ज्ञानेश्वरी अध्याय १७

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत.


॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १७ ॥

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अध्याय सतरावा ।

श्रद्धात्रयविभागयोगः ।

विश्वविकासित मुद्रा । जया सोडी तुझी योगमुद्रा । तया नमोजी गणेंद्रा । श्रीगुरुराया ॥१॥

त्रिगुणत्रिपुरीं वेढिला । जीवत्वदुर्गीं आडिला । तो आत्मशंभूनें सोडविला । तुझिया स्मृती ॥२॥

म्हणौनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा । तऱ्ही हळु मायाजळा । माजीं तारूनि ॥३॥

जे तुझ्याविखीं मूढ । तयांलागीं तूं वक्रतुंड । ज्ञानियांसी तरी अखंड । उजूचि आहासी ॥४॥

दैविकी दिठी पाहतां सानी । तऱ्ही मीलनोन्मीलनीं । उत्पत्ति प्रळयो दोन्ही । लीलाचि करिसी ॥५॥

प्रवृत्तिकर्णाच्या चाळीं । उठली मदगंधानिळीं । पूजीजसी नीलोत्पलीं । जीवभृंगांच्या ॥६॥

पाठीं निवृत्तिकर्णताळें । आहाळली ते पूजा विधुळे । तेव्हां मिरविसी मोकळें । आंगाचें लेणें ॥७॥

वामांगीचा लास्यविलासु । जो हा जगद्रूप आभासु । तो तांडवमिसें कळासु । दाविसी तूं ॥८॥

हें असो विस्मो दातारा । तूं होसी जयाचा सोयरा । सोइरिकेचिया व्यवहारा । मुकेचि तो ॥९॥

फेडितां बंधनाचा ठावो । तूं जगद्बंधु ऐसा भावो । धरूं वोळगे उवावो । तुझाचि आंगीं ॥१०॥

तंव दुजयाचेनि नांवें तया । देहही नुरेचि पैं देवराया । जेणें तूं आपणपयां । केलासि दुजा ॥११॥

तूंतें करूनि पुढें । जे उपायें घेती दवडे । तयां ठासी बहुवें पाडें । मागांचि तूं ॥१२॥

जो ध्यानें सूये मानसीं । तयालागीं नाहीं तूं त्याचे देशीं । ध्यानही विसरे तेणेंसीं । वालभ तुज ॥१३॥

तूतें सिद्धचि जो नेणे । तो नांदे सर्वज्ञपणें । वेदांही येवढें बोलणें । नेघसी कानीं ॥१४॥

मौन गा तुझें राशिनांव । आतां स्तोत्रीं कें बांधों हाव । दिसती तेतुली माव । भजों काई ॥१५॥

दैविकें सेवकु हों पाहों । तरी भेदितां द्रोहोचि लाहों । म्हणौनि आतां कांहीं नोहों । तुजलागीं जी ॥१६॥

जैं सर्वथा सर्वही नोहिजे । तैं अद्वया तूतें लाहिजे । हें जाणें मी वर्म तुझें । आराध्य लिंगा ॥१७॥

तरी नुरोनि वेगळेंपण । रसीं भजिन्नलें लवण । तैसें नमन माझें जाण । बहु काय बोलों ॥१८॥

आतां रिता कुंभ समुद्रीं रिगे । तो उचंबळत भरोनि निगे । कां दशीं दीपसंगें । दीपुचि होय ॥१९॥

तैसा तुझिया प्रणितीं । मी पूर्णु जाहलों श्रीनिवृत्ती । आतां आणीन व्यक्तीं । गीतार्थु तो ॥२०॥

तरी षोडशाध्यायशेखीं । तिये समाप्तीच्या श्लोकीं । जो ऐसा निर्णयो निष्टंकीं । ठेविला देवें ॥२१॥

जे कृत्याकृत्यव्यवस्था । अनुष्ठावया पार्था । शास्त्रचि एक सर्वथा । प्रमाण तुज ॥२२॥

तेथ अर्जुन मानसें । म्हणे हें ऐसें कैसें । जे शास्त्रेंवीण नसे । सुटिका कर्मा ॥२३॥

तरी तक्षकाची फडे । ठाकोनि कैं तो मणि काढे । कैं नाकींचा केशु जोडे । सिंहाचिये ? ॥२४॥

मग तेणें तो वोंविजे । तरीच लेणें पाविजे । एऱ्हवीं काय असिजे । रिक्तकंठीं ? ॥२५॥

तैसी शास्त्रांची मोकळी । यां कैं कोण पां वेंटाळी । एकवाक्यतेच्या फळीं । पैसिजे कैं ? ॥२६॥

जालयाही एकवाक्यता । कां लाभें वेळु अनुष्ठितां । कैंचा पैसारु जीविता । येतुलालिया ॥२७॥

आणि शास्त्रें अर्थें देशें काळें । या चहूंही जें एकफळे । तो उपावो कें मिळे । आघवयांसी ? ॥२८॥

म्हणौनि शास्त्राचें घडतें । नोहें प्रकारें बहुतें । तरी मुर्खा मुमुक्षां येथें । काय गति पां ? ॥२९॥

हा पुसावया अभिप्रावो । जो अर्जुन करी प्रस्तावो । तो सतराविया ठावो । अध्याया येथ ॥३०॥

तरी सर्वविषयीं वितृष्णु । जो सकळकळीं प्रवीणु । कृष्णाही नवल कृष्णु । अर्जुनत्वें जो ॥३१॥

शौर्या जोडला आधारु । जो सोमवंशाचा शृंगारु । सुखादि उपकारु । जयाची लीला ॥३२॥

जो प्रज्ञेचा प्रियोत्तमु । ब्रह्मविद्येचा विश्रामु । सहचरु मनोधर्मु । देवाचा जो ॥३३॥

अर्जुन उवाच ।

ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः ।

तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्त्वमाहो रजस्तमः ॥१॥

तो अर्जुन म्हणे गा तमालश्यामा । इंद्रियां फांवलिया ब्रह्मा । तुझां बोलु आम्हा । साकांक्षु पैं जी ॥३४॥

जें शास्त्रेंवांचूनि आणिकें । प्राणिया स्वमोक्षु न देखे । ऐसें कां कैंपखें । बोलिलासी ॥३५॥

तरी न मिळेचि तो देशु । नव्हेचि काळा अवकाशु । जो करवी शास्त्राभ्यासु । तोही दुरी ॥३६॥

आणि अभ्यासीं विरजिया । होती जिया सामुग्रिया । त्याही नाहीं आपैतिया । तिये वेळीं ॥३७॥

उजू नोहेचि प्राचीन । नेदीचि प्रज्ञा संवाहन । ऐसें ठेलें आपादन । शास्त्राचें जया ॥३८॥

किंबहुना शास्त्रविखीं । एकही न लाहातीचि नखी । म्हणौनि उखिविखी । सांडिली जिहीं ॥३९॥

परी निर्धारूनि शास्त्रें । अर्थानुष्ठानें पवित्रें । नांदताति परत्रें । साचारें जे ॥४०॥

तयांऐसें आम्हीं होआवें । ऐसी चाड बांधोनि जीवें । घेती तयांचें मागावे । आचरावया ॥४१॥

धड्याचिया आखरां । तळीं बाळ लिहे दातारा । कां पुढांसूनि पडिकरा । अक्षमु चाले ॥४२॥

तैसें सर्वशास्त्रनिपुण । तयाचें जें आचरण । तेंचि करिती प्रमाण । आपलिये श्रद्धे ॥४३॥

मग शिवादिकें पूजनें । भूम्यादिकें महादानें । आग्निहोत्रादि यजनें । करिती जे श्रद्धा ॥४४॥

तयां सत्त्वरजतमां / । माजीं कोण पुरुषोत्तमा । गति होय ते आम्हां । सांगिजो जी ॥४५॥

तंव वैकुंठपीठींचें लिंग । जो निगमपद्माचा पराग । जिये जयाचेनि हें जग । अंगच्छाया ॥४६॥

काळ सावियाचि वाढु । लोकोत्तर प्रौढु । आद्वितीय गूढु । आनंदघनु ॥४७॥

इयें श्लाघिजती जेणें बिकें । तें जयाचें आंगीं असिकें । तो श्रीकृष्ण स्वमुखें । बोलत असे ॥४८॥

श्री भगवानुवाच ।

त्रिविध भवति श्रद्धा देहिनां सा स्वभावजा ।

सात्त्विकी राजसी चैव तामसी चेति तां शृणु ॥२॥

म्हणे पार्था तुझा अतिसो । हेंही आम्ही जाणतसों । जे शास्त्राभ्यासाचा आडसो । मानितोसि कीं ॥४९॥

नुसधियाची श्रद्धा । झोंबों पाहसी परमपदा । तरी तैसें हें प्रबुद्धा । सोहोपें नोहे ॥५०॥

श्रद्धा म्हणितलियासाठीं । पातेजों नये किरीटी । काय द्विजु अंत्यजघृष्टीं । अंत्यजु नोहे ? ॥५१॥

गंगोदक जरी जालें । तरी मद्यभांडां आलें । तें घेऊं नये कांहीं केलें । विचारीं पां ॥५२॥

चंदनु होय शीतळु । परी अग्नीसी पावे मेळु । तैं हातीं धरितां जाळूं । न शके काई ? ॥५३॥

कां किडाचिये आटतिये पुटीं । पडिलें सोळें किरीटी । घेतलें चोखासाठीं । नागवीना ? ॥५४॥

तैसें श्रद्धेचें दळवाडें । अंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागीं जैं ॥५५॥

ते प्राणिये तंव स्वभावें । आनादिमायाप्रभावें । त्रिगुणाचेचि आघवे । वळिले आहाती ॥५६॥

तेथही दोन गुण खांचती । मग एक धरी उन्नती । तैं तैसियाचि होती वृत्ती । जीवांचिया ॥५७॥

वृत्तीऐसें मन धरिती । मनाऐसी क्रिया करिती । केलिया ऐसी वरीती । मरोनि देहें ॥५८॥

बीज मोडे झाड होये । झाड मोडे बीजीं सामाये । ऐसेनि कल्पकोडी जाये । परी जाति न नशे ॥५९॥

तियापरीं यियें अपारें । होत जात जन्मांतरें । परी त्रिगुणत्व न व्यभिचरें । प्राणियांचें ॥६०॥

म्हणूनि प्राणियांच्या पैकीं । पडिली श्रद्धा अवलोकीं । ते होय गुणासारिखी । तिहीं ययां ॥६१॥

विपायें वाढे सत्त्व शुद्ध । तेव्हां ज्ञानासी करी साद । परी एका दोघे वोखद । येर आहाती ॥६२॥

सत्त्वाचेनि आंगलगें । ते श्रद्धा मोक्षफळा रिगे । तंव रज तम उगे । कां पां राहाती ? ॥६३॥

मोडोनि सत्त्वाची त्राये । रजोगुण आकाशें जाये । तेव्हां तेचि श्रद्धा होये । कर्मकेरसुणी ॥६४॥

मग तमाची उठी आगी । तेव्हां तेचि श्रद्धा भंगी । हों लागे भोगालागीं । भलतेया ॥६५॥

सत्त्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत ।

श्रद्धामयोऽयं पुरुषो यो यछ्रद्धः स एव सः ॥३॥

एवं सत्त्वरजतमा / । वेगळी श्रद्धा सुवर्मा । नाहीं गा जीवग्रामा / । माजीं यया ॥६६॥

म्हणौनि श्रद्धा स्वाभाविक । असे पैं त्रिगुणात्मक । रजतमसात्त्विक । भेदीं इहीं ॥६७॥

जैसें जीवनचि उदक । परी विषीं होय मारक । कां मिरयामाजीं तीख । उंसीं गोड ॥६८॥

तैसा बहुवसें तमें । जो सदाचि होय निमे । तेथ श्रद्धा परीणमे । तेंचि होऊनि ॥६९॥

मग काजळा आणि मसी । न दिसे विवंचना जैसी । तेवीं श्रद्धा तामसी । सिनी नाहीं ॥७०॥

तैसीच राजसीं जीवीं । रजोमय जाणावी । सात्त्विकीं आघवीं । सत्त्वाचीच ॥७१॥

ऐसेनि हा सकळु । जगडंबरु निखिळु । श्रद्धेचाचि केवळु । वोतला असे ॥७२॥

परी गुणत्रयवशें । त्रिविधपणाचें लासें । श्रद्धे जें उठिलें असे । तें वोळख तूं ॥७३॥

तरी जाणिजे झाड फुलें । कां मानस जाणिजे बोलें । भोगें जाणिजे केलें । पूर्वजन्मींचें ॥७४॥

तैसीं जिहीं चिन्हीं । श्रद्धेचीं रूपें तीन्हीं । देखिजती ते वानी । अवधारीं पां ॥७५॥

यजन्ते सात्त्विका देवान यक्षरक्षांसि राजसाः ।

प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जनाः ॥४॥

तरी सात्त्विक श्रद्धा । जयांचा होय बांधा । तयां बहुतकरूनि मेधा । स्वर्गीं आथी ॥७६॥

ते विद्याजात पढती । यज्ञक्रिये निवडती । किंबहुना पडती । देवलोकीं ॥७७॥

आणि श्रद्धा राजसा । घडले जे वीरेशा । ते भजती राक्षसां । खेचरां हन ॥७८॥

श्रद्धां जे कां तामसी । ते मी सांगेन तुजपाशीं । जे कां केवळ पापराशी । आतिकर्कशी निर्दयत्वें ॥७९॥

जीववधें साधूनि बळी । भूतप्रेतकुळें मैळीं । स्मशानीं संध्याकाळीं । पूजिती जे ॥८०॥

ते तमोगुणाचें सार । काढूनि निर्मिले नर । जाण तामसियेचें घर । श्रद्धेचें तें ॥८१॥

ऐसी इहीं तिहीं लिंगीं । त्रिविध श्रद्धा जगीं । पैं हें ययालागीं । सांगतु असें ॥८२॥

जे हे सात्त्विक श्रद्धा । जतन करावी प्रबुद्धा । येरी दोनी विरुद्धा । सांडाविया ॥८३॥

हे सात्त्विकमति जया । निर्वाहती होय धनंजया । बागुल नोहे तया । कैवल्य तें ॥८४॥

तो न पढो कां ब्रह्मसूत्र । नालोढो सर्व शास्त्र । सिद्धांत न होत स्वतंत्र । तयाच्या हातीं ॥८५॥

परी श्रुतिस्मृतींचे अर्थ । जे आपण होऊनि मूर्त । अनुष्ठानें जगा देत । वडील जे हे ॥८६॥

तयांचीं आचरती पाउलें । पाऊनि सात्त्विकी श्रद्धा चाले । तो तेंचि फळ ठेविलें । ऐसें लाहे ॥८७॥

पैं एक दीपु लावी सायासें । आणिक तेथें लॐ बैसें । तरी तो काय प्रकाशें । वंचिजे गा ? ॥८८॥

कां येकें मोल अपार । वेंचोनि केलें धवळार । तो सुरवाडु वस्तीकर । न भोगी काई ? ॥८९॥

हें असो जो तळें करी । तें तयाचीच तृषा हरी । कीं सुआरासीचि अन्न घरीं । येरां नोहे ? ॥९०॥

बहुत काय बोलों पैं गा । येका गौतमासीचि गंगा । येरां समस्तां काय जगां । वोहोळ जाली ? ॥९१॥

म्हणौनि आपुलियापरी । शास्त्र अनुष्ठीती कुसरी । जाणे तयांते श्रद्धाळु जो वरी । तो मूर्खुही तरे ॥९२॥

अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः ।

दंभाहङ्कारसंयुक्ताः कामरागबलान्विताः ॥५॥

ना शास्त्राचेनि कीर नांवें । खाकरोंही नेणती जीवें । परी शास्त्रज्ञांही शिवें । टेंकों नेदिती ॥९३॥

वडिलांचिया क्रिया । देखोनि वाती वांकुलिया । पंडितां डाकुलिया । वाजविती ॥९४॥

आपलेनीचि आटोपें । धनित्वाचेनि दर्पें । साचचि पाखंडाचीं तपें । आदरिती ॥९५॥

आपुलिया पुढिलांचिया । आंगीं घालूनि कातिया । रक्तमांसा प्रणीतया । भर भरु ॥९६॥

रिचविती जळतकुंडीं । लाविती चेड्याच्या तोंडीं । नवसियां देती उंडी । बाळकांची ॥९७॥

आग्रहाचिया उजरिया । क्षुद्र देवतां वरीया । अन्नत्यागें सातरीया । ठाकती एक ॥९८॥

अगा आत्मपरपीडा । बीज तमक्षेत्रीं सुहाडा । पेरिती मग पुढां । तेंचि पिके ॥९९॥

बाहु नाहीं आपुलिया । आणि नावेतेंही धनंजया । न धरी होय तया । समुद्रीं जैसें ॥१००॥

कां वैद्यातें करी सळा । रसु सांडी पाय खोळां । तो रोगिया जेवीं जिव्हाळा । सवता होय ॥१०१॥

नाना पडिकराचेनि सळें । काढी आपुलेचि डोळे । तें वानवसां आंधळें । जैसें ठाके ॥१०२॥

तैसें तयां आसुरां होये । निंदूनि शास्त्रांची सोये । सैंघ धांवताती मोहें । आडवीं जे कां ॥१०३॥

कामु करवी तें करिती । क्रोधु मारवी ते मारिती । किंबहुना मातें पुरिती । दुःखाचा गुंडां ॥१०४॥

कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्राममचेतसः ।

मां चैवान्तः शरीरस्थं तान विद्ध्यासुरनिश्चयान ॥६॥

आपुलां परावां देहीं । दुःख देती जें जें कांहीं । मज आत्मया तेतुलाही । होय शीणु ॥१०५॥

पैं वाचेचेनिही पालवें । पापियां तयां नातळावें । परी पडिलें सांगावें । त्यजावया ॥१०६॥

प्रेत बाहिरें घालिजे । कां अंत्यजु संभाषणीं त्यजिजे । हें असो हातें क्षाळिजे । कश्मलातें ? ॥१०७॥

तेथ शुद्धीचिया आशा । तो लेपु न मनवे जैसा । तयांतें सांडावया तैसा । अनुवादु हा ॥१०८॥

परी अर्जुना तूं तयांतें । देखसी तैं स्मर हो मातें । जे आन प्रायश्चित्त येथें । मानेल ना ॥१०९॥

म्हणौनि जे श्रद्धा सात्त्विकी । पुढती तेचि पैं येकी । जतन करावी निकी । सर्वांपरी ॥११०॥

तरी धरावा तैसा संगु । जेणें पोखे सात्त्विक लागु । सत्त्ववृद्धीचा भागु । आहारु घेपें ॥१११॥

एऱ्हवीं तरी पाहीं । स्वभाववृद्धीच्या ठाईं । आहारावांचूनि नाहीं । बळी हेतु ॥११२॥

प्रत्यक्ष पाहें पां वीरा । जो सावध घे मदिरा । तो होऊनि ठाके माजिरा । तियेचि क्षणीं ॥११३॥

कां जो साविया अन्नरसु सेवी । तो व्यापिजे वातश्लेष्मस्वभावीं । काय ज्वरु जालिया निववी । पयादिक ? ॥११४॥

नातरी अमृत जयापरी । घेतलिया मरण वारी । कां आपुलियाऐसें करी । जैसें विष ॥११५॥

तेवीं जैसा घेपे आहारु । धातु तैसाचि होय आकारु । आणि धातु ऐसा अंतरु । भावो पोखे ॥११६॥

जैसें भांडियाचेनि तापें । आंतुलें उदकही तापे । तैसी धातुवशें आटोपे । चित्तवृत्ती ॥११७॥

म्हणौनि सात्त्विकु रसु सेविजे । तैं सत्त्वाची वाढी पाविजे । राजसा तामसा होईजे । येरी रसीं ॥११८॥

तरी सात्त्विक कोण आहारु । राजसा तामसा कायी आकारु । हें सांगों करीं आदरु । आकर्णनीं ॥११९॥

आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः ।

यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिम शृणु ॥७॥

आणि एकसरें आहारा । कैसेनि तिनी मोहरा । जालिया तेही वीरा । रोकडें दॐ ॥१२०॥

तरी जेवणाराचिया रुची । निष्पत्ति कीं बोनियांची । आणि जेवितां तंव गुणांची । दासी येथ ॥१२१॥

जे जीव कर्ता भोक्ता । तो गुणास्तव स्वभावता । पावोनियां त्रिविधता । चेष्टे त्रिधा ॥१२२॥

म्हणौनि त्रिविधु आहारु । यज्ञुही त्रिप्रकारु । तप दान हन व्यापारु । त्रिविधचि ते ॥१२३॥

पैं आहार लक्षण पहिले ? । सांगों जें म्हणितलें । तें आईक गा भलें । रूप करूं ॥१२४॥

आयुः सत्त्वबलारोग्यसुखप्रीतिवर्धनाः ।

रस्याः स्निग्धाः स्थिरा हृद्या आहाराः सात्त्विकप्रियाः ॥८॥

तरी सत्त्वगुणाकडे । जें दैवें भोक्ता पडे । तैं मधुरीं रसीं वाढे । मेचु तया ॥१२५॥

आंगेंचि द्रव्यें सुरसें । जे आंगेंचि पदार्थ गोडसे । आंगेंचि स्नेहें बहुवसें । सुपक्वें जियें ॥१२६॥

आकारें नव्हती डगळें । स्पर्शें अति मवाळें । जिभेलागीं स्नेहाळें । स्वादें जियें ॥१२७॥

रसें गाढीं वरी ढिलीं । द्रवभावीं आथिलीं । ठायें ठावो सांडिलीं । अग्नितापें ॥१२८॥

आंगें सानें परीणामें थोरु । जैसें गुरुमुखींचें अक्षरु । तैशी अल्पीं जिहीं अपारु । तृप्ति राहे ॥१२९॥

आणि मुखीं जैसीं गोडें । तैसीचिहि ते आंतुलेकडे । तिये अन्नीं प्रीति वाढे । सात्त्विकांसी ॥१३०॥

एवं गुणलक्षण । सात्त्विक भोज्य जाण । आयुष्याचें त्राण । नीच नवें हें ॥१३१॥

येणें सात्त्विक रसें । जंव देहीं मेहो वरीषे । तंव आयुष्यनदी उससे । दिहाचि दिहा ॥१३२॥

सत्त्वाचिये कीर पाळती । कारण हाचि सुमती । दिवसाचिये उन्नती । भानु जैसा ॥१३३॥

आणि शरीरा हन मानसा । बळाचा पैं कुवासा । हा आहारु तरी दशा । कैंची रोगां ॥१३४॥

हा सात्त्विकु होय भोग्यु । तैं भोगावया आरोग्यु । शरीरासी भाग्यु । उदयलें जाणो ॥१३५॥

आणि सुखाचें घेणें देणें । निकें उवाया ये येणें । हें असो वाढे साजणें । आनंदेंसीं ॥१३६॥

ऐसा सात्त्विकु आहारु । परीणमला थोरु । करी हा उपकारु । सबाह्यासी ॥१३७॥

आतां राजसासि प्रीती । जिहीं रसीं आथी । करूं तयाही व्यक्ती । प्रसंगें गा ॥१३८॥

कट्वम्ललवणात्युष्णतीक्ष्णरूक्षविदाहिनः ।

आहारा राजसस्येष्टा दुःखशोकामयप्रदाः ॥९॥

तरी मारें उणें काळकुट । तेणें मानें जें कडुवट । कां चुनियाहूनि दासट । आम्ल हन ॥१३९॥

कणिकीतें जैसें पाणी । तैसेंचि मीठ बांधया आणी । तेतुलीच मेळवणी । रसांतरांची ॥१४०॥

ऐसें खारट अपाडें । राजसा तया आवडे । ऊन्हाचेनि मिषें तोंडें । आगीचि गिळी ॥१४१॥

वाफेचिया सिगे । वातीही लाविल्या लागे । तैसें उन्ह मागे । राजसु तो ॥११४२॥

वावदळ पाडूनि ठाये । साबळु डाहारला आहे । तैसें तीख तो खाये । जें घायेविण रुपे ॥१४३॥

आणि राखेहूनि कोरडें । आंत बाहेरी येके पाडें । तो जिव्हादंशु आवडे । बहु तया ॥१४४॥

परस्परें दांतां । आदळु होय खातां । तो गा तोंडीं घेतां । तोषों लागे ॥१४५॥

आधींच द्रव्यें चुरमुरीं । वरी परवडिजती मोहरी । जियें घेतां होती धुवारी । नाकेंतोंडें ॥१४६॥

हें असो उगें आगीतें । म्हणे तैसें राइतें । पढियें प्राणापरौतें । राजसासि गा ॥१४७॥

ऐसा न पुरोनि तोंडा । जिभा केला वेडा । अन्नमिषें अग्नि भडभडां । पोटीं भरी ॥१४८॥

तैसाचि लवंगा सुंठे । मग भुईं गा सेजे खाटे । पाणियाचें न सुटे । तोंडोनि पात्र ॥१४९॥

ते आहार नव्हती घेतले । व्याधिव्याळ जे सुतले । ते चेववावया घातलें । माजवण पोटीं ॥१५०॥

तैसें एकमेकां सळें । रोग उठती एके वेळे । ऐसा राजसु आहारु फळे । केवळ दुःखें ॥१५१॥

एवं राजसा आहारा । रूप केलें धनुर्धरा । परीणामाचाहि विसुरा । सांगितला ॥१५२॥

आतां तया तामसा । आवडे आहारु जैसा । तेंही सांगों चिळसा । झणें तुम्ही ॥१५३॥

तरी कुहिलें उष्टें खातां । न मनिजे तेणें अनहिता । जैसें कां उपहिता । म्हैसी खाय ॥१५४॥

यातयामं गतरसं पूति पर्युषितं च यत् ।

उच्छिष्टमपि चामेध्यम् भोजनं तामसप्रियम् ॥१०॥

निपजलें अन्न तैसें । दुपाहरीं कां येरें दिवसें । अतिकरें तैं तामसें । घेईजे तें ॥१५५॥

नातरी अर्ध उकडिलें । कां निपट करपोनि गेलें । तैसेंही खाय चुकलें । रसा जें येवों ॥१५६॥

जया कां आथि पूर्ण निष्पत्ती । जेथ रसु धरी व्यक्ती । तें अन्न ऐसी प्रतीती । तामसा नाहीं ॥१५७॥

ऐसेनि कहीं विपायें । सदन्ना वरपडा होये । तरी घाणी सुटे तंव राहे । व्याघ्रु जैसा ॥१५८॥

कां बहुवें दिवशीं वोलांडिलें । स्वादपणें सांडिलें । शुष्क अथवा सडलें । गाभिणेंही हो ॥१५९॥

तेंही बाळाचे हातवरी । चिवडिलें जैसी राडी करी । का सवें बैसोनि नारी । गोतांबील करी ॥१६०॥

ऐसेनि कश्मळें जैं खाय । तैं तया सुखभोजन ऐसें होय । परी येणेंही न धाय । पापिया तो ॥१६१॥

मग चमत्कारु देखा । निषेधाचा आंबुखा । जया का सदोखा । कुद्रव्यासी ॥१६२॥

तया अपेयांच्या पानीं । अखाद्यांच्या भोजनीं । वाढविजे उतान्ही । तामसें तेणें ॥१६३॥

एवं तामस जेवणारा । ऐसैसी मेचु हे वीरा । तयाचें फल दुसरां । क्षणीं नाहीं ॥१६४॥

जे जेव्हांचि हें अपवित्र । शिवे तयाचें वक्त्र । तेव्हांचि पापा पात्र । जाला तो कीं ॥१६५॥

यावरतें जें जेवीं । ते जेविती वोज न म्हणावी । पोटभरती जाणावी । यातना ते ॥१६६॥

शिरच्छेदें काय होये । का आगीं रिघतां कैसें आहे । हें जाणावें काई पाहें । परी साहातुचि असे ॥१६७॥

म्हणौनि तामसा अन्ना । परीणामु गा सिनाना । न सांगोंचि गा अर्जुना । देवो म्हणे ॥१६८॥

आतां ययावरी । आहाराचिया परी । यज्ञुही अवधारीं । त्रिधा असे ॥१६९॥

परी तिहींमाजीं प्रथम । सात्त्विक यज्ञाचें वर्म । आईक पां सुमहिम । शिरोमणी ॥१७०॥

अफलाकांक्षिभिर्यज्ञो विधिदृष्टो य इज्यते ॥

यष्टव्यमेवेति मनः समाधाय स सात्त्विकः ॥११॥

तरी एकु प्रियोत्तमु / । वांचोनि वाढों नेदी कामु । जैसा का मनोधर्मु । पतिव्रतेचा ॥१७१॥

नाना सिंधूतें ठाकोनि गंगा । पुढारां न करीचि रिगा । का आत्मा देखोनि उगा । वेदु ठेला ॥१७२॥

तैसें जे आपुल्या स्वहितीं । वेंचूनियां चित्तवृत्ती । नुरवितीचि अहंकृती । फळालागीं ॥१७३॥

पातलेया झाडाचें मूळ । मागुतें सरों नेणेंचि जळ । जिरालें गां केवळ । तयाच्याचि आंगीं ॥१७४॥

तैसें मनें देहीं । यजननिश्चयाच्या ठायीं । हारपोनि जें कांहीं । वांछितीना ॥१७५॥

तिहीं फळवांच्छात्यागीं । स्वधर्मावांचूनि विरागीं । कीजे तो यज्ञु सर्वांगीं । अळंकृतु ॥१७६॥

परी आरिसा आपणपें । डोळां जैसें घेपें । कां तळहातींचें दीपें । रत्न पाहिजे ॥१७७॥

नाना उदितें दिवाकरें । गमावा मार्गु दिठी भरे । तैसा वेदु निर्धारें । देखोनियां ॥१७८॥

तियें कुंडें मंडप वेदी । आणीकही संभारसमृद्धी । ते मेळवणी जैसी विधी । आपणपां केली ॥१७९॥

सकळावयव उचितें । लेणीं पातलीं जैसीं आंगातें । तैसे पदार्थ जेथिंचे तेथें । विनियोगुनी ॥१८०॥

काय वानूं बहुतीं बोलीं । जैसी सर्वाभरणीं भरली । ते यज्ञविद्याचि रूपा आली । यजनमिषें ॥१८१॥

तैसा सांगोपांगु । निफजे जो यागु । नुठऊनियां लागु । महत्त्वाचा ॥१८२॥

प्रतिपाळु तरी पाटाचा । झाडीं कीजे तुळसीचा । परी फळा फुला छायेचा । आश्रयो नाहीं ॥१८३॥

किंबहुना फळाशेवीण । ऐसेया निगुती निर्माण । होय तो यागु जाण । सात्त्विकु गा ॥१८४॥

अभिसन्धाय तु फलं दंभार्थमपि चैव यत् ।

इज्यते भरतश्रेष्ठ तं यज्ञं विद्धि राजसम् ॥१२॥

आतां यज्ञु कीर वीरेशा । करी पैं याचिऐसा । परी श्राद्धालागीं जैसा । अवंतिला रावो ॥१८५॥

जरी राजा घरासि ये । तरी बहुत उपेगा जाये । आणि कीर्तीही होये । श्राद्ध न ठके ॥१८६॥

तैसा धरूनि आवांका । म्हणे स्वर्गु जोडेल असिका । दीक्षितु होईन मान्यु लोकां । घडेल यागु ॥१८७॥

ऐसी केवळ फळालागीं । महत्त्व फोकारावया जगीं । पार्था निष्पत्ति जे यागीं । राजस पैं ते ॥१८८॥

विधिहीनमसृष्टान्नं मन्त्रहीनमदक्षिणम् ।

श्रद्दाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते ॥१३॥

आणि पशुपक्षिविवाहीं । जोशी कामापरौता नाहीं । तैसा तामसा यज्ञा पाहीं । आग्रहोचि मूळ ॥१८९॥

वारया वाट न वाहे । कीं मरण मुहूर्त पाहे । निषिद्धांसीं बिहे । आगी जरी ॥१९०॥

तरी तामसाचिया आचारा । विधीचा आथी वोढावारा । म्हणूनि तो धनुर्धरा । उत्सृंखळु ॥१९१॥

नाहीं विधीची तेथ चाड । नये मंत्रादिक तयाकड । अन्नजातां न सुये तोंड । मासिये जेवीं ॥१९२॥

वैराचा बोधु ब्राह्मणा । तेथ कें रिगेल दक्षिणा । अग्नि जाला वाउधाणा । वरपडा जैसा ॥१९३॥

तैसें वायांचि सर्वस्व वेंचे । मुख न देखती श्रद्धेचें । नागविलें निपुत्रिकाचें । जैसें घर ॥१९४॥

ऐसा जो यज्ञाभासु । तया नाम यागु तामसु । आइकें म्हणे निवासु । श्रियेचा तो ॥१९५॥

आता गंगेचें एक पाणी । परी नेलें आनानीं वाहणीं । एक मळीं एक आणी । शुद्धत्व जैसें ॥१९६॥

तैसें तिहीं गुणीं तप । येथ जाहलें आहे त्रिरूप । तें एक केलें दे पाप । उद्धरी एक ॥१९७॥

तरी तेंचि तिहीं भेदीं । कैसेनि पां म्हणौनि सुबुद्धी । जाणों पाहासी तरी आधीं । तपचि जाण ॥१९८॥

येथ तप म्हणजे काई । तें स्वरूप दॐ पाहीं । मग भेदिलें गुणीं तिहीं । तें पाठीं बोलों ॥१९९॥

तरी तप जें कां सम्यक । तेंही त्रिविध आइक । शारीर मानसिक । शाब्द गा ॥२००॥

आतां गा तिहीं माझारीं । शारीर तंव अवधारीं । तरी शंभु कां श्रीहरी । पढियंता होय ॥२०१॥

देवद्विजगुरुप्राज्ञपूजनं शौचमार्जवम् ॥

ब्रह्मचर्यमहिंसा च शारीरं तप उच्यते ॥१४॥

तया प्रिया देवतालया । यात्रादिकें करावया । आठही पाहार जैसें पायां । उळिग घापे ॥२०२॥

देवांगणमिरवणियां । अंगोपचार पुरवणियां । करावया म्हणियां । शोभती हात ॥२०३॥

लिंग कां प्रतिमा दिठी । देखतखेंवों अंगेष्टी । लोटिजे कां काठी । पडली जैसी ॥२०४॥

आणि विधिविनयादिकीं । गुणीं वडील जे लोकीं । तया ब्राह्मणाची निकी । पाइकी कीजे ॥२०५॥

अथवा प्रवासें कां पीडा । का शिणले जे सांकडां । ते जीव सुरवाडा । आणिजती ॥२०६॥

सकल तीर्थांचिये धुरे । जियें कां मातापितरें । तयां सेवेसी कीर शरीरें । लोण कीजे ॥२०७॥

आणि संसाराऐसा दारुणु । जो भेटलाचि हरी शीणु । तो ज्ञानदानीं सकरुणु । भजिजे गुरु ॥२०८॥

आणि स्वधर्माचा आगिठां । देह जाड्याचिया किटा । आवृत्तिपुटीं सुभटा । झाडी कीजे ॥२०९॥

वस्तु भूतमात्रीं नमिजे । परोपकारीं भजिजे । स्त्रीविषयीं नियमिजे । नांवें नांवें ॥२१०॥

जन्मतेनि प्रसंगे । स्त्रीदेह शिवणें आंगें । तेथूनि जन्म आघवें । सोंवळें कीजे ॥२११॥

भुतमात्राचेनि नांवें । तृणही नासुडावें । किंबहुना सांडावे । छेद भेद ॥२१२॥

ऐसैसी जैं शरीरीं । रहाटीची पडे उजरी । तैं शारीर तप घुमरी । आलें जाण ॥२१३॥

पार्था समस्तही हें करणें । देहाचेनि प्रधानपणें । म्हणौनि ययातें मी म्हणें । शारीर तप ॥२१४॥

एवं शारीर जें तप । तयाचें दाविलें रूप । आतां आइक निष्पाप । वाङ्मय तें ॥२१५॥

अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् ।

स्वाध्यायाभ्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते ॥१५॥

तरी लोहाचें आंग तुक । न तोडितांचि कनक । केलें जैसें देख । परीसें तेणें ॥२१६॥

तैसें न दुखवितां सेजे । जावळिया सुख निपजे । ऐसें साधुत्व कां देखिजे । बोलणां जिये ॥२१७॥

पाणी मुदल झाडा जाये । तृण ते प्रसंगेंचि जियें । तैसें एका बोलिलें होये । सर्वांहि हित ॥२१८॥

जोडे अमृताची सुरसरी । तैं प्राणांतें अमर करी । स्नानें पाप ताप वारी । गोडीही दे ॥२१९॥

तैसा अविवेकुही फिटे । आपुलें अनादित्व भेटे । आइकतां रुचि न विटे । पीयुषीं जैसी ॥२२०॥

जरी कोणी करी पुसणें । तरी होआवें ऐसें बोलणें । नातरी अवर्तणें । निगमु का नाम ॥२२१॥

ऋग्वेदादि तिन्ही । प्रतिष्ठीजती वाग्भुवनीं । केली जैसी वदनीं । ब्रह्मशाळा ॥२२२॥

नातरी एकाधें नांव । तेंचि शैव का वैष्णव । वाचे वसे तें वाग्भव । तप जाणावें ॥२२३॥

आतां तप जें मानसिक । तेंही सांगों आइक । म्हणे लोकनाथनायक । नायकु तो ॥२२४॥

मनः प्रसादः सौम्यत्वं मौनमात्मविनिग्रहः ।

भावसंशुद्धिरित्येतत्तपो मानसमुच्यते ॥१६॥

तरी सरोवर तरंगीं । सांडिलें आकाश मेघीं । का चंदनाचें उरगीं । उद्यान जैसें ॥२२५॥

नाना कळावैषम्यें चंद्रु । कां सांडिला आधीं नरेंद्रु । नातरी क्षीरसमुद्रु । मंदराचळें ॥२२६॥

तैसीं नाना विकल्पजाळें । सांडुनि गेलिया सकळें । मन राहे का केवळें । स्वरूपें जें ॥२२७॥

तपनेंवीण प्रकाशु । जाड्येंवीण रसीं रसु । पोकळीवीण अवकाशु । होय जैसा ॥२२८॥

तैसी आपली सोय देखे । आणि आपलिया स्वभावा मुके । हिंवली जैसी आंगिकें । हिवों नेदी निजांग ॥२२९॥

तैसें न चलतें कळंकेंवीण । शशिबिंब जैसें परीपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें ॥२३०॥

बुजाली वैराग्याची वोरप । जिराली मनाची धांप कांप । तेथ केवळ जाली वाफ । निजबोधाची ॥२३१॥

म्हणौनि विचारावया शास्त्र । राहाटवावें जें वक्त्र । तें वाचेचेंही सूत्र । हातीं न धरी ॥२३२॥

तें स्वलाभ लाभलेपणें । मन मनपणाही धरूं नेणें । शिवतलें जैसें लवणें । आपुलें निज ॥२३३॥

तेथ कें उठिती ते भाव । जिहीं इंद्रियमार्गीं धांव । घेऊनि ठाकावे गांव । विषयांचे ते ॥२३४॥

म्हणौनि तिये मानसीं । भावशुद्धिचि असे अपैसी । रोमशुचि जैसी । तळहातासी ॥२३५॥

काय बहु बोलों अर्जुना । जैं हे दशा ये मना । तैं मनोतपाभिधाना । पात्र होय ती ॥२३६॥

परी ते असो हें जाण । मानस तपाचें लक्षण । देवो म्हणे संपूर्ण । सांगितलें ॥२३७॥

एवं देहवाचाचित्तें । जें पातलें त्रिविधत्वातें । तें सामान्य तप तूतें । परीसविलें गा ॥२३८॥

आतां गुणत्रयसंगें । हेंचि विशेषीं त्रिविधीं रिगे । तेंही आइक चांगें । प्रज्ञाबळें ॥२३९॥

श्रद्धया परया तप्तं तपस्तत्त्रिविधं नरैः ।

अफलाकाङ्क्षिभिर्युक्तैः सात्त्विकं परिचक्षते ॥१७॥

तरी हेंचि तप त्रिविधा । जें दाविलें तुज प्रबुद्धा । तेंचि करीं पूर्णश्रद्धा । सांडूनि फळ ॥२४०॥

जैं पुरतिया सत्त्वशुद्धी । आचरिजे आस्तिक्यबुद्धी । तैं तयातेंचि गा प्रबुद्धी । सात्त्विक म्हणिपे ॥२४१॥

सत्कारमानपूजार्थं तपो दंभेन चैव यत् ।

क्रियते तदिह प्रोक्तं राजसं चलमध्रुवं ॥१८॥

नातरी तपस्थापनेलागीं । दुजेपण मांडूनि जगीं । महत्त्वाच्या शृंगीं । बैसावया ॥२४२॥

त्रिभुवनींचिया सन्माना । न वचावें ठाया आना । धुरेचिया आसना । भोजनालागीं ॥२४३॥

विश्वाचिया स्तोत्रा । आपण होआवया पात्रा । विश्वें आपलिया यात्रा । कराविया यावें ॥२४४॥

लोकांचिया विविधा पूजा । आश्रयो न धरावया दुजा । भोग भोगावे वोजा । महत्त्वाचिया ॥२४५॥

अंग बोल माखूनि तपें । विकावया आपणपें । अंगहीन पडपे । जियापरी ॥२४६॥

हें असो धनमानीं आस । वाढौनी तप कीजे सायास । तैं तेंचि तप राजस । बोलिजे गा ॥२४७॥

परी पहुरणी जें दुहिलें । तैं तें गुरूं न दुभेचि व्यालें । का उभें शेत चारिलें । पिकावया नुरे ॥२४८॥

तैसें फोकारितां तप । कीजे जें साक्षेप । तें फळीं तंव सोप । निःशेष जाय ॥२४९॥

ऐसें निर्फळ देखोनि करितां । माझारीं सांडी पंडुसुता । म्हणौनि नाहीं स्थिरता । तपा तया ॥२५०॥

एऱ्हवीं तरी आकाश मांडी । जो गर्जोनि ब्रह्मांड फोडी । तो अवकाळु मेघु काय घडी । राहात आहे ? ॥२५१॥

तैसें राजस तप जें होये । तें फळीं कीर वांझ जाये । परी आचरणींही नोहे । निर्वाहतें गा ॥२५२॥

आतां तेंचि तप पुढती । तामसाचिये रीती । पैं परत्रा आणि कीर्ती । मुकोनि कीजे ॥२५३॥

मूढग्राहेणात्मनो यत्पीडया क्रियते तपः ।

परस्योत्सादनार्थं वा तत्तामसमुदाहृतम् ॥१९॥

केवळ मूर्खपणाचा वारा । जीवीं घेऊनि धनुर्धरा । नाम ठेविजे शरीरा । वैरियाचें ॥२५४॥

पंचाग्नीची दडगी । खोलवीजती शरीरालागीं । का इंधन कीजे हें आगी । आंतु लावी ॥२५५॥

माथां जाळिजती गुगुळु । पाठीं घालिजती गळु । आंग जाळिती इंगळु । जळतभीतां ॥२५६॥

दवडोनि श्वासोच्छ्वास । कीजती वायांचि उपवास । कां घेपती धूमाचें घांस । अधोमुखें ॥२५७॥

हिमोदकें आकंठें । खडकें सेविजती तटें । जितया मांसाचे चिमुटे । तोडिती जेथ ॥२५८॥

ऐसी नानापरी हे काया । घाय सूतां पैं धनंजया । तप कीजे नाशावया । पुढिलातें ॥२५९॥

आंगभारें सुटला धोंडा । आपण फुटोनि होय खंडखंडा । कां आड जालियातें रगडा । करी जैसा ॥२६०॥

तेवीं आपलिया आटणिया । सुखें असतया प्राणिया । जिणावया शिराणिया । कीजती गा ॥२६१॥

किंबहुना हे वोखटी । घेऊनि क्लेशाची हातवटी । तप निफजे तें किरीटी । तामस होय ॥२६२॥

एवं सत्त्वादिकांच्या आंगीं । पाडिलें तप तिहीं भागीं । जालें तेंही तुज चांगी । दाविलें व्यक्ती ॥२६३॥

आतां बोलतां प्रसंगा । आलें म्हणौनि पैं गा । करूं रूप दानलिंगा । त्रिविधा तया ॥२६४॥

येथ गुणाचेनि बोलें । दानही त्रिविध असे जालें । तेंचि आइक पहिलें । सात्त्विक ऐसें ॥२६५॥

दातव्यमिति यद्दानं दीयतेऽनुपकारिणे ॥

देशे काले च पात्रे च तद्दानं सात्त्विकं स्मृतम् ॥२०॥

तरी स्वधर्मा आंतौतें । जें जें मिळे आपणयातें । तें तें दीजे बहुतें । सन्मानयोगें ॥२६६॥

जालया सुबीजप्रसंगु । पडे क्षेत्रवाफेचा पांगु । तैसाचि दानाचा हा लागु । देखतसें ॥२६७॥

अनर्घ्य रत्न हातां चढे । तैं भांगाराची वोढी पडे । दोनी जालीं तरी न जोडे । लेतें आंग ॥२६८॥

परी सण सुहृद संपत्ती । हे तिन्ही येकीं मिळती । जे भाग्य धरी उन्नती । आपुल्याविषयीं ॥२६९॥

तैसें निफजावया दान । जैं सत्त्वासि ये संवाहन । तैं देश काळ भाजन । द्रव्यही मिळे ॥२७०॥

तरी आधीं तंव प्रयत्नेंसीं । होआवें कुरुक्षेत्र का काशी । नातरी तुके जो इहींसीं । तो देशुही हो ॥२७१॥

तेथ रविचंद्रराहुमेळु । होतां पाहे पुण्यकाळु । का तयासारिखा निर्मळु । आनुही जाला ॥२७२॥

तैशा काळीं तिये देशीं । होआवी पात्र संपत्ती ऐसी । मूर्ति आहे धरिली जैसी । शुचित्वेंचि कां ॥२७३॥

आचाराचें मूळपीळ । वेदांची उतारपेठ । तैसें द्विजरत्न चोखट । पावोनियां ॥२७४॥

मग तयाच्या ठाईं वित्ता । निवर्तवावी स्वसत्ता । परी प्रियापुढें कांता । रिगे जैसी ॥२७५॥

का जयाचें ठेविलें तया । देऊनि होईजे उतराइया । नाना हडपें विडा राया । दिधला जैसा ॥२७६॥

तैसेनि निष्कामें जीवें । भूम्यादिक अर्पावें । किंबहुना हांवे । नेदावें उठों ॥२७७॥

आणि दान जया द्यावें । तयातें ऐसेया पाहावें । जया घेतलें नुमचवे । कायसेंनही ॥२७८॥

साद घातलिया आकाशा । नेदी प्रतिशब्दु जैसा । का पाहिला आरसा । येरीकडे ॥२७९॥

नातरी उदकाचिये भूमिके । आफळिलेनि कंदुकें । उधळौनि कवतिकें । न येईजे हाता ॥२८०॥

नाना वसो घातला चारू । माथां तुरंबिला बुरू । न करी प्रत्युपकारू । जियापरी ॥२८१॥

तैसें दिधलें दातयाचें । जो कोणेही आंगें नुमचे । अर्पिलया साम्य तयाचें । कीजे पैं गा ॥२८२॥

ऐसिया जें सामग्रिया । दान निफजे वीरराया । तें सात्त्विक दानवर्या । सर्वांही जाण ॥२८३॥

आणि तोचि देशु काळु । घडे तैसाचि पात्रमेळु । दानभागुही निर्मळु । न्यायगतु ॥२८४॥

यत्तु प्रत्युपकारार्थं फलमुद्दिश्य वा पुनः ।

दीयते च परिक्लिष्टं तद्दानं राजसं स्मृतम् ॥२१॥

परी मनीं धरूनि दुभतें । चारिजे जेवीं गाईतें । का पेंव करूनि आइतें । पेरूं जाइजे ॥२८५॥

नाना दिठी घालुनि आहेरा । अवंतुं जाइजे सोयिरा । का वाण धाडिजे घरा । वोवसीयाचे ॥२८६॥

पैं कळांतर गांठीं बांधिजे । मग पुढिलांचें काज कीजे । पूजा घेऊनि रसु दीजे । पीडितांसी ॥२८७॥

तैसें जया जें दान देणें । तो तेणेंचि गा जीवनें । पुढती भुंजावा भावें येणें । दीजे जें का ॥२८८॥

अथवा कोणी वाटे जातां । घेतलें उमचों न शकता । मिळे जैं पंडुसुता । द्विजोत्तमु ॥२८९॥

तरी कवड्या एकासाठीं । अशेषां गोत्रांचींच किरीटी । सर्व प्रायश्चित्तें सुयें मुठीं । तयाचिये ॥२९०॥

तेवींचि पारलौकिकें । फळें वांछिजती अनेकें । आणि दीजे तरी भुके । येकाही नोहे ॥२९१॥

तेंही ब्राह्मणु नेवो सरे । कीं हाणिचेनि शिणें झांसुरें । सर्वस्व जैसें चोरें । नागऊनि नेलें ॥२९२॥

बहु काय सांगों सुमती । जें दीजे या मनोवृत्ती । तें दान गा त्रिजगतीं । राजस पैं ॥२९३॥

अदेशकाले यद्दनमपात्रेभ्यश्च दीयते ।

असत्कृतमवज्ञातं तत्तामसमुदाहृतम् ॥२२॥

मग म्लेंच्छांचे वसौटें । दांगाणे हन कैकटे । का शिबिरें चोहटे । नगरींचे ते ॥२९४॥

तेही ठाईं मिळणी । समयो सांजवेळु कां रजनी । तेव्हां उदार होणें धनीं । चोरियेच्या ॥२९५॥

पात्रें भाट नागारी । सामान्य स्त्रिया का जुवारी । जिये मूर्तिमंते भुररीं । भुले तया ॥२९६॥

रूपानृत्याची पुरवणी । ते पुढां डोळेभारणी । गीत भाटीव तो श्रवणीं । कर्णजपु ॥२९७॥

तयाहीवरी अळुमाळु । जैं घे फुलागंधाचा गुगुळु । तंव भ्रमाचा तो वेताळु । अवतरे तैसा ॥२९८॥

तेथ विभांडूनियां जग । आणिले पदार्थ अनेग । तेणें घालूं लागे मातंग । गवादी जैसी ॥२९९॥

एवं ऐसेनि जें देणें । तें तामस दान मी म्हणें । आणि घडे दैवगुणें । आणिकही ऐक ॥३००॥

विपायें घुणाक्षर पडे । टाळिये काउळा सांपडे । तैसे तामसां पर्व जोडे । पुण्यदेशीं ॥३०१॥

तेथ देखोनि तो आथिला । योग्यु मागोंही आला । तोही दर्पा चढला । भांबावें जरी ॥३०२॥

तरी श्रद्धा न धरी जिवीं । तया माथाही न खालवी । स्वयें न करी ना करवी । अर्घ्यादिक ॥३०३॥

आलिया न घली बैसों । तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो । हा अप्रसंगु कीर असो । तामसीं नरीं ॥३०४॥

पैं बोळविजे रिणाइतु । तैसा झकवी तयाचा हातु । तूं करणें याचा बहुतु । प्रयोगु तेथ ॥३०५॥

आणि जया जें दे किरीटी । तयातें उमाणी तयासाठीं । मग कुबोलें कां लोटी । अवज्ञेच्या ॥३०६॥

हें बहु असो यापरी । मोल वेंचणें जें अवधारीं । तया नांव चराचरीं । तामस दान ॥३०७॥

ऐशीं आपुलाला चिन्हीं । अळंकृतें तिन्हीं । दानें दाविलीं अभिधानीं । रजतमाचिया ॥३०८॥

तेथ मी जाणत असें । विपायें तूं गा ऐसें । कल्पिसील मानसें । विचक्षणा ॥३०९॥

जें भवबंधमोचक । येकलें कर्म सात्त्विक । तरी कां वेखासी सदोख । येर बोलावीं ? ॥३१०॥

परी नोसंतितां विवसी । भेटी नाहीं निधीसी । का धूं न साहतां जैसी । वाती न लगे ॥३११॥

तैसें शुद्धसत्त्वाआड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणे यातें कीड । म्हणावें कां ? ॥३१२॥

आम्ही श्रद्धादि दानांत । जें समस्तही क्रियाजात । सांगितलें कां व्याप्त । तिहीं गुणीं ॥३१३॥

तेथ भरंवसेनि तिन्ही । न सांगोंचि ऐसें मानीं । परी सत्त्व दावावया दोन्ही । बोलिलों येरें ॥३१४॥

जें दोहींमाजीं तिजें असे । तें दोन्ही सांडितांचि दिसे । अहोरात्रत्यागें जैसें । संध्यारूप ॥३१५॥

तैसें रजतमविनाशें । तिजें जें उत्तम दिसे । तें सत्त्व हें आपैसें । फावासि ये ॥३१६॥

एवं दाखवावया सत्त्व तुज । निरूपिलें तम रज । तें सांडूनि सत्त्वें काज । साधीं आपुलें ॥३१७॥

सत्त्वेंचि येणें चोखाळें । करीं यज्ञादिकें सकळें । पावसी तैं करतळें । आपुलें निज ॥३१८॥

सूर्यें दाविलें सांतें । काय एक न दिसे तेथें । तेवीं सत्त्वें केलें फळातें । काय नेदी ? ॥३१९॥

हे कीर आवडतांविखीं । शक्ति सत्त्वीं आथी निकी । परी मोक्षेंसी एकीं । मिसळणें जें ॥३२०॥

तें एक आनचि आहे । तयाचा सावावो जैं लाहे । तैं मोक्षाचाही होये । गांवीं सरतें ॥३२१॥

पैं भांगार जऱ्हीं पंधरें । तऱ्ही राजावळींचीं अक्षरें । लाहें तैंचि सरे । जियापरी ॥३२२॥

स्वच्छें शीतळें सुगंधें । जळें होती सुखप्रदें । परी पवित्रत्व संबंधें । तीर्थाचेनि ॥३२३॥

नयी हो कां भलतैसी थोरी । परी गंगा जैं अंगीकारी । तैंचि तिये सागरीं । प्रवेशु गा ॥३२४॥

तैसें सात्त्विका कर्मां किरीटी । येतां मोक्षाचिये भेटी । न पडे आडकाठी । तें वेगळें आहे ॥३२५॥

हा बोलु आइकतखेवीं । अर्जुना आधि न माये जीवीं । म्हणे देवें कृपा करावी । सांगावें तें ॥३२६॥

तेथ कृपाळुचक्रवर्ती । म्हणे आईक तयाची व्यक्ती । जेणें सात्त्विक तें मुक्ती । रत्न देखे ॥३२७॥

ॐतत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ।

ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा ॥२३॥

तरी अनादि परब्रह्म । जें जगदादि विश्रामधाम । तयाचें एक नाम । त्रिधा पैं असे ॥३२८॥

तें कीर अनाम अजाती । परी अविद्यावर्गाचिये राती / । माजी वोळखावया श्रुती । खूण केली ॥३२९॥

उपजलिया बाळकासी । नांव नाहीं तयापासीं । ठेविलेनि नांवेंसी । ओ देत उठी ॥३३०॥

कष्टले संसारशीणें । जे देवों येती गाऱ्हाणें । तयां ओ दे नांवें जेणें । तो संकेतु हा ॥३३१॥

ब्रह्माचा अबोला फिटावा । अद्वैततत्त्वें तो भेटावा । ऐसा मंत्रु देखिला कणवा । वेदें बापें ॥३३२॥

मग दाविलेनि जेणें एकें । ब्रह्म आळविलें कवतिकें । मागां असत ठाके । पुढां उभें ॥३३३॥

परी निगमाचळशिखरीं । उपनिषदार्थनगरीं । आहाति जे ब्रह्माच्या येकाहारीं । तयांसीच कळे ॥३३४॥

हेंही असो प्रजापती । शक्ति जे सृष्टि करिती । ते जया एका आवृत्ती । नामाचिये ॥३३५॥

पैं सृष्टीचिया उपक्रमा / पूर्वीं गा वीरोत्तमा । वेडा ऐसा ब्रह्मा । एकला होता ॥३३६॥

मज ईश्वरातें नोळखे । ना सृष्टिही करूं न शके । तो थोरु केला एकें । नामें जेणें ॥३३७॥

जयाचा अर्थु जीवीं ध्यातां । जें वर्णत्रयचि जपतां । विश्वसृजनयोग्यता । आली तया ॥३३८॥

तेधवां रचिलें ब्रह्मजन । तयां वेद दिधलें शासन । यज्ञा ऐसें वर्तन । जीविकें केलें ॥३३९॥

पाठीं नेणों किती येर । स्रजिले लोक अपार । जाले ब्रह्मदत्त अग्रहार । तिन्हीं भुवनें ॥३४०॥

ऐसें नाममंत्रें जेणें । धातया अढंच करणें । तयाचें स्वरूप आइक म्हणे । श्रीकांतु तो ॥३४१॥

तरी सर्व मंत्रांचा राजा । तो प्रणवो आदिवर्णु बुझा । आणि तत्कारु जो दुजा । तिजा सत्कारु ॥३४२॥

एवं ॐतत्सदाकारु । ब्रह्मनाम हें त्रिप्रकारु । हें फूल तुरंबी सुंदरु । उपनिषदाचें ॥३४३॥

येणेंसीं गा होऊनि एक । जैं कर्म चाले सात्त्विक । तैं कैवल्यातें पाइक । घरींचें करी ॥३४४॥

परी कापुराचें थळींव । आणून देईल दैव । लेवों जाणणेंचि आडव । तेथ असे बापा ॥३४५॥

तैसें आदरिजेल सत्कर्म । उच्चरिजेल ब्रह्मनाम । परी नेणिजेल जरी वर्म । विनियोगाचें ॥३४६॥

तरी महंताचिया कोडी । घरा आलियाही वोढी । मानूं नेणतां परवडी । मुद्दल तुटे ॥३४७॥

कां ल्यावया चोखट । टीक भांगार एकवट । घालूनि बांधिली मोट । गळा जेवीं ॥३४८॥

तैसें तोंडीं ब्रह्मनाम । हातीं तें सात्त्विक कर्म । विनियोगेंवीण काम । विफळ होय ॥३४९॥

अगा अन्न आणि भूक । पासीं असे परी देख । जेऊं नेणतां बालक । लंघनचि कीं ॥३५०॥

का स्नेहसूत्र वैश्वानरा । जालियाही संसारा । हातवटी नेणतां वीरा । प्रकाशु नोहे ॥३५१॥

तैसे वेळे कृत्य पावे । तेथिंचा मंत्रुही आठवे । परी व्यर्थ तें आघवें । विनियोगेंवीण ॥३५२॥

म्हणौनि वर्णत्रयात्मक । जे हें परब्रह्मनाम एक । विनियोगु तूं आइक । आतां याचा ॥३५३॥

तस्मादोमित्युदाहृत्य यज्ञदानतपः क्रियाः ।

प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥२४॥

तरी या नामींचीं अक्षरें तिन्हीं । कर्मा आदिमध्यनिदानीं । प्रयोजावीं पैं स्थानीं । इहीं तिन्हीं ॥३५४॥

हेंचि एकी हातवटी । घेउनि हन किरीटी । आले ब्रह्मविद भेटी । ब्रह्माचिये ॥३५५॥

ब्रह्मेंसीं होआवया एकी । ते न वंचती यज्ञादिकीं । जे चावळलें वोळखीं । शास्त्रांचिया ॥३५६॥

तो आदि तंव ओंकारु । ध्यानें करिती गोचरु । पाठीं आणिती उच्चारु । वाचेही तो ॥३५७॥

तेणें ध्यानें प्रकटें । प्रणवोच्चारें स्पष्टें । लागती मग वाटे । क्रियांचिये ॥३५८॥

आंधारीं अभंगु दिवा । आडवीं समर्थु बोळावा । तैसा प्रणवो जाणावा । कर्मारंभीं ॥३५९॥

उचितदेवोद्देशे । द्रव्यें धर्म्यें आणि बहुवसें । द्विजद्वारां हन हुताशें । यजिती पैं ते ॥३६०॥

आहवनीयादि वन्ही । निक्षेपरूपीं हवनीं । यजिती पैं विधानीं । फुडे होउनी ॥३६१॥

किंबहुना नाना याग । निष्पत्तीचे घेउनि अंग । करिती नावडतेया त्याग । उपाधीचा ॥३६२॥

कां न्यायें जोडला पवित्रीं । भूम्यादिकीं स्वतंत्रीं । देशकाळशुद्ध पात्रीं । देती दानें ॥३६३॥

अथवा एकांतरां कृच्छ्रीं । चांद्रायणें मासोपवासीं । शोषोनि गा धातुराशी । करिती तपें ॥३६४॥

एवं यज्ञदानतपें । जियें गाजती बंधरूपें । तिहींच होय सोपें । मोक्षाचें तयां ॥३६५॥

स्थळीं नावा जिया दाटिजे । जळीं तियांचि जेवीं तरीजे । तेवीं बंधकीं कर्मीं सुटिजे । नामें येणें ॥३६६॥

परी हें असो ऐसिया । या यज्ञदानादि क्रिया । ओंकारें सावायिलिया । प्रवर्तती ॥३६७॥

तिया मोटकिया जेथ फळीं । रिगों पाहाती निहाळीं । प्रयोजिती तिये काळीं । तच्छब्दु तो ॥३६८॥

तदित्यनभिसन्धाय फलं यज्ञतपः क्रियाः ।

दानक्रियाश्च विविधाः क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभिः ॥२५॥

जें सर्वांही जगापरौतें । जें एक सर्वही देखतें । तें तच्छब्दें बोलिजे तें । पैल वस्तु ॥३६९॥

तें सर्वादिकत्वें चित्तीं । तद्रूप ध्यावूनियां सुमती । उच्चारेंही व्यक्ती । आणिती पुढती ॥३७०॥

म्हणती तद्रूपा ब्रह्मा तया । फळेंसीं क्रिया इयां । तेंचि होतु आम्हां भोगावया । कांहींचि नुरो ॥३७१॥

ऐसेनि तदात्मकें ब्रह्में । तेथ उगाणूनि कर्में । आंग झाडिती न ममें । येणें बोलें ॥३७२॥

आतां ओंकारें आदरिलें । तत्कारें समर्पिलें । इया रिती जया आलें । ब्रह्मत्व कर्मा ॥३७३॥

तें कर्म कीर ब्रह्माकारें । जालें तेणेंही न सरे । जे करी तेणेंसी दुसरें । आहे म्हणौनि ॥३७४॥

मीठ आंगें जळीं विरे । परी क्षारता वेगळी उरे । तैसें कर्म ब्रह्माकारें । गमे तें द्वैत ॥३७५॥

आणि दुजे जंव जंव घडे । तंव तंव संसारभय जोडे । हें देवो आपुलेनि तोंडें । बोलती वेद ॥३७६॥

म्हणौनि परत्वें ब्रह्म असे । तें आत्मत्वें परीयवसे । सच्छब्द या रिणादोषें । ठेविला देवें ॥३७७॥

तरी ओंकार तत्कारीं । कर्म केलें जें ब्रह्मशरीरीं । जें प्रशस्तादि बोलवरी । वाखाणिलें ॥३७८॥

प्रशस्तकर्मीं तिये । सच्छब्दा विनियोगु आहे । तोचि आइका होये । तैसा सांगों ॥३७९॥

सद्भावे साधुभावे च सदित्येतत्प्रयुज्यते ।

प्रशस्ते कर्मणि तथा सच्छब्दः पार्थ युज्यते ॥२६॥

तरी सच्छब्दें येणें । आटूनि असताचें नाणें । दाविजे अव्यंगवाणें । सत्तेचें रूप ॥३८०॥

जें सत तेंचि काळें देशें । होऊं नेणेचि अनारिसे । आपणपां आपण असे । अखंडित ॥३८१॥

हें दिसतें जेतुलें आहे । तें असतपणें जें नोहे । देखतां रूपीं सोये । लाभे जयाची ॥३८२॥

तेणेंसीं प्रशस्त तें कर्म । जें जालें सर्वात्मक ब्रह्म । देखिजे करूनि सम । ऐक्यबोधें ॥३८३॥

तरी ओंकार तत्कारें । जें कर्म दाविलें ब्रह्माकारें । तें गिळूनि होईजे एकसरें । सन्मात्रचि ॥३८४॥

ऐसा हा अंतरंगु । सच्छब्दाचा विनियोगु । जाणा म्हणे श्रीरंगु । मी ना म्हणें हो ॥३८५॥

ना मीचि जरी हो म्हणें । तरी श्रीरंगीं दुजें हेंचि उणें । म्हणौनि हें बोलणें । देवाचेंचि ॥३८६॥

आतां आणिकीही परी । सच्छब्दु हा अवधारीं । सात्त्विक कर्मा करी । उपकारु जो ॥३८७॥

तरी सत्कर्में चांगें । चालिलीं अधिकारबगें । परी एकाधें कां आंगें । हिणावती जैं ॥३८८॥

तैं उणें एकें अवयवें । शरीर ठाके आघवें । कां अंगहीन भांडावें । रथाची गती ॥३८९॥

तैसें एकेंचि गुणेंवीण । सतचि परी असतपण । कर्म धरी गा जाण । जिये वेळे ॥३९०॥

तेव्हां ओंकार तत्कारीं । सावायिला हा चांगी परी । सच्छब्दु कर्मा करी । जीर्णोद्धारु ॥३९१॥

तें असतपण फेडी । आणी सद्भावाचिये रूढी । निजसत्त्वाचिये प्रौढी । सच्छब्दु हा ॥३९२॥

दिव्यौषध जैसें रोगिया । कां सावावो ये भंगलिया । सच्छब्दु कर्मा व्यंगलिया । तैसा जाण ॥३९३॥

अथवा कांहीं प्रमादें । कर्म आपुलिये मर्यादे । चुकोनि पडे निषिद्धे । वाटे हन ॥३९४॥

चालतयाही मार्गु सांडे । पारखियाचि अखरें पडे । राहाटीमाजीं न घडे । काइ काइ ? ॥३९५॥

म्हणौनि तैसी कर्मा । राभस्यें सांडे सीमा । असाधुत्वाचिया दुर्नामा । येवों पाहे जें ॥३९६॥

तेथ गा हा सच्छब्दु । येरां दोहींपरीस प्रबुद्धु । प्रयोजिला करी साधु । कर्मातें यया ॥३९७॥

लोहा परीसाची घृष्टी । वोहळा गंगेची भेटी । कां मृता जैसी वृष्टी । पीयूषाची ॥३९८॥

पैं असाधुकर्मा तैसा । सच्छब्दुप्रयोगु वीरेशा । हें असो गौरवुचि ऐसा । नामाचा यया ॥३९९॥

घेऊनि येथिंचें वर्म । जैं विचारिसी हें नाम । तैं केवळ हेंचि ब्रह्म । जाणसी तूं ॥४००॥

पाहें पां ॐतत्सत ऐसें । हें बोलणें तेथ नेतसे । जेथूनि कां हें प्रकाशे । दृश्यजात ॥४०१॥

तें तंव निर्विशिष्ट । परब्रह्म चोखट । तयाचें हें आंतुवट । व्यंजक नाम ॥४०२॥

परी आश्रयो आकाशा । आकाशचि का जैसा । या नामानामी आश्रयो तैसा । अभेदु असे ॥४०३॥

उदयिला आकाशीं । रवीचि रवीतें प्रकाशी । हे नामव्यक्ती तैसी । ब्रह्मचि करी ॥४०४॥

म्हणौनि त्र्यक्षर हें नाम । नव्हे जाण केवळ ब्रह्म । ययालागीं कर्म । जें जें कीजे ॥४०५॥

यज्ञे तपसि दाने च स्थितिः सदिति चोच्यते ।

कर्म चैव तदर्थीयं सदित्येवाभिधीयते ॥२७॥

तें याग अथवा दानें । तपादिकेंही गहनें । तियें निफजतु कां न्यूनें । होऊनि ठातु ॥४०६॥

परी परीसाचा वरकली । नाहीं चोखाकिडाची बोली । तैसी ब्रह्मीं अर्पितां केलीं । ब्रह्मचि होती ॥४०७॥

उणिया पुरियाची परी । नुरेचि तेथ अवधारीं । निवडूं न येती सागरीं । जैसिया नदी ॥४०८॥

एवं पार्था तुजप्रती । ब्रह्मनामाची हे शक्ती । सांगितली उपपत्ती । डोळसा गा ॥४०९॥

आणि येकेकाही अक्षरा । वेगळवेगळा वीरा । विनियोगु नागरा । बोलिलों रीती ॥४१०॥

एवं ऐसें सुमहिम । म्हणौनि हें ब्रह्मनाम । आतां जाणितलें कीं सुवर्म । राया तुवां ? ॥४११॥

तरी येथूनि याचि श्रद्धा । उपलविली हो सर्वदा । जयाचें जालें बंधा । उरों नेदी ॥४१२॥

जिये कर्मीं हा प्रयोगु । अनुष्ठिजे सद्विनियोगु । तेथ अनुष्ठिला सांगु । वेदुचि तो ॥४१३॥

अश्रद्धया हुतं दत्तं तपस्तप्तं कृतं च यत् ।

असदित्युच्यते पार्थ न च तत्प्रेत्य नो इह ॥२८॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धात्रयविभागयोगो नाम सप्तदशोऽध्यायः ॥१७॥

ना सांडूनि हे सोये । मोडूनि श्रद्धेची बाहे । दुराग्रहाची त्राये । वाढऊनियां ॥४१४॥

मग अश्वमेध कोडी कीजे । रत्नें भरोनि पृथ्वी दीजे । एकांगुष्ठींही तपिजे । तपसाहस्रीं ॥४१५॥

जळाशयाचेनि नांवें । समुद्रही कीजती नवे । परी किंबहुना आघवें । वृथाचि तें ॥४१६॥

खडकावरी वर्षले । जैसें भस्मीं हवन केलें । कां खेंव दिधलें । साउलिये ॥४१७॥

नातरी जैसें चडकणा । गगना हाणितलें अर्जुना । तैसा समारंभु सुना । गेलाचि तो ॥४१८॥

घाणां गाळिले गुंडे । तेथ तेल ना पेंडी जोडे । तैसें दरिद्र तेवढें । ठेलेंचि आंगीं ॥४१९॥

गांठीं बांधली खापरी । येथ अथवा पैलतीरीं । न सरोनि जैसी मारी । उपवासीं गा ॥४२०॥

तैसें कर्मजातें तेणें । नाहीं ऐहिकीचें भोगणें । तेथ परत्र तें कवणें । अपेक्षावें ॥४२१॥

म्हणौनि ब्रह्मनामश्रद्धा । सांडूनि कीजे जो धांदा । हें असो सिणु नुसधा । दृष्टादृष्टीं तो ॥४२२॥

ऐसें कलुषकरिकेसरी । त्रितापतिमिरतमारी । श्रीवर वीर नरहरी । बोलिलें तेणें ॥४२३॥

तेथ निजानंदा बहुवसा । माजीं अर्जुन तो सहसा । हरपला चंद्रु जैसा । चांदिणेनि ॥४२४॥

अहो संग्रामु हा वाणिया । मापें नाराचांचिया आणिया । सूनि माप घे मवणिया । जीवितेंसी ॥४२५॥

ऐसिया समयीं कर्कशें । भोगीजत स्वानंदराज्य कैसें । आजि भाग्योदयो हा नसे । आनी ठाईं ॥४२६॥

संजयो म्हणे कौरवराया । गुणा रिझों ये रिपूचिया । आणि गुरुही हा आमुचिया । सुखाचा येथ ॥४२७॥

हा न पुसता हे गोठी । तरी देवो कां सोडिते गांठी । तरी कैसेंनि आम्हां भेटी । परमार्थेंसीं ॥४२८॥

होतों अज्ञानाच्या आंधारां । वोसंतीत जन्मवाहरा । तों आत्मप्रकाशमंदिरा / । आंतु आणिलें ॥४२९॥

एवढा आम्हां तुम्हां थोरु । केला येणें उपकारु । म्हणौनि हा व्याससहोदरु । गुरुत्वें होय ॥४३०॥

तेवींचि संजयो म्हणे चित्तीं । हा अतिशयो या नृपती । खुपेल म्हणौनि किती । बोलत असों ॥४३१॥

ऐसी हे बोली सांडिली । मग येरीचि गोठी आदरिली । जे पार्थें कां पुसिली । श्रीकृष्णातें ॥४३२॥

याचें जैसें कां करणें । तैसें मीही करीन बोलणें । ऐकिजो ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ॥४३३॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां सप्तदशोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : July 01, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP