मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
एकुणपन्नासावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकुणपन्नासावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८९४
"रामाचे देणेच तेवढे हिताचे असते.
आपल्या देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये."
कर्नाटकातील ८/१० मंडळी श्रींच्या दर्शनास गोंदवल्या आली. श्रींनी त्यांना आग्रहाने १५ दिवस ठेवून घेतले. त्यानंतर सकाळी ती मंडळी जाण्यास निघाली. श्रींनी त्यांच्याकरिता पिठले भात करायला सांगितले. जाणार्‍या मंडळींनी जेवण उरकल्यावर ती श्रींना भेटायला आली. श्रींनी हरिपंत मास्तरना सांगितले, "मास्तर माझ्या गादीखाली मी मघाशी रुपये ठेवले आहेत, तेवढे घेऊन या." त्यावर मास्तर म्हणाले, "महाराज गादीखाली काही नाही, मी इतक्यातच सर्व अंथरूण झाडून घातले आहे." त्यावर श्री म्हणाले, "मास्तर, आपली विद्या शाळेतील मुलांपुरती खरी आहे, ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल ? मी सांगती त्यावर तर्क काढू नये, जा आणि गादीखाली सापडेल ते आणा." हरिपंत मुकाटयाने गेले आणि गादीखाली पाहिले तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले, ते चकितच झाले. श्रींना ते नेऊन दिले. श्रींनी प्रत्येक पुरुषाला एकेक रुपया आणि प्रत्येक बाईला एकेक खण देऊन सर्वांना निरोप दिला. म्हासुर्णे या गावी श्रीरामाच्या मंदिराजवळ शंकरशास्त्री म्हासुर्णेकर यांचा मठ आहे. अत्यंत भाविक, सात्त्विक प्रवृत्तीचे असून त्यांचे श्रींवर अतिशय प्रेम होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अतिशय रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्रींनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकारही दिला होता. एकदा ते नामस्मरण करीत बसले असता, श्रींनी आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्रींचे डोंगराएवढे उपकार त्यांना आठवले, त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या, श्रींची काही स्तुति करावी असे त्यांना मनापासून वाटले; पण काव्य करण्याची त्यांना शक्ति नव्हती याचे त्यांना वाईट वाटले. रात्री नित्याप्रमाणे भजन, आरती करून ते झोपले. झोपायच्या आधी त्यांनी श्रींचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी काकुळतीने प्रार्थना केली. पहाटे शास्त्रिबुवांना स्वप्न पडले, श्री सिंहासनावर बसले आहेत आणि शास्त्रिबुवा पीतांबर नेसून पूजा साहित्या घेऊन आले व त्यांनी श्रींची यथासांग पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून श्रींसमोर उभे राहिले व लगेच एकामागून एक सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतक्यात त्यांनी ते लिहून काढले व मग त्यांनी त्यांच्या कामाला आरंभ केला. पुढे त्यांच्या मनात आले की, या सहा श्लोकांत आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनावावे. त्याप्रमाणे त्यांनी डोके खाजवून दोन श्लोक खूप वेळांनी तयार केले व अष्टक बनवले. काही दिवसांनी गुरुपौर्णिमेला श्रींच्या दर्शनासाठी शास्त्रीबुवा गोंदवल्यास आले. झालेली हकीकत सांगून अष्टक लिहिलेला कागद श्रींच्या पुढे केला. श्रींनी पेन्सिल मागवली व शेवटच्या दोन श्लोकांवर काट मारून म्हणाले, "राम देतो त्यामध्ये समाधान मानायला शिकावे, रामाचे देणेच तेवढे हिताचे असत. आपल्या देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये." या शब्दांचे मर्ग शास्त्रीबुवांच्या लक्षात आले. मद्रासकडील एका सुशिक्षित सरकारी अधिकार्‍याला एक मुलगी होती. लहानपणापासून तिचे लक्ष भगवंताकडे लागले होते. लग्न होऊनही नवर्‍याशी पटेना म्हणून त्याच्या संमतीनेच ती माहेरी आली. पुढे तिच्या बापाची व ब्रह्यानंदांची गाठ पडली आणि तिला गोंदवल्यास श्रींकडे नेण्याचा त्य़ांनी सल्ला दिला. श्रींनी तिची सर्व हकीकत ऐकून तिला ठेवून घेतले. श्री तिला अम्मा म्हणू लागले व मौन पाळून १२ वर्षे नामस्मरण करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने केले. लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर अम्मा छान करीत असे. राम, लक्ष्मण, स्तीता यांच्यासाठी सुंदर कपडे श्री तिच्याकडून तयार करून घेत. ते घातल्यावर रामरायाचे ध्यान अतिशय स्वरूपसुंदर दिसे. अम्मा जाऊन येऊन गोंदवल्यास रहात असे. शेवटचे दिवस तिने तिथेच काढले.

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP