पूर्वार्ध - अभंग १०१ ते २००

श्री मुक्तेश्वरी पोथी वाचल्याने आत्मिक समाधान मिळते.


कोटिसूर्यसम देदीप्यमान । शीतल कोमल परी होऊन । जेथें दिव्य प्रकाशमान । प्रकाशे ऐसा ॥१०१॥
ज्ञानी, भक्त, योगी, दानी । आनन्दामधीं जेथ राही रमुनी । मुक्तानन्दा तेथ रहा जाऊनी । रसहीन जगीं कशाला? ॥२॥
उर्ध्व सहस्त्राराच्या. ज्योतिर्मय तेजाच्या । कोमल आनन्दपूर्ण आल्हादिनीच्या । सरोवरामध्यें ॥३॥
घण्टा, भेरी, मृदंग, बासरी । मेघा नादध्वनी घोषांतरी । चित् प्रकाश चिन्मयी रश्मीकरी । मुक्तानन्दा, तव सुखासन ॥४॥
घ्या श्रीरामनाम । वा घ्या केशवनाम । परी होऊन तद्रूप । जप करावा ॥५॥
जल एक जलाशयांचें अनेक । अनेक पर्वतांचा मातीकण एक । नाना मेघांचें जलमयीच अन्तरीक ।
तसा आत्मा शरीरीं अनेक ॥६॥
लांकडांतुनि अग्नी । घडयाघडयामधी माती । तन्तुमध्यें रुई । सार्‍या जगतीं आत्माच ॥७॥
तिळामध्यें तेल, अग्नि काष्टांत । जसें दुघामध्यें घृत । आत्मा सर्व शरीरांत । विद्यमान ॥८॥
जाती भेदांच्या कल्पित । पुढती पुढती जात । मुक्तानंदा, शुद्ध आत्म्यांत । होइ रत ॥९॥
दह्याचा थेंब विरजवी क्षीराब्धीला । गुरुकृपामृत बिंदु पुरे प्रपंचाला । रसमय सिंधु बनण्याला । पारमार्थिक ॥११०॥
दह्याचें दूध न हो परत । प्रपंचाचा झालेला परमार्थ । असाच न बनत । प्रपंच केवळ ॥११॥
घुसळलेल्या दह्यांतला तुपांश । दह्यामध्यें न सामावे वापस । जसा काढलेला तेलांश । तिळामध्यें न पतते ॥१२॥
ऐसा करूनि घेतलेला । ज्ञानद्वारा आत्मा वेगळा । व्यवहारी वर्तत दिसला । राही अलग ॥१३॥
दह्याचें करीतां मंथन । लोणी ये वरी जमून । मुक्तानन्दा, केलें जरी मिश्रण । दोन्ही न एक होती ॥१४॥
दिवस घुबड न पाही प्रकाशाला । नित्यानन्दकृपेनें असेंच तुजला । दिसणार नाहीं जगामधला । व्यवहार कांहीं ॥१५॥
पांळण्यानें वेदान्ताचा आदेश । परमानंदप्राप्ती तेणें खास । तद्विषयीं बोलुनि त्यास । न घेतां ये ॥१६॥
क्रियाशील, निष्ठावान वेदान्ती । आवश्यक बहुत जगा ते असती । स्वानुभवाविना अशा व्यक्ती । पण सांगणार काय ॥१७॥
ह्रदयांतरीं राम जो बघतो । द्दष्टीस त्याच्या सर्वत्र तो पडतो । स्वतःमध्यें न देखतां सांगतो । स्वारस्य काय त्या बोला ॥१८॥
क्षेत्रांतुनि व्यवहारिक । घटना वा प्रसंग अनेक । येती ही नैसर्गिक । गोष्ट आहे ॥१९॥
मानव यदि धैर्ययुक्त पूर्ण । होऊनि सद्धर्मपरायण । राहील तरी विजयी बनुन । शंकाच नोहे ॥१२०॥
स्थिर, शान्त, तटस्थ, निर्विकार । होऊनि बैठक जशी साधणार । मुक्तानन्दा, तसें चित्त स्थिर । तुझें बनेल ॥२१॥
खकष्टमय जीवन । खकष्टमय व्यवहारांतुन । निरुपद्र्वी शान्त रहन-सहन । महायज्ञ असे कीं ॥२२॥
एक पत्नी, एक पती । एक मन्त्र, एक गुरुभक्ती । मुक्तानन्दा, एक नाम एकाग्रवृत्ती । प्रातिव्रत्यधर्म सर्वांचा ॥२३॥
सुक्तानंदा, गप्पासप्पा नाहक । निद्रा भोजन ना ठराविक । वीर्यत्याग अनावश्यक । त्यहुनी मलत्याग बरा ॥२४॥
रात्रीचें अकारण जाग्रण । दिवसा निद्रा, अनियतित भोजन । मुक्तानन्दा, नरकयतनेचें आमंत्रण । दे ही तपास्या ॥२५॥
साधतांही आपला व्यवहार । सतत निन्तन अन्तरात्म्याचें कर । ज्ञान, भक्ति, प्रेम, योग हाच होणार । मुक्तानन्दा जाण ॥२६॥
अनावश्य दिखावट । मुक्तानंदा, सिद्धीची सजावट । प्रलोभनांचा थाटमाट । जनतेपुढें करूं नको ॥२७॥
मानवाचें मन मोहिती । अनेक व्यवहार कलाकृती । नयनमोहक नाटय किती । जसें नटीचें ॥२८॥
गायकाचें जसें गायन । वादनपटुचें वादन । मुक्तानंदा, तसाच जाण । चमत्कार त्याचा ॥२९॥
जीवन-निर्वाह-साधन । तशीच गुणसंपन्न । असतां अर्थवान । जी सिद्धी ॥१३०॥
मग तेथें गुणहीन । सर्वस्त्री जी अर्थहीन । कशाला हवें प्रयोजन । दिखाऊ सिद्धीचें ॥३१॥
बहुजन हितासाठीं नाहीं । न बहुतजन प्रयोजनही । कामाच्या नाहीं कांहीं । दीन भुकेल्यांच्या ॥३२॥
मुक्तानंदा, सिद्धि अशी । जरी कधीं देखिशी । गंधर्व नगरी जशी । तशीच ही नसे का ॥३३॥
सशाचें श्रृंग, रज्जु-सर्प । आकाश-कुसुम, वन्ध्यापुत्र । भासमान होतांही सर्वत्र । निष्प्रयोजन जैसें ॥३४॥
असेच मुक्तानन्दा असती । परमात्कार ईशरचित जगतीं । कृत्रिम ऋद्धिसिद्धींप्रती । न प्रयोजन ॥३५॥
सिद्धी दिखावटी । नोट बनावटी । लग्नाच्या वाटाघाटी । वन्ध्यापुत्राच्या ॥३६॥
चित्रामधली नारी । इत्यादीपासनी परी मुक्तानंदा कोणी तरी । सुखी होइ का? ॥३७॥
किसानाची सिद्धी बरवी । जी अन्ना उपजवी । तेणें जीवन सुखवी । आपणा सर्वांचें ॥३८॥
चमत्कार असा जो तो । परमात्म्याला दूर ठेवतो । अरे साधुवरा तूं कसा रमतो । भ्रमांत त्याच्या ॥३९॥
सर्व मिथ्या, ब्रह्मापुढें ।’ यद्‍दृष्टं तन्नष्टं’ दशा जडे । पागलाची मग भ्रांति पडे । भ्रमनिष्ठ कां बनसी ॥१४०॥
अरे बाबा, तूं पुरा । सचोटीचा बन खरा । दाखविसी अन्तरींच्य चमत्कारा । अपणच आपुल्या ॥४१॥
तेव्हां सिद्धी सार्‍या प्रगटीती । स्वागत करण्या जमती । थकणें न लगे तुजप्रती । चमक्तार कर करूनी ॥४२॥
जादुगाराचे मोहक चमत्कार । पाशवी कृतीचेच प्रकार । मुक्तानन्दा, राही अगदीं दूर । त्यापासोनि ॥४३॥
व्यवहार प्रामाणिक पूर्ण । कर्म सत‍कर्म संपूर्ण । साधुचें स्वच्छ अंतःकरण । जेथ असे ॥४४॥
सर्व सिद्धि तेथ जमती । पाणी भरण्य़ा जाती । उणें पडूं न देती । हरीच्या दासा ॥४५॥
अंतारशान्ति, बाह्म विश्रांती । जेथ राही व्यवहार निश्चिन्ती । मुक्तानन्दा, पर्ण महासिद्धि वसती । तेथें जाण ॥४६॥
ब्रह्मज्ञी कुशलता, योगांत सफलता । व्यवहार-उपदेशामध्यें । सुलभता मुक्तानन्दा, सार्‍या सिद्धी तत्त्वता । पारमेश्वरी ॥४७॥
इंद्रियांपासूनि दूर । आत्मारामीं चूर । ठेवी मित आहार । ऐसा आहे ॥४८॥
जो गुरुभक्तिरता । ऋद्धि सिद्धि जोडुनि हात । मुक्तानन्दा, उम्या ठाकत । त्या ठिकाणीं ॥४९॥
द्दश्य जें दूरी । चित्ताच्या तटस्थेपासुनी । चमत्कार जो राही । वंचित आत्मरसाच्या ॥१५०॥
जीवनोपयोगी । कृती जी नाहीं । मुक्तानंदा, पोरखेळही । तो नसे का ॥५१॥
राजाच्या पुतळ्याचें वैभव । चित्रांतील स्त्रीशीं विवाह । सिद्धींची दिखावट । सर्वही समान ॥५२॥
मुक्तानंदा, व्यवहारिक क्षेत्रीं । विना पारमेश्वरी शक्ती । सारे कांहीं व्यर्थ होती । अन्य जे ते ॥५३॥
पथ्वीमध्यें निपजते । खाण्या अन्ना मिळतें । पिण्यास अन् लाभतें । नदीचें पाणी ॥५४॥
कुशाग्र बुद्धी व्यवहाराकडे । प्रज्ञावान अशा नरापुढें । चित्रपट- रश्मी एवढें । दिखाऊ सिद्धी- प्रयोजन ॥५५॥
नशाबाजी जादूबाजी । रेसबाजी सट्टाबाजी । मुक्तानंदा जशा सार्‍या बाजी । सिद्धीही बाजी असे ॥५६॥
दाणा एकला । गव्हाचा पेरला । उपजवी अनेकाला । ही पृथ्वी ॥५७॥
एकापासुनी अनेक फळती । अनेक नारळ एका लागती । फळें रसाळ गोमटीं । एका बीजापोटीं ॥५७अ॥
प्रत्यक्ष व्यवहार सिद्धीपुढें । दिखाऊ चमत्कारांचे पडे । मुक्तानंदा, अस्तित्व तोकडें । किती पाही ॥५८॥
आकाशीं कावळ्याचें उड्डाण । मासोळीचें जलतरतें जीवन । अनेक दाणे एक मोहरीपासुन । सह्ज सिद्धी तिचीच ना? ॥५९॥
एका वीर्यबिंदूपासुन । मानव करी निर्माण । आपल्या समान । दुसरा मानव ॥१६०॥
फलदि तृणजन्य । एका पृथ्वीपासून । गोड मधुर रसपूर्ण । खेचुनि घेती ॥६१॥
तृणादि घास खात । गोमाता दे दुग्ध श्वेत । त्याहुनि अर्थहीन अभृत । सिद्धी-प्रयोजन कसलें ॥६२॥
परमात्मा ऋद्धि-सिद्धी पूर्ण प्रदाता । अष्टसिद्धी नौ ऋद्धींची तत्परता । मुक्तानन्दा, त्याच्या सेवेंत असतां । साथ दे कोणती सिद्धी ॥६३॥
 ‘अंतरात्मा-दर्शन । मानवजातीला म्हणुन । घेण्याप्राप्त करून । योग्य सिद्धी ॥६४॥
जेथ व्यवहार न । नसे जगताचेंही भाना । नाहीं कांहीं ज्ञान । आपुलें आपणा ॥६५॥
एकतानता पुर्ण जिथें । मुक्तानन्दा, सिद्धीचें तिथें । मोल किती तें । कवडीभर ॥६६॥
जो तुर्यातीत एकाकार । आनंदरस-निर्झ्र-धार । वाही जिथें निर्भर । ज्याच्या ठायीं ॥६७॥
पूर्णमधीं अपूर्णाचा । लय होइ सर्वांचा । मुक्तानन्दा, क्षुद्रासिद्धी अपेक्षांचा । काय पाड तेथ ॥६८॥
पूर्ण  आत्मतृप्ती । असे नित्य वसती । एकात्मज्ञानाची ती । ज्याच्या ह्रदयीं ॥६९॥
आत्म्याविना कांहीं । अन्य कोठें रती नाहीं । मुक्तानंदा, मरुजलसम राही । तेथ सिद्धी अशी ना? ॥१७०॥
परमेश्वर परम सिद्धी । पावतां मानव मौनी । न बने ऐसी कांहीं । अन्यगती असे का ॥७१॥
पूर्ण सिद्धाचें लक्षण । आतां घे परीसून । न होऊं देते भान । द्दष्टीला कांहीं ॥७२॥
एकात्म्याचें ज्ञान । होई ज्यांना संपूर्ण । मुक्तानन्दा, सिद्ध महान । ते असती ॥७३॥
होई वासनायुक्त । न राही कांहीं अन्य । प्राप्तीची इच्छा ह्याहुन । परमात्मा सिद्धीनें ॥७४॥
आपुल्यामधीं आपण । पावे कृतार्थ धन्य । मुक्तानन्दा, हेंही मान्य । सिद्धाचें लक्षण ॥७५॥
आपुल्यामध्यें जगताला । देखे जगतीं आपणाअला । चराचरामध्यें एकाला । मुक्तानंदा, तोही सिद्ध ॥७६॥
नष्ट करी विश्वाची माती ही । सिद्ध लोप पावे स्वतःही । मुक्तानंदा, तोचि जगा पाही । मरूनि अमर होइ ॥७७॥
निजठाथीं परमात्म्याला । परत्माम्यांत आपणाला । देखे निजात्मा सामावलेला । मुक्तानंदा, महासिद्ध अन्य कोण ॥७८॥
ब्रह्मच अद्वैत पूर्ण । सत्य सिद्धवाद संपूर्ण । मुक्तानंदा, भ्रम नसे तेथ ॥१८०॥
पूर्ण असे चित्त । मानस राही शान्त । हो परिपूर्त । अतीन्द्रिय तृप्तीनें ॥८१॥
अन्तर इंद्रियें होती । पावुनि अशी गती । मुक्तानन्दा, ही सारी स्थिती । सिद्ध-लक्षण ॥८२॥
राही अन्तरीं पूर्ण । बाहेरूनि दिसे शून्य । प्रेतवत् क्रियाहीन । दशा जरी ॥८३॥
परी असे चैतन्यपूर्ण । समतायुक्त ज्यांचें जीवन । मुक्तानंदा, देव प्राप्त सिद्धजन । हें खरोखर ॥८४॥
प्राप्त् होण्या निःशेष । साधना नावकाश । स्वस्वरूपीं ज्याचा निवास । मुक्तानंदा, चमत्कार लाभ कशास ॥८५॥
आंत बाहेरी एक । सर्वत्र पूर्ण एक । चित्तज्ञान, प्राप्तीही एक । मुक्तानंदा, ह्याहुनी सिद्ध कोण? ॥८६॥
योगाचार नियमभंगी । प्रवृत्त होई योगी । परखुषी साधण्यालागी । अनादरास प्राप्त होई ॥८७॥
जो योगसम्राट । पूर्ण योग- तत्त्वज्ञाननिष्ठ । परी करण्या संतुष्ट । लोलुप अनाधिकारीस ॥८८॥
योगतंत्र भ्रष्ट करी । इंद्रियारामाची गुलामी पत्करी । स्वतःतें म्हणवी जरी । महर्षीयांचा आदिऋषी ॥८९॥
परंतु असे खरा । भ्रमित पुरा । भ्रमाधीन होणारा । अर्धवट वेदान्ती ॥१९०॥
योगाचा पूर्ण ज्ञाता । अग्रेसर प्रोफेसरांत असतां । परी पूजा सोडीतां । योगांगाची ॥९१॥
सोडी ध्यान धारणा समाधी । नटनटींचा बने पूजक आधीं । पूर्ण पतनास न लगे अवधी । अशा योग्याचा ॥९२॥
शुद्ध योग विद्यापूजन सोडी । डान्सर, नटनटींशी चित्त जोडी । योगीपदासा लायक थोडी । असे कीं ॥९३॥
मंत्रांत श्रद्धा नाहीं न गुरूत विश्वासही । प्रेम नसे कांहीं । देवतांवरी ॥९४॥
योगी असला । सर्कशीमधला । कसरतीवाला । म्हणावा ॥९५॥
सत्यबुद्धी नाहीं वेदांत । अतर्क्यबुद्धी न यज्ञयागांत । आदराचा अभाव भगवन्नामांत । असा योगी योग्य का ॥९६॥
कर्मयोग, भक्तियोग । ज्ञानयोग. मंत्रयोग । लयगोग, हठयोग । राजयोग, यजनयोग ॥९७॥
जो संकुचित द्दष्टीसे । क्षुद्र ह्यांना देखतसे । तो आपल्याच बघतसे । लायकीला ॥९८॥
अप्राकृट प्रज्ञा लोकाची । ऋषींना प्राप्ती त्याची । म्हणुनी त्यांच्या कथनाची । प्रचीती सत्य ॥९९॥
हेतुरहित त्यांचे उपकार । त्यामधीं फक्त पामर । बुद्धीमान कसा साधणार । सन्देह कीं हो ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP