श्रीनामदेव चरित्र - अभंग १३१ ते १४०

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१३१
मरण सांगा स्वामी कवणियां गुणें । संसारीं मरण उरलें नाहीं ॥१॥
आम्हां मरण नाहीं मेलें होतें काई । श्रीगुरुच्या पायीं राहे मना ॥२॥
मरणें हें काया मरणें हें माया । मरे हे छाया कवण्या गुणें ॥३॥
भक्ति अमरकंदु रामनाम वंदूं । नामयासी छंदू विठोबाचा ॥४॥

१३२
नामा स्वयेंपाक करुं बैसला । केशव श्वानरूपें आला ।
रोटी घेऊनि  पळाला । सर्वांभूतीं केशव ॥१॥
हातीं घेऊनि तुपाची वाटी । नामा लागला श्वानापाठीं ।
तूप घे गा जगजेठी । कोरडी रोटी कां खाशी ॥२॥
तंव श्वान हांसोनी बोलिले । नामया तुज कैसें कळलें ।
येरू म्हणे खेचरें उपदेशिलें । सर्वांभूतीं विठठल ॥३॥

१३३
सद्‌गुरुनायकें पूर्ण कृपा  केली । निजवस्तु दाविली माझी मज ॥१॥
माझें सुख मज दावियेलें डोळां । दिधली प्रेमकळा ज्ञानमुद्रा ॥२॥
तया उतराई व्हावें कवण्या गुणें । जन्म नाहीं येणें ऐसें केलें ॥३॥
नामा म्हणे निकीज दावियेली सोय । न विसरावे पाय विठोबाचे ॥४॥

१३४
पाषाणाचा देव बोलेचि ना कधीं । हरि भवव्याधि केंवि घडे ॥१॥
दगडाची मूर्ति मानिला ईश्वर । परि तो साचार देव भिन्न ॥२॥
दगडाचा देव इच्छा पुरवीत । तरि कां भंगत आघातानें ॥३॥
पाषाण देवाची करिती जे भक्ति । सर्वस्वा मुकती मूढपणें ॥४॥
प्रस्तराचा देव बोलत भक्तांतें । सांगते ऐकते मूर्ख दोघे ॥५॥
ऐशांचे माहात्म्य जे कां वर्णिताती । आणिज म्हणविती तेणें भक्त ॥६॥
परंतु ने नर पामर जाणावे । त्यांचे नायकावे बोल कानीं ॥७॥
धोंडा घडोणियां देव त्याचा केला । आदरें पूजिला वर्षें बहु ॥८॥
तरी तो उतराई होय केव्हां काई । बरवें ह्र्दयीं विचारा हें ॥९॥
धोंडापाण्याविण नाहीं देव कोठें । होतां सान मोठें तीर्थ क्षेत्र ॥१०॥
बाराशीचे गांवीं जाहला उपदेश । देवाविण ओस स्थळ नाहीं ॥११॥
तो देव नामया ह्रदयीं दाविला । खेचरानें केला उपकारु हा ॥१२॥

१३५
कृपेची साउली अखंड लाधली । खेचर माउली भेटलिया ॥१॥
आतां मज  भय नाहीं पैं कोणाचें । जन्ममरणाचें दुःख गेलें ॥२॥
बंधमोक्षाची फिटली काळजी । समाधि लागली समाधीसी ॥३॥
नामा म्हणे माझें सर्वही साधन । खेचर चरण न विसंबे ॥४॥

१३६
भक्ति हेंचि भाण परब्रह्म पक्वान्न । गुरुमुखें जेवण येवियेलें ॥१॥
अनुभव भात लयालक्ष कढी । जेवणारा गोडी घेत असे ॥२॥
सुखशांति शाखा भावर्थ हा वडा । जेवणार गाढा आत्माराम ॥३॥
दया क्षीरधारी शांती पूर्णपोळी । घृत हें कल्होळी प्रेम माझें ॥४॥
विषयाचा गुरळा थुंकोनी सांडिला । नामा आंचवला संसारासी ॥५॥

१३७
स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती ॥१॥
तैसें माझें मन मुरारी । वासना धांवे विषयावरी ॥२॥
डोळियांचीं बुबुळें फुटोनियां जाती । न संडी वासना हालवितो पातीं ॥३॥
ढोराचें पुच्छ मोडोनियं चांगा । पुढती पुढती हालविती पैं गा ॥४॥
वोढाळ ढोरा बांधियेलें काष्ट । पुढती पुढती धरी तीच वाट ॥५॥
नामा म्हणे माझी मुळीं वासनाच खोटी । खेचर विसा चरणीं घातलिले मिठी ॥६॥

१३८)
सूर्याचा प्रकाश सर्व सृष्टीवरी । धन्य तो अंतरीं सर्वकाळ ॥१॥
स्वर्गादि पाताळ  सर्व पूर्ण जळें । चातका न मिळे मेघाविण ॥२॥
नारायय्न पूर्ण सर्वभूतां ठायीं । अभाग्यासी नाहीं तिहीं लोकीं ॥३॥
नामा म्हणे गुरुकृपेचें अंजन । पायाळासी धन दिसें जैसें ॥४॥

१३९
सुखाचे सोयरे भेटती अंतरीं । बाहेरी भितरीं दिधलें क्षेम ॥१॥
सुखाची गवसणी घालोनियां मना । विठ्ठलीं वासना बोल्हावली ॥२॥
वाचे उपरम मन जालें तन्मय । लागलासे लय पर लक्षीं ॥३॥
शांति क्षमा दया देती आलिंगन । चित्त समाधान पावविलें ॥४॥
परतलिया दृष्टी इंद्रियांच्या वृत्ती । पावली विश्रांति ठाईंच्या ठाईं ॥५॥
विष्णुदास नामा निजबोधें निवाला । खेचरें दिधला अभयकर ॥६॥

१४०
सद्‌गुरुचे पाय जीवें न विसंबावे । मन वळवावेंज वृत्तिसहित ॥१॥
डोळियाचे डोळे उघडिले जेणें । आनंदाचें लेणें लेवविलें ॥२॥
जन्ममरणाचें फेडिलें सांकडें । कैवल्यचि पुढें दाखविलें ॥३॥
मोहरले तरु पुष्पफळभारें । तेचि निर्विकार सनकादिक ॥४॥
नामा म्हणे स्वामी खेचर माउली । कृपेची साउली केली मज ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP