१६११
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी; चाल-गुरुकृपा अंजन० )
चालत नाहीं बोलत नाहीं । हालत नाहीं तो निरंजन ॥ध्रु०॥
दिसत नाहीं भासत नाहीं । नासत नाहीं तो निरंजन ॥१॥
करीत नाहीं घरीत नाहीं । हरित नाहीं तो निरंजन ॥२॥
निर्मळ जो तो निश्चळ जो तो । दासचि जो तो निरंजन ॥३॥
नामचि नाहीं रुपचि नाहीं । चंचळ नाहीं तो निरंजन ॥४॥

१६१२
( राग-खमाज; ताल-धुमाळी )
तूं तूं तूं देवा तूं तूं तूं रे ॥ध्रु०॥
व्यापुनी हे जन जन वन विजन । देव निरंजन पूर्ण पुरातन ॥१॥
नित्य निरंतर बाहिर अंतर । दूरि दुरांतर मौन्य मनांतर ॥२॥
देव सघन घन चंचळ हें मन । दास हरिजन पतितपावन ॥३॥

१६१३
( राग-कफी; ताल-दादरा )
साजिरें रामरूप साजिरें रे ॥ध्रु०॥
जनीं वनीं नट नाटकलीळा । येकीं अनेक कळा ॥१॥
तन मन धन जीवन लोकां । एकचि देव अनेकां ॥२॥
दास म्हणे समजा उमजावें । मोक्षपदाप्रति जावें ॥३॥

१६१४
( चाल-अकळ करणी दे० )
अनंता गुन या रामाचें । मुनिजन विश्रामाचे ॥ध्रु०॥
आत्मरामें जन चाले । चारी वाचा पन बोले ॥१॥
जवळिच परि तो भासेना । भासे परि तो दिसेना ॥२॥
कळतें परि तें उमजेना । उमजे परि समजेना ॥३॥
दोहींकडे  चालवीतो । अबोलणें चि बोलवीतो ॥४॥
दास म्हणे हा जवळी । विवेकें जन निवळी ॥५॥

१६१५
( राग-कल्याण; ताल-दीपचंदी )
सकळ हरि चाल वितो तो ॥ध्रु०॥
चालवितो तो बोलवितो तो । ऐके तोचि देखतो ॥१॥
हरिहरादिक इंद्रब्रह्मादिक । त्रैलोक्य वर्तवितो ॥२॥
देवचि जो तो भक्तचि जो तो । नामरूपातित तो ॥३॥

१६१६
( राग-केदार; ताल-त्निताल; चाल-सकळ घटीं जगदीश० )
जाणता जगज्जीवन जाणे । नाना घटीं एकचि बाणे ॥ध्रु०॥
मागें जाले आहे ते होती । नाना लोक पुराणे ॥१॥
एक अनेक चालविताहे । अंतर तो जगदांतर पाहे ॥२॥
बाह्याकार मेदचि दिसे । अंतर तों एकचि असे ॥३॥
सर्वां भूतीं भगवंत पहावा । सत्संगें प्रत्यय बाणे ॥४॥
देहधारक विश्वंमर जाला । दास म्हणे रे जाण तयाला ॥५॥

१६१७
( राग-बिलावल; ताल-धुमाळी )
उमजत उमजत उमजलें। निरूपम समजलें। अंतर  तें जगदांतरीं । जगदांतर जालें ॥ध्रु०॥
ऐकत ऐकिलें । मननीं मन गेलें । ध्यास धरितांचि साघलें । कांहींएक शोधलें ॥१॥
सारित सारित सारिलें । पंचभूत  वारिलें । तनुचतुष्टय निरसतां । निवेदन घडलें ॥२॥
दास म्हणे मी निरसला । मग देवचि जाला । देव विवेकें विसर्जिला । निश्चळ राहिला ॥३॥

१६१८
( राग-तिलक कामोद; ताल-धुमाळी )
ऐसा नाटकु नाटकु देव महाठकु । आपण येकुचि येकुचि येकुचि अनेकु । तया वेगळा वेगळा कोण आहे लोकु । हा तो हिशेबी हिशेबी न्यायाचा विवेकु ॥ध्रु०॥
आपण करितो करीतो आम्हांवरी घालितो । आपण चुकतो चुकतो आम्हां शिकवितो । आपण भोगितो भोगितो आम्हां दटावितो । न्याय सांडुनि अन्याय करितो ॥१॥
शास्त्रें पुराणें पुराणें आम्हांला दंडणें । म्हणे  करणें करणें माझोंचि करणें । आम्हांकारणें कारणें कां बोल ठेवणें । आम्ही कर्ते कीं अकर्ते हें एक सांगणें ॥२॥
कर्ता करील करील करील तो पावेल । स्वयें अकर्ता अकर्ता त्याला कैंचा बोल । विल्हे लाविना लाविना हें येक नवल । स्वार्थपरमार्थ परमार्थ तेथें कैंची वोल ॥३॥
नाना ग्रामस्थ ग्रामस्थ कुल्लाळ पाळिती । कांहीं  असो व नसो वा अखंड मागती । वेठी बेगारी बेगारी सर्वदा सांगती । तया वेगळी वेगळी तयास नाहीं गती ॥४॥
दास म्हणे रे म्हणे रे हें तों अप्रमाण । न्यायें वर्तावें वर्तावें हें येक प्रमाण । उगीच बालटें बालटें सोसूं पाहतो कोण । मुख्य देवासी भजतां सोडा मीतूंपण ॥५॥

१६१९
( राग-सोहोनी; ताल-दादरा. )
ऐसा देवाचा दानवाचा तो हा आत्माराम । सर्वां जीवांचा मानवांचा अवाप्तसकळहि कम । वसे अंतरीं जगदांतरीं सकळाचा विश्राम । तेणेंकरितां विवरतां पाविजे निजधाम ॥ध्रु०॥
देह पाळितो सांमाळितो अंतरीं मरोनि । भूतीं मरला आणि उरला चौखाणी उरोनी । देहीं होतसे पाहतसे जातसे मुरोनी ॥१॥
कांहीं हालेना ना चालेना त्याविण सकळ । देहपडती वो झडती होताती विकळ । कांहीं मानेना अनुमानेना प्रेत चि केवळ । बरें बुझतां समजताम होतसे निवळ ॥२॥
पुसी करितो विवरितो व्यापक त्नैलोक्याचा । नाना जाणतां मग बाणतां अंतर खुणेचा । नाना आगमीं आणि निगमीं साक्षेप तयाचा । ज्ञान तद्रूप मग अमूप सेवक रघुनाथाचा ॥३॥

१६२०
( राग-बिलावल; ताल-दादरा. )
निवळत निवळत निवळलें । तम वितळोनी गेलें । शुद्ध सत्त्व तें बळावलें । निजबीज निवडिलें ॥ध्रु०॥
भासत भासत भासतें । पंचभूत नासतें । उमजल्याविण वोसरतें । नसत चि दिसतें ॥१॥
निश्चळ निश्चळ होतसे । चंचळ जातसे । मायिक मायिक खातसे । निश्चय होतसे ॥२॥
दास म्हणे मन वळेना । मज मीच कळेना । तूंपण तें हि दुरावलें । निजपद निवळलें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP