मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीब्रह्मचैतन्य महाराज वरित्र|
बत्तिसावे वर्ष

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - बत्तिसावे वर्ष

आनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.


१८७७
"माय, मला फार भूक लागली आहे,
माझे पोट भरेल एवढे दूध दे."
श्री यात्रेसाठी पंढरपूरला गेले असता तेथे अलिवागहून आलेले श्री. सदुभाऊ लेले नावाचे गृहस्थ भेटले. त्यांनी श्रींना अलिबागला येण्याचा खूप आग्रह केला. काही दिवसांनी श्री अलिबागला गेले, त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. श्रींनी दारावर थाप मारली त्यावेळी सदुभाऊंची म्हातारी आई जागी होती, तिने झरोक्यातून पाहिले तेव्हा एक तरुण बाहेर उभा असलेला दिसला. तिने आतूनच विचारले, "तू कोण आहेस ?" तेव्हा श्री म्हणाले, "मी सदुभाऊंचा गुरु आहे," त्यावर म्हातारी बोलली, "तू सदुभाऊंचा गुरु असशील, पण मी तुला ओळखत नाही, सदुभाऊ घरी नाही, तू उद्या सकाळी ये." तिचे बोलणे ऐकून श्री तेथेच बाहेरच्या ओटीवर बसून राहिले. साडेबारा वाजून गेल्यावर सदुभाऊ घरी परतले, त्यावेळी श्री ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले. साष्टांग नमस्कार घालून "आपण बाहेर का बसला ?" असे श्रींना विचारल्यावर श्री हसून म्हणाले, "अरे तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले, मी तरी काय करू ?" सदुभाऊंचा आवाजाऐकल्यावर म्हातारीने दार उघडले, तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसवून ठेवल्याबद्दल सदुभाऊ तिला बोलू लागले, त्यावर श्री म्हणाले, "म्हातीरीने केले ते अगदी बरोबर केले, रात्री-अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कुणाला आत घेऊ नये " म्हातारीच्या मनाला ही गोष्ट फार लागली. तिने श्रींची क्षमा मागितली. "झाले गेले सर्व विसरून जा " असे श्री तिला म्हणाले. पण तिच्या मनाला चैन पडेना. एक दिवस ती श्रींना म्हणाली, "महाराज, मी आता ७५ वर्षांची आहे. माझा मुलगा मला चांगले वागवतो, पण मी आता फार थकत चालले आहे, माझी एक इच्छा शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या, आपल्याला मी माझा मुलगाच समजते." श्री एकदम म्हणाले, "माय खरीच तुमची तयारी आहे ना ? मग वाट कशाला बघायची चला, आजच निघा " सदुभाऊ व आई दोघेही गडबडले, आई म्हणाली, "असे नाही हो महाराज. मला वाटले ते तुम्हाला सांगून टाकले इतकेच. आजच घाईने नको." त्यावर श्रींनी आईला आश्र्वासन दिले, "माय, तुम्ही तुमच्या अंतःकाळची काळजी करू नका. आजपासून नामस्मरण करू लागा, तुमच्या अंतकाळी श्रीमारुतीराय स्वतः तुम्हाला न्यायला येतील." आईचे फार समाधान झाले. सदुभाऊंचा निरोप घेऊन श्री उत्तरेकडे जाण्यास निघाले. वाटेमध्ये अबूच्या जंगलामधून जात असताना भिल्लांच्या टोळीने त्यांना गाठले व जंगलामधील आपल्या निवासस्थानाकडे त्यांना घेऊन गेले. अनेक प्रकारे त्रास देऊनही हा मनुष्य चिडत नाही हे पाहून एक म्हातारा भिल्ल म्हणाला, "ह मनुष्य साधा दिसत नाही, त्याला त्रास देऊ नका, याच्यापाशी काय सामर्थ्य आहे आपल्याला माहीत नाही, त्याला आधी खायला प्यायला द्या." श्री म्हणाले, "मी नुसते दूध पितो, दुसरे काही खात नाही." त्यावर श्रींची चेष्टा करण्याचे ठरवून एक नाठाळ, वांझ गाय श्रींच्या समोर आणून उभी केली व एक मडके हातात देऊन गायीचे दूध काढून पिण्यास सांगितले. श्री गायीजवळ गेले. तिच्या पाठीवर प्रेमाने थाप मारून ते गायीला म्हणाले, "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." श्रींचा हात लागल्याबरोबर गाय त्यांचे अंग चाटू लागली, तिला धार काढली व पोट भरेल एवढे दूध प्याले. यावर आजूबाजूच्या भिल्ल लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. म्हातार्‍या भिल्लाने सर्वांच्या वतीने श्रींची क्षमा मागितली. श्रींनी सर्वांना अनुग्रह दिला व चोर्‍या करण्यापासून परावृत्त केले. श्री तेथून पुढे निघून गेले.

N/A

References : N/A
Last Updated : February 04, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP