उत्तरार्ध - अभंग ३०१ ते ४००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


ठेवी सर्वत्र द्दष्टी निर्मळ । सर्वांतें पाही सुंदर सोज्ज्वळ । मुक्तानंदा चितीपूर्ण स्त्री केवळ । अन्य ना कांहीं ॥३०१॥
मुक्तानन्दा, राजमाता देवमाता । असेना ही सतीची पवित्रता । कुण्डलिनी चिती भगवती स्पर्शतां । नसे तो अनाथ ॥२॥
तीच माता पूरी पतिब्रता । सती सावित्री जननी सर्वथा । चितीचा पूर्ण विकास जींत तत्त्वता । ना कष्ट तेथ पुनरजन्मीं ॥३॥
असे ही महाबली पत्नी । दानवीर माता, शूरवीर जननी । परी नसेल ध्यानयोगिनी । सारें व्यर्थ तोंवरी ॥४॥
तीच चालती बोलती परमेश्वरी । मुक्तानंदा तीच प्रकट मुक्तेश्वरी । अंतरतेज पूर्णप्राप्त नारी । तिचें दर्शन पुण्यकारी ॥५॥
पूर्ण रूपसुंदरी । धनवान महा कुलाचारी । अंतरविकासशून्य नारी । मुक्तानंदा, अघोरी ॥६॥
अभिन्न सरूप अम्बा लक्ष्मी गौरी । गंगा यमुना सरस्वती कावेरी । अंतरशक्ति जागृत अशी नारी । चितीपूर्ण जी खरी ॥७॥
न पतिरूप बनली । ना अर्धांगिनी ठरली । पतिकार्यीं न रमली । ती नारी महामारी ॥८॥
पतिव्रतेचा महिमा महान । व्रातनिष्ठा गृहाचार पालन । मुक्तानंदा तिचें चरणपूजन । देवताही करीती ॥९॥
ना आत्मवत् पतिप्रेम । नसे सरळ व्यवहार संयम । मुक्तानंदा, पागल अस्वलासम । असे गृहिणी अशी ॥३१०॥
पतिपरायणी पूर्ण पतिरत । माता सखी सेवक हितैषी बनत । मुक्तानन्दा अशी परम दैवत । प्रातःस्मरणीय ही ॥११॥
पतिद्वेषा पति प्रेमाविना भिकारी । निष्कपटानें एकरूपतेस न वरी । पतिक्रोधी जारिणीहूनि बरी । मुक्तानन्दा,  वाधीण देखील ॥१२॥
पतिप्रेमी पतिकुलभूषण । ती पत्नी परमतीर्थ पावन । चिती भगवती कुण्डलिनीही असुन । जगज्जननी महाशक्ति होय ॥१३॥
पतीनें परमेद्श्वर मानी । घे स्वकष्ट यज्ञ समजोनी । घरीं दारीं शेजारीं मिसळुनी । प्रेम संपादी ॥१४॥
पुत्रपुत्री-कल्याणार्थ । माताच हो परमगुरूरूप सार्थ । मुक्तानंदा, ती नारी बने तीर्थ । दर्शनीय यथार्थ ॥१५॥
असो नेता वा दाता । मार्गदर्शक अथवा चालवी सत्ता । परी ना निष्कामी ना सोडी स्वार्था । लाजिरवाणेंच जिणें सर्वथा ॥१६॥
आहे नाना प्रलोभन । महती-व्यथा अशांत जीवन । मुक्तानंदा पुरुष असा पुण्यवान । समजावा का ॥१७॥
अनेक गुरुंना पूजितो । मन मानेल देवता अर्चितो । जो बहुनारीव्रत आचरितो । चाण्डालाचेंच कर्मकाण्ड हें ॥१८॥
एकपात्री, देशभक्ती निष्ठावंत । वाडवडिलचरण जे अनुसरत । मुक्तानंदा उच्चवर्गीय होत । असे पुरुष ॥१९॥
नाहीं एकनिष्ठ व्रत । ना सत्कर्मीं रत । ना विश्वास परमात्म्यांत । स्त्रीलंपट पोळ जणुं ॥२०॥
महाव्रत महादीक्षा शांतिक्षेत्र । जाणी एकपत्नीव्रत मात्र । आदर्श असा संसारी सर्वत्र । एकपत्नीव्रतधारीच ॥२१॥
परिवर्तनशील जगतीं । चार दिसांची जीवन-स्थिती । बहुजन सुखहितार्थ जो व्यतीती । तोचा खरा मानव ॥२२॥
स्वकष्टपूर्ण जीवन व्याप्ती । प्राप्तीनुसार तृप्ती । कर्तव्याची क्रियाशील गती । शांतिमंदिर द्वारेंच ॥२३॥
परधनमत्सर स्वतःतें जाळी । ना अन्य कोणातें पोळी । मुक्तानंदा रडोत, रड ज्यांच्या कपाळी । स्वाभाग्यीं रहा तूं मस्त ॥२४॥
धीर वीर विवेको । मानव पराक्रमशील प्रत्येकी । नसे त्याची वृत्ती रडकी । मुक्तानंदा ॥२५॥
सदाचारसम्पन्न ध्यानशील । गुरुभक्तिरत मानव सुशील । मुक्तानंदा या संसारीं बनशील । पूर्ण यशस्वी त्यासम ॥२६॥
परमेश्वर-प्रेम-धन । गुरुसेवा सद्नुणांचें पालन । मुक्तानंदा, चित्तही ध्यानमग्न । समाधान परिणाम ॥२७॥
माता पिता जन्मदाते । प्रेमभरें सेवावी तयांतें । मुक्तानंदा पितृ-पूजन असें तें । शांति देतें ॥२८॥
मनुष्यजन्म दुर्लभ होय । राही बहुमूल्यवान समय । मुक्तानंदा, आत्मध्यानमय । समयच सदुपयोगी ॥२९॥
तूं उच्च नरदेहसंपन्न । मानवशरीर अतिमूल्यवान । पुन्हा पुन्हा लाभणें कठीण । ही प्राप्ती ॥३३०॥
स्वकष्टमय जीवन । मुक्तानंदा वितरी म्हणून । परावलंबी पराश्रयानं । कां राहसी ॥३१॥
पराधीनता भासवी सुख । अंतीं परी ठरे महादुःख । स्वाधीनताच अपसुख । दे पूर्ण सुख ॥३२॥
स्वकष्टपूर्ण जीवन । अमृतमय मिष्टान्न । मुक्तानंदा जे सर्वसिद्धीप्रदान । आचरूनि पहा म्हणुन ॥३३॥
शरमुं दे जीव घेतांना । पूर्ण उमंगी बनुं दे देतांना । मुक्तानंदा स्वकष्टयज्ञ यजतांना । स्वर्ग दूर नाहीं ॥३४॥
स्वकष्टार्जित कांहीं दे दान । सतत घेत राहण्यानं । मुक्तानंदा सुकृत जाइ घटुन । देण्यानें परी वाढतें ॥३५॥
देई तोच घेई । घेणार कोठुन न देणारा कांहीं । मुक्तानंदा हवें तर देत राही । दिल्याविना मिळे भ्रम व्यर्भ ॥३६॥
जसें द्यावें तसें लागे घ्यावें । देणें घेणें घडे स्वभावें । दुसर्‍यास दोष देऊनि कां रडावें । सन्मानानेंच देत जावें ॥३७॥
गंगाजल भरपूर । केवढेंही पात्र भरा पुरेपूर । मुक्तानंदा तुझीही करी भर । हवी तेवढी ॥३८॥
परी तूं राह्शी कर्महीन । जो घेतो त्यासी देखुन । कां उगाच करिशी रुदन । निष्क्रिय होऊनी ॥३९॥
खाल्लें प्यायलेलें अन्न । जातें पचुन । वा दुसर्‍या वाटेनं । जाई निघून ॥३४०॥
मुक्तानंदा तुझें धन । करी थोडें तरी दान । बनेल तें पुण्यप्रदान । वरदानच राही मागें, ना अन्य ॥४१॥
परमात्मसृष्टीचें दान महान । तेजस्वी कार्य क्रियावान । परमात्मा करीतसे प्रदान । तूंही दान देत जा ॥४२॥
करी शुद्ध कर्म करणी । ठेवी उच्च विचारसरणी । संयमशील ध्यानधारणीं । सदा राही ॥४३॥
मुक्तानन्दा तदनन्तर पाही । अन्तरवासी देवदेवताही । दर्शन देती सर्वही । तत्परतेनें ॥४४॥
राजा असशी जगाचा । महाधनेश्वर संपत्तीचा । स्वामी अष्टमहासिद्धींचा । निर्दोषिता विना नसे शांति ॥४५॥
निर्दोषिता शांतीची जननी । निर्दोष बन मन वचन कर्मांनीं । मुक्तानन्दा मुखमण्डलीं ये प्रगटुनी । निर्दोष मनाची खुशी ॥४६॥
शेती करितां प्रेमानें । रामच प्रगटे तेणें । व्यापार करतां न्यायानें । तोच हो शामरूप ॥४७॥
करीनास का राजकारण । समजे तें परमेश्वरप्रांगण । मुक्तानंदा शांति नसे जाण । रामाविना ॥४८॥
प्राप्त एक शांति । तेणें अनेक तृप्ती । नित्यानंदप्रसाद नसे अतृप्ती । मुक्तानंदा ह्रदयशांती कमावी ॥४९॥
चेतना पूजा त्वरित । होतसे सफलित । मुक्तानंदा करी शांती प्राप्त । चेतन पूजनानें ॥३५०॥
माता पिता गुरु वृद्ध । ह्यांच्या सन्मानानें मुक्तानंद । देवपूजेचा प्रबंध । आपच होई ॥५१॥
च्रुपचाप मन स्तब्ध । चिंतनरहित चित्त । जीवन ऋणरहित । आणखी ॥५२॥
गुरुसेवा निष्काम । हीच वैकुण्ठ धाम । दूरी नसे राम । राही अंतरींच ॥५३॥
नसावी नीच संगती। थोर संगती-परिणाम-महती । परिसाच्या संगें सुवर्ण होती । लोखंड पहा ॥५४॥
अग्नि-स्नेह, सर्प दोस्ती । मुक्तानंदा क्रूर प्राणी सांगाती । नीच मानवसंगती -। पेक्षां भली म्हणावी ॥५५॥
पुण्यात्म्याचें दर्शन पुण्य । श्रवणानें बने पवित्र अंतःकरण । मुक्तानन्दा पाप्याचें पापाचरण । नरक भोगवी ॥५६॥
गंगेमाजीं गाढव नाहलें । कुकमीं पुण्यक्षेत्रीं राहिले । म्हणुनि काय जाहलें । सूर तयाचा न बदले ॥५७॥
संगतीनें स्वर्ग । संगतीनें नर्कसंग । कर्माचेंही नीच उच्च अंतरंग । भिउनी रहा नीच संगाला ॥५८॥
भरभराटीच्या काळीं । नीति धर्म पाळी । सत्ता-क्षीणतेची सर्व वेळीं । स्मृती राख ॥५९॥
सत्तामदा करी धुन्द । परपीडारूप पाप बद्ध । वाचवी स्वतःला मुक्तानंद । ह्यांपासुनी ॥३६०॥
परसत्ता प्राप्त करून । स्वसत्ता सारी समजून । मुक्तानन्दा परपीडारत होऊन । सत्तानाश ओढवे ॥६१॥
धना गर्व जन गर्व । सत्ता गर्व डिग्री गर्व । सुरू होई निंद्यपर्व । कोण राही मग सांगाती ॥६२॥
सत्ता, दर्जा । चार दिसांची मजा । थांबेल सारा गाजावाजा । रिटायई झाल्याक्षणीं ॥६३॥
सत्ताधारीस सलामी । सत्ताभ्राष्टतेचा मी मी । न ये कोणत्या कामीं । हो मात्र उपेक्षतेचा धनी ॥६४॥
मुक्तानंदा, पाही नेते सत्ताहीन । हवालदील कसे होती दुर्दशेनं । जीवन वितरी अगर्वतेनं । घेऊनि धडा ह्यापासुन ॥६५॥
बदल जगाचा नियम । सत्ता दर्जा मानवकर्म । मुक्तानन्दा न टिके कांहीं कायम । अनासक्ती असावा धर्म ॥६६॥
धनाविना धनिकपण । गुणांविना गुणीपण । सभ्यतेविना शहाणपण । मुक्तानंदा काय कामाचें ॥६७॥
असे सत्ताधारी । तरीही अनहंकारी । साधी राहणी धनवान जरी । असा मनुष्य ॥६८॥
आहे मोठा विद्वान । पण असे गर्वहीन । मुक्तानन्दा दिव्यात्म्यास घे जाणुन । मानवरूपी अशा ॥६९॥
अनन्तात्मा देखे अविरत । बाह्य इंद्रियगोचर जगत । साक्षीभावानें रहात । न थकतां ॥३७०॥
मुक्तानन्दा तुझी अल्प सम्पत । तींत तुझा कां गुंतत । जीव हैराण होता । व्यर्थ असा ॥७१॥
धन जन मान । गर्व ताठा अभिमान । ह्यांतच व्यर्थ दिला घालवून । बहुत काल ॥७२॥
मुक्तानंदा ह्या सार्‍या आपदा मान । त्यागुनी त्यांना करी ध्यान । होशील मग सुखसंपन्न । तत्काल ॥७३॥
सर्वांतरीं रमे शाम । मानवा नको होऊं उद्दाम । मुक्तानंदा, परमेश्वराचें धाम । धीरता होय ॥७४॥
अंतरयामीं सर्वज्ञ । पाही तव कर्मांतुन । मुक्तानन्दा, गेला असेल पस्तावुन । देखुनि तव जीवन ॥७५॥
मानवा अंतरयामीं खुशी । तरी शांति प्रसाद पावशी । मुक्तानन्दा कसा सुखी होशी । अन्तरयामींच्या अवकृपेनें ॥७६॥
व्यर्थ गर्विष्ठ मानव । जगतीं सज्जनताच श्रेष्ठ स्वभाव । मुक्तानंदा नको राहुं दे अभाव । सज्जनतेचा ॥७७॥
नरजन्म श्रेष्ठ प्राप्ती । परी सत्ता दर्जा निवसती । मुक्तानंदा, सत्ता बाह्य उपाधी ती । आत्म्यातें विसरूं नको ॥७८॥
मानव-मूलस्वरूप निरुपाधिक । सहज सरल महाश्रेष्ठ एक । सत्ताधारीपणा कनिष्ठ अविवेक । श्रेष्ठ मानवतेंत ॥७९॥
मुक्तानंदा खरी आत्मलायकी । पदवी सत्ता छोटी प्रत्येकीं । आत्माच एकाकी । सर्वश्रेष्ठ असे ॥३८०॥
सोडी सारी वटवट । लोकसंग्रहाचीही खटपट । कमाई करी झटपट । अंतर संतत्तीची ॥८१॥
परम आत्मा शुद्ध पूर्ण । मानवा तूंही तसा संपूर्ण । तव आत्म्याची ही खूण । शुद्धपण ॥८२॥
आत्ममल-दोष सारे कल्पित । मुक्तानंदा असेंच शुद्ध मानवतेंत । कल्पित सत्ता उपाधि होत । जाणुनी घेई ॥८३॥
दो दिसांची जिंदगी मानवा । जीवनयात्रेचा विचार करावा । काळ लागे कवटाळाया । पळापळानें ॥८४॥
जीवन मरणाचें राही गणित । मुक्तानंदा उद्दामपणा सोडीत । उपाय राही शोधीत । अंतरशांतीचा ॥८५॥
विधात्याचें विधान । राही अति बलवान । मानव कितीही संकल्पवान । तरी व्यर्थ त्यापुढें ॥८६॥
मुक्तानंदा जशी करणी । तशी भरणी । कर्मफलाचीच वाटणी । सारे भोग ॥८७॥
एक पत्नी एक पती । एक मंत्र एकाकार वृत्ती । ही सारी परमार्थप्राप्ती । महत् भाग्यें लाभे ॥८८॥
सत्कर्मीं जर रुकावट । स्वकर्मफल परिणाम बिकट । मुक्तानंदा भोगी खुशीसकट । धैर्यानें ॥८९॥
भाग्यानेंच फकीर अमीर । भाग्यच सुखदुःखाकार । भाग्यच उभें ठाके समोर । भाग्यच सर्व कांहीं ॥३९०॥
सम्पदा अपदांचें मानवजीवन । जें जें घडे सारें परिवर्तन । मुक्तानंदा सर्वच दैवाधीन । कां द्वेषीसी भाग्यवंता ॥९१॥
पूर्वींची कंगाली आज नाहीं । आजची अमीरी नव्हती पूर्वींही । मुक्तानंदा न स्थिर कांहीं राही । पूर्ण निःस्पृह हो म्हणुनी ॥९२॥
’ अकस्मात होणार होऊनि जातें’ । मानवा कां करी हर्ष विषादातें ।’ गतं न शोच्यम् ’ स्मृती वदते । नको स्मरूं गत काळ ॥९३॥
मानवाची रडारड । निज कर्मलोकींचीच ओरड । मुक्तानंदा सुधार स्वलोक परवड । परकर्माचा ओरडा फुका ॥९४॥
आधीं नव्हता जो आहे आतां । आलेला जाईला अवश्य पुढतां । मुक्तानंदा राही स्थिर ठेवी शांतता । येण्याजाण्याच्या मध्यंतरीं ॥९५॥
होणार तें होत रहातें । महाप्रयत्नें टाळतां न टळतें । मुक्तानंदा साक्षीभावें पाही त्यातें । शांतपणें उगाच ॥९६॥
अल्पायुष्य जलद सरे । अंतकाळींचें निर्वाण खरें । मुक्तानन्दा आत्मध्यान बरें । आतांपासुनी ॥९७॥
समयाचें मोल अनंत समयपर समय येत जात । गेल समय नाहीं येत । पुन्हा कधीं ॥९८॥
जो मानी समयास परमेश्वर । तो करी सारें समयानुसार । लाभे यश प्राप्त घडी आल्यावर । न चाले तांतडी कांहीं ॥९९॥
जीवनीं दुसर्‍यास दे सर्वही । परी समय नको देऊं कांहीं । व्यर्थ गेल्या समयीं परमात्मा राही । समय-संधी दवडूं नको ॥४००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP