मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
त्रेपन्नावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - त्रेपन्नावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८९८
"महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत."
दुष्काळाचे भयानक स्वरूप संपल्यामुळे श्रींना जरासे स्वस्थ वाटू लागले होते. रामवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे बरीच मंडळी अजून गोंदवल्यासच राहिली होती. एके दिवशी सकाळी ९ वाजता श्री रामासमोर भजन करण्यास उभे राहिले. लगेच बरीच मंडळी जमली. श्रींनी भजनातच निरूपण करण्यास आरंभ केला. भजन-निरूपण करता करता दोन तास केव्हाच निघून गेले. सर्व मंडळी अगदी तल्लीन होऊन ऐकत होती. तेवढयात श्री खालील अभंग घोळून घोळून म्हणू लागले. त्रेपन्न वर्षे भुमीभार । आता पाहू आपले घर ॥ देहमर्यादा सरली । मागे भक्ती करा भली । तुम्हा सांगितल्या खुणा । विसरू देऊ नका मना । दीनदास आनंदला ।
राम बोलावितो मला ॥
श्रींनी अभंग संपविला व ’जानकी जीवन स्मरण जय जय राम ’ असे म्हणून सर्वांना सांगितले, "आज मी नैमिष्यारण्यात जाणार, कोणीही रामाला विसरू नये, माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काळ घालवावा." हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळीत एकदम गोंधळ उडून गेला, अनेक लोक श्रींच्या पाया पडून, "आपण जाऊ नका " अशी कळवळून विनंती करू लागले, लहान मुले त्यांना विनवू लागल्या. श्री म्हणाले, "काही झाले तरी मी आज गोंदवले सोडणार " त्यावर सर्व लोकांनी त्यांच्या पायावर डोकी ठेवली व त्यांचे आशीर्वाद घेतले. क्षणभर रामाकडे टक लावून पाहिले व म्हणाले, "रामा, आजवर तुझ्या छायेत येथे मी वावरलो, तुझ्या संगतीत मोठया आनंदात दिवस गेले, आता मला निरोप दे, माझ्यामागे या सर्वांना सांभाळ. तुझ्या नामाचे प्रेम त्यांना दे." रामरायाला नमस्कार करून श्री मंदिराबाहेर पडले. रस्त्यावर टांगा उभा होता तेथपर्यंत आले, पुन्हा सर्वांनी नमस्कार केला. दुपारची बारा वाजण्याची वेळ होती. म्हातार्‍यापासून
लहान मुलांपर्यंत कोणाच्याही पोटात अन्नाचा कण नव्हता. आपला कायमचा आधार चालला या विचाराने असहाय आणि दीन होऊन सर्वजण स्फुंदून रडत होते. श्री टांग्यात बसले व टांगा चालू झाला. इतक्यात मंदिरातील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला श्रींनी पाहिलाव टांगा थांबविला. तो मनुष्य घाबर्‍या घाबर्‍या श्रींना म्हणाला, "महाराज, राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रुधारा वाहात आहेत." श्री एकदम उद्‍गारले, "खरच का ?" श्रींनी लगेच टांगा मंदिराकडे वळविला. श्रींनी मंदिरापाशी टांगा थांबवून हातपाय धुऊन सोवळे नेसले व रामापुढे उभे राहिले. रामरायाच्या डोळ्यातून गालावर ओघळलेले पाणी मऊ रुमालाने पुसून काढले. तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली. श्रींच्या डोळ्यातही पाणी आले व म्हणाले, "मी जाऊ नये असे तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचे आहे, हा बघ मी राहिलो. आता तू रडायचा थांब." हे शब्द ऐकल्यावर रामाच्या व सीता आणि लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणे बंद झाले. श्री गोंदवल्यासच राहणार असे समजल्यावर वातावरण एकदम बदलले. सर्वत्र प्रसन्नता आली. श्री म्हणाले, "चला आटपा लवकर, स्नाने करा, रामाला नैनेद्य करा. तिर्‍ही मूर्तींना दुधाचा अभिषेक करा. हा प्रसंग कुणाला कळवू नका." श्री रात्री भजन करण्यास उभे राहिले. सर्वत्र आनंदाचे वातावरण हेते. श्री नाचत नाचत रामरायासमोर गेले तेव्हा त्याच्या डोक्यावरी तुरा उडून श्रींच्या अंगावर येऊन पडला. भजन आटोपून आरती झाल्यावर श्री म्हणाले, "चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे. ते कोठेही प्रगट होऊ शकेल. ते आपल्या भावनेवर अवलंबून आहे. ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असेल त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते. भावना मात्र शंभर नंबरी पाहिजे. तीत कसलीही भेळ उपयोगाची नाही.

N/A

References : N/A
Last Updated : February 05, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP