आत्मसुख - अभंग २१ ते ३०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


२१
काय गुणदोष आणितोसी मनाअ । नको नारायणा अभक्तची ॥१॥
शरीरसंबंधा सुचती अंतरें । काय म्यां पामरें आवरावें ॥२॥
नामा  म्हणे मज नागविसी दातारा । नको बा अंतरा पाहों अंत ॥३॥

२२
काय गुण दोष माझे विचारिसी । आहे मी तों राशी अपराधांची ॥१॥
अंगुष्ठापासोनी मस्तकापर्यंत । अखंड दुश्चित आचरलों ॥२॥
स्वप्नीं देवा तुझी नाहीं घडली भक्ति । पुससी विरक्ति कोठुनियां ॥३॥
तूंची माझा गुरु तूंची तारी स्वामी । सकळ अंतर्यामीं गाऊं तुज ॥४॥
नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण । नको करूं शीण पांडुरंगा ॥५॥

२३
चोरा ओढोनियां नेईजे जैं शुळीं । चालतां पाउलीं मृत्यु जैसा ॥१॥
तैसी परी मज जाली नारायणा । दिवसेंदिवस उणा होत असे ॥२॥
वृक्षाचिये मुळीं घालितां कुर्‍हाडी । वेंचे तैसी घडी आयुष्याची ॥३॥
नामा म्हणे हेंही लहरीचें जल । आटत सकळ भानुतेजें ॥४॥

२४
संसारींच्या आह्या आहाळलों भारी । निवावी गा श्रीहरि अमृतदृष्टी ॥१॥
मी अनाथ अपराधी दुर्बळ दुराचारी । कृपाळू बा हरी तारीं मज ॥२॥
नामा म्हणे विठो कृपेचा कोंवळा । जाणसी कळवळा अनाथनाथा ॥३॥

२५
सांडोनि संसार जालों मी अंकित । ऐशियाचा अंत पाहूं नको ॥१॥
पातकी मी सत्य पातकी मी सत्य । पातकी मी सत्य पांडुरंगा ॥२॥
माझे गुणदोष न धरिसी चित्तीं । थोरपण ख्याति दावी आम्हां ॥३॥
ऐसा अपराध आणूं नको मना । पंढरीच्या राणा म्हणे नामा ॥४॥

२६
देशीं परदेशीं जालों तुजविण । माझें समाधान कोण करी ॥१॥
चातक चकोरापरी पाहे वास । तूं कां गे उदास पांडुरंगे ॥२॥
नामा म्हणे चित्त देईं माझ्या बोला । जीउ हा उरला तो निघों पाहे ॥३॥

२७
वत्साकारणें मोहाळु गाये । अनुसरलेया पान्हा ये ॥१॥
तैसें तुझें वासरूं बांधलों मी असें । मज लावे कांसे आपुलिया ॥२॥
मज बांधलें त्वां संसारखुंटीं । माझी माउली दूर वैकुंठीं ॥३॥
थोरूं करी मना लाहो । तंव आणिकें नेती पान्हावो ॥४॥
धीरू नव्हे याचि परि । नामा विनवितसे मुरारी ॥५॥

२८
आपुले रूपीं मज लपवीं निरंतरीं । समाये भीतरीं आड राहे ॥१॥
परि तुज मज असावा संबादू । भ्रांति मायाबाधु करी ॥२॥
काम क्रोध लोभ दंभ मद मछर । हे वैरी अपार मारी माझे ॥३॥
नामा म्हणे आम्हीं जन्माजन्मांतरींचे । पोसणें घरींचे सदा तुझें ॥४॥

२९
मुंगीचिया गळां बांधोनियां मेरू । तेणें हा प्रकारू कळों आला ॥१॥
माळियाचे पोरें लपविलें पोटीं । तेणें जगजेठी सुख मानीं ॥२॥
कुलालाचे हातीं तुडविलें मूल । दाखवी नवल तयासाठीं ॥३॥
मजसाठीं काय धरियेलें मौना । धांव नारायना नामा म्हणे ॥४॥

३०
विठ्ठल विद्‌गदे पुंडलिकवरदे । अनंत अभेदे नामें तुझीं ॥१॥
पाव गे विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढीं मज ॥२॥
आकांत अवसरीं स्मरलें साच । दीनानाथें ब्रीदें सत्य केलीं ॥३॥
स्मरली संकटी द्रौपदी वनवासी । धांवोनि आलासि लवडसवडीं ॥४॥
प्रल्हादें तुजलागीं स्मरिलें निर्वाणीं । संकटापासोनि राखियेलें ॥५॥
नामा म्हणे थोर पीडिलों गर्भवासें । अखंड पाहातसें वास तुझी ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP