आत्मसुख - अभंग ८१ ते ९०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


८१
नाम गाऊं नाम ध्याऊं । नामें विठोबासी पाहूं ॥१॥
आम्ही दैवाचे दैवाचे । दास पंढरिरायाचे ॥२॥
टाळ दिंडी घेऊनि हातीं । केशवराज गाऊं गीतीं ॥३॥
नामा म्हणे लाखोली सदा । अनंत नामें वाहूं गोविंदा ॥४॥

८२
नामें तरूं अवघे जन । यमपुरीं घालूं वाण ॥१॥
करूं हरिनामकीर्तना । तोडूं देहाचें बंधन ॥२॥
करूं हरिनामाचा घोष । कुंभपाक पाडूं ओस ॥३॥
ऐस नामा यशवंत । विठोबाचा शरणागत ॥४॥

८३
विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो ।
तुटेल हा संदेहो । भवमूळव्याधीचा ॥१॥
म्हणा नरहरि उच्चार । कृष्ण हरी श्रीधर ।
हें नाम आम्हां सारा । संसार तरावया ॥२॥
एकतत्त्व त्रिभुवनीं । हेंचि आम्हां हरिपर्वणी ।
गाइली जे पुराणीं । वेदशास्त्रांसहित ॥३॥
नेघों नामेंविण कांहीं । विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलों पाही । विठ्ठल विठ्ठल म्हणतांचि ॥४॥

८४
जें जें घडेल तें तें घडो । देह राहो अथवा पडो ॥१॥
परि मी न सोडी सर्वथा । तुझे पाय पंढरिनाथा ॥२॥
क्लेश होत नाना परी । मुखीं रामकृष्ण हरि ॥३॥
नामा म्हणे केशवातें । जें जें घडेल या देहातें ॥४॥

८५
यज्ञ याग दान व्रत उद्यापन । हें नेणें मी साधन काय करूं ॥१॥
जप तप होम स्वधर्माचरण । नव्हे तीर्थाटण कांहीं मज ॥२॥
गया पिंडदान प्रयागींचें स्नान । कर्म अनुष्ठान नव्हे मज ॥३॥
भक्ति उपासना देवाचें पूजन । ध्यान उपोषण नव्हे मज ॥४॥
पृथ्वीचें भ्रमण अनुताप संपूर्ण । सारासार खूण नकळे कांहीं ॥५॥
पुण्य नाहीं गांठीं पापाचें संचित । परम पतित वाटे मज ॥६॥
माझा देह आहे पातकांचा थारा । मी अपराधी खरा कळलेसें ॥७॥
पुराणप्रसिद्ध नाम तुझें सार । ऐसें निरंतर बोलताती  ॥८॥
अन्याथा वचन नोहे हें प्रमाण । तरी ब्रीदें जाण सांडवलीं ॥९॥
तुम्ही व्रीद आपुलें जतन करणें । तरी नारायणें सांभाळावें ॥१०॥
नामेंविण कांहीं आम्हांपाशीं नाहीं । विचारोनी पाही पांडुरंगा ॥११॥
धन वित सर्व आमची हे जोडी । नामा म्हणे गोडी नामीं तुझें ॥१२॥

८६
लपलासी तरी नाम कैसें नेसी । आम्ही अहर्निशीं नाम गाऊं ॥१॥
आम्हांपासोनियां जातां नये तुज । तें हें वर्म बीज नाम घोकूं ॥२॥
आम्हांसी  तों तुझें नामचि पाहिजे । मग भेटी सहजें  देणें लागे ॥३॥
भोळीं भक्तें आम्ही चुकलों होतों वर्म । सांपडलें नाम नामयासी ॥४॥

८७
भोगावरी आम्ही घातिला पाषाण । मरणा मरण आणियेलें ॥१॥
नाहीं यासी पतन् न  होय  बंधन । नित्य हेंचि स्नान राचनामीं ॥२॥
नामा म्हणे भाव सर्वाभूतीं करा । आणिक पसारा घालूं नका ॥३॥

८८
नलगे तुझी भुक्ति नलगे तुझी मुक्ति । मज आहे विश्रांति वेगळीच ॥१॥
माझें मज कळलें माझें मज कळलें । माझें  मज कळलें प्रेमसुख ॥२॥
न करीं तुझें ध्यान नलगे ब्रह्मज्ञान । माझी आहे खूण वेगळीच ॥३॥
न करीं तुझी स्तुति न वाखाणीं कीर्ति । धरलसि ते युक्ति वेगळीच ॥४॥
नामा म्हणे नाम गाईन विर्विकल्प । येसी आपोआप गिंवसित ॥६॥

८९
क्रिया कर्म धर्म तूंचि होसी माझे । राखेन मी तुझें द्वार देवा ॥१॥
मज पाळीसी तैसा पाळीं दीनानाथा । न सोडीं सर्वथा नाम तुझें ॥२॥
गाईन तुझें नाम ह्रदयीं धरुनि प्रेम । हाचि नित्य  नेम सर्व माझा ॥३॥
नामा म्हणे केशवा सुखाच्या सागरा । तूं आम्हां सोईरा आदिअंतीं ॥४॥

९०
अवघाचि संसार करीन सुखाचा । जरी जाला दुःखाचा दुर्धर हा ॥१॥
विठोबाचें नाम गाईन मनोभावें । चित्त तेणें नांवें सुख पावे ॥२॥
इंद्रियांचें कोड सर्वस्वें पुरती । मनाचे मावळती मनोधर्म ॥३॥
श्रवणीं श्रवणा नामाचा प्रवंधा । नाइकें स्तुतिनिंदा दुर्जनाची ॥४॥
कुंडलें मंडित श्रीमुख निर्मळ । पाहतां हे डोळे निवती माझे ॥५॥
विटेसहित चरण  धरीन मस्तकीं । तेणें तनु सुखी होईल माझी ॥६॥
संतसमागमें नाचेन रंगणीं । तेणें होईल धुणी त्रिविध तापा ॥७॥
नामा म्हणे सर्व सुखाचा सोईरा । न विसंवे दातारा क्षणभरी ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP