आत्मसुख - अभंग १८१ ते १९०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१८१
माझें सर्व भाग्य केशवाचे पाय । आणिक उपाय नेणों आम्ही ॥१॥
पक्षी अवचित अंगणांत आला । घेऊनियां गेला सारा तेणें ॥२॥
हाटकरी आम्ही हाटसी पैं गेलों । फिरोनियां आलों गांवामाजीं ॥३॥
नामा म्हणे नमूं सर्व जीवजंत । दिसे ते अनंत दृष्टीपुढें ॥४॥

१८२
मायबापाची ते सांडुनियां आस । धरिली तुझी कांस पांडुरंगा ॥१॥
झणीं पांडुरंगा उपेक्षिसी मातें । तरी हांसतील तूंतें संतजन ॥२॥
नामा म्हणे तुझीं पाउलें समान । तेथें माझें मन स्थिरावलें ॥३॥

१८३
तुजवांचोनि कांहीं गोड न वाटे जीवा । मज दिव्य केशवा पाय तुझे ॥१॥
लौकिकापासुनि कधीं सोडविसी । सांग ह्रषिकेशी उघडोनि ॥२॥
तुझे पाय दिव्य तुझे पाय दिव्य । तुझे पाय दिव्य रे दातारा ॥३॥
नामा म्हणे जिव्हे काढीन मी रवा । तुझे पाय केशवा दिव्य मज ॥४॥

१८४
तुझिया पायांचें प्रमाण हेंज माझें । चरण कमळ तुझे विसंबेना ॥१॥
संसाराच्या गोष्टी कीट जाले पोटीं । रामकृष्ण कंठीं माळ घाल ॥२॥
दुरोनियां देखें गरुडाचें वारिकें । गोपाळा सारिखें चतुर्भुज ॥३॥
नामा म्हणे विठो जन्मजन्मांतरीं । ऋणि करुनि करीं घेई  मज ॥४॥

१८५
किती देवा तुला यावें काकुलती । काय या संचितीं लिहिलें असे ॥१॥
केली कांहो सांडी माझी ह्रषिकेशी । आम्ही कोणापाशीं तोंड वासूं ॥२॥
ब्रीदाचा तोडर गर्जे त्रिभुवनीं । तूंचि एक धनी त्रैलोक्याचा ॥३॥
समूळ घेतला पृथ्वीचा भारा । माझाचि जोजार काय तुला ॥४॥
नको पाहूं अंत पांडुरंगे आई । नामा विठोपायीं मिठी घाली ॥५॥

१८६
गाणीं  मी गाईलों भाटीं वाखाणिलों । जन्मोनियां जालों दास तुझा ॥१॥
आतां माझी लाज राखें नारायणा । झणीं केविलवाणा दिसों देसी ॥२॥
माये दुर्‍हाविलों मोहें मोकलिलों । सोये पैं चुकलों संसाराची ॥३॥
आपवर्गिं सांडिलों प्रवृत्ती दंडिलों । मीपना मुकलों मायबापा ॥५॥
नामा म्हणे तुझ्या चरणाची आवडी । लागली न सोडी चित्त माझें ॥६॥

१८७
हातीं विणा मुखीं हरी । गायें राउळाभीतरींज ॥१॥
अन्न उदक सोडिलें । ध्यान देवाचें लागलें ॥२॥
स्त्री  पुत्र बाप माय । यांचा आठव न होय ॥३॥
देह्भाव विसरला । छंद हरीच लागला ॥४॥
नामा म्हणे हेंचि देई । तुझे पाय माझे डोयीं ॥५॥

१८८
पाहतां तुझे चरण हरली भवव्यथा । पुढतीं एक चिंता वाटतसे ॥१॥
झणीं मुक्तिपद देसी पांडुरंगा । मग या संतसंगा कोठें पाहूं ॥२॥
मग हे पंढरी आनंद सोहळा । कवणाचे डोळां पाहूं देवा ॥३॥
मग हे हरिकथा अमृत संजीवनी । कवणाचे श्रवणीं ऐकों देवा ॥४॥
नामा म्हणे मज पंढरीची सोये । अनंत जन्म होये याचिलागीं ॥५॥

१८९
देवा माझें मन आणि तुझे चरण । एकत्र करोन दिधली गांठी ॥१॥
होणार तें हो गा सुखें पंढरीनाथा । कासया शिणतां वायांविण ॥२॥
माझिया अदृष्टीं ऐसेंचि पैं आहे । सेवावे तुझे पाय जन्मोजन्मीं ॥३॥
असतां निरंतर येणें अनुसंधानें । प्रारब्ध भोगणें गोड वाटे ॥४॥
ह्रदयीं तुझें रूप वदनीं तुझें नाम । बुद्धि हे निष्काम धरिली देवा ॥५॥
नामा म्हणे तुझीं पाउलें चिंतितां । जाली कृतकृत्यता जन्मोजन्मीं ॥६॥

१९०
तुझिया चरणाची न संडी मी आस । मग होत गर्भवास कोटिवरी ॥१॥
हेंचि मज द्यावें जन्मजन्मांतरीं । वाचे नरहरी नाम तुझें ॥२॥
कृपेचें पोसणें मी गा येक दिन । माझा अभिमान न संडावा ॥३॥
नामा म्हणे मज चाड नाहीं येरे । इतुकेंचि पुरे केशिराजा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP