां केलें त्रैलोक्यामाझारी ॥ न भूतो न भविष्यति ॥६४॥
शिवशर्म्या तुजाऐसा कोणी ॥ न देखों या त्रिभुवनीं ॥ जो कां आरूढे विमानीं ॥ तया वैकुंठ प्राप्त होतसे ॥६५॥
मग धर्मराज संतुष्ट करेंसीं ॥ नमस्कारी विष्णुगणांसी ॥ आमुचा प्रणाम श्रीअंनतासी ॥ निरूपावा आदरें ॥६६॥
सुफळ जन्म आमुचा आज ॥ शिवशर्म्या तुज देखिलें सहज ॥ मग आज्ञा घेऊनि धर्मराज ॥ प्रवेशला नगरीं सत्वर ॥६७॥
मग शिवशर्मा विष्णुगणांसी ॥ हा कोण ऐसें पुसे तयांसी ॥ हें कोणाचें नगर तें आम्हांसी ॥ निरूपावें भावपूर्वक ॥६८॥
गण म्हणती शिवशर्म्या उत्तमा ॥ तूं जे प्रश्न करिसी आम्हां ॥ तें तूं परिसें गा अनुपमा ॥ एकचित्तें करूनियां ॥६९॥
या नगराचें नाम यमपुर ॥ ये नगरीं यम राज्यधर ॥ चहूं खाणींचे जीव अपार ॥ वसती येथें सर्वदा ॥७०॥
तंव प्रश्व करी शिवशर्मा उत्तम ॥ हा जी होय कैसा यम ॥ हा मनोभावेंसीं धर्म ॥ सात्त्विकभाव दिसे याचा ॥७१॥
सूर्यासी पडे अंधकार ॥ चंद्रासी उपजे तापज्वर ॥ तरी हा यम भाव क्रूर ॥ टाकील वाटे अहर्निशीं ॥७२॥
यम तो कैसा जी भला ॥ शेष तौ कैसा निर्विष जाहाला ॥ कृशानु वसनी बांधिला ॥ केवीं निवांत राहे तो ॥७३॥
मग ते सुशील पुण्यशील गण ॥ शिवशर्म्यासी देती प्रतिवचन ॥ या यमाचें सात्त्विकपण ॥ सांगों काय तुजप्रती ॥७४॥
शिवशर्म्या तुजऐसा पुण्यशील ॥ शरीरीं नाहीं गा दोषमळ ॥ ज्याचें मन शुद्ध केवळ ॥ शुद्ध स्फटिक ज्यापरी ॥७५॥
त्या शुद्ध स्फटिकावरी जैसे ॥ नाना रंगांचे दिसती ठपे ॥ होती त्या त्या रंगाऐसे ॥ हे गुण सत्त्वाचे असती ॥७६॥
जैसें सर्व रसीं मिळे नीर ॥ रसाऐसें होय कडु मधूर ॥ तैसा यमधर्म सात्त्विक क्रूर ॥ होय पुण्यपापास्तव ॥७७॥
तुजसारिखा जो पुण्यशील भक्त ॥ तयाचा यम हो शरणागत ॥ योगेश्वरांमाजी महामहंत ॥ धर्मराज जाण हा ॥७८॥
यासी प्रसन्न झाला शंकर ॥ प्रतापें वधिला लवणासुर ॥ जेणें देवांवरी तोडर ॥ बांधिला होता पूर्वीच ॥७९॥
केला यमपुरीचा राज्यधर ॥ चतुर्दशकोटि याचा परिवार ॥ आणि चहूं खाणींचा जीवांकुर ॥ निमित्त जाण तोचि हा ॥८०॥
द्वादश लक्ष योजनें गणती ॥ या नगरीची असे जान वस्ती ॥ चहूं दिशीं चार द्वारें असती ॥ यमपुरीसी जाण पां ॥८१॥
शत योजनें दुर्ग आकाशीं ॥ प्रभा फांके जैसे रविशशी ॥ ते दिव्यतेजें दशदिशांसी ॥ गगनोदरीं हुडे ते ॥८२॥
तेथें रविसुताचीं मंदिरें ॥ रत्नखचित मनोहरें ॥ एकवीस खणांचीं दामोदरें ॥ वरी ध्वजा थोर मिरवती ॥८३॥
ऐसा हा यमरावो महद्‍भूत ॥ दोषियां वरी महाकृतांत ॥ मृत्युलोकीं याचे भृत्य अद्‍भुत ॥ बांधिती महादोषियां ॥८४॥
सूक्ष्मदेहें महादोषी ॥ यमगण नेती यमपुरीसी ॥ मार्गी जाचिती थोर तयांसी ॥ तरी तो मार्ग कवणेपरी ॥८५॥
तो मार्ग मुत्युलोकींहूनी ऐक ॥ असे शायशीं सहस्त्र योजन देख ॥ तेथें असती तप्त लोहकंटक ॥ दोषियां नेती त्यांवरूनी ॥८६॥
म्हणोनि दान काय कीजे ॥ उपानहदान सत्पात्रीं दीजे ॥ मग तो दुस्तुर मार्ग तरिजे ॥ हेलामात्रेंकरूनी ॥८७॥
तयापुढें योजनें सहस्त्र दोनी ॥ तप्त वाळू पसरिली मेदिनीं ॥ महादोषियां तया वरूनी ॥ नेती यमकिंकर सर्वदा ॥८८॥
यास्तव काय कीजे दान ॥ मार्गीं पोही घालिजे म्हणोन ॥ मग सुखें जाइजे उतरोन ॥ ते भूमीसी ॥८९॥
त्यापुढें दहा सहस्त्र योजन ॥ भूमीं जळत महाअग्न ॥ महादोषियां नेती त्याजवरून ॥ ते आक्रंदती थोर दुःखें ॥९०॥
यास्तव पुण्य काय कीजे ॥ वापी कूप तडाग बांधिजे ॥ उष्णकाळीं अवश्य दीजे ॥ उदकदान प्रीतिभरें ॥९१॥
त्यापुढें असे महादारूण ॥ षोडष सहस्त्र संख्यायोजन ॥ शूळधारा असती तीक्ष्ण ॥ त्यांवरी चालविती दोषियांतें ॥९२॥
तेणें दीर्घ स्वरें आक्रंदती ॥ मग दोषी येती काकुळती ॥ कृपा न येचि यमदूतांप्रती ॥ जाचिती थोर दोषियांसी ॥९३॥
यास्तव पुण्य काय कीजे ॥ सत्पात्रीं नाना दानें समर्पिजे ॥ मग तेणें सामर्थ्यें तरिजे ॥ महादुस्तर शूळधारा ॥९४॥
तयापुढें सहस्त्र एक योजन ॥ लोहार्‍या महातीक्ष्ण ॥ पंचपंच धारा त्यांसी जाण ॥ तेथें घोर असे अंधकार ॥९५॥
तरी दान कीजे तयांसी ॥ दीपमाळा लाविजे शिवापाशीं ॥ नभदीप ऊर्जमासीं ॥ लाविजे प्रयत्नेंकरूनी ॥९६॥
पुढें अठरा सहस्त्र क्षिती ॥ महाशूळ रोविले असती ॥ ते दोषियांतें केवीं भासती ॥ प्रलयाग्नीसारिखे ॥९७॥
यास्तव पुण्य कीजे कायी ॥ महा उष्णकाळाच्या ठायीं ॥ गलतिका लाविजे शिवालयीं ॥ तेणें निवारे दुस्तरे दुस्तर ते ॥९८॥
पुढें अष्टादश सहस्त्र योजनें थोर ॥ भूमिका भरली प्रळयनीर ॥ तेथें बुडविती यमकिंकर ॥ पुढें नेती दोषियांतें ॥९९॥
यास्तव काय कीजे पुण्य ॥ सत्पात्रासी दीजे भूमिदान ॥ त्यापुढें असे एक सहस्त्र योजन ॥ दोषियां दाहक कृशानु ॥१००॥
त्या कृशानूसी आज्ञा ऐसी ॥ पोळवावें महादोषियांसी ॥ तेव्हां उपजे दोषियांचे मानसीं ॥ तृणकाष्ठांतें कवळावें ॥११०॥
यास्तव काय कीजे पुण्य ॥ उष्णकाळीं दधिभोजन ॥ आणि सुगंध चंदन ॥ कीजे उपचार विप्रांसी ॥१०२॥
ऐसे यमदूत जरी जाचितील ॥ तेणें जीव म्हणाल जरी जाईल ॥ तरी घोर दुःख कोण भोगील ॥ म्हणोनि जीवात्मा अविनाश ॥१०३॥
नाशिवंत स्थूळ नाशिलें ॥ वासनात्मक लिंगशरीर उरलें ॥ मग ते जीवात्मया प्राप्त झालें ॥ दोषभोगास्तव परियेसीं ॥१०४॥
तो देह दूत बांधिती ॥ ऐसिया यातना करीत नेती ॥ तंव देखती तेजदीप्ती ॥ यमपुरींची अकस्मात ॥१०५॥
ऐसी ते यमपुरी पाहातां ॥ शत योजनें रक्तपुवांची सरिता ॥ तेथें दोषी बुडविती नेतां ॥ डंखू धांवती फणिवर ॥१०६॥
यास्तव सत्पात्रीं पूजन ॥ कृष्णधेनु दान करून ॥ सहस्त्र विप्रां द्यावें भोजन ॥ दुर्गतीते नाशावया ॥१०७॥
ऐसें आणिलिया यमपुरीसी ॥ घोर कुंडीं घालिती दोषियांसी ॥ अनेक यातना करिती त्यांसी ॥ मग ताडिती यमदंडें ॥१०८॥
मग उष्ण वृक्ष्णांचिया पारीं ॥ बैसविती दोषी दुराचारी ॥ मग उष्ण पत्रें दोषियांवरी ॥ गळती वृक्षांचीं ॥१०९॥
जैशा असंख्या पिपीलिका ॥ सर्वांगीं झोंबती कीटका ॥ तैशीं तीं उष्ण पत्रें दोषिकां ॥ अंगीं जडती तत्काळ ॥११०॥
तप्त वाळूचे पुंज करिती ॥ त्यांवरी दोषियां लोळविती ॥ त्या उष्णत्वें नेत्र पडती ॥ दोषियांचे गळोनी ॥१११॥
मग तप्त तैल आणून ॥ कुंभ भरिती परिपूर्ण ॥ ते महादोषियांवरी शिंपोन ॥ उपचारिती दूत पैं ॥११२॥
मग बळें लाविती केदारासी ॥ आलिंगन देवविती अग्निस्तंभासी ॥ मग नेऊनि दोषियांसी ॥ लोहसूळावरी घालिती ॥११३॥
श्वान वायस झोंबती ॥ व्याघ्र सिंह मूषक येती ॥ तप्त लोहीं पिंड झडपिती ॥ पातकियांचे ते ठायीं ॥११४॥
द्वादश सहस्त्र कुंभीपाक ॥ यमपुरीमाजी असती देख ॥ तितुके कुंभीं पचवूनि दोषिक ॥ आणिती धर्मसभेसी ॥११५॥
तरी ते धर्मसभा कैसी ॥ पृथ्वीपति पुण्यराशी ॥ बैसले असती आनंदेंसीं ॥ नामें तयांचीं अवधारीं ॥११६॥
उशीनरराजा आणि सुधन्वा ॥ जयद्रथ आणि श्रुतश्रवा ॥ अनुशाल्व वीर द्दढधन्वा ॥ आणि रिपूंजय तो ॥११७॥
दंतवक्र आणि यवन ॥ नाभाग आणि रिपूमर्दन ॥ कर्दमराजा आणि धर्मसेन ॥ परमादी परांतक ॥११८॥
गण म्हणती शिवशर्म्यासी ॥ ऐसे राजे धर्मसभेसी ॥ तेथें बांधोनि उभे केले दोषी ॥ मग धर्म बोले चित्रगुप्तातें ॥११९॥
घ्यावया कृतकर्मांचा झाडा ॥ उभे केले सभेपुढां ॥ दोष दंड पुण्यमानें गाढा ॥ सांगतसे धर्मराज ॥१२०॥
शिवशास्त्रीं श्रवण न देती ॥ सत्कर्म वृथा मानिती ॥ त्यांसी बधिरत्व प्राप्ती ॥ एकजन्मपर्यंत ॥१२१॥
दुसरा जन्म कपोत्याचा जाणा ॥ वांकडें शरीर कर्कश शब्द नाना ॥ तिसरे जन्मीं लांबा होय खुणा ॥ हरळ भक्षण तयातें ॥१२२॥
धर्म म्हणे चित्रगुप्ता अवधारीं ॥ धर्मनीतीचा लोप करी ॥ परद्रव्यहरणें उदर भरी ॥ त्यासी जन्म बिडालकाचा ॥१२३॥
एक स्वामीतें रणीं सांडिती ॥ आपुले कार्यास्तव असत्य बोलती ॥ तयांसी कवण जन्म होय प्राप्ती ॥ ते होताती अजापुत्र ॥१२४॥
रणीं चुकविती मरण ॥ देहलोभ मनीं धरून ॥ त्यांसी चौर्‍यायशीं लक्ष योनी पूर्ण ॥ जन्म घेणें निश्वयेंसी ॥१२५॥
सांगती ज्ञानशास्त्रांच्या हतवटी ॥ श्रवण करी त्यां नव्हे संतुष्टी ॥ परस्त्रियांची मात गोष्टी ॥ मानिती अमृतासमान ॥१२६॥
तयांसी सूकरयोनी प्राप्त ॥ नरक भोगिती जन्मपर्यंत ॥ दुसरें जन्मीं होती निश्वित ॥ घुंगुरडे नीच योनीसी ॥१२७॥
कन्या देऊनि द्रव्य घेती ॥ एक गुरुशब्द नायकती ॥ एक एकाची निंदा करिती ॥ आपुले गृहीं बैसोनियां ॥१२८॥
तरी त्यांसी जन्म कवण ॥ अनामिकाद्वारीं कृष्णश्वान ॥ अमंगळ भक्षी दीनवदन ॥ अस्थी फोडी धेनूंच्या ॥१२९॥
ऐसे दोषियांसी दंड सांगतां ॥ कथेसी होईल विस्तीर्णता ॥ जरी हें न सांगावें श्रोतां ॥ तरी हें धर्मशास्त्र जाण पां ॥१३०॥
म्हणोनि पुण्याच्या राशी ॥ जोडिजे बहु सायासीं ॥ इतुकें नव्हे तरी वाराणसी ॥ सेविजे एक वेळां तरी ॥१३१॥
अरे सुकृताचेनि कारण ॥ स्वर्गसुखासी होइजे पावन ॥ महादोषास्तव जाण ॥ चौर्‍यायशीं लक्ष भोगिजे ॥१३२॥
ऐसें यमपुर महाघोर ॥ तें निरूपिलें सविस्तर ॥ विमान चाललें वेगवत्तर ॥ शिवशर्मा-गणांसहित ॥१३३॥
शिवदास गोमा बद्धकरीं ॥ श्रोतयांसी विनवी दीनवैखरी ॥ आतां कवण लोक पुढारी ॥ देखिला तें परिसावें ॥१३४॥
॥ इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे यमलोकवर्णनं नाम सप्तमाध्यायः ॥७॥   ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP