श्रीनामदेव चरित्र - अभंग १४१ ते १५०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१४१
वेदांसी न कळे शास्त्रें पैं भांडती । श्रुति विवादती ब्रह्मालागीं ॥१॥
आवघेचि कर्मामुक्त उपदेश धर्म । हारपती पैं कर्में गुरुसेवा ॥२॥
सेवेपरतें साधन नाहीं पैं उपदेश । हरीसि सौरस आपेंआप ॥३॥
नामा म्हणे हरि गुरु आज्ञा काम । भजन निष्काम गुरुसेवा ॥४॥

१४२
उपजोनी सभाग्य तेचि एक जाले । जीहीं विचारिलें आत्महित ॥१॥
सांडोनि मीपणास सद्‌‍गुरुचरणा । लागलों संपूर्ण भावार्थोंसि ॥२॥
तयाचें जें कांहीं सर्व मज वोझें । नाहीं मज दुजें त्यासि कांहीं ॥३॥
तयाचे ह्रदयीं संतपण प्रगटे । द्वैतपण तुटे क्षणामाजीं ॥४॥
नामा म्हणे आम्हां विठोबाचे बोल । सांपडली वोल तरावया ॥५॥

१४३
सुखाचा सद्‌गुरु सुखरूप खेचरू । स्वरूप साक्षात्कारु दाखविला ॥१॥
विठ्ठल पहातां मावळलें मन । ध्यानीं भरले नयन तन्मय जालें ॥२॥
मी माझें होतें तें मजमाजि निमालें । जळें जळ गिळिलें जयापरी ॥३॥
तेथें आनंदीं आनंदु वोळला परमानंदु । नाम्या जाला बोधु विठ्ठलनामें ॥४॥

१४४
नाशवंत देतां ब्रह्म येईल हातां । ऐसी ज्याची कथा पुराणांत ॥१॥
सद्‌‍गुरुचे पायीं देहासि अर्पितां । तात्काळ मुक्तता हातां येते ॥२॥
माया देऊनियां ब्रह्म  घ्यावें हातीं । ऐशा गुरूप्रति कां भजाना ॥३॥
नामा म्हणे गुरूपायीं लाभ आहे । मोक्ष तोही पाहे दास होतो ॥४॥

१४५
चंद्रभागे तीरीं आयकिल्या गोष्टी । वाल्मीकें शतकोटी ग्रंथ केला ॥१॥
तेणें माझ्या चित्ता बहु जाले क्लेश । व्यर्थ म्यां आयुष्य गमाविलें ॥२॥
जाऊनि राऊळा विठोसी विनविलें । वाल्मिकानें केलें रामायण ॥३॥
असेन मी खरा तुझा भक्त देवा । सिद्धीस हा न्यावा पण माझा ॥४॥
शतकोटी तुझे करीन अभंग । म्हणे पांडुरंग ऐक नाम्या ॥५॥
तये वेळीं होती आयुष्याची वृद्धि । आतांची अवधि थोडी असे ॥६॥
नामा म्हणे जरी न होतां संपूर्ण । जिव्हा उतरीन तुज पुढें ॥७॥

१४६
निश्चय पाहूनि उपजली दया । स्वामी देवराया पांडुरंगा ॥१॥
सारजेसी सांगे भीमातीरीं हरी । बैस जिव्हेवरी नामयाच्या ॥२॥
लाडकें लडिवाळ नामा माझें तान्हें । तयाला मजविण कोण आहे ॥३॥
मजवरी त्याचें बहु असे ऋण । होईन उत्तीर्ण एवढयानें ॥४॥
नामा म्हणे हातीं बांधोनियां वह्या । बैसे लिहावया पांडुरंग ॥५॥

१४७
अभंगाची कळा नाहीं मी नेणत । त्वरा केली प्रीत केशिराजें ॥१॥
अक्षरांची संख्या बोलिले उदंड । मेरू सुप्रचंड शर आदि ॥२॥
सहा साडेतीन चरण जाणावेअ । अक्षरें मोजावीं चौकचारी ॥३॥
पहिल्यापासोनि तिसर्‍यापर्यंत । अठरा गणित मोज आलें ॥४॥
चौकचारी आधीं बोलिलों मातृका । बाविसावी संख्या शेवटील ॥५॥
दीड चरणाचें दीर्घ तें अक्षर । मुमुक्षु विचार बोध केला ॥६॥
नामा म्हणे मज स्वप्न दिलें हरी । प्रीतीनें खेचरीं आज्ञा केली ॥७॥

१४८
खवळलों आतां न भिये रे तुज । सांडिली रे लाज लौकिकाची ॥१॥
आम्ही दीन सिंपे यातिचे ते हीन । दे माझें ठेवणें केशीराजा ॥२॥
साठ लक्ष संख्या चौर्‍यांसी कोटि । त्यांत मी कवडी सोडूं काय ॥३॥
आणिक याहून असेल वेगळें । घेईन तें बळें जाण आतां ॥४॥
तुझें थोरपण ऐक हें देवा । दुर्बळाचा ठेवा अभिलाषी ॥५॥
म्हणूनि पोरटा नामा खेचराचा । काया मनें वाचा सत्य करी ॥६॥

१४९
ऐसें ऐकोनियां राजाई ते आली । रोषें येऊनि बोली बोलातसे ॥१॥
देवानें हें दिलें तुम्ही कां पाठवा । काशाचा गणोबा बोलतसा ॥२॥
ऐसें बोलोनियां हातें लोटी धोंटी धोंडा । तुमचिया वितंडा कोण पुसे ॥३॥
देवें मज दिलें तुम्ही कां मागतां । अलंकार आतां घडीन मी ॥४॥
नामा म्हणे धन ज्याचें त्यासी द्यावें । आपुलें तें घ्यावें आपणची ॥५॥

१५०
वाघाचिये गव्हाणीं बांधिलीसे गाये । कैसी तुं वो माये लोभाचारें ॥१॥
कां मज संसारीं घालितोसि देवा । कैसी तुझी माया जीवा गोड वाटे ॥२॥
विषयाचें गरळ पाजिसी केवळ । ह्रदया कोवळें कैसें तुझें ॥३॥
नामा म्हणे मज आदिअंतीं एकु । जननी आणि जनकु पांडुरंग ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP