आत्मसुख - अभंग १९१ ते २००

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१९१
सांडोनि अभिमान जालों शरणागत । ऐसियाचा अंत पहासी काई ॥१॥
माझे गुणदोष मनीं गा न धरीं । पतित पावत जरी म्हण्नविसी ॥२॥
पडविलिया पापराशी झणीं देसी देवा । हे लाज केशवा कोणास जी ॥३॥
नामा म्हणे देवा चतुरा शिरोमणी । निकुरा जासी झणीं मायबापा ॥४॥

१९२
जाणसी  तें करीं कृपाळुवा हरि । लाज सर्वांपरी आहे तुज ॥१॥
आरूष साबडें मी कांहीं नेणें वेडें । जन्मोनि सांदडें केलें तुज ॥२॥
बहुकीर्ति ऐकिली बहुतांचे मुखीं । बहुत केले सुखी शरणागत ॥३॥
नाहीं तुझी सेवा केली मनोभावें । लोभ दंभ गर्व भ्रांति सदा ॥४॥
नामा म्हणे मज होताती विपत्ति । सोडवीं श्रीपति येथोनियां ॥५॥

१९३
भिऊनि निघिजे समर्थाचे पोटीं । विषयांची तो भेटी नको मज ॥१॥
तैसा मी शरण आलों रे केशवा । मज त्वां राखावें पायांतळीं  ॥२॥
नको उदासीन राखों अभिमान । माझें आगमन  विचारीं कां ॥३॥
तुझेनि होईल तेंच मी मागेन । न सोडीं चरण अहर्निशीं ॥४॥
अविद्या अपारा संचरली देवा । आम्हासि कुढावा नाहीं कोणी ॥५॥
देवा आतां मज नको गर्भवास । नामा विष्णुदास विनवितसे ॥६॥

१९४
वासनेचा फांसा पडिला माझें कंठीं । हिंडलों जगजेठी नाना योनी ॥१॥
सोडवीं गा देवा दीनदयानिधी । मी एक अपराधी दास तुझा ॥२॥
शरण आलियाचे न पाहसी अवगुण । कृपेचें लक्षण तुज साजे ॥३॥
त्रिभुवनीं समर्थ उदार मनाचा । कृपाळू दीनांचा ब्रीद तुझें ॥४॥
गजेंद्र गणिकेची राखिलीं तुंवां लाज । उद्धरिला द्विज अजामेळ ॥५॥
नामा म्हणे देवा अव्हेरितां मज । जगीं थोर लाज येईल तूंतें ॥६॥

१९५
देवा तुझी अवज्ञा घडे । तयाचे दास होती वांकुडे ।
व्याधिविण देह पीडे । बुडे सागरीं चितेच्या ॥१॥
देवा तूं होसी उदासीन । तरी हांसती सकळैक जन ॥२॥
देवा तूं नाहींस जयाचेंज चित्तीं । सोनें धरिल्या होये माती ।
पीक न पिके तयाचे शेतीं । पेंवीं पाणी  रिघतसे ॥३॥
सेवा करी जयाचे घरीं । तींचि होतीं पाठमोरीं ।
इष्टमित्र सज्जन सोयरीं । आप्त वैरी होऊनि ठाके ॥४॥
ठेवा ठेविला चुके आपण । मागतोचि मागे जाण ।
सत्यास घडे आपदास्तपण । बोले तितुकें लटिकेची ॥५॥
ऐसा अनुभव घडला मज । म्हणोनि बा शरण आलों तुज ।
नामा म्हणे केशिराज । कृपा करीं दातारा ॥६॥

१९६
तुज गीतीं गातां न येसी पांडुरंगा । प्रेमेंचि दडूं गा पायांपाशीं ॥१॥
वांकडें तिकडें जैसें आलें तैसें । गावया उल्हास उगवला ॥२॥
त्याचि भरें तोंडा आलें तें बोलतों । नाम मुखीं घेतों अखंडित ॥३॥
तुझा म्हणवितों सांभाळावें देवा । नामया केशवा सर्वकाळ ॥४॥

१९७
अपराधाच्या कोडी हेचि माझी जोडी । पतितपावन प्रौढी तुझी देवा ॥१॥
माझिया निदैवें ऐसेंचि घडलें । तूं तंव आपुलें न संडिसी ॥२॥
सहस्त्र अपराध घालीं माझें पोटीं । तारीं जगजेठी नामा म्हणे ॥३॥

१९८
देवा माझें मन ठेवीं तुझे चरणीं । घालीं माझें नयनीं रूप तुझें ॥१॥
मज या लोकांचा शीण असे मनांत । तुजचि चिंतित ह्रदयकमळीं ॥२॥
चंदनाच्या दृतीं वेधले तरूवर । सबाह्य अभ्यंतर काय जालें ॥३॥
सरिता सिंधुमाजी मिळोनि लपाली । सागरची जाली एकसरें ॥४॥
लवण जळाचें प्रसिद्धचि असे । ऐक्यभावें वसे न दिसे कांहीं ॥५॥
नामा म्हणे शरण आलों केशिराजा । ऐसा भावो माझा करी वेगीं ॥६॥

१९९
तत्त्व पुसावया गेलों वेदज्ञासी । तंव भरले त्यापासीं विधिनिषेध ॥१॥
तया समाधान नुपजे कदा काळीं । अहंकार बळि जाला तेथेम ॥२॥
म्हणोनि तुझें नाम धरिलें शुद्धभावें । उचित करावें पांडुरंगा ॥३॥
स्वरूप पुसावया गेलों शास्त्रज्ञासी । तंव भरले तयापाशीं भेदाभेदा ॥३॥
एकएकाचिया न मिळती मतासी । भ्रांत गर्वराशि भुलले सदा ॥५॥
पुराणिकासी पुसूं स्वरूपाची स्थिति । तंव त्यासी विश्रांति नाहीं कोठें ॥६॥
विषयीं ठेवुनि मन सांगति ब्रह्मज्ञान । तेणें समाधान नुपजे कदा ॥७॥
हरिदासासी पुसूं भक्तीच उपाव । तंव तयापाशीं भाव नाहीं कोठें ॥८॥
वाचेंनें सांगती नामाचा बडिवार । विषयीं पडीभर  सदाकाळीं ॥९॥
ऐसें विचारितां बहुत भागलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१०॥
भयभीत जालों संसार येरझारीं । शिणलों असें भारी तारीं मज ॥११॥
नामा म्हणे आतां हिंडतां कष्टलों । म्हणोनि शरण आलों पांडुरंगा ॥१२॥

२००
संसारी गांजलों म्हणोनि शरण आलों । पाठीसि रिघालों देवराया ॥१॥
कळिकाळा वास पाहूं तूं न देसी । भरंवसा मानसीं आहे मज ॥२॥
नामा म्हणे देवा स्वामिया तूं एक । आवडता सेवक करीं मज ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP