आत्मसुख - अभंग ७१ ते ८०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


७१
तुझिया संतांची अंगसंगति । ते शिणलिया विश्रांति संसारिया ॥१॥
श्रवण कीर्तन ध्यान घडे अनायासें । भेदभ्रम नासे तेचि क्षणीं ॥२॥
ऐसें भाग्य मज देसी कवणें काळीं । होईन पायधुळी वैष्णवांची ॥३॥
वदनीं तुझें नाम वसे निरंतर । राखीन त्यांचे द्वार थोर आशा ॥४॥
येतां जातां मज करिती सावधान । वदनीं कृष्ण कृष्ण म्हणविती ॥५॥
कामधेनु घरीं असे प्रसवली । ते विकावया नेली दैवहतें ॥६॥
पंथी पडिला पायां लागे चिंतामणी । पाषाण म्हणऊजि उपेक्षिला ॥७॥
तैसी परी मज जाहली अधमा । चुकलों तुझ्या वर्मा केशिराजा ॥८॥
नामा म्हणे थोर खंती वाटे जीवा । कृपा करूनि ठेवा कर माथां ॥९॥

७२
सर्वभावें तूतें जे ध्याती दातारा । त्यांचिया संसारा तूंचि होसी ॥१॥
ज्याचे चित्तीं नाहीं आणिक कांहीं काम । त्याचा योगक्षेम तूंचि होसी ॥२॥
ऐहिक परत्र जें कांहीं देखिजे । तें तुवां होईजे मायबापा ॥३॥
नामा म्हणे माझी भक्ति हे माउली । केशवा वाहिली क्षणमात्रें ॥४॥

७३
अमृताहुनि गोड नाम तुझें देवा । मन माझें केशवा कां वा नेघे ॥१॥
सांग पंढरिराया काय करूं यासी । कां रूप ध्यानासि न ये तुझें ॥२॥
कीर्तनीं बैसतां निद्रें नागविलें । मन हें भुललें विषयसुखा ॥३॥
हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ति । न ये माझ्या चित्तीं नामा म्हणे ॥४॥

७४
जगदानिया हें ब्रीद आहे जगीं । तें आजि मजलागीं काय जालें ॥१॥
मज पाहतां विसरू पडिला त्या नामाचा । कीं तुज आमुचा वीट आला ॥२॥
सुजाणाच्या राया परिसें केशिराजा । भक्ताचिया काजा लाजों नको ॥३॥
भक्तकाजकैवारी हें ब्रीद चराचरीं । तें ठेविलें क्षीरसागरीं लक्ष्मीपाशीं ॥४॥
मज पाहतां अभिलाष धरिला मानसीं । मग तूं हषिकेशी विसरलासी ॥५॥
दीनानाथ ऐसें नाम बहुतांसी वांटिलें । निर्गुण तें उरलें तुजपाशीं ॥६॥
म्हणोनि केशिराजा विसरलासी आम्हां । विनवितसे नामा विष्णुदासा ॥७॥

७५
अपराधाच्या कोडी हीच माझी जोडी । पावनत्व प्रौढी नाम तुझें ॥१॥
द्रौपदी संकटीं वस्त्रें पुरविलीं । धांवा त्वां घेतली गजेद्रासी ॥२॥
उपमन्यालागीं आळी पुराविली । अढळपदीं दिधली वस्ती ध्रुवा ॥३॥
नामा म्हणे करा करुणा केशवा । तूं माझा विसावा पांडुरंगा ॥४॥

७६
संसारसागरीं पडलों महापुरीं । सोडवण करी देवराया ॥१॥
नामाची सांगडी देऊनियां मातें । वैकुंठावरूतें नेऊनि घाली ॥२॥
काम क्रोध मगर करिती माझा ग्रास । झणीं तूं उदास होसी देवा ॥३॥
नामा म्हणे देवा झणीं मोकलिसी मातें । नाम तुझें सरतें धरिलें एक ॥४॥

७७
कीटकीतें भयें स्वयें भृंगी ध्यातां । तैसा तूं अनंता करी आतां ॥१॥
भजनें पाठविलें श्रीहरिरूपासी । नेतो वैकुंठासी नारायण ॥२॥
नाम नारायण अंतीं उद्धारक । नामा म्हणे देख भाक माझी ॥३॥

७८
काखे पान अंगणीं उभें उगें । भोजन मागें रामनाम ॥१॥
आणिक नाहीं मज चाड । रामनाम गोड जेऊं घाला ॥२॥
आनरस सेवितां मंद पडिलों । तुझेंचि नामेंम रुचीस आलों ॥३॥
इच्छाभोजनीं तूं एक दाता । नामा विनवी पंढरीनाथा ॥४॥

७९
तान्हेलों भुकेलों । तुझेनि नामें निवालों ॥१॥
तहान नेणें भूक नेणें । अखंड पारणें नामीं तुझ्या ॥२॥
अमुतलिंग केशव हा चित्तीं । तेणें नामया तृप्ति अखंडित ॥३॥

८०
मोहभुजंगें डंखिलें । विषयलहरीं झांकोळिलें ॥१॥
धांव धांव चक्रपाणि । आणिका न करवे धांवणी ॥२॥
नामा म्हणे निर्विष जालों । केशव नामें उपचारिलों ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP