ज्ञानेश्वरी अध्याय ६

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत.


॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ६ ॥

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अध्याय सहावा ।

आत्मसंयमयोगः ।

मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती आतां जो । योगरूप ॥१॥

सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥२॥

कैसी दैवाची आगळिक नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करूनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥३॥

तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जे आडमुठीं तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रें म्हणितलें । हें न पुसों तूतें ॥४॥

तया संजया येणें बोलें । रायाचें हृदय चोजवलें । जें अवसरीं आहे घेतलें । कुमारांचिया ॥५॥

हें जाणोनि मनीं हांसिला । म्हणे म्हातारा मोहें नाशिला । एऱ्हवीं बोलु तरी भला जाहला । अवसरीं इये ॥६॥

परि तें तैसें कैसेनि होईल । जात्यंधु कैसें पाहेल । तेवींचि ये रुसें घेईल । म्हणौनि बिहे ॥७॥

परि आपण चित्तीं आपुला । निकियापरी संतोषला । जे तो संवादु फावला । कृष्णार्जुनांचा ॥८॥

तेणें आनंदाचेनि धालेपणें । साभिप्राय अंतःकरणें । आतां आदरेंसीं बोलणें । घडेल तया ॥९॥

तो गीतेमाजी षष्ठींचा । प्रसंगु असे आयणीचा । जैसा क्षीरार्णवीं अमृताचा । निवाडु जाहला ॥१०॥

तैसें गीतार्थाचें सार । जें विवेकसिंधूचें पार । नाना योगविभवभांडार । उघडलें कां ॥११॥

जें आदिप्रकृतीचें विसवणें । जें शब्दब्रह्मासि न बोलणें । जेथूनि गीतावल्लीचें ठाणें । प्ररोहो पावे ॥१२॥

तो अध्यावो सहावा । वरि साहित्याचिया बरवा । सांगिजैल म्हणौनि परिसावा । चित्त देउनी ॥१३॥

माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंही पैजां जिंके । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥१४॥

जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचें रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥१५॥

ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोले इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥१६॥

सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥१७॥

नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळयांही पुरों लागे धणी । ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ॥१८॥

जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें । बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ॥१९॥

ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं । झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी । जैसा एकला जग चेववी । सहस्त्रकरु ॥२०॥

तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण । पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ॥२१॥

हें असोतु या बोलांचीं ताटें भलीं । वरी कैवल्यरसें वोगरिलीं । ही प्रतिपत्ति मियां केली । निष्कामासी ॥२२॥

आतां आत्मप्रभा नीच नवी । तेचि करूनि ठाणदिवी । जो इंद्रियांतें चोरूनि जेवी । तयासीचि फावे ॥२३॥

येथ श्रवणाचेनि पांगें । वीण श्रोतयां होआवें लागे । हे मनाचेनि निजांगें । भोगिजे गा ॥२४॥

आहाच बोलाची वालीफ फेडिजे । आणि ब्रह्माचियाचि आंगा घडिजे । मग सुखेंसी सुरवाडिजे । सुखाचि माजीं ॥२५॥

ऐसें हळुवारपण जरी येईल । तरीच हें उपेगा जाईल । एऱ्हवीं आघवी गोठी होईल । मुकिया बहिरयाची ॥२६॥

परी तें असो आतां आघवें । नलगे श्रोतयांतें कडसावें । जे अधिकारिये एथ स्वभावें । निष्कामकामु ॥२७॥

जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचूनि एथींची गोडी । नेणती आणिक ॥२८॥

जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा प्राकृतीं हा ग्रंथु नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेविं खाजें । चकोराचें ॥२९॥

तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । आणि अज्ञानासी आन गांवो । म्हणौनि बोलावया विषय पहा हो । विशेषु नाहीं ॥३०॥

परी अनुवादलों मी प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगें । निरोपिलें जें ॥३१॥

तें बुद्धीही आकळितां सांकडें । म्हणौनि बोलीं विपायें सांपडे । परी श्रीनिवृत्तिकृपादीप उजियेडें । देखैन मी ॥३२॥

जें दिठीही न पविजे । तें दिठीविण देखिजे । जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥३३॥

ना तरी जें धातुवादाही न जोडे । तें लोहींचि पंधरें सांपडे । जरी दैवयोगें चढे । परिसु हातां ॥३४॥

तैसी गुरुकृपा होये । तरी करितां काय आपु नोहे । म्हणौनि तें अपार मातें आहे । ज्ञानदेवो म्हणे ॥३५॥

तेणें कारणें मी बोलेन । बोलीं अरूपाचें रूप दावीन । अतींद्रिय परी भोगवीन । इंद्रियांकरवीं ॥३६॥

आइका यश श्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥३७॥

म्हणौनि तो भगवंतु । जो निःसंगाचा सांगातु । तो म्हणे पार्था दत्तचित्तु । होईं आतां ॥३८॥

श्रीभगवानुवाच ।

अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः ।

स संन्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः ॥१॥

आइकें योगी आणि संन्यासी जनीं । हे एकचि सिनानें झणीं मानीं । एऱ्हवीं विचारिजती जंव दोन्ही । तंव एकचि ते ॥३९॥

सांडिजे दुजया नामाचा आभासु । तरी योगु तोचि संन्यासु । पाहतां ब्रह्मीं नाहीं अवकाशु । दोहींमाजीं ॥४०॥

जैसें नामाचेनि अनारिसेपणें । एका पुरुषातें बोलावणें । कां दोहींमार्गीं जाणें । एकाचि ठाया ॥४१॥

नातरी एकचि उदक सहजें । परि सिनाना घटीं भरिजे । तैसें भिन्नत्व जाणिजे । योगसंन्यासांचें ॥४२॥

आइकें सकळ संमतें जगीं । अर्जुना गा तोचि योगी । जो कर्में करूनि रागी । नोहेचि फळीं ॥४३॥

जैसी मही हे उद्भिजें । जनी अहंबुद्धीवीण सहजें । आणि तेथिंचीं तियें बीजें । अपेक्षीना ॥४४॥

तैसा अन्वयाचेनि आधारें । जातीचेनि अनुकारें । जें जेणें अवसरें । करणें पावे ॥४५॥

तें तैसेंचि उचित करी । परी साटोपु नोहे शरीरीं । आणि बुद्धीही करोनि फळवेरी । जायेचिना ॥४६॥

ऐसा तोचि संन्यासी । पार्था गा परियेसीं । तोचि भरंवसेनिसीं । योगीश्वरु ॥४७॥

वांचूनि उचित कर्म प्रासंगिक । तयातें म्हणे हे सांडावें बद्धक । तरी टांकोटांकीं आणिक । मांडीचि तो ॥४८॥

जैसा क्षाळूनियां लेपु एकु । सवेंचि लाविजे आणिकु । तैसेनि आग्रहाचा पाइकु । विचंबे वायां ॥४९॥

गृहस्थाश्रमाचें वोझें । कपाळीं आधींचि आहे सहजें । कीं तेंचि संन्याससवा ठेविजे । सरिसें पुढती ॥५०॥

म्हणौनि अग्निसेवा न सांडितां । कर्माची रेखा नोलांडितां । आहे योगसुख स्वभावता । आपणपांचि ॥५१॥

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव ।

न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन ॥२॥

ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एकवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥५२॥

जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥५३॥

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते ।

योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥३॥

आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणी ॥५४॥

येणें यमनियमांचेनि तळवटें । रिगे आसनाचिये पाउलवाटें । येई प्राणायामाचेनि आडकंठें । वरौता गा ॥५५॥

मग प्रत्याहाराचा अधाडा । जो बुद्धीचियाही पायां निसरडा । जेथ हटिये सांडिती होडा । कडेलग ॥५६॥

तरी अभ्यासाचेनि बळें । प्रत्याहारीं निराळें । नखीं लागेल ढाळें ढाळें । वैराग्याची ॥५७॥

ऐसा पवनाचेनि पाठारें । येतां धारणेचेनि पैसारें । क्रमी ध्यानाचें चवरें । सांपडे तंव ॥५८॥

मग तया मार्गाची धांव । पुरेल प्रवृत्तीची हांव । जेथ साध्यसाधना खेंव । समरसें होय ॥५९॥

जेथ पुढील पैसु पारुखे । मागील स्मरावें तें ठाके । ऐसिये सरिसीये भूमिके । समाधि राहे ॥६०॥

येणें उपायें योगारूढु । जो निरवधि जाहला प्रौढु । तयाचिया चिन्हांचा निवाडु । सांगैन आइकें ॥६१॥

यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते ।

सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥४॥

तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥६२॥

जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे । विषय पासींही आलियां से न रिगे । हें काय म्हणौनि ॥६३॥

इंद्रियें कर्माच्या ठायीं । वाढीनलीं परि कहीं । फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥६४॥

असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं ॥६५॥

तेथ अर्जुन म्हणे अनंता । हें मज विस्मो बहु आइकतां । सांगे तया ऐसी योग्यता । कवणें दीजे ॥६६॥

उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत् ।

आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥५॥

तंव हांसोनि श्रीकृष्ण म्हणे । तुझें नवल ना हें बोलणें । कवणासि काय दिजेल कवणें । अद्वैतीं इये ॥६७॥

पैं व्यामोहाचिये शेजे । बळिया अविद्या निद्रितु होइजे । ते वेळी दुःस्वप्न हा भोगिजे । जन्ममृत्यूंचा ॥६८॥

पाठीं अवसांत ये चेवो । तैं तें अवघेंचि होय वावो । ऐसा उपजे नित्य सद्भावो । तोहि आपणपांचि ॥६९॥

म्हणौनि आपणचि आपणयां । घातु कीजतु असे धनंजया । चित्त देऊनि नाथिलिया । देहाभिमाना ॥७०॥

बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः ।

अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत् ॥६॥

हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीचि वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥७१॥

एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥७२॥

कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥७३॥

कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हे गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंदु अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥७४॥

एऱ्हवीं होय तें तोचि आहे । परि काई कीजे बुद्धि तैशी नोहे । देखा स्वप्नींचेनि घायें । कीं मरे साचें ॥७५॥

जैशी ते शुकाचेनि आंगभारें । नळिका भोविन्नली एरी मोहरें । तेणें उडावें परी न पुरे । मनशंका ॥७६॥

वायांचि मान पिळी । अटुवें हियें आंवळी । टिटांतु नळी । धरूनि ठाके ॥७७॥

म्हणे बांधला मी फुडा । ऐसिया भावनेचिया पडे खोडां । कीं मोकळिया पायांचा चवडा । गोंवी अधिकें ॥७८॥

ऐसा काजेंवीण आंतुडला । तो सांग पां काय आणिकें बांधिला । मग न सोडीच जऱ्ही नेला । तोडूनि अर्धा ॥७९॥

म्हणौनि आपणयां आपणचि रिपु । जेणें वाढविला हा संकल्पु । येर स्वयंबुद्धी म्हणे बापु । जो नाथिलें नेघे ॥८०॥

जितात्मनः प्रशान्तस्य परमात्मा समाहितः ।

शीतोष्णसुखदुःखेषु तथा मानापमानयोः ॥७॥

तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता । परमात्मा परौता । दुरी नाहीं ॥८१॥

जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रह्मत्व आहे । संकल्पलोपीं ॥८२॥

हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळों जाणें आकाशा । आना ठाया ॥८३॥

तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥८४॥

आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणीं । इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानांचीं ॥८५॥

जे जिये वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व होये । तैसें तया पावे तें आहे । तोचि म्हणौनी ॥८६॥

देखैं मेघौनि सुटती धारा । तिया न रुपती जैसिया सागरा । तैशीं शुभाशुभें योगीश्वरा । नव्हती आनें ॥८७॥

ज्ञ्यानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः ।

युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः ॥८॥

जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विवरितां जाहला वावो । मग लागला जंव पाहों । तंव ज्ञान तें तोचि ॥८८॥

आतां व्यापकु कीं एकदेशी । हे ऊहापोही जे ऐसी । ते करावी ठेली आपैशी । दुजेनवीण ॥८९॥

ऐसा शरीरीचि परी कौतुकें । परब्रह्माचेनि पाडें तुकें । जेणें जिंतलीं एकें । इंद्रियें गा ॥९०॥

तो जितेंद्रियु सहजें । तोचि योगयुक्तु म्हणिजे । जेणे सानें थोर नेणिजे । कवणें काळीं ॥९१॥

देखैं सोनयाचें निखळ । मेरुयेसणें ढिसाळ । आणि मातियेचें डिखळ । सरिसेंचि मानी ॥९२॥

पाहतां पृथ्वीचें मोल थोडें । ऐसें अनर्घ्य रत्न चोखडें । देखें दगडाचेनि पाडें । निचाडु ऐसा ॥९३॥

सुहृन्मित्रार्युदासीनमध्यस्थद्वेष्यबन्धुषु ।

साधुष्वपि च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते ॥९॥

तेथ सुहृद आणि शत्रु । कां उदासु आणि मित्रु । हा भावभेदु विचित्रु । कल्पूं कैंचा ॥९४॥

तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा । मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ॥९५॥

मग तयाचिये दिठी । अधमोत्तम असे किरीटी ? । काय परिसाचिये कसवटी । वानिया कीजे ? ॥९६॥

ते जैशी निर्वाण वर्णुचि करी । तैशी जयाची बुद्धी चराचरीं । होय साम्याची उजरी । निरंतर ॥९७॥

जे ते विश्वालंकाराचें विसुरे । जरी आहाती आनानें आकारें । तरी घडले एकचि भांगारें । परब्रह्में ॥९८॥

ऐसें जाणणें जें बरवें । तें फावलें तया आघवें । म्हणौनि आहाचवाहाच न झकवे । येणें आकारचित्रें ॥९९॥

घापे पटामाजि दृष्टी । दिसे तंतूंची सैंघ सृष्टी । परी तो एकवांचूनि गोठी । दुजी नाहीं ॥१००॥

ऐसेनि प्रतीती हें गवसे । ऐसा अनुभव जयातें असे । तोचि समबुद्धि हे अनारिसें । नव्हे जाणें ॥१०१॥

जयाचें नांव तीर्थरावो । दर्शनें प्रशस्तीसि ठावो । जयाचेनि संगें ब्रह्मभावो । भ्रांतासही ॥१०२॥

जयाचेनि बोलें धर्मु जिये । दिठी महासिद्धितें विये । देखैं स्वर्गसुखादि इयें । खेळु जयाचा ॥१०३॥

विपायें जरी आठवला चित्ता । तरी दे आपुली योग्यता । हें असो तयातें प्रशंसितां । लाभु आथि ॥१०४॥

योगी युञ्जीत सततमात्मानं रहसि स्थितः ।

एकाकी यतचित्तात्मा निराशीरपरिग्रहः ॥१०॥

पुढती अस्तवेना ऐसें । जया पाहलें अद्वैतदिवसें । मग आपणपांचि आपणु असे । अखंडित ॥१०५॥

ऐसिया दृष्टी जो विवेकी । पार्था तो एकाकी । सहजें अपरिग्रही जो तिहीं लोकीं । तोचि म्हणौनि ॥१०६॥

ऐसियें असाधारणें । निष्पन्नाचीं लक्षणें । आपुलेनि बहुवसपणें । श्रीकृष्ण बोले ॥१०७॥

जो ज्ञानियांचा बापु । देखणेयांचे दिठीचा दीपु । जया दादुलयाचा संकल्पु । विश्व रची ॥१०८॥

प्रणवाचिये पेठे । जाहलें शब्दब्रह्म माजिठे । तें जयाचिया यशा धाकुटें । वेढूं न पुरे ॥१०९॥

जयाचेनि आंगिकें तेजें । आवो रविशशीचिये वणिजे । म्हणौनि जग हें वेशजे । वीण असे तया ॥११०॥

हां गा नामचि एक जयाचें । पाहतां गगनही दिसे टांचें । गुण एकैक काय तयाचे । आकळशील तूं ॥१११॥

म्हणौनि असो हें वानणें । सांगों नेणों कवणाचीं लक्षणें । दावावीं मिषें येणें । कां बोलिलों तें ॥११२॥

ऐकें द्वैताचा ठावोचि फेडी । ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी । तरी अर्जुना पढिये हे गोडी । नासेल हन ॥११३॥

म्हणौनि तें तैसे बोलणें । नव्हे सपातळ आड लावणें । केलें मनचि वेगळवाणें । भोगावया ॥११४॥

जया सोऽहंभाव अटकु । मोक्षसुखालागोनि रंकु । तयाचिये दिठीचा झणें कळंकु । लागेल तुझिया प्रेमा ॥११५॥

विपाये अहंभावो ययाचा जाईल । मी तेंचि हा जरी होईल । तरी मग काय कीजेल । एकलेया ॥११६॥

दिठीची पाहतां निविजें । कां तोंड भरोनि बोलिजे । नातरी दाटूनि खेंव दीजे । ऐसें कवण आहे ? ॥११७॥

आपुलिया मना बरवी । असमाई गोठी जीवीं । ते कवणेंसि चावळावी । जरी ऐक्य जाहलें ॥११८॥

इया काकुळती जनार्दनें । अन्योपदेशाचेनि हाताशनें । बोलामाजि मन मनें । आलिंगूं सरलें ॥११९॥

हें परिसतां जरी कानडें । तरी जाण पां पार्थ उघडें । कृष्णसुखाचेंचि रूपडें । वोतलें गा ॥१२०॥

हें असो वयसेचिये शेवटीं । जैसें एकचि विये वांझोटी । मग ते मोहाची त्रिपुटी । नाचों लागे ॥१२१॥

तैसें जाहलें श्रीअनंता । ऐसें तरी मी न म्हणतां । जरी तयाचा न देखतां । अतिशयो एथ ॥१२२॥

पाहा पां नवल कैसें चोज । कें उपदेशु केउतें झुंज । परी पुढें वालभाचें भोज । नाचत असे ॥१२३॥

आवडी आणि लाजवी । व्यसन आणि शिणवी । पिसें आणि न भुलवी । तरी तेंचि काई ? ॥१२४॥

म्हणौनि भावार्थु तो ऐसा । अर्जुन मैत्रियेचा कुवासा । कीं सुखें श्रृंगारलिया मानसा । दर्पणु तो ॥१२५॥

यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र । तो श्रीकृष्णकृपे पात्र । याचिलागीं ॥१२६॥

हो कां आत्मनिवेदनातळींची । जे पीठिका होय सख्याची । पार्थु अधिष्ठात्री तेथिंची । मातृका गा ॥१२७॥

पासींचि गोसावी न वर्णिजे । मग पाइकाचा गुण घेईजे । ऐसा अर्जुनु तो सहजें । पढिये हरी ॥१२८॥

पाहां पां अनुरागें भजें । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वानिजे । पतिव्रता ? ॥१२९॥

तैसा अर्जुनचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनींचिया दैवां । एकायतनु जाहला ॥१३०॥

जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ती आवगें । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥१३१॥

तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनि आली ॥१३२॥

हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी बोलिजे तरी ऐशी । वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचे ॥१३३॥

कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्थु पडे गार । हेचि श्लोकार्थ कुमुदिनी फार । साविया होती ॥१३४॥

चाडचि निचाडां करी । ऐसी मनोरथीं ये थोरी । तेणें विवळले अंतरीं । तेथ डोलु आला ॥१३५॥

तें निवृत्तिदासें जाणितलें । मग अवधान द्या म्हणितलें । नवल पांडवकुळीं पाहलें । कृष्णदिवसें ॥१३६॥

देवकीया उदरीं वाहिला । यशोदा सायासें पाळिला । कीं शेखीं उपेगा गेला । पांडवांसी ॥१३७॥

म्हणौनि बहुदिवस वोळगावा । कां अवसरु पाहोनि विनवावा । हाही सोसु तया सदैवा । पडेचिना ॥१३८॥

हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें आंगीं । न ठकती माझ्या ॥१३९॥

एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥१४०॥

जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मियां होईजेल । काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल जें ॥१४१॥

हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघिजत असों अंतःकरणीं । ऐसी जहालेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥१४२॥

हें आंगें म्यां होईजो का । येतुलें गोसावी आपुलेपणें कीजो कां । तंव हांसोनि श्रीकृष्ण हो कां । करूं म्हणती ॥१४३॥

देखा संतोषु एक न जोडे । तंवचि सुखाचें सैंघ सांकडें । मग जोडलिया कवणीकडे । अपुरें असे ? ॥१४४॥

तैसा सर्वेश्वरु बळिया सेवकें । म्हणौनि ब्रह्मही होय तो कौतुकें । परि कैसा भारें आतला पिकें । दैवाचेनि ॥१४५॥

जो जन्मसहस्रांचियासाठीं । इंद्रादिकांही महागु भेटी । तो आधीनु केतुला किरीटी । जे बोलुही न साहे ॥१४६॥

मग ऐका जें पांडवें । म्हणितलें म्यां ब्रह्म होआवें । तें अशेषही देवें । अवधारिलें ॥१४७॥

तेथ ऐसेंचि एक विचारिलें । जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले । परि उदरा वैराग्य आहे आलें । बुद्धीचिया ॥१४८॥

एऱ्हवीं दिवस तरी अपुरे । परी वैराग्यवसंताचेनि भरें । जे सोऽहंभाव महुरे । मोडोनि आला ॥१४९॥

म्हणौनि प्राप्तिफळीं फळतां । यासि वेळु न लगेल आतां । होय विरक्तु ऐसा अनंता । भरंवसा जाहला ॥१५०॥

म्हणे जें जें हा अधिष्ठील । तें आरंभींच यया फळेल । म्हणौनि सांगितला न वचेल । अभ्यासु वायां ॥१५१॥

ऐसें विवरोनियां श्रीहरी । म्हणितलें तिये अवसरीं । अर्जुना हा अवधारीं । पंथराजु ॥१५२॥

तेथ प्रवृत्तितरूच्या बुडीं । दिसती निवृत्तिफळाचिया कोडी । जिये मार्गींचा कापडी । महेशु आझुनी ॥१५३॥

पैल योगवृंदे वहिलीं । आडवीं आकाशीं निघालीं । कीं तेथ अनुभवाच्या पाउलीं । धोरणु पडिला ॥१५४॥

तिहीं आत्मबोधाचेनि उजुकारें । धांव घेतली एकसरें । कीं येर सकळ मार्ग निदसुरे । सांडूनियां ॥१५५॥

पाठीं महर्षी येणें आले । साधकांचे सिद्ध जाहाले । आत्मविद थोरावले । येणेंचि पंथें ॥१५६॥

हा मार्गु जैं देखिजे । तैं तहान भूक विसरिजे । रात्रिदिवसु नेणिजे । वाटे इये ॥१५७॥

चालतां पाऊल जेथ पडे । तेथ अपवर्गाची खाणी उघडे । आव्हांटलिया तरी जोडे । स्वर्गसुख ॥१५८॥

निगिजे पूर्वींलिया मोहरा । कीं येइजे पश्चिमेचिया घरा । निश्चळपणें धनुर्धरा । चालणें एथिंचें ॥१५९॥

येणें मार्गें जया ठाया जाइजे । तो गांवो आपणचि होईजे । हें सांगों काय सहजें । जाणसी तूं ॥१६०॥

तेथ पार्थें म्हणितलें देवा । तरी तेंचि मग केव्हां । कां आर्तिसमुद्रौनि न काढावा । बुडतु जी मी ॥१६१॥

तंव श्रीकृष्ण म्हणती ऐसें । हें उत्सृंखळ बोलणें कायसें । आम्हीं सांगतसों आपैसें । वरि पुशिलें तुवां ॥१६२॥

शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मनः ।

नात्युच्छ्रितं नातिनीचं चैलाजिनकुशोत्तरम् ॥११॥

तरी विशेषें आतां बोलिजेल । परि तें अनुभवें उपेगा जाईल । म्हणौनि तैसें एक लागेल । स्थान पाहावें ॥१६३॥

जेथ अराणुकेचेनि कोडें । बैसलिया उठों नावडे । वैराग्यासी दुणीव चढे । देखिलिया जें ॥१६४॥

जो संतीं वसविला ठावो । संतोषासि सावावो । मना होय उत्सावो । धैर्याचा ॥१६५॥

अभ्यासुचि आपणयातें करी । हृदयातें अनुभवु वरी । ऐसी रम्यपणाची थोरी । अखंड जेथ ॥१६६॥

जया आड जातां पार्था । तपश्चर्या मनोरथा । पाखांडियाही आस्था । समूळ होय ॥१६७॥

स्वभावें वाटे येतां । जरी वरपडा जाहला अवचितां । तरी सकामुही परि माघौता । निघों विसरे ॥१६८॥

ऐसेनि न राहतयातें राहावी । भ्रमतयातें बैसवी । थापटूनि चेववी । विरक्तीतें ॥१६९॥

हें राज्य वर सांडिजे । मग निवांता एथेंचि असिजे । ऐसें श्रृंगारियांहि उपजे । देखतखेंवो ॥१७०॥

जें येणें मानें बरवंट । आणि तैसेंचि अतिचोखट । जेथ अधिष्ठान प्रगट । डोळां दिसे ॥१७१॥

आणिकही एक पहावें । जें साधकीं वसतें होआवें । आणि जनाचेनि पायरवें । रुळेचिना ॥१७२॥

जेथ अमृताचेनि पाडें । मुळाहीसकट गोडें । जोडती दाटें झाडें । सदा फळतीं ॥१७३॥

पाउला पाउला उदकें । वर्षाकाळेंही अतिचोखें । निर्झरें का विशेखें । सुलभें जेथ ॥१७४॥

हा आतपुही आळुमाळु । जाणिजे तरी शीतळु । पवनु अति निश्चळु । मंदु झुळके ॥१७५॥

बहुत करूनि निःशब्द । दाट न रिगे श्वापद । शुक हन षट्पद । तेउतें नाहीं ॥१७६॥

पाणिलगें हंसें । दोनी चारी सारसें । कवणे एके वेळे बैसे । तरी कोकिळही हो ॥१७७॥

निरंतर नाहीं । तरी आलीं गेलीं कांहीं । होतु कां मयूरेंही । आम्ही ना न म्हणों ॥१७८॥

परि आवश्यक पांडवा । ऐसा ठावो जोडावा । तेथ निगूढ मठ होआवा । कां शिवालय ॥१७९॥

दोहींमाजीं आवडे तें । जें मानलें होय चित्तें । बहुतकरूनि एकांते । बैसिजे गा ॥१८०॥

म्हणौनि तैसें तें जाणावें । मन राहतें पाहावें । राहील तेथ रचावें । आसन ऐसें ॥१८१॥

वरी चोखट मृगसेवडी । माजीं धूतवस्त्राची घडी । तळवटीं अमोडी । कुशांकुर ॥१८२॥

सकोमळ सरिसे । सुबद्ध राहती आपैसे । एकपाडें तैसें । वोजा घालीं ॥१८३॥

परि सावियाचि उंच होईल । तरी आंग हन डोलेल । नीच तरी पावेल । भूमिदोषु ॥१८४॥

म्हणौनि तैसें न करावें । समभावें धरावें । हें बहु असो होआवें । आसन ऐसें ॥१८५॥

तत्रैकाग्रं मनः कृत्वा यतचित्तेन्द्रियक्रियः ।

उपविश्यासने युञ्ज्याद्योगमात्मविशुद्धये ॥१२॥

मग तेथ आपण । एकाग्र अंतःकरण । करूनि सद्गुरुस्मरण । अनुभविजे ॥१८६॥

जेथ स्मरतेनि आदरें । सबाह्य सात्त्विकें भरे । जंव काठिण्य विरे । अहंभावाचें ॥१८७॥

विषयांचा विसरु पडे । इंद्रियांची कसमस मोडे । मनाची घडी घडे । हृदयामाजीं ॥१८८॥

ऐसें ऐक्य हें सहजें । फावें तंव राहिजे । मग तेणेंचि बोधें बैसिजे । आसनावरी ॥१८९॥

आतां आंगातें आंग वरी । पवनातें पवनु धरी । ऐसी अनुभवाची उजरी । होंचि लागे ॥१९०॥

प्रवृत्ति माघौति मोहरे । समाधि ऐलाडी उतरे । आघवें अभ्यासु सरे । बैसतखेंवो ॥१९१॥

मुद्रेची प्रौढी ऐशी । तेचि सांगिजेल आतां परियेसीं । तरी उरु या जघनासी । जडोनि घालीं ॥१९२॥

चरणतळें देव्हडीं । आधारद्रुमाच्या बुडीं । सुघटितें गाढीं । संचरीं पां ॥१९३॥

सव्य तो तळीं ठेविजे । तेणें सिवणीमध्यें पीडिजे । वरी बैसे तो सहजें । वाम चरणु ॥१९४॥

गुद मेंढ्राआंतौतीं । चारी अंगुळें निगुतीं । तेथ सार्ध सार्ध प्रांतीं । सांडूनियां ॥१९५॥

माजी अंगुळ एक निगे । तेथ टांचेचेनि उत्तरभागें । नेहेटिजे वरि आंगें । पेललेनि ॥१९६॥

उचलिलें कां नेणिजे । तैसें पृष्ठांत उचलिजे । गुल्फद्वय धरिजे । तेणेंचि मानें ॥१९७॥

मग शरीर संचु पार्था । अशेषही सर्वथा । पार्ष्णीचा माथा । स्वयंभु होय ॥१९८॥

अर्जुना हें जाण । मूळबंधाचें लक्षण । वज्रासन गौण । नाम यासी ॥१९९॥

ऐसी आधारीं मुद्रा पडे । आणि आधींचा मार्गु मोडे । तेथ अपानु आंतुलेकडे । वोहोटों लागे ॥२००॥

समं कायशिरोग्रीवं धारयन्नचलं स्थिरः ।

संप्रेक्ष्य नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन ॥१३॥

तंव करसंपुट आपैसें । वाम चरणीं बैसे । तंव बाहुमूळीं दिसे । थोरीव आली ॥२०१॥

माजीं उभारलेनि दंडें । शिरकमळ होय गाढें । नेत्रद्वारींचीं कवाडें । लागूं पाहती ॥२०२॥

वरचिलें पातीं ढळतीं । तळींचीं तळीं पुंजाळती । तेथ अर्धोन्मीलित स्थिती । उपजे तया ॥२०३॥

दिठी राहोनि आंतुलीकडे । बाहेर पाऊल घाली कोडें । ते ठायीं ठावो पडे । नासाग्रपीठीं ॥२०४॥

ऐसें आंतुच्या आंतुचि रचे । बाहेरी मागुतें न वचे । म्हणौनि राहणें आधिये दिठीचें । तेथेंचि होय ॥२०५॥

आतां दिशांची भेटी घ्यावी । कां रूपाची वास पहावी । हे चाड सरे आघवी । आपैसया ॥२०६॥

मग कंठनाळ आटे । हनुवटी हडौती दाटे । ते गाढी होऊनि नेहटे । वक्षःस्थळीं ॥२०७॥

माजीं घंटिका लोपे । वरी बंधु जो आरोपे । तो जालंधरु म्हणिपे । पंडुकुमरा ॥२०८॥

नाभीवरी पोखे । उदर हें थोके । अंतरीं फांके । हृदयकोशु ॥२०९॥

स्वाधिष्ठानावरिचिले कांठीं । नाभिस्थानातळवटीं । बंधु पडे किरीटी । वोढियाणा तो ॥२१०॥

प्रशांतात्मा विगतभीर्ब्रह्मचारिवरते स्थितः ।

मनः संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः ॥१४॥

कुंडलीनी दर्शन ॥ ॥

ऐसी शरीराबाहेरलीकडे । अभ्यासाची पांखर पडे । तंव आंतु त्राय मोडे । मनोधर्माची ॥२११॥

कल्पना निमे । प्रवृत्ती शमे । आंग मन विरमे । सावियाचि ॥२१२॥

क्षुधा काय जाहाली । निद्रा केउती गेली । हे आठवणही हारपली । न दिसे वेगां ॥२१३॥

जो मूळबंधें कोंडला । अपानु माघौता मुरडला । तो सवेंचि वरी सांकडला । धरी फुगूं ॥२१४॥

क्षोभलेपणें माजे । उवाइला ठायीं गाजे । मणिपूरेंसीं झुंजे । राहोनियां ॥२१५॥

मग थावलिये वाहटुळी । सैंघ घेऊनि घर डहुळी । बाळपणींची कुहीटुळी । बाहेर घाली ॥२१६॥

भीतरीं वळी न धरे । कोठ्यामाजीं संचरे । कफपित्तांचे थारे । उरों नेदी ॥२१७॥

धातूंचे समुद्र उलंडी । मेदाचे पर्वत फोडी । आंतली मज्जा काढी । अस्थिगत ॥२१८॥

नाडीतें सोडवी । गात्रांतें विघडवी । साधकातें भेडसावी । परी बिहावें ना ॥२१९॥

व्याधीतें दावी । सवेंचि हरवी । आप पृथ्वी कालवी । एकवाट ॥२२०॥

तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा । शक्ति करी उजगरा । कुंडलिनीतें ॥२२१॥

नागिणीचें पिलें । कुंकुमें नाहलें । वळण घेऊनि आलें । सेजे जैसें ॥२२२॥

तैशी ते कुंडलिनी । मोटकी औट वळणी । अधोमुख सर्पिणी । निदेली असे ॥२२३॥

विद्युल्लतेची विडी । वन्हिज्वाळांची घडी । पंधरेयाची चोखडी । घोंटीव जैशी ॥२२४॥

तैशी सुबद्ध आटली । पुटीं होती दाटली । तें वज्रासनें चिमुटली । सावधु होय ॥२२५॥

तेथ नक्षत्र जैसें उलंडलें । कीं सूर्याचें आसन मोडलें । तेजाचें बीज विरूढलें । अंकुरेंशीं ॥२२६॥

तैशी वेढियातें सोडिती । कवतिकें आंग मोडिती । कंदावरी शक्ती । उठली दिसे ॥२२७॥

सहजें बहुतां दिवसांची भूक । वरी चेवविली तें होय मिष । मग आवेशें पसरी मुख । ऊर्ध्वा उजू ॥२२८॥

तेथ हृदयकोशातळवटीं । जो पवनु भरे किरीटी । तया सगळेयाचि मिठी । देऊनि घाली ॥२२९॥

मुखींच्या ज्वाळीं । तळीं वरी कवळी । मांसाची वडवाळी । आरोगूं लागे ॥२३०॥

जे जे ठाय समांस । तेथ आहाच जोडे घाउस । पाठी एकदोनी घांस । हियाही भरी ॥२३१॥

मग तळवे तळहात शोधी । उर्ध्वींचे खंड भेदी । झाडा घे संधी । प्रत्यंगाचा ॥२३२॥

अधोभाग तरी न संडी । परि नखींचेंही सत्त्व काढी । त्वचा धुवूनि जडी । पांजरेशीं ॥२३३॥

अस्थींचे नळे निरपे । शिरांचे हीर वोरपे । तंव बाहेरी विरूढी करपे । रोमबीजांची ॥२३४॥

मग सप्तधातूंच्या सागरीं । ताहानेली घोंट भरी । आणि सवेंचि उन्हाळा करी । खडखडीत ॥२३५॥

नासापुटौनि वारा । जो जातसे अंगुळें बारा । तो गच्च धरूनि माघारा । आंतु घाली ॥२३६॥

तेथ अध वरौतें आकुंचे । ऊर्ध्व तळौतें खांचे । तया खेंवामाजि चक्राचे । पदर उरती ॥२३७॥

एऱ्हवीं तरी दोन्ही तेव्हांचि मिळती । परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती । ते तयांतें म्हणे परौती । तुम्हीचि कायसी एथें ? ॥२३८॥

आइकें पार्थिव धातु आघवी । आरोगितां कांहीं नुरवी । आणि आपातें तंव ठेवी । पुसोनियां ॥२३९॥

ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये । मग सौम्य होउनि राहे । सुषुम्नेपाशीं ॥२४०॥

तेथ तृप्तीचेनि संतोषें । गरळ जें वमी मुखें । तेणें तियेचेनि पीयूषें । प्राणु जिये ॥२४१॥

तो अग्नि आंतूनि निघे । परी सबाह्य निववूंचि लागे । ते वेळीं कसु बांधिती आंगें । सांडिला पुढती ॥२४२॥

मार्ग मोडिती नाडीचे । नवविधपण वायूचें । जाय म्हणौनि शरीराचे । धर्मु नाहीं ॥२४३॥

इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती । साही पदर फुटती । चक्रांचे हे ॥२४४॥

मग शशी आणि भानु । ऐसा कल्पिजे जो अनुमानु । तो वातीवरी पवनु । गिंवसितां न दिसे ॥२४५॥

बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे । तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजीं ॥२४६॥

तंव वरिलेकडोनि ढाळें । चंद्रामृताचें तळें । कानवडोनी मिळे । शक्तिमुखीं ॥२४७॥

तेणें नाळकें रस भरे । तो सर्वांगामाजीं संचरे । जेथिंचा तेथ मुरे । प्राणपवनु ॥२४८॥

तातलिये मुसें । मेण निघोनि जाय जैसें । मग कोंदली राहे रसें । वोतलेनी ॥२४९॥

तैसें पिंडाचेनि आकारें । ते कळाचि कां अवतरे । वरी त्वचेचेनि पदरे । पांघुरली असे ॥२५०॥

जैशी आभाळाची बुंथी । करूनि राहे गभस्ती । मग फिटलिया दीप्ति । धरूनि ये ॥२५१॥

तैसा आहाचवरि कोरडा । त्वचेचा असे पातोडा । तो झडोनि जाय कोंडा । जैसा होय ॥२५२॥

मग काश्मीरीचे स्वयंभ । कां रत्नबीजा निघाले कोंभ । अवयवकांतीची भांब । तैसी दिसे ॥२५३॥

नातरी संध्यारागींचे रंग । काढूनि वळिलें तें आंग । कीं अंतर्ज्योतीचें लिंग । निर्वाळिलें ॥२५४॥

कुंकुमाचें भरींव । सिद्धरसाचें वोतींव । मज पाहतां सावेव । शांतिचि ते ॥२५५॥

तें आनंदचित्रींचें लेप । नातरी महासुखाचें रूप । कीं संतोषतरूचें रोप । थांबलें जैसें ॥२५६॥

तो कनकचंपकाचा कळा । कीं अमृताचा पुतळा । नाना सासिन्नला मळा । कोंवळिकेचा ॥२५७॥

हो कां जे शारदियेचेनि वोलें । चंद्रबिंब पाल्हेलें । कां तेजचि मूर्त बैसलें । आसनावरी ॥२५८॥

तैसें शरीर होये । जे वेळीं कुंडलिनी चंद्र पीये । मग देहाकृति बिहे । कृतांतु गा ॥२५९॥

वार्धक्य तरी बहुडे । तारुण्याची गांठी विघडे । लोपली उघडे । बाळदशा ॥२६०॥

वयसा तरी येतुलेवरी । एऱ्हवीं बळाचा बळार्थु करी । धैर्याची थोरी । निरुपमु ॥२६१॥

कनकद्रुमाच्या पालवीं । रत्नकळिका नित्य नवी । नखें तैसीं बरवीं । नवीं निघती ॥२६२॥

दांतही आन होती । परि अपाडें सानेजती । जैसी दुबाहीं बैसे पांती । हिरेयांची ॥२६३॥

माणिकुलियांचिया कणिया । सावियाचि अणुमानिया । तैसिया सर्वांगीं उधवती अणियां । रोमांचियां ॥२६४॥

करचरणतळें । जैसीं कां रातोत्पलें । पाखाळींव होती डोळे । काय सांगों ॥२६५॥

निडाराचेनि कोंदाटें । मोतियें नावरती संपुटें । मग शिवणी जैशी उतटे । शुक्तिपल्लवांची ॥२६६॥

तैशीं पातियांचिये कवळिये न समाये । दिठी जाकळोनि निघों पाहे । आधिलीचि परी होये । गगना कवळिती ॥२६७॥

आइके देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें । जे आप आणि पृथ्वीचे । अंशु नाहीं ॥२६८॥

मग समुद्रापैलीकडील देखे । स्वर्गींचा आलोचु आइके । मनोगत वोळखे । मुंगियेचें ॥२६९॥

पवनाचा वारिकां वळघे । चाले तरी उदकीं पाऊल न लागे । येणें येणें प्रसंगें । येती बहुता सिद्धि ॥२७०॥

आइकें प्राणाचा हातु धरूनी । गगनाची पाउटी करूनी । मध्यमेचेनि दादराहुनी । हृदया आली ॥२७१॥

ते कुंडलिनी जगदंबा । जे चैतन्यचक्रवर्तीची शोभा । जया विश्वबीजाचिया कोंभा । साउली केली ॥२७२॥

जे शून्यलिंगाची पिंडी । जे परमात्मया शिवाची करंडी । जे प्रणवाची उघडी । जन्मभूमी ॥२७३॥

हें असो ते कुंडलिनी बाळी । हृदयाआंतु आली । अनुहताची बोली । चावळे ते ॥२७४॥

शक्तीचिया आंगा लागलें । बुद्धीचें चैतन्य होतें जाहलें । तें तेणें आइकिलें । अळुमाळु ॥२७५॥

घोषाच्या कुंडीं । नादचित्रांचीं रूपडीं । प्रणवाचिया मोडी । रेखिलीं ऐसीं ॥२७६॥

हेंचि कल्पावें तरी जाणिजे । परी कल्पितें कैचें आणिजे । तरी नेणों काय गाजे । तिये ठायीं ॥२७७॥

विसरोनि गेलों अर्जुना । जंव नाशु नाहीं पवना । तंव वाचा आथी गगना । म्हणौनि घुमे ॥२७८॥

तया अनाहताचेनि मेघें । आकाश दुमदुमों लागे । तंव ब्रह्मस्थानींचें बेगें । सहज फिटे ॥२७९॥

आइकें कमळगर्भाकारें । जें महदाकाश दुसरें । जेथ चैतन्य आधातुरें । करूनि असिजे ॥२८०॥

तया हृदयाच्या परिवरीं । कुंडलिनिया परमेश्वरी । तेजाची शिदोरी । विनियोगिली ॥२८१॥

बुद्धीचेनि शाकें । हातबोनें निकें । द्वैत तेथ न देखे । तैसें केलें ॥२८२॥

निजकांती हारविली । मग प्राणुचि केवळ जाहाली । ते वेळीं कैसी गमली । म्हणावी पां ? ॥२८३॥

हो कां जे पवनाची पुतळी । पांघुरली होती सोनसळी । ते फेडूनियां वेगळी । ठेविली तिया ॥२८४॥

नातरी वायूचेनि आंगें झगटली । दीपाची दिठी निवटली । कां लखलखोनि हारपली । वीजु गगनीं ॥२८५॥

तैशी हृदयकमळवेऱ्हीं । दिसे जैशी सोनियाची सरी । नातरी प्रकाशजळाची झरी । वाहत आली ॥२८६॥

मग ते हृदयभूमी पोकळे । जिराली कां एके वेळे । तैसें शक्तीचें रूप मावळे । शक्तीचिमाजीं ॥२८७॥

तेव्हां तरी शक्तीचि म्हणिजे । एऱ्हवीं तो प्राणु केवळ जाणिजे । आतां नादुबिंदु नेणिजे । कळा ज्योती ॥२८८॥

मनाचा हन मारु । कां पवनाचा आधारु । ध्यानाचा आदरु । नाहीं परी ॥२८९॥

हे कल्पना घे सांडी । तें नाहीं इये परवडी । हे महाभूतांची फुडी । आटणी देखां ॥२९०॥

पिंडें पिंडाचा ग्रासु । तो हा नाथसंकेतींचा दंशु । परि दाऊनि गेला उद्देशु । श्रीमहाविष्णु ॥२९१॥

तया ध्वनिताचें केणें सोडुनि । यथार्थाची घडी झाडुनी । उपलविली म्यां जाणुनी । ग्राहीक श्रोते ॥२९२॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः ।

शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥१५॥

ऐकें शक्तीचें तेज जेव्हां लोपे । तेथ देहाचें रूप हारपे । मग तो डोळ्यांमाजीं लपे । जगाचिया ॥२९३॥

एऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी दिसे । परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥२९४॥

नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनी उभा । कां अवयवचि नभा । उदयला तो ॥२९५॥

तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनीं ॥२९६॥

देखें साधकु निघोनि जाये । मागां पाउलांची वोळ राहे । तेथ ठायीं ठायीं होये । अणिमादिक ॥२९७॥

परि तेणें काय काज आपणयां । अवधारीं ऐसा धनंजया । लोप आथी भूतत्रया । देहींचा देहीं ॥२९८॥

पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी । तेजातें पवनु हरवी । हृदयामाजीं ॥२९९॥

पाठीं आपण एकला उरे । परि शरीराचेनि अनुकारें । मग तोही निगे अंतरें । गगना मिळे ॥३००॥

ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मग मारुती ऐसें नाम होये । परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥३०१॥

मग जालंधर सांडी । ककारांत फोडी । गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥३०२॥

ते ॐ काराचिये पाठी । पाय देत उठाउठी । पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥३०३॥

पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाच्या अंतरीं । भरती गमे सागरीं । सरिता जेवीं ॥३०४॥

मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाच्या बाह्या पसरुनी । परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ॥३०५॥

तंव महाभूतांची जवनिका फिटे । मग दोहींसि होय झटें । तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥३०६॥

पैं मेघाचेनि मुखीं निवडिला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपयां ॥३०७॥

तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥३०८॥

आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ॥३०९॥

गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥३१०॥

म्हणौनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु । जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ॥३११॥

अर्जुना एऱ्हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्व धरी । ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥३१२॥

भ्रूलता मागिलीकडे । तेथ मकाराचेंचि आंग न मांडे । सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥३१३॥

पाठीं तेथेंचि तो भेसळला । तैं शब्दाचा दिवो मावळला । मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥३१४॥

आतां महाशून्याचिया डोहीं । जेथ गगनसीचि थावो नाहीं । तेथ तागा लागेल काई । बोलाचा इया ? ॥३१५॥

म्हणौनि आखरामाजीं सांपडे । कीं कानवरी जोडे । हे तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥३१६॥

जें कहीं दैवें । अनुभविलें फावे । तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ॥३१७॥

पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणौनि असो किती हेंचि । बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥३१८॥

ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे । वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥३१९॥

जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य । अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥३२०॥

जें विश्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ । जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥३२१॥

जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु । जेथ आदि आणि अंतु । विरोनी गेले ॥३२२॥

जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज । एवं पार्था जें निज । स्वरूप माझें ॥३२३॥

ते हे चतुर्भुज कोंभेली । जयाची शोभा रूपा आली । देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृंदें ॥३२४॥

तें अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले जे पुरुष । जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥३२५॥

आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीरीं जिहीं केलें । ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥३२६॥

परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसें । वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ॥३२७॥

जरी हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्वचि हें अवघें झांके । तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ॥३२८॥

कां जें आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो । तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥३२९॥

इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरंवसेनि ब्रह्मत्वा येती । हें सांगतियाची रीती । कळलें मज ॥३३०॥

देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता । मा अनुभवें तल्लीनता । नोहेल केवीं ? ॥३३१॥

म्हणौनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं । परी नावभरी चित्त देईं । बोला एका ॥३३२॥

आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु । परि न शकें करूं पांगु । योग्यतेचा ॥३३३॥

सहजें आंगिक जेतुलें आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये । तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥३३४॥

नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपें जरी न ठकेल । तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥३३५॥

जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण । मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥३३६॥

हां हो जी अवधारिलें । जें हें साधन तुम्हीं निरूपिलें । तें आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ? ॥३३७॥

कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं । तेथ श्रीकृष्ण म्हणती काई । धनुर्धरा ॥३३८॥

हें काज कीर निर्वाण । परि आणिकही जें कांहीं साधारण । तेंही अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ? ॥३३९॥

पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची अधीन जाणिजे । कां जे योग्य होऊनि कीजे । तें आरंभिलें फळें ॥३४०॥

तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं । आणि योग्यतेची काई । खाणी असे ? ॥३४१॥

नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु । तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ? ॥३४२॥

येतुलालिये आयणीमाजिवडें । योग्यपण तूतेंही जोडे । ऐसें प्रसंगें सांकडें । फेडिलें तयाचें ॥३४३॥

मग म्हणे पार्था । ते हे ऐसी व्यवस्था । अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥३४४॥

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।

न चाति स्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥१६॥

जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला । तो नाहींच एथ म्हणितला । अधिकारिया ॥३४५॥

अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी । आहारातें तोडी । मारूनियां ॥३४६॥

निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे । तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ? ॥३४७॥

म्हणौनि अतिशयें विषयो सेवावा । तैसा विरोधु नोहावा । कां सर्वथा निरोधावा । हेंही नको ॥३४८॥

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥१७॥

आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे । क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥३४९॥

मितला बोलीं बोलिजे । मितलिया पाउलीं चालिजे । निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥३५०॥

जागणें जरी जाहलें । तरी होआवें तें मितलें । येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सहजें ॥३५१॥

ऐसें युक्तीचेनि हातें । जें इंद्रियां वोपिजे भातें । तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥३५२॥

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।

निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा ॥१८॥

बाहेर युक्तीची मुद्रा पडे । तव आंत आंत सुख वाढे । तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥३५३॥

जैसें भाग्याचिया भडसें । उद्यमाचेनि मिसें । मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥३५४॥

तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिया मोहरा ठाके । आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥३५५॥

म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा । तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकारिजे ॥३५६॥

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥१९॥

युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग जेथ होय बरवें । तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥३५७॥

तयातें योगयुक्त तूं म्हण । हेंही प्रसंगें जाण । तें दीपाचे उपलक्षण । निर्वातींचिया ॥३५८॥

आतां तुझें मनोगत जाणोनी । कांहीं एक आम्ही म्हणौनि । तें निकें चित्त देउनी । परिसावें गा ॥३५९॥

तूं प्राप्तीची चाड वाहसी । परी अभ्यासीं दक्षु नव्हसी । तें सांग पां काय बिहसी । दुवाडपणा ? ॥३६०॥

तरी पार्था हें झणें । सायास घेशीं हो मनें । वायां बागूल इये दुर्जनें । इंद्रियें करिती ॥३६१॥

पाहें पां आयुष्यातें अढळ करी । जें सरतें जीवित वारी । तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ? ॥३६२॥

ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुःखें । एऱ्हवीं सोपें योगासारिखें । कांहीं आहे ? ॥३६३॥

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।

यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥२०॥

सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।

वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥२१॥

म्हणौनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका । तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥३६४॥

एऱ्हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदाण लागे । तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥३६५॥

परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे । देखतखेवों वोळखे । म्हणे तत्त्व हें मी ॥३६६॥

तिये ओळखीचिसरिसें । सुखाचिया साम्राज्यीं बैसे । मग आपणपां समरसें । विरोनि जाय ॥३६७॥

जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं । तें आपणचि आपुलिया ठायीं । होऊनि ठाके ॥३६८॥

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन्स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥२२॥

मग मेरूपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरें । दाटिजो पां पडिभरें । चित्त न दटे ॥३६९॥

कां शस्त्रें वरी तोडिलिया । देह अग्निमाजीं पडलिया । चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥३७०॥

ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वासु न पाहे । आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥३७१॥

तं विद्याद् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।

स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥२३॥

जया सुखाचिया गोडी । मग आर्तीची सेचि सोडी । संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥३७२॥

जें योगाची बरव । संतोषाची राणिव । ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥३७३॥

तें अभ्यासिलेनि योगें । सावयव देखावें लागे । देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥३७४॥

संकल्पप्रभवान्कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥२४॥

तरि तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा । जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥३७५॥

हां विषयातें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे । तरी हियें घालूनि मुके । जीवित्वासी ॥३७६॥

ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी । सुखें धृतीचिया धवळारीं । बुद्धि नांदे ॥३७७॥

शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनः कृत्वा न कींचिदपि चिन्तयेत् ॥२५॥

यतो यतो निश्चरति मनश्चंचलमस्थिरम् ।

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥२६॥

बुद्धी धैर्या होय वसौटा । मनातें अनुभवाचिया वाटा । हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥३७८॥

याही एके परी । प्राप्ती आहे विचारीं । हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥३७९॥

आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला । जैसा कृतनिश्चयाचिया बोला । बाहेरा नोहे ॥३८०॥

जरी येतुलेनि चित्त स्थिरावें । तरी काजा आलें स्वभावें । नाहीं तरी घालावें । मोकलुनी ॥३८१॥

मग मोकलिलें जेथ जाईल । तेथूनि नियमूचि घेउनि येईल । ऐसेनि स्थैर्यचि होईल । सावियाचि कीं ॥३८२॥

प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।

उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥२७॥

पाठीं केतुलेनि एके वेळे । तया स्थैर्याचेनि मेळें । आत्मस्वरूपाजवळें । येईल सहजें ॥३८३॥

तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल । आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥३८४॥

आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे । तैं गगनचि कां भरे । विश्व जैसें ॥३८५॥

तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये । ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥३८६॥

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।

सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥२८॥

या सोपिया योगस्थिती । उकलु देखिला गा बहुतीं । संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥३८७॥

तें सुखाचेनि सांगातें । आलें परब्रह्मा आंतौतें । तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणें ॥३८८॥

तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं । महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥३८९॥

ऐसें आपुले पायवरी । चालिजे आपुले पाठीवरी । हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥३९०॥

सर्वभूतस्थमात्मानं सर्वभूतानि चात्मनि ।

ईक्षते योगयुक्तात्मा सर्वत्र समदर्शनः ॥२९॥

यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति ।

तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति ॥३०॥

तरी मी तंव सकळ देहीं । असे एथ विचारु नाहीं । आणि तैसेंचि माझ्या ठायीं । सकळ असे ॥३९१॥

हें ऐसेंचि संचलें । परस्परें मिसळलें । बुद्धी घेपे एतुलें । होआवें गा ॥३९२॥

एऱ्हवीं तरी अर्जुना । जो एकवटलिया भावना । सर्वभूतीं अभिन्ना । मातें भजे ॥३९३॥

भूतांचेनि अनेकपणें । अनेक नोहे अंतःकरणें । केवळ एकत्वचि माझें जाणें । सर्वत्र जो ॥३९४॥

मग तो एक हा मियां । बोलता दिसतसे वायां । एऱ्हवीं न बोलिजे तरी धनंजया । तो मीचि आहें ॥३९५॥

दीपा आणि प्रकाशा । एकवंकीचा पाडु जैसा । तो माझ्या ठायीं तैसा । मी तयामाजीं ॥३९६॥

जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु । तैसा माझेनि रूपें रूपसु । पुरुषु तो गा ॥३९७॥

सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः ।

सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते ॥३१॥

जेणें ऐक्याचिये दिठी । सर्वत्र मातेंचि किरीटी । देखिला जैसा पटीं । तंतु एकु ॥३९८॥

कां स्वरूपें तरी बहुतें आहाती । परी तैसीं सोनीं बहुवें न होती । ऐसी ऐक्याचळाची स्थिती । केली जेणें ॥३९९॥

नातरी वृक्षांचीं पानें जेतुलीं । तेतुलीं रोपें नाहीं लाविलीं । ऐसी अद्वैतदिवसें पाहली । रात्री जया ॥४००॥

तो पंचात्मकीं सांपडे । तरी मग सांग पां कैसेनि अडे ? । जो प्रतीतीचेनि पाडें । मजसीं तुके ॥४०१॥

माझें व्यापकपण आघवें । गवसलें तयाचेनि अनुभवें । तरी न म्हणतां स्वभावें । व्यापकु जाहला ॥४०२॥

आतां शरीरीं तरी आहे । परी शरीराचा तो नोहे । ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ॥४०३॥

आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन ।

सुखं वा यदि वा दुःखं स योगी परमो मतः ॥३२॥

म्हणौनि असो तें विशेषें । आपणपेयांसारिखें । जो चराचर देखे । अखंडित ॥४०४॥

सुखदुःखादि वर्में । कां शुभाशुभें कर्में । दोनी ऐसीं मनोधर्में । नेणेचि जो ॥४०५॥

हें सम विषम भाव । आणिकही विचित्र जें सर्व । तें मानी जैसे अवयव । आपुले होती ॥४०६॥

हें एकैक काय सांगावें । जया त्रैलोक्यचि आघवें । मी ऐसें स्वभावें । बोधा आलें ॥४०७॥

तयाही देह एकु कीर आथी । लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती । परी आम्हांतें ऐसी प्रतीती । परब्रह्मचि हा ॥४०८॥

म्हणौनि आपणपां विश्व देखिजे । आणि आपण विश्व होईजे । ऐसें साम्यचि एक उपासिजे । पांडवा गा ॥४०९॥

हें तूतें बहुतीं प्रसंगीं । आम्ही म्हणों याचिलागीं । जे साम्यापरौती जगीं । प्राप्ति नाहीं ॥४१०॥

अर्जुन उवाच ।

योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन ।

एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात्स्थितिं स्थिराम् ॥३३॥

चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथि बलवद्दृढम् ।

तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम् ॥३४॥

तंव अर्जुन म्हणे देवा । तुम्ही सांगा कीर आमुचिया कणवा । परी न पुरों जी स्वभावा । मनाचिया ॥४११॥

हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडें । एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ॥४१२॥

म्हणौनि ऐसें कैसें घडेल । जे मर्कट समाधी येईल । कां राहा म्हणतलिया राहेल । महावातु ? ॥४१३॥

जें बुद्धीतें सळी । निश्चयातें टाळी । धैर्येसीं हातफळी । मिळऊनि जाय ॥४१४॥

जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी । बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ॥४१५॥

जें निरोधलें घे उवावो । जया संयमुचि होय सावावो । तें मन आपुला स्वभावो । सांडील काई ? ॥४१६॥

म्हणौनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसि साम्य होईल । हें विशेषेंही न घडेल । याचिलागीं ॥४१७॥

श्रीभगवानुवाच ।

असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् ।

अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते ॥३५॥

तंव कृष्ण म्हणती साचचि । बोलत आहासि तें तैसेंचि । यया मनाचा कीर चपळचि । स्वभावो गा ॥४१८॥

परि वैराग्याचेनि आधारें । जरी लाविलें अभ्यासाचिये मोहरें । तरी केतुलेनि एके अवसरें । स्थिरावेल ॥४१९॥

कां जें यया मनाचें एक निकें । जें देखिलें गोडीचिया ठाया सोके । म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें । दावीत जाइजे ॥४२० ॥

असंयतात्मना योगो दुष्प्राप इति मे मतिः ।

वश्यात्मना तु यतता शक्योऽवाप्तुमुपायतः ॥३६॥

एऱ्हवीं विरक्ति जयांसि नाहीं । जे अभ्यासीं न रिघती कहीं । तयां नाकळे हें आम्हीही । न मनूं कायी ॥४२१॥

परि यमनियमांचिया वाटा न वचिजे । कहीं वैराग्याची से न करिजे । केवळ विषयजळीं ठाकिजे । बुडी देउनी ॥४२२॥

यया जालिया मानसा कहीं । युक्तीची कांबी लागली नाहीं । तरी निश्चळ होईल काई । कैसेनि सांगें ? ॥४२३॥

म्हणौनि मनाचा निग्रहो होये । ऐसा उपाय जो आहे । तो आरंभीं मग नोहे । कैसा पाहों ॥४२४॥

तरी योगसाधन जितुकें । कें अवघेंचि काय लटिकें ? । परि आपणयां अभ्यासूं न ठाके । हेंचि म्हण ॥४२५॥

आंगीं योगाचें होय बळ । तरी मन केतुलें चपळ ? । काय महदादि हें सकळ । आपु नोहे ? ॥४२६॥

तेथ अर्जुन म्हणे निकें । देवो बोलती तें न चुके । साचचि योगबळेंसीं न तुके । मनोबळ ॥४२७॥

तरी तोचि योगु कैसा केवीं जाणों । आम्ही येतुले दिवस याची मातुही नेणों । म्हणौनि मनातें जी म्हणों । अनावर ॥४२८॥

हा आतां अघवेया जन्मा । तुझेनि प्रसादें पुरुषोत्तमा । योगपरिचयो आम्हां । जाहला आजी ॥४२९॥

अर्जुन उवाच ।

अयतिः श्रद्धयोपेतो योगाच्चलितमानसः ।

अप्राप्य योगसंसिद्धि कां गतिं कृष्ण गच्छति ॥३७॥

कच्चिन्नोभयविभ्रष्टश्छिन्नाभ्रमिव नश्यति ।

अप्रतिष्ठो महाबाहो विमूढो ब्रह्मणः पथि ॥३८॥

एतन्मे संशयं कृष्ण छेत्तुमर्हस्यशेषतः ।

त्वदन्यः संशयस्यास्य छेत्ता न ह्युपपद्यते ॥३९॥

परि आणिक एक गोसांविया । मज संशयो असे साविया । तो तूं वांचूनि फेडावया । समर्थु नाहीं ॥४३०॥

म्हणौनि सांगें गोविंदा । कवण एकु मोक्षपदा । झोंबत होता श्रद्धा । उपायेंविण ॥४३१॥

इंद्रियग्रामोनि निघाला । आस्थेचिया वाटे लागला । आत्मसिद्धिचिया पुढिला । नगरा यावया ॥४३२॥

तंव आत्मसिद्धि न ठकेचि । आणि मागुतें न येववेचि । ऐसा अस्तु गेला माझारींचि । आयुष्यभानु ॥४३३॥

जैसें अकाळीं आभाळ । अळुमाळु सपातळ । विपायें आलें केवळ । वसे ना वर्षे ॥४३४ ॥

तैसीं दोन्ही दुरावलीं । जे प्राप्ती तंव अलग ठेली । आणि अप्राप्तीही सांडवली । श्रद्धा तया ॥४३५॥

ऐसा दोंला अंतरला कां जी । जो श्रद्धेच्या समाजीं । बुडाला तया हो जी । कवण गति ? ॥४३६॥

श्रीभगवानुवाच ।

पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते ।

न हि कल्याणकृत्कश्चिद्दुर्गतिं तात गच्छति ॥४०॥

तंव कृष्ण म्हणती पार्था । जया मोक्षसुखीं आस्था । तया मोक्षावांचूनि अन्यथा । गती आहे गा ? ॥४३७॥

परि एतुलें हेंचि एक घडे । जें माझारीं विसवावें पडे । तेंही परी ऐसेनि सुरवाडें । जो देवां नाहीं ॥४३८॥

एऱ्हवीं अभ्यासाचा उचलता । पाउलीं जरी चालता । तरी दिवसाआधीं ठाकिता । सोऽहंसिद्धीतें ॥४३९॥

परि तेतुला वेगु नव्हेचि । म्हणौनि विसांवा तरी निकाचि । पाठीं मोक्षु तंव तैसाचि । ठेविला असे ॥४४०॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः ।

शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥४१॥

ऐकें कवतिक हें कैसें । जें शतमखा लोक सायासें । तें तो पावे अनायासें । कैवल्यकामु ॥४४१॥

मग तेथिंचे जे अमोघ । अलौकिक भोग । भोगितांही सांग । कांटाळे मन ॥४४२॥

हा अंतरायो अवचितां । कां वोढवला भगवंता ? । ऐसा दिविभोग भोगितां । अनुतापी नित्य ॥४४३॥

पाठीं जन्में संसारीं । परि सकळ धर्माचिया माहेरीं । लांबा उगवे आगरीं । विभवश्रियेचा ॥४४४॥

जयातें नीतिपंथें चालिजे । सत्यधूत बोलिजे । देखावें तें देखिजे । शास्त्रदृष्टीं ॥४४५॥

वेद तो जागेश्वरु । जया व्यवसाय निजाचारु । सारासार विचारु । मंत्री जया ॥४४६॥

जयाच्या कुळीं चिंता । जाली ईश्वराची पतिव्रता । जयातें गृहदेवता । आदि ऋद्धि ॥४४७॥

ऐसी निजपुण्याची जोडी । वाढिन्नली सर्वसुखाची कुळवाडी । तिये जन्मे तो सुरवाडी । योगच्युतु ॥४४८॥

अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।

एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम् ॥४२॥

तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।

यतते च ततो भूयः संसिद्धौ कुरुनन्दन ॥४३॥

अथवा ज्ञानाग्निहोत्री । जे परब्रह्मण्यश्रोत्री । महासुखक्षेत्रीं । आदिवंत ॥४४९॥

जे सिद्धांताचिया सिंहासनीं । राज्य करिती त्रिभुवनीं । जे कूजती कोकिल वनीं । संतोषाच्या ॥४५०॥

जे विवेकद्रुमाचे मुळीं । बैसले आहाति नित्य फळीं । तया योगियांचिया कुळीं । जन्म पावे ॥४५१॥

मोटकी देहाकृति उमटे । आणि निजज्ञानाची पाहांट फुटे । सूर्यापुढें प्रगटे । प्रकाशु जैसा ॥४५२॥

तैसी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गांवा न येतां । बाळपणींच सर्वज्ञता । वरी तयातें ॥४५३॥

तिये सिद्धप्रज्ञेचेनि लाभें । मनचि सारस्वतें दुभे । मग सकळ शास्त्रे स्वयंभें । निघती मुखें ॥४५४॥

ऐसें जे जन्म । जयालागीं देव सकाम । स्वर्गीं ठेले जप होम । करिती सदा ॥४५५॥

अमरीं भाट होईजे । मग मृत्युलोकातें वानिजे । ऐसें जन्म पार्था गा जे । तें तो पावे ॥४५६॥

पूर्वाभ्यासेन तेनैव ऱ्हियते ह्यवशोऽपि सः ।

जिज्ञासुरपि योगस्य शब्दब्रह्मातिवर्तते ॥४४॥

आणि मागील जे सद्बुद्धि । जेथ जीवित्वा जाहाली होती अवधि । मग तेचि पुढती निरवधि । नवी लाहे ॥४५७॥

तेथ सदैवा आणि पायाळा । वरी दिव्यांजन होय डोळां । मग देखे जैसी अवलीळा । पाताळधनें ॥४५८॥

तैसें दुर्भेद जे अभिप्राय । कां गुरुगम्य हन ठाय । तेथ सौरसेंवीण जाय । बुद्धि तयाची ॥४५९॥

बळियें इंद्रियें येती मना । मन एकवटे पवना । पवन सहजें गगना । मिळोंचि लागे ॥४६०॥

ऐसें नेणों काय अपैसें । तयातेंचि कीजे अभ्यासें । समाधि घर पुसे । मानसाचें ॥४६१॥

जाणिजे योगपीठीचा भैरवु । काय हा आरंभरंभेचा गौरवु । कीं वैराग्यसिद्धीचा अनुभवु । रूपा आला ॥४६२॥

हा संसारु उमाणितें माप । कां अष्टांगसामग्रीचें द्वीप । जैसें परिमळेंचि धरिजे रूप । चंदनाचें ॥४६३॥

तैसा संतोषाचा काय घडिला । कीं सिद्धिभांडारींहूनि काढिला । दिसे तेणें मानें रूढला । साधकदशे ॥४६४॥

प्रयत्नाद्यतमानस्तु योगी संशुद्धकिल्बिषः ।

अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥४५॥

जे वर्षशतांचिया कोडी । जन्मसहस्रांचिया आडी । लंघितां पातला थडी । आत्मसिद्धीची ॥४६५॥

म्हणौनि साधनजात आघवें । अनुसरे तया स्वभावें । मग आयतिये बैसे राणिवे । विवेकाचिये ॥४६६॥

पाठीं विचारितया वेगां । तो विवेकुही ठाके मागां । मग अविचारणीय तें आंगा । घडोनि जाय ॥४६७॥

तेथ मनाचें मेहुडें विरे । पवनाचें पवनपण सरे । आपणपां आपण मुरे । आकाशही ॥४६८॥

प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे । म्हणौनि आधींचि बोलु बहुडे । तयालागीं ॥४६९॥

ऐसी ब्रह्मींची स्थिती । जे सकळां गतींसी गती । तया अमूर्ताची मूर्ति । होऊनि ठाके ॥४७०॥

तेणें बहुतीं जन्मीं मागिलीं । विक्षेपांचीं पाणिवळें झाडिलीं । म्हणौनि उपजतखेंवो बुडाली । लग्नघटिका ॥४७१॥

आणि तद्रूपतेसीं लग्न । लागोनि ठेलें अभिन्न । जैसे लोपलें अभ्र गगन । होऊनि ठाके ॥४७२॥

तैसें विश्व जेथ होये । मागौतें जेथ लया जाये । तें विद्यमानेंचि देहें । जाहला तो गा ॥४७३॥

तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः ।

कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद्योगी भवार्जुन ॥४६॥

जया लाभाचिया आशा । करूनि धैर्यबाहूंचा भरंवसा । घालीत षट्कर्मांचा धारसां । कर्मनिष्ठ ॥४७४॥

कां जिये एक वस्तूलांगीं । बाणोनि ज्ञानाची वज्रांगी । झुंजत प्रपंचेंशीं समरंगीं । ज्ञानिये गा ॥४७५॥

अथवा निलागें निसरडा । तपोदुर्गाचा आडकडा । झोंबती तपिये चाडा । जयाचिया ॥४७६॥

जें भजतियां भज्य । याज्ञिकांचें याज्य । एवं जें पूज्य । सकळां सदा ॥४७७॥

तेंचि तो आपण । स्वयें जाहला निर्वाण । जें साधकांचें कारण । सिद्ध तत्त्व ॥४७८॥

म्हणौनि कर्मनिष्ठा वंद्यु । तो ज्ञानियांसि वेद्यु । तापसांचा आद्यु । तपोनाथु ॥४७९॥

पैं जीवपरमात्मसंगमा । जयाचें येणें जाहलें मनोधर्मा । तो शरीरीचि परी महिमा । ऐशी पावे ॥४८०॥

म्हणौनि याकारणें । तूंतें मी सदा म्हणें । योगी होईं अंतःकरणें । पंडुकुमरा ॥४८१॥

योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।

श्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मतः ॥४७॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे ध्यानयोगो नाम षष्ठोध्यायः ॥६॥

अगा योगी जो म्हणिजे । तो देवांचा देवो जाणिजे । आणि सुख सर्वस्व माझें । चैतन्य तो ॥४८२॥

तेथ भजता भजन भजावें । हें भक्तिसाधन जें आघवें । तो मीचि जाहलों अनुभवें । अखंडित ॥४८३॥

मग तया आम्हां प्रीतीचें । स्वरूप बोलीं निर्वचे । ऐसें नव्हे गा तो साचें । सुभद्रापती ॥४८४॥

तया एकवटलिया प्रेमा । जरी पाडें पाहिजे उपमा । तरी मी देह तो आत्मा । हेंचि होय ॥४८५॥

ऐसे भक्तचकोरचंद्रें । त्रिभुवनैकनरेंद्रें । बोलिलें गुणसमुद्रें । संजयो म्हणे ॥४८६॥

तेथ आदिलापासूनि पार्था । ऐकिजे ऐसीचि आस्था । दुणावली हें यदुनाथा । भावों सरलें ॥४८७॥

कीं सावियाचि मनीं संतोषला । जे बोला आरिसा जोडला । तेणें हरिखें आतां उपलवला । निरूपील ॥४८८॥

तो प्रसंगु आहे पुढां । जेथ शांतु दिसेल उघडा । तो पालविजेल मुडा । प्रमेयबीजाचा ॥४८९॥

जें सात्त्विकाचेनि वडपें । गेलें आध्यात्मिक खरपें । सहजें निडारले वाफे । चतुरचित्ताचे ॥४९०॥

वरी अवधानाचा वाफसा । लाधला सोनया ऐसा । म्हणौनि पेरावया धिंवसा । श्रीनिवृत्तीसी ॥४९१॥

ज्ञानदेव म्हणे मी चाडें । सद्गुरूंनीं केलें कोडें । माथां हात ठेविला तें फुडें । बीजचि वाइलें ॥४९२॥

म्हणौनि येणें मुखें जें जें निगे । तें संतांच्या हृदयीं साचचि लागे । हें असो सांगों श्रीरंगें । बोलिलें जें ॥४९३॥

परी तें मनाच्या कानीं ऐकावें । बोल बुद्धीच्या डोळां देखावें । हे सांटोवाटीं घ्यावें । चित्ताचिया ॥४९४॥

अवधानाचेनि हातें । नेयावें हृदयांआतौतें । हे रिझवितील आयणीतें । सज्जनांचिये ॥४९५॥

हे स्वहितातें निवविती । परिणामातें जीवविती । सुखाची वाहविती । लाखोली जीवां ॥४९६॥

आतां अर्जुनेंसीं श्रीमुकुंदें । नागर बोलिजेल विनोदें । तें वोंवियेचेनि प्रबंधें । सांगेन मी ॥४९७॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां षष्ठोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 30, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP