श्रीपूर्णानंद चरित्र - अध्याय अठरावा

आनंद संप्रदाय हा सर्व भक्तिमार्गी संप्रदायाचा मूळ स्रोत आहे .


श्रीगणेशायनमः । श्रीगुरुभ्योनमः । ॐनमोजी सदगुरु शिवराया । पूर्णानंदा सच्चिदानंद निलया । स्वानंदे शरण येता तव पाया । स्वरुपानुभूती त्यादेशी ॥१॥

तूझा अवतार आनंदाम्नाय महासरिता । तव महिमा न कळे ब्रह्मादिका ही सर्वथा । तू सदानंद पूर्णब्रह्म विज्ञान चरिता । ह्रदयाभीरामा नमो तुज ॥२॥

तु अज अव्यय अमलगुणी भगवंता । ब्रह्मानंदा सौख्य समुद्री रमता । सहजानंदा कल्याण विहारी म्हणविता । पूर्णानंदा पदांका नमोस्तुते ॥३॥

ब्रह्मानंदी निमग्न तुझे ध्यान । पूर्णानंद तू लक्ष्मी रमण । तुझे स्मरणी शिवराम । आनंद पूर्ण प्रवाहिले ॥४॥

तुझ्या प्राप्तीस्तव करिती हठयोग । तुझेसाठीच दाविती राजयोग । तू सकळ योगातीत अभंग अभिनव । अंतरंग विहारा सर्वेशा ॥५॥

तुज जरी वैकुंठपती म्हणावे । तरी अणुरेणूतही भरलासी स्वभावे । तुज माजी नसे रुपनामादी स्वभावे । सच्चिदानंदा श्रीकेशवा ॥६॥

तू निःसंग निर्गुण निराकार । भक्तास्तव होऊनी साकार । भक्तांचे लाड चालविसी साचार । पूर्णानंदा श्रीदिगंबरा ॥७॥

तुझी जरी कृपा जोडे । तरी पांगुळ हि मेरुवरी चढे । मुका ही शास्त्र बोले गाढे । ऐसे चरण पवाडे गुरुवर्या ॥८॥

मी तो पतीतामाजी पतीत ब्रहत्तर । माझे पापासी नसे पार । तू तरी पतीत पावन नामे निर्धार । तुलाच साजे दयाळा ॥९॥

तू आपुले बिरुदासाठी । प्रगटलास की खांबापोटी । ऐसा तू भक्तवत्सला जगजेठी । लीला तुझी अगम्य ॥१०॥

तरी तूजशी भक्तराज शिरोमणी । शरण येताती तव चरणी । पावसी त्यांच्या कार्या लागुनी । ही अगाध गुण विधानी अलंकरण ॥११॥

माझे अंगी नसे भक्ति । मजमाजी नसे वैराग्य स्थिती । मी तो केवळ मंदमती । अपराधिया माजी शिरोमणी ॥१२॥

तरी तू कृपासागरु । तव चरित्रा लेखनी साह्यकरी सर्वस्तरु । माझे निमित्य करुनी साचारु । रसाळ चरित्रा वदविणे ॥१३॥

वदवितोसी पाहोनि माझा भाव । हे ही बोल दिसे वाव । सत्यचि तू वाचेत रिघोनि स्वयमेव । तुजविण त्रिभुवनी कोण असे ॥१४॥

सप्तदशाध्याया पर्यंत । तव चरित्र ते अत्यअदभूत । तूच कृपा करुनी व्दितीयावृत्ती निश्चित । वदविलासी गुरुचरणा कृपाळा ॥१५॥

आता पुढेही साचार । तव चरित्र प्रकाश करवी मनोहर । वदविजे निजसत्ते निर्धार । पूर्णानंदा श्रीदिगंबरा ॥१६॥

सप्तदशाध्यायाचे कथन । पूर्णानंदाची पूजा करुन । शिवराम प्रभू हिरापुरी पूर्ण । राहते जाले स्वानंदे ॥१७॥

पुढील कथेसी अवधान । द्यावे श्रोते दयाळु पूर्ण । पूर्णानंद स्वरुपा आनंदा रंभरण । चरित्र स्वलीले परिसावे ॥१८॥

असो महाराज शिवराम । पूर्णानंद मूर्ती घेऊन समागम । सुखासनी बैसोनि संभ्रम । कल्याणासी आणिले मिरवित ॥१९॥

कल्याणासी आणिता ती मूर्ती । दशदिशी फाकली ही किर्ती । तेथे ही अपार लोक येती । दर्शनास्तव स्वानंदे ॥२०॥

कल्याणास पूर्णानंद नारायण । प्रभू आणिले ऐसे जाणून । रामपाठक नामे ब्राह्मण । काय करिता पै जाहला ॥२१॥

त्याचे घरी असे लक्ष्मीची मूर्ती । सकल सुलक्षण युक्त निगुती । त्यांनी शिवराम प्रभूप्रती । विज्ञापनी काय बोलती ॥२२॥

प्रभूघरी अवतरले नारायण । मम घरी असे लक्ष्मी लक्षणसंपन्न । सगूण चरणे भक्तदर्शनी एक्या स्थाने । पूर्णानंद स्वरुपी रमवावे ॥२३॥

ऐकता त्याचे वचन । प्रभू मनी फार संतोषून । बोले काय त्यालागुन । हर्षयुक्त त्याकाळी ॥२४॥

आमुचे घरी नारायण असे । तुमचे घरी लक्ष्मी वसे । उभयतांचे लग्न सौरसे । करु आता विधीयुक्त ॥२५॥

ब्राह्मण तो धर्म संपन्न । प्रभू तो षडगुण ऐश्वर्यसंपन्न । पूर्णानंदाचे उत्साही लग्न । चार दिवस सोहळा करितसे ॥२६॥

ब्राह्मण भोजन आणि संभावना । अपार देतसे प्रभूराणा । ज्याच्या चरणी नवनिधी रावती सगुणा । त्या विंदाणा काय उणे ॥२७॥

यापरी ते पूर्णानंद नारायण । महालक्ष्मीसह वर्तमान । अच्युत मंदिरी पूर्ण । स्वानंद सिंहासनी विराजिले ॥२८॥

ब्रह्मानंद गुरुंचे वरे करुन । गुरुक्षेत्री पूर्णानंद नारायण । कालत्रयी अढळ अचळ पूर्ण । भक्तास्तव तिष्ठले स्वानंदे ॥२९॥

सद्यःकाळ पावेतो यापरी । ती मूर्ती विराजिलेसे पांडुरंग मंदिरी । भाग्यबळे नरनारी । दर्शने पावती परमकल्याणा ॥३०॥

कल्याणमय ती मूर्ती । कल्याणमय ज्याची कीर्ती । कल्याणकारी श्रोत्या वक्त्याची अनुभुती । कल्याण करिती यावज्जन्माशी ॥३१॥

ज्या ग्रामास नाम कल्याण । सदानंदास्तव ठेवी अवधूत पूर्ण । यास्तव सदानंद यतीश्वर श्रीचरण । सप्रेमे तिष्ठे त्यास्थानी ॥३२॥

असो ते शिवरामेश्वर । पुढे काय करीतसे चरित्र । तेही ऐकावे श्रवणाधार । स्वानंद प्रदायिनी श्रोतयासी ॥३३॥

प्रभूचा एक निजशिष्य । त्यास असता एक तनय । नवस केला निश्चय । त्याचे उपनयन गुरुसन्निधानी करावे ॥३४॥

दहा वर्षे पर्यंत । तो बसला असे वाट पहात । याकाळ पर्यंत प्रभूस तेथ । योग न मिळे जाग्याचा ॥३५॥

एकदा नारायणाचे दर्शन करुन । प्रभूसी नेले मानिहाळातुन । निज प्रासादी पुत्रास गुरुचरण । उपनयनार्थ उपदेश भक्ति प्रेमभरी ॥३६॥

त्याचेही मनोरथ पूर्ण । करिते जाले प्रभू आपण । निज जनास्तव अवतार घेउन । प्रभू वाहती अवनी तळी ॥३७॥

कलियुगी लोक समस्त । होतील विषयासक्त । बुडेल परामार्थ पंथ । निज हितासी जीव मुकतील ॥३८॥

यास्तव आचार्याकृत ग्रंथासी । टीका करुनी निश्चयेसी । सुलभ केले जनासी । तरावया भवसागर ॥३९॥

जे वेदाचे गर्भितार्थ । अज्ञ जना केवी होय ज्ञात जीवनी यथार्थ । यास्तव करुनी प्राकृती बोधार्थ । मार्ग दाविलेसे स्वाध्यायि ॥४०॥

ह्या मार्गी जे धरतील विश्वास । त्यास न बाधत गर्भवास । ऐसा या संप्रदायास । वर दिला असे शंकरे ॥४१॥

यास्तव प्रभूचे अवतार । ते सदैव पूर्ण कृपासागर । काय करते जाले शिवरामेश्वर । तेही परिसावे क्रमाशिनी ॥४२॥

प्रभू दिसताती मानवी शरीर । हे सत्यची सर्वेश्वरी नित्य अवतार । जेवी समुद्र आणि लहर । भिन्न कदापि नव्हेची ॥४३॥

जरी ते पूर्णानंद समुद्रीचे लहर । ते लहर काय पूर्णानंद नीर । नीरची भरले असे बाह्यांतर । तरंग दिसताही शिवरामरुपी सत्यत्वी ॥४४॥

शके सोळाशे आठी शिवरामेश्वर । वसंतऋतू अक्षय्यत्रितीया श्रेष्ठतर । पूर्णानंद स्वरुप समुद्री भीमातीर । मन्याळी समाधिस्त सदानंदी ॥४५॥

ज्ञान भिमातीरी । अक्षय तृतीयेसी निर्धारी । पूर्णानंद समुद्री । निमग्न होताती म्मान्याळी ॥४६॥

ज्या वस्तूस नसे येणे । त्यासी केवी संभवेल जाणे । अज अव्यय शाश्वत पूर्णे । सदा सदानंदत्वी विश्वंभर ॥४७॥

ते कालत्रयी अविनाश । ते सच्चिदानंद स्वयंप्रकाश । परंज्योती जगदीश । त्यासी येणे जाणे ते कायी ॥४८॥

ज्याचे करिता नामस्मरण । जगदवडंबर दिसे मृगजळ शून्य । केवळ सच्चिदानंद घनपूर्ण । हे पूर्ण प्रचिती त्या होय ॥४९॥

ज्याचे नाम असे शिवराम । शिव शब्द तो मंगळ परम । मंगळास प्रकाश करी श्रीराम । यापरी प्रभूचे नाम द्विअर्थिकी ॥५०॥

तो केवळ अरुप अनाम । परी नामी असे महिमा परम । सकृत म्हणता शिवराम । शिवसुख त्यासी सहज लाभे ॥५१॥

त्याचे घेता नाम मंगल । त्यासी मिळेल दिव्यविज्ञान स्वरुप विमल । मंगलमय जन्म वाहिल । नाम प्रसादे प्रभूस्वरुपी ॥५२॥

असो शिवराम तेच पूर्णानंद । पूर्णानंद ते शिवराम सच्चिदानंद । ते उभयताही अद्वयानंद । कल्याणी तिष्ठली भक्तास्तव ॥५३॥

ज्याचे राहणे कल्याणी । कल्याणकारक ज्याची करणी । त्याचे चरित्र श्रवण पठणी । कल्याण करी सर्वासी ॥५४॥

हे चरित्र पूर्णानंद । ब्राह्यांभ्यंतरंगी भरलासे अभंग शुध्द । जे ऐकती ऐकविती स्वानंद । पूर्णानंद ओसरल त्यालागी ॥५५॥

पूर्णानंदचि आपण । आपुले चरित्र पूर्ण । पूर्णानंद पदी वाहून । वदविले असे सत्यत्वी ॥५६॥

सत्यची हे चरित्र श्रवण मात्र । संतती संपत्ती अपार । प्राप्त होत असे निर्धार । यापरी वर असे या ग्रंथासी ॥५७॥

वाचेचे वाचकत्व । बुध्दीचे बोधकत्व । सदगुरु असता सत्यत्व । त्यावीण वदविता कोण असे ॥५८॥

सदगुरु तो कल्पवृक्ष । श्रोत्यांचे पुरवी कल्पितापेक्ष । तो सच्चिदानंद सर्वाध्यक्ष । सर्वांतरात्मा सर्वेश्वर ॥५९॥

श्रवण करता भावार्थ । पूर्ण करतील मनोरथ । वक्ता स्वये सदगुरुनाथ । सत्य सत्य त्रिवाचा ॥६०॥

असो पुढे हा संप्रदाय । कैसा चालिला प्रवाह प्रकारी श्रेय । तेही ऐकावे निगमस्तरी औदार्य । श्रोते तुम्ही दयाळु ॥६१॥

शिवराम प्रभूचे अनुग्रहित । राजमणी स्वामी निश्चित । त्यांची गुरुभक्ति अदभूत । तेही परिसावे की स्वानंदे ॥६२॥

ते तरी प्रभूचे निजशिष्य । ते सच्चिदानंदीय स्वानंद निलय । त्यापासून हा संप्रदाय क्रम । चालिलासे सत्यत्वी ॥६३॥

त्या राजमणी स्वामीचा अनुग्रह पूर्ण । वैकुंठ स्वामीसी असे जाण । ते अवतारी पुरुष पूर्ण । पौत्र शिवराम प्रभूचे ॥६४॥

नाम ज्याचे असे वैकुंठ । जे प्रत्यक्षची वैकुंठ पीठ । त्याचे नाम घेता वैकुंठ । प्राप्त होय नित्यत्वी ॥६५॥

ते सकृत म्हणता वैकुंठ । किंवा कानी पडता नाम अवचट । सहज त्याची खुंटे वाट । जन्म मरणा ग्रंथी सुटे कृपेनी ॥६६॥

ते प्रत्यक्षचि वैकुंठपती । संपूर्ण जगी भरलेसे ज्याची कीर्ती । ते मानवी वेष धरिताती निश्चिती । ते मानवी नव्हे अमूत ॥६७॥

त्याची कीर्ती अदभूत । परि कांही सांगेन निश्चित । ते ऐकावे स्वानंद चित्त । कृपा करुनी श्रोतेहो ॥६८॥

वैष्णवमति कृष्ण द्वैपायनाचर्य म्हणविती । ते कलियुगी श्रेष्ठ मध्व मताभिमानी असती । ते मणूर ग्रामीचे जागीरदार म्हणविति । अचारधर्मे लोकांतरी ॥६९॥

त्यास सूत्र भाष्यात । कांही अनुमान वाढला मनी निश्चित । त्याचे समाधानास्तव जाती गुरुस्थानाप्रत । चिंतनि फार आंतरा वेढिले ॥७०॥

ते उपासिति नित्य श्रीहयीग्रीवदेव । ह्रदयी आठऊनी त्याचा प्रभाव । निजले असता सहज स्वभाव । दृष्टांत काय होतसे ॥७१॥

वैकुंठबाबा असे बेदरी । तेथे तू जाय झडकरी । त्याचे दर्शनी होता निर्धारी । सूत्रार्थ संशय हरेल ॥७२॥

त्यास तू मानू नको मानव । मानवापरी दिसती तरी ते ज्ञान श्रीवैभव । तया प्रत्यक्ष साक्षात जाणरे श्रीकेशव । अवतार माझेच वधिनीय ॥७३॥

त्याचे दर्शना वाचून । तुझा हा संशय न होई खंडन । यास्तव जाई येथून । दर्शन घेई सत्वर ॥७४॥

यापरी पाहीले स्वप्न । काय करिती ज्ञानसंपन्न । बेदरास जावे म्हणून । चिडगोपेस पै आले ॥७५॥

तेथे होता दादाराय । तेथील तो देशपांडे समर्थ कुळी व्यवहार्य । जाणून चिडगोपी आचार्य । मुक्काम वाहिले तेथे चार दिवस ॥७६॥

आचार्या म्हणती बेदर । येथून किती असे दूर । मजला जाणे असे निर्धार । यास्तव कारणी येथे पै आलो ॥७७॥

देशपांडे म्हणे काय कारण । आचार्य बोलती त्या लागुन । वैकुंठबाबाचे दर्शन । मजला अगत्य असे घेणे ॥७८॥

बाबांचे नाव पडता कानी । बोले काय तो मध्वमती अभिमानी । स्मार्त निंदक त्याचे मुखावलोकनी । देशापांड्या चिडला त्याकाळी ॥७९॥

अहो स्वामी आचार्य । तो स्मार्तपूर्ण केवळ नष्टचर्य । आपणास योग्य नव्हे दर्शनी औदार्य । उचित नसे विधानांशी ॥८०॥

आचार्या म्हणे तू निंदक । तुज केवी कळे ते कवतुक । मज जाणे असे उदयिक । सांगा किती दूर असे ॥८१॥

तेव्हा ते बोले आचार्यास । येथून असे बारा कोस । उदयिक रहावे चिकनहळ्ळीस । ते गाव मख्ता असे माझेच ॥८२॥

उदयिक तेथे राहून । परवाचे दिवशी करावे प्रयाण । ऐसे त्यास बोलूवन । आणिते झाले त्या गावासी ॥८३॥

आचार्य आले चिकनहळ्ळीसि । ऐसे समजुन मनासी । आंतरज्ञानी केवळ पूर्ण अपरोक्ष क्रतीराशी । केले काय तेधवा ॥८४॥

प्रातःकाळी उठोन । स्नानसंध्या उरकोन । समागमे चौघे शिष्य घेऊन । येते जाले त्या गावास ॥८५॥

तेव्हा ते आचार्य शिरोमणी । बैसले होते देवार्चनी । बाबा आले हनुमंत देऊळी ऐकोनी । दूते सांगती वार्ता आचार्यासी ॥८६॥

पूजा टाकूनी तात्काळी । आचार्य धावे त्वरे अनवाणी उतावीळी । दर्शनाची आस संकल्प आगळी । बाबापाशी येती लगबगी ॥८७॥

दुरुन पाहता वैकुंठमूर्ती । आनंद न समाये त्याचे चित्ती । नमस्कार करिती निश्चिती । सप्रेमेसी वैकुंठेश्वरा ॥८८॥

ते मूर्तीस करुनी नमस्कार । स्वानंदे धरुनी त्याचे कर । आणिते जाले निज बिर्‍हाडावर । जेथे आपण उतरले असती ॥८९॥

तेथे आपण मांडूनि आसन । करीत होते देवतार्चन । त्याच आसनी बाबास बैसऊन । आपण पुढे बैसलेती ॥९०॥

बाबा म्हणे आचार्य प्रभूप्रती । सांगा आता इच्छित संशय चित्ती । म्हणे आपणास स्वतःअडखळे निश्चिती । आधीच त्याची संगती विहित विधानांशी ॥९१॥

आपण केवळ ज्ञानसिंधु । आपण छेदक भवबंधु । आपण तो ब्रह्मानंदु । सांगावे ऐसे पै नाही ॥९२॥

आपण तो अपरोक्ष ज्ञानी । अवतार पुरुष या जनी । हे तो आधीच माझे स्वप्नी । आज्ञापिले असे श्रीदेवे ॥९३॥

यापरी बोलुनी आचार्य । पुसते जाले सूत्रार्थ संशय । तत्क्षणी त्याचे निर्णय । करुन दिधले वैकुंठ मुनीसी ॥९४॥

संशयाची होता पूर्ण निवृत्ती । आचार्यास न राहे देहस्थिती । ब्रह्मानंदीय अनुभूती चित्तवृत्ती । ताटंक मुद्रांशी प्राप्त झाली ॥९५॥

उभयता सेविती सहज समाधी । कांही न राहे देहबुध्दी । हे भक्तगणे पाहती त्रिशुध्दी । आचार्य प्रतिभा विधानीय ॥९६॥

सावध होताती आचार्य पूर्ण । नेत्री चालिलेसे प्रेमजीवन । त्या आनंदे उठून जाण । मिठी घातिली वैकुंठ चरणी ॥९७॥

मुखी म्हणे संशय समुद्री । मी बुडालो असता निर्धारी । आपण तारक होऊन साचारी । तारिलेजी स्वामीया ॥९८॥

ते नव्हे संशय खंडन । माझे जन्ममरण हरिले पूर्ण । या उपकारा पासुन । उत्तीर्ण कदापि नव्हेची ज्ञानधना ॥९९॥

यापरी विनंती करुन । आग्रह करीतसे भोजना कारण । बाबा बोले अन्नसेवन । मजला कदापि नव्हेची ॥१००॥

श्रीगुरु आपण यावे मठा लागुन । तेथे होईल संभाषण । यापरी त्यास बोलून । निघते जाले त्याकाळी ॥१०१॥

पुनरपी वेशी पर्यंत । आचार्य आले बोळवित । पाठवून देती निश्चित । उदक आणिले स्नानासी ॥१०२॥

आचार्य म्हणे त्या लागुन । स्नानाचे मज नाही प्रयोजन । असेच देवतार्चन । नैवेद्य सिध्दी ही होईल ॥१०३॥

इतर म्हणती आचार्यास । स्पर्शा स्पर्श झाले अर्चनी काळास । यास्तव कारणे स्नानासी । शुचिर्भूत विधानांशी ॥१०४॥

ऐकता ऐसे आग्रह वचन । आचार्य बोलती त्यालागुन । त्या देही विटाळ नाही साक्षात आग्नी जाण । अग्नि स्वरुपा विटाळ कैचे संभवेल ॥१०५॥

त्यास जे म्हणती विटाळ । तेचि होतील अपवित्री खळ । ते तरी ब्रह्मानंद शुध्द निश्चळ । त्यास मानव कोण म्हणेल ॥१०६॥

यापरी बोलता आचार्य । आग्रह करी देशपांडे । क्षोभून तेव्हा श्रेष्ठचर्य । शाप देती त्यालागी ॥१०७॥

तू करिसी साधु निंदा । तुझे वंश क्षय होईल रे मतिमंदा । हे असत्य नव्हे रे मुढांधा । वचन माझे परियेसी ॥१०८॥

तुझे घरी न सेऊ अन्न । ऐसे बोलुनी कोप वचन । येते जाले बेदरी लागुन । बाबापाशी त्याकाळी ॥१०९॥

आजही देशपांड्या घरी संतान । वृध्दीस नसे जाण । दुसरे दत्तक बाळ पोषण । घेत जाती सत्यत्वे ॥११०॥

आचार्य बाबापाशी । मास एक राहिले आनंदेसी । अत्यानंद पावोनि मानसी । महाराजांचे संगती शांत्यर्थ ॥१११॥

ही तो कथा प्रसिध्द । जाणती अबाल वृध्द । यापरीचे ते ब्रह्मानंद । वैकुंठस्वामी समर्थु ॥११२॥

धन्य ते आचार्य । धन्य ते वैकुंठ मुनीवर्य । आणिक एक गोष्ट आश्चर्य । ऐका तयांची सांगेन मी ॥११३॥

आचार्य असता निजध्यानी । त्यास समजले की अंतःकरणी । वैकुंठबाबा वैकुंठसदनी । जाताती त्याकाळी ॥११४॥

जेव्हा अंगणी येऊनी पाहे । तेव्हा अंतरिक्षीय मार्गी तेज वाहे । साष्टांग प्रणिपात करती आचार्य । लोक हासती तेधवा ॥११५॥

साधूचा महिमा साधू जाणे । इतरासी विनोद पूर्ण । आचार्य म्हणती लोका लागुन । वैकुंठमूर्ती गेले की ॥११६॥

तेव्हा बेदरास मनुष्य पाठऊन । आणविताती वर्तमान । सत्यचि असे तेच दिन । स्वरुपी लीन पै जाहलेती ॥११७॥

तरी ते केवळ अज अव्यय । त्यास येणे जाणे कैचे काय । जगदोध्दारास्तव मठी जाण । समाधि जाहली स्वानंदघनी ॥११८॥

त्यांचा पूर्व परिचय । संक्षेप विधानी बोलू संबंधठाय । जेणे क्रम परिचय । सिध्दांत विधीत होईल ॥११९॥

आता स्मरु कथा प्राचीन । कल्याण स्थानी सदानंद मठी अनुलीलन । श्री दत्तानंद यतीश्वर श्रीचरण । मठास्थानी सेवा संवाहिली ॥१२०॥

सातपुडा पर्वतीय मध्यप्रदेशी । दुर्गम प्रदेश सुरभी नदि तीराशी । कौशिक गोत्री विप्र कुळेशी । आश्रम शाळे वेदा अभ्यासिले ॥१२१॥

तया घरी अहर्निशी । वेदसेवा पठण पाठणी विशेषी । तया प्रांतीय स्तरी क्रमेशी । विप्र सदनी परिवाहती ॥१२२॥

प्रतिवर्षी यथावत । नूतन बटु पाठशाळेत । अभ्यासा कारणी नियमित । वेद पठणार्थी होती एकत्रिती ॥१२३॥

ऐशा परिसरी एक बटुक । अती सात्विक विशेष नेटक । तीव्र बुध्दी उपासनी नियामक । शुध्द जीवनी परिवाहीले ॥१२४॥

काहि दिन अध्यायना वाहोनी । यात्रा विधानी संकल्प क्रतीनि । निघाले महाकुंभ पर्वणी । गोदावरी सिव्हस्थ त्र्यंबका पातलेकी ॥१२५॥

पर्वणी स्नान उपासनी । सारोनि तटाक यात्रा विधानि । जात असता आपेगावि दिव्यस्थानी । आत्मतीर्थी स्थीरावले ॥१२६॥

आत्मतीर्थी कांहि काळी । दत्तानन्द राहिले श्रध्देनि निश्चळी । मानवि भाषेत तीर्थ चरित्रा ऐकिली । एकाग्र लक्षाणी परिवाहती ॥१२७॥

पुनीत गुरुदेव अगम्य चरित्र । वर्णीती नित्यक्रमीय सत्र । नवीन कथेत तपःपात्र । जीवनोद्देशाशी उपदेशिती ॥१२८॥

लक्षपूर्वक कथा सावधानि । शांतपणी अंतर्विवेकी शांतमनी । श्रीगुरु दत्तात्रेय उपासनी । शुध्दतत्वी परिवहती ॥१२९॥

तेथेचि लक्ष पुरविता । आनंदाम्नयविधि विधानता । कल्याण स्थळी त्रिपुरांतक तीर्था । विशेषत्वी अनुबोधिले ॥१३०॥

अनादिकाला पासोनी । कलिकैवल्य विज्ञान गहनी । विश्वकल्याण मार्गा वाहोनि । अनुक्रमांशी उपदेश हा ॥१३१॥

तयाच्या क्षेत्र स्थानाशी लक्षून । दत्तानन्द आले परळी तिर्थ स्थान । योगेश्वरी दर्शन वाहून । कल्याण स्थानी प्रत्यक्षिल ॥१३२॥

स्थान विशाल पुण्यप्रद स्थळ । एकांत स्थळी तपःपावनी सोज्वळ । पाहोनि आंतरीय सेवेशी तात्काळ । मार्गदर्शनी अनुसरले ॥१३३॥

आनंदाम्नया सनातन । कलि आरंभणी कार्य चाले गतिमान । श्रध्दा भक्तीयुक्त सक्रीयपण । अनुवाहिलेति क्रमांगत्वि ॥१३४॥

श्रीसदानन्द चरण प्राचीन । स्वये सर्वकालीय मार्गदर्शन । भक्तोध्दारार्थ कर्मोपासनी विज्ञान । अतीव शुध्दत्वि चालतसे ॥१३५॥

सद्यो विधानी क्रम सेवेत । पूर्णानन्द चरण कार्यांशी वाहत । त्यांच्या आज्ञे यथावत । शुध्द क्रम प्रकाशिले ॥१३६॥

नित्यक्रमी अर्चनोपासनी । दत्तानन्द रमले गुरु संन्निधानी । मानव जीवन लक्षणांशनि । विश्वकल्याण परिवहणे ॥१३७॥

एतत्क्रमे यथावत । वाहती दिन क्रमांशाशी पुनीत । आंतरी श्रीदर्शनाशी इच्छिती यथार्थ । समय विधानी अभीवर्धिले ॥१३८॥

निग्रह करुनी साधनी गुहेत । प्रार्थना करीती सदानन्दाशी यथावत । पुनीत दर्शनी इच्छा प्रज्वलीत । दिव्यतत्वीय परिलक्षणी ॥१३९॥

प्रयोपवेशनी आग्रहे वाहती । आपुल्या चरण दर्शनासी स्मृति इच्छिती । पुनीत दर्शन द्यावे आम्हांप्रती । पावन करावे जीवनांशाशी ॥१४०॥

अनन्य समाधीसी प्रार्थीति । कळवळे विनवणी वाहाताती । जडजीवाच्या तरणोपायासी । ही प्रार्थना सदानन्दे ऐकावी ॥१४१॥

देवाधिदेव गुरुराज । भक्त कल्याणी वाहूनि बैसले सहज । हाके सरशी पुरविती इच्छा भक्तकाज । युगानुयुगीय गव्हरी गुरुचरणे ॥१४२॥

प्रातःपुजेची वेळा प्रशांत । एकाग्र मनीपूजा वाहात । अचानक गडगड ध्वनी भरली गुहेत । प्रकाश पुंजरत्तर सर्वत्र गव्हरी फाकले ॥१४३॥

सुगंध भस्माची धुसकारी । मंद सुगंधे भरली स्तरी । प्रभापुंजे तत्काळी गव्हरी । झगमगीत तेजाळले ॥१४४॥

संपूर्ण भिंत समाधी पुढची । एका क्षणात ढासळली त्वरेची । भव्य दिव्य मुर्ति मनोहारीणी सुखाची । दत्तानन्दे अवलोकिले ॥१४५॥

प्रथम तरवी उत्तराभि मुखी । पद्मासनी दिव्यभव्य सदानन्द विशेखी । प्रभापूर्ण प्रशांत प्रसन्नमूर्ती निर्निमेखि ।अनुपम्य दर्शनी भान हरपले ॥१४६॥

दिव्य स्वयंभु शुभ्र कांति सतेज । दिव्य शाटी परिधानिले सहज । केशर कस्तुरी भाळी सतेज । माथी जटाजूट त्रिनेत्री ॥१४७॥

नागकुंडले कानी । भस्मभूषित देह धवल वहनी । नीलकंठ सोज्वळ नयनी । शांभवी मुद्रेयोग मंडीत ॥१४८॥

भाळी चंद्रमा शोभत । व्याघ्रांबरी मूर्ती पद्मासनी दिप्त । सतेजे प्रभापूर्ण लखलखित । दिव्य पुष्पमाला कंठी रुळे ॥१४९॥

रुद्राक्ष हार वलये । दंडकमंडलू पादुका पुढलिया ठाये । धूप दिपज्योतीसह निर्वाहे । वराभय मुद्रे परिमंडीत ॥१५०॥

खाके झोळी प्रसादपूर्ण । दिव्य दर्शनी भरले लोचन । नेत्र दिपती प्रभे कारण । देहभाना हरपलेसे ॥१५१॥

लगबगीने डोळे बांधोनि । हाती इष्टिका तत्क्षणी वाहोनि । पूरिती भयादरीय क्रतिनी । मुखी प्रार्थीती मनसोक्ती ॥१५२॥

अतीव दिप्त तैजसी विषेश । सहन नहोय प्रखर तेजांश । डोळे दिपती प्रभेनी विषेश । तेजे डोळे वस्त्रे बांधिले ॥१५३॥

उपवस्त्रे डोळे बांधून । हाती इष्टिका घेवोन । चाचपडत तारव संपूर्ण । बुजविती सर्व पूर्ववत ॥१५४॥

त्यावरी चुना लिंपोन । गिलावा करिती पूर्ववत जाण । मग डोळे सोडोनि पाहता शाटी महान । श्रींची बाहेरी राहिले असे अल्पांशी ॥१५५॥

चिंता करिती सकळीक । थोड्याच क्षणी गेले आत स्वगतित नीयमांक । त्या स्थानी चरण पादुका पुर्ववत देख । बैसविले अर्चन व्यस्थांशी ॥१५६॥

मग पंचामृतादी अभिषेक । रुद्रसुक्तादी विशेख । पुरुषसुक्तादी पंचक । पूजा करिती पूर्ववतची ॥१५७॥

धूपदिप नैवेद्यारति । नित्यप्रती यथावती करिती । मंत्रघोषे वेदस्तुतीवी प्रार्थिती । अनन्यपणी चरणा वंदिती सर्वही ॥१५८॥

साक्षात शिवबिंबीत दिव्यत्वमूर्ती महान । शिवसंकल्पी उर्ध्वगंगेतुनी अवतरले चरण । ऋतःपूत पारमहंस्य विभुत्वी संपन्न । गंगा प्रवाहि भूवरी वारणशीत ॥१५९॥

तेथे साक्षात देवऋषीश्वरांनी । यज्ञांशी आराधिले वामदेवादि ऋषिवर्यानी । गंगा पूजनी मानवांच्या दर्शनी । दत्तात्रेये सोमऋषीसी प्रसादिले ॥१६०॥

आनंदी प्रसन्न दिव्यस्वरुपी प्राशांत । सदानन्द नामाभिधानी सर्वही आवाहित । कलि कल्पास्तव अवतार स्वतंत्र । देवऋषीवरे तया वरांघ्रिले ॥१६१॥

तीच मूर्ती शिवआज्ञेनी कल्याणी । जया दत्तात्रेयो देश दीक्षालंकरणी । आदिमूर्ति संन्यस्त व्रतांशिनि । देवदेवेश्वरे गव्हरी विभूषिले ॥१६२॥

ऐशा अनुपम्य श्रीचरणाचे दर्शनी । श्रीदत्तानंदे वाहिले भाग्य लंकरणी । आनन्दाम्नाय प्रवाहनी । शाश्वत सेवेत संवाहिले ॥१६३॥

चरण दर्शनी देहभान । दिव्यसमाधि अलंकरण । आब्राम्हांडी अवतरले श्रीचरण । केवढे भाग्य दत्तानन्दाचे ॥१६४॥

सर्वही प्रार्थिती भक्तीभाव स्तवनी । आदरे साष्टांग वाहती स्तवनी । अपूर्व दर्शनी जीवनी धन्यता वाहोनि । सार्थक झाले याक्षणांशी ॥१६५॥

वरतीही प्रदक्षिणा वाहोनी । एकशेआठ साष्टांग पणी वंदोनी । क्षमाप्रार्थि त्रास दिले अज्ञानपणी । जयत्कारा परिवाहती ॥१६६॥

श्रीसदानन्दाची समाधी । दोनहजार वर्षानी ढासळली आगधी । पूजाविधानी दर्शन क्षणांश संबंधी । अहो भाग्यत्व उच्चारिति ॥१६७॥

परम आश्चर्याचा क्षण । नगरी देशी वार्ता पसरली महान । समस्त देशवासी ग्रामवासी जन । सदानन्द दर्शनी धावताती ॥१६८॥

त्याच गती नगराधिपतीस । ही वार्ता कळली विशेष । तोही इच्छिला दर्शनास । कलत्र पुत्रासह मठी पातला ॥१६९॥

भक्तगणे तयासी । स्थान महिमा सांगती पवित्र विधिशी । परी न ऐके कवणाच्याही शब्दाशी । सत्ताविधानी आला असे मठस्थानात ॥१७०॥

वस्त्रा भरणासी लेवोनी । दरबार विधी वस्त्रा भूषणी । द्वारी येवोनि ठाकिता क्षणी । प्रवेशनार्थी आज्ञा प्रवर्तीलासे ॥१७१॥

ऐश्या कार्याशी त्या स्थानी । अकस्मात गतिद्युती संकल्पनि । गडगडाटे शब्द ध्वनि । अग्निलोळ प्रकटिले सामोरी ॥१७२॥

अग्निलोळ तैजस गतिभूत । अतीवेगे अंगावरती येत । तेणे किल्लेदार मनी घाबरत । गयावया शब्दे प्रार्थितसे ॥१७३॥

अघटीत घटने कारणा पाहता । आंतरी दाहकत्वी यातना अनुभवित । म्हणे न्यावे किल्यास त्वरीत । सुरक्षित स्थळीराहू म्हणे ॥१७४॥

डोळे अंधारी भरले । अग्निलोळे भयभीत अंतरहि व्यापिले । देही कंपासी वाहिले । घामाघूम क्षणांतरी ॥१७५॥

तयाच्या दाहक पणी । भयभीत झाला त्याच क्षणी । म्हणे किल्लयास न्यावे करीतसे प्रार्थनी । असाह्य तेजा सहावेना नेत्राशी ॥१७६॥

तयाच्या सर्व देही । कंप भरले लवलाही । भीतीने थरथरतो देही । भान नाही क्षणार्धे ॥१७७॥

तयास किल्लयावरी पोचविला । म्हणे ही असे विचित्र लीला । सदानन्दी क्षमा मागीतला । प्रार्थीतसे विधानांशी ॥१७८॥

ऐश्या स्थिती विधानी । मठी उगवला महोत्सवदिन सदानंद पंचमी क्षण । भक्तसमुदाय परिपूर्ण । श्रीमहोत्सवीय कार्या जमले कीं ॥१७९॥

श्रीसदानन्द महोत्सव । सर्वत्र आनंदी वैभव । उत्साह वाहे अपूर्व । श्रीसेवा विधीयांशी ॥१८०॥

आधी उत्सव गावात । श्रीपूर्णानन्द तिथी प्रीत्यर्थ । प्रतिपदाते त्रितीया दिनांत । भक्तिरसे ओथंबिलीसे ॥१८१॥

चतुर्थीते अष्टमी पर्यंत । श्री सदानन्द मठी आराधना विहित । सहस्त्रावधी भक्त पुनीत । भक्तिभावांशी परिरंगती ॥१८२॥

विपुल ब्रम्हवृंद समुदाय । वेद वेदांत भक्तिउपासना अतिशय । जप पारायणादी पूजा ऐश्वर्य । नानाविधी परिरंगली ॥१८३॥

सदानंद स्वामीचे आराधनेसी । चारी सहस्त्र ब्राह्मण भोजनासी । वैशाख उत्सवी नैमेसी । घृताची पंगतीत त्रुटी पै पडली तदा ॥१८४॥

तेंव्हा साद्यंत वर्तमान । सांगती दत्तानंदा लागुन । भोजनासी बैसले ब्राह्मण । परिघृताची त्रुटी पडली असे ॥१८५॥

कानी पडता हे वचन । आडा जवळी येऊन । बोलिले काय शिष्या लागुन । सेंदून काढा रे तूप शीघ्र ॥१८६॥

आज्ञा होताचि पाही । शिष्य काढिती लवलाही । तेव्हांच काढविले घृत पाही । निघते जाले त्याकाळी ॥१८७॥

ते तूप घेऊनी । वाढिले समस्त ब्राह्मणी । साचून ठेविली ते तूप कलशातुनी । उदक दिसे सर्वासी ॥१८८॥

ब्राह्मणाचे भोजन पर्यंत । ते असे सत्यचि घृत । मागून पाहता निश्चित । उदक असे सर्व घटी ॥१८९॥

ज्या आडातील तूप काढीली । ते आड कल्याणी असे वहिली । अद्यापि पूजा करिती लोक सकळी । त्या आडाची सप्रेमे ॥१९०॥

ऐसे कित्येक कवतुक । त्यांनी दाविलेसे देख । तेही ऐकावे भाविक । कृपा करुनी सर्वस्वे ॥१९१॥

बीदर देशीय सुभेदार । त्याच्या सत्तेत कल्याण परिसर । सहज कल्याणी आला राज्यस्तर । स्थान रम्य पाहोनी ॥१९२॥

यावनी सत्ते किल्लेदार । बीदर परगणी राज्यशासनी धुरंधर । राज्यसीम अवलोकनी दळभार । परिसरी आला क्रमांशे ॥१९३॥

मोगल राज्यसत्ता परिसर । किल्यावरीही राज्यभार । स्वये देखदेखी संचार । सुभेबीदर परगणी सत्ताधीश ॥१९४॥

आपूल्या राज्यात सर्वत्र संचार करित । सत्तेकारणी आला मोरखंडीत । मुक्काम पडला तंबू राहूट्यात । शेजार परिसरी सैन्य वावरले सर्वत्र ॥१९५॥

उन्हाच्या तळपणी कहरी । माध्यान्हि दाहकता भारी । म्हणे आम्रफळासी आणारे सत्वरी । प्रखर ताप जाईल पदांशी ॥१९६॥

त्या वर्षी आम्रफळे वृक्षासी । न लागली या परिसरीय देशी । म्हणती कल्याणी मठ विभागाशी । फळ आहेत परिपूर्ण ॥१९७॥

दरबारी आज्ञावाही । आम्रफळे आणा लवलाही । सर्वत्र धावती राज्यदूत परिसरा ठायी । वृक्षासी फळे तया नादिसती ॥१९८॥

रिक्तहस्ते दरबारी माघारी । फळ कोठेही न मिळाले परिसरी । लोक सांगती सदानन्द मठस्तरी । फळ आहेत विपुलपणी ॥१९९॥

राज्यस्तरीय चाकर । धावले कल्याण मठीय परिसर । मठीही शोधिती सर्वत्र । दत्तानन्दे तया पुसताती ॥२००॥

श्रीदत्तानन्द बाह्य मठ परिसरी । सहज बैसले उन्हाच्या कहरी । राजदूतासी फिरता परिसरी । विच्यारिती कवण कोठून आलेती ॥२०१॥

सुभेदार आज्ञा वाहून । आम्रफळे नेण्यासी फिरतो कारण । स्वामी सांगती यापरिसरी पूर्ण । आम्रवृक्ष नाहीत उमजोनि घेई ॥२०२॥

चिंचेची झाडी सर्वत्र । मठांशी पाहिरे सर्वत्र । वृथा शिणु नका व्यर्थ सत्र । सुभेदाराशी वार्ता देणे ॥२०३॥

या शब्द ओघासरिसे निर्भरी । चिंचेची दिसती झाडे सभेवरी । आम्रवृक्षे शब्दासरी । गुप्त झाली क्षणार्धात ॥२०४॥

शब्दौघे निसर्गा परिवर्तनी । अकस्मात पाहती साक्षात्पणी । नेत्राद दृष्टीदोष झाले म्हणूनी । नाना विवंचनी जन बोलती ॥२०५॥

सर्वही पाहती वृक्ष परिसरी । क्षणार्धात लोपली दृष्टीस्तरी । चिंचेची वृक्षराजी दिसती संपूर्ण परिक्षेत्री । आम्रवृक्ष नसती तेथे एकही जाण ॥२०६॥

त्यांनी जेव्हा वृक्षाकडे पाहिले । सत्यचि ती चिंचेची झाडे जाणिली । कांहीच न बोलता परतली । अधोवदनी जाती धन्याकडे ॥२०७॥

जाऊन सांगती धन्यासी । येथे आम्रवृक्ष नसेजी निश्चयेसी । ऐसे म्हणता समस्तासी । आश्चर्य फार वाटले ॥२०८॥

कोणी म्हणती आज पाहिले । कुणी म्हणती कैर्‍या आणिले । चिंचेची झाडे नाही पहिले । हे असत्य अवघे बोलती ॥२०९॥

आणखी दोघे चौघे जाऊन । तेही तेच सांगती जाण । म्हणती दत्तानंदांचे विंदाण । ब्रह्मादिकासी कळेना ॥२१०॥

आणखीन तेथील यवन दुराचार । दत्तानंदास जाच करिताती फार । ऐकता क्षोभती श्रीमुनीश्वर । अवदशा आली सुभेदाराशी याक्षोभे ॥२११॥

संक्षेपी पदावनती झाली किल्लेदारी । सुभेदार अत्यंत झालासे भिकारी । तेव्हा मनी विचार करी । हा साधु क्षोभ झाला असे ॥२१२॥

आम्हांकडून अपराध थोर । झाला असे अक्षम्य दुर्धर । तरी ते श्रेष्ठ तपोनिष्ठ साचार । शरण जावे सर्वस्वी ॥२१३॥

तेव्हा तो मठाचे महाद्वारी । पडून राहिला सेवास्तरी । तेथ झाडाझुडी करितसे परिसरी । त्यास लोटले वर्ष एक ॥२१४॥

त्याचे दैव येता उदयाशी । तो झाडिता पाहे स्वामींनी दाराशी । तेव्हा कळवळुन निज मानसी । बोले काय त्यालागी ॥२१५॥

का रे मठाच्या महाद्वारी । राहिलासी आजवरी । बहुत दिनावधी सेवास्तरी । तू सेवाधर्मी परिसेवितो ॥२१६॥

जाय आपुले घरी इच्छे प्रकारी । कारण मठीय सेवा नावडे गुरुदरबारी । वाया शिणू नको बेजारी । समाधाना घरी वाहणे ॥२१७॥

तो म्हणे स्वामी यतीश्वरा । मी न जायचि सोडून महाद्वारा । पडुन राहीन दास किंकरा । हीच आवडी ममचित्ती ॥२१८॥

ऐकता त्याची दीन भाक । करुणा उपजली मुनीस देख । केली तेंव्हा कृपा वरदायक । तेही परिसावे सज्जन हो ॥२१९॥

बेदर किल्लेदारीची सनद । त्याचे नावेचि करुनी सिध्द । आणविते झाले दत्तानंद । स्वसत्तेनी कृपाघनी ॥२२०॥

तेथील मर्यादा ऐसी असे । दिल्लीहुनी किल्लेदारी सनद येतसे । त्यास्तव सत्ताविधानी आज्ञापत्र विशेष । सनद आणिविले श्रीगुरुकृपे ॥२२१॥

कसल्याही प्रयत्नाविणे । केवळ गुरुव्दारीय सेवा वाहोन । दिल्ली दरबारी कार्य साधोन । आणविती दुस्तर विधान हे ॥२२२॥

सनद आणविली कोठून । प्रयत्नास्तव गेले कोण । हे तो कवणसीही नाही ज्ञान । न कळे अमानवीय कार्यावळी ॥२२३॥

स्वामी दिसती मानवी वेष । मानव नव्हे श्रेष्ठ अवतारी श्रीश । स्वसत्तेने लीला विशेष । दाविते जाले निजभक्ता ॥२२४॥

ती सनद सुभेदारास हाती देऊन । बोले काय त्यालागुन । तू जाय बेदरासी पूर्ण । राज्य करी रे त्याठायी ॥२२५॥

ऐकता ऐसे अमृत वचन । नेत्री चालिलेसे प्रेमजीवन । वारंवार करुनी वंदन । बोले काय मुनीप्रती ॥२२६॥

धन्य धन्य जी यतीश्वरा । मी द्वारी पडता सेवेच्या स्तरा । मज दीनावरी करुणा सागरा । कृपावर अगाधि वर्षिले ॥२२७॥

आपुले द्वारी असे जे सुख । त्यासमान नसेजी त्रिभुवनी आणिक । हे तो मज अनुभव दिले विशेख । नाशिवंत वैभव भूवरी मज ना वहवे ॥२२८॥

यास्तव धरिले मी पाय । अनंतकृपा मजला प्राप्त झाली अभय । ऐसी कृपा वाहुनी व्दार सेवे निश्चय । दत्तानंदा सर्वस्वी प्रत्यर्पिले ॥२२९॥

ऐसे तो बोलता असता यवन । बेदराहुनी आले बोलावण । तेव्हा परतोनि स्वामी लागुन । बोले की सर्वथा मी न जाय ॥२३०॥

आपुले दर्शनाविण । मी न करी जी उदकपान । असत्य नव्हे माझी भक्ती हे चरण । जाणता आपण सर्वसाक्षी ॥२३१॥

पुढील भविष्य जाणून । दत्तानंद म्हणे त्यालागुन । मी ही तिकडे येईन । प्रयाण सिध्द करावे ॥२३२॥

मुनीच्या आज्ञेवरुन । तो निघाला तेथून । स्वामीही निघाले जाण । बेदराकडे भक्तकारणे ॥२३३॥

शालिवाहन शक सोळाशे चारि । संवत्सर महान रुधिरोदगारी । वैशाख शुध्द नवमी बेदरी । दत्तानन्दे प्रयाणिले ॥२३४॥

तो तरी प्रवेशिला दुर्गामाझारी । स्वामी तटी राहिले गावा बाहेरी । त्याने आग्रह करिता सांगती राजगृही । सन्यस्त वृतार्थी वर्ज्य असे ॥२३५॥

पर्वत कोरुन गुरुलागी । करविला तारव वेगी । त्यात राहिले ते स्वामी भक्तालागी । किल्ल्याच्या सन्मुख स्थान बरवे ॥२३६॥

त्याच्या दर्शनास्तव जाण । तळ घाटावरी वास्तू नुतन । तेही सिध्द करुनी पूर्ण । तेथून दर्शन घेतसे ॥२३७॥

दत्तानंदास्तव मठ विस्तीर्ण । बांधविले दर्शनव्दार किल्लायासी जाण । त्याचे भक्तिस्तव समाधिकाल पर्यंत पूर्ण । दत्तानंद राहिले त्या स्थळी ॥२३८॥

धन्य ते मुनीवर्य देव । धन्य ते मठस्थळ भक्त वैभव । अद्यापि पूजा अर्चादि अपूर्व वैभव । चालिला असे सातत्यपणी ॥२३९॥

ब्रह्महत्यादि पातक । त्या स्थळी जाताचि हरती देख । ऐसे स्थळ ते पावन कारक । प्रसिध्द असे भूमंडळी ॥२४०॥

तेथेच राहिले राम दीक्षित । ते शिवराम स्वामींचे बंधुसूत । त्यांची महिमा अत्यंत अदभूत । लोक जाणती सर्वत्र ॥२४१॥

भास्करराव पंडीत शिरोमणी । ज्यास असे सुप्रसन्न शारदा जननी । त्याची कीर्ती असे त्रिभुवनी । विजयपत्र देती काशीकर ॥२४२॥

ऐसा तो महापंडीत । त्यास जिंकुनी रामदीक्षित । त्याची कन्या निश्चित । सून करुनी आणिले ॥२४३॥

एके दिवशी ते दीक्षित । बसले असता वेदांत पहात । वृत्ती झाली स्वरुपाकारित । निःषेश विराले देहाभिमान गुरुस्वरुपी ॥२४४॥

तेंव्हा सायंकाळ जाली असे । घरी ब्राह्मण कुणीच नसे । पत्नी त्याची चिंता करीतसे । होम कोण करतील ॥२४५॥

पती असे समाधिस्त । उठविता नये निश्चित । तेंव्हा यज्ञरुपी श्रीअनंत । स्वयेचि होम केला असे ॥२४६॥

दीक्षित पाहे समाधी जिरऊन । तो सायंकाळ जाली पूर्ण । पूसे भार्ये लागुन । होम कुणी केला पै ॥२४७॥

यापरी तिजला बोलून । पाहे अग्निशाळेत जाऊन । तो होम आपुले आपण । जाला असे निश्चित ॥२४८॥

तेव्हा ते अग्निहोत्र धरी । सुवास भरला असे बाह्यांतरी । दीक्षित मनी विचार करी । केले असेल होम कुणी ॥२४९॥

तेव्हा ज्ञान दृष्टीने पाहता । समजले की निजचित्ता । मज करिता श्रीभगवंता । होम कर्मा स्वये केला की ॥२५०॥

आता या कर्माची जाली सीमा । घ्यावे आता चतुर्थाश्रमा । तरी विज्ञानसेवा आंम्हा । प्राप्त सहज पै असे ॥२५१॥

ऐसे बोलुनी संभ्रम । ग्रहण केला चतुर्थाश्रम । ते प्रत्यक्षचि पुरुषोत्तम । अवतार पुरुष या जगी ॥२५२॥

त्याचे अनुग्रह पूर्ण । बाल गोपाळस्वामी जाण । त्या स्वामीची महिमा पूर्ण । शेषादिकासी अगम्य ॥२५३॥

त्यांनी गुरुभक्तीची ध्वजा । त्रैलोकी लाविली सहजा । त्रिकर्ण वेचिलीसे गुरुकाजा । धन्य तो गुरुभक्त शिरोमणी ॥२५४॥

मठा बाहेर न ठेविता पाऊल । इच्छा भोजन सर्व संतासी देतसे सर्वकाळ । आराधनी भक्तजना सकळ । तो प्रत्यक्ष गोपाळ भूतळी ॥२५५॥

तेव्हा ते दीक्षित स्वरुपी झाले लीन । बाळ गोपाळास भाषादि ग्रंथ अवलोकन । न झाले ऐसे जाणून । पुतण्यास आज्ञा काय केली ॥२५६॥

तरी तो पुतण्या कोण । जे वैकुंठपुरीचे भूषण । संशय छेदिले सूत्रभाष्यांशी रहस्यपूर्ण । सांगीतले मणूर आचार्यासी ॥२५७॥

भाषाधन वैकुंठ बाबापाशी । झाले असे ते स्वामीसी । दीक्षित आणि वैकुंठपतीसी । स्वामी भावितसे गुरुपदी ॥२५८॥

ते स्वामीस जे शरण जाती । त्यास भग्वतगीता सांगुनी निगुती । त्याचे हटविति जन्ममरण खंती । हे अनुग्रह स्वामीचे पै असे ॥२५९॥

त्या मठी गीतेचा गजर । होतसे अहोरात्र । ज्याचे मुखी नये श्रीकार । त्यासी ही स्वामी सांगे गीता ॥२६०॥

हे स्वामीचे ब्रिद असे । वाचा शुध्द करुनी षाठास । गीता सांगाती निश्चयांश । शरण मात्र भक्तासी ॥२६१॥

या स्वामीचा अनुग्रह पूर्ण । माझे जनकासी जाला जाण । ते निज शिष्य म्हणून । कृपा पूर्ण जाली असे ॥२६२॥

राम दीक्षितादिकाची समाधी । त्यांचे मठी असे त्रिशुध्दी । समाधी काय ते निजानंदी । मग्न असती यतीवर्य ॥२६३॥

आता सिंहावलोकन । मागील कथेचे अनुसंधान । वैकुंठ स्वामींचे अनुग्रह पूर्ण । कोणास जाले ते ऐका ॥२६४॥

वैकुंठ स्वामी तो वैकुंठपती । ऐकिली की त्याची कीर्ती । ते अवतार पुरुष निश्चित । भक्तवत्सल अवतरले ॥२६५॥

त्या वैकुंठ स्वामींचा अनुग्रह पूर्ण । केशव स्वामीस असे जाण । केशव स्वामीस्तव आपण । कल्याणीहुनी आले वैकुंठमूर्ती ॥२६६॥

ते केशवस्वामी प्रत्यक्ष केशव । सावयव दिसती परी ते निरावयव । स्वप्रकाश सिध्दांतखेव । अवतार निश्चित प्रभूचे ॥२६७॥

ते पूर्ण ब्रह्म अवतारी । मानवी वेष अवतरले भूमीवरी । त्यांची कीर्ती जगा माझारी । भरली असे पूर्णपणे ॥२६८॥

पूर्वी अर्जुनाचा होवोनी सारथी । श्रीकृष्ण प्रबोधी पार्थाप्रती । तेवी ती वैकुंठमूर्ती । प्रबोध करिती तयालागी ॥२६९॥

केशवराजास्तव कल्याण । सोडून आले बेदरास आपण । त्याचे घरीच राहून । पूर्ण विद्यातया सांगती ॥२७०॥

निजखांदी घेऊनी त्यासी । विद्या सांगाती स्वानंदेसी । धन्य ते सदगुरुराशी । सच्चिदानंद अविनाशी ॥२७१॥

लौकिकी मर्यादा यापरी । शिष्याची सेवा पाहुनी निर्धारी । सदगुरुकृपा त्यावरी । सदाप्रसन्न सर्वकाळ ॥२७२॥

सदगुरुच आपण होऊन । त्याचे पालन पोषण करुन । कृपा करुनी विद्या देती दान । ही विधी असे नवलपरिची ॥२७३॥

षोडश वर्षा न भरता जाण । केशव स्वामीस विद्यापूर्ण । वेद आणि शास्त्रीय अध्यायन । झाले असे अविश्रांत ॥२७४॥

जालासे शास्त्र वेदांत । गौड ब्रह्मानंदी इत्यादि ग्रंथ । त्यापुढे कोणी नसे पंडीत । वाद प्रसंग करतील ॥२७५॥

स्वरुप ज्याचे मदन मोहन । सरळ नासिका आकर्ण नयन । गौरवर्ण जेवी उमा रमण । सुहास्य वदन सर्वदा ॥२७६॥

ज्याचे गायनी गंधर्व लाजे । ज्याचे कीर्तनी अधोक्षज नाचे सहजा । ज्याचे दर्शन मात्रे काळभय उपजे । ज्ञानानुभवी अपरोक्ष ॥२७७॥

ते वैराग्य सिंधुच दिव्यरत्न । ते ज्ञान भांडारीचे पूर्णधन । भक्तकृपाळू सच्चिदानंद चरण । केशवस्वामी यापरीचे ॥२७८॥

शिवरामस्वामी केले जे पद निरुपण । त्याचे ते धाटी बसवावे आपण । ऐसे पाहता वैकुंठ स्वामी पूर्ण । बोलावे अवतार प्रभूचे ॥२७९॥

ऐसे ते महाराज श्रीकेशव । लीला त्यांची अनुपम अनुभव । अवतार ज्याचा निज भक्तस्तव । पूर्ण पुरुष भूमंडळी ॥२८०॥

त्या महाराजांची समाधी । बेदर मठास असे चित्तशुध्दी । त्यास कैसे असे समाधी । अजरामर ते कालत्रयी ही ॥२८१॥

त्या केशव स्वामींचा अनुग्रह पूर्ण । माझ्या सदगुरुस असे जाण । सदगुरु तो ब्रह्म सनातन । सहजानंद दिगंबर ॥२८२॥

या संप्रदायास आधी श्रीअवधूत । त्यापासुनी क्रम चालिले पुढत पुढत । पुनरपि तेच अवधूत । दिगंबर नामे अवतरले ॥२८३॥

ते प्रत्यक्षचि दिगंबर । ज्यांची महिमा असे अपार । गुरुसेवेत सदा तत्पर । संपूर्ण वय वेचिले असे ॥२८४॥

ज्याचे दृष्टीस पाहता । सदगुरुच दिसे आप्त त्रिजगता । श्रीसदगुरुविण रिता । ठावच न दिसे ब्रह्मांडी ॥२८५॥

ब्रह्मांडाची घडामोडी । श्री तारीतसे स्वामीची सेवा प्रतिघडी । यापरी ज्याची कृपा प्रौढी । आपणविण काही नसेची ॥२८६॥

आपण तो सर्वाधिष्ठान । आपुल्या अंगी असे जगदाक्षेपण । जगी पाहता आपण परिपूर्ण । अलंकारी जेवी हेम ॥२८७॥

ज्याची वृत्ती निजानंदी । ज्याची व्यापक सहज समाधी । ऐसे ते सहजानंद कृपाबुधी । मानवी वेशी अवतरले ॥२८८॥

ज्याची गुरुभक्ति हेचि जीवन । लीनवृत्ती भूषित भूषण पूर्ण । विरळा असतील यासमान । गुरुभक्त पूर्ण उर्वीवरी ॥२८९॥

पूर्वी एका जनार्दने । दाविले असे गुरुभक्ति खूणे । प्रस्तुत माझे स्वामी त्याच स्तरी जीवने । तैसेचि दाविती गुरुभक्ति ॥२९०॥

ते गुरुभक्त शिरोमणी । ज्यांची वृत्ती रंगली गुरुचरणी । अवस्थात्रयी ज्याचे ध्यानी । गुरुचि दिसे दशदिशी कीं ॥२९१॥

ज्याचे कीर्तनी नाचे श्रीरंग । श्रोतयास लागे प्रेम समाधी गुंग । तैसा तो समर्थ सर्वांतरंग । धन्य माझा दिगंबरु ॥२९२॥

माझा सदगुरु तोच निर्गुण निराकारी । मज पाप्यास्तव होऊनी साकारी । मस्तकी ठेवितसे अभयकरी । ज्याची महिमा तोचि जाणे ॥२९३॥

असो केशव स्वामींचा अनुग्रह पूर्ण । सकल शिष्यवर्गासी असे परिपूर्ण । हे उभयताही शिष्यची जाण । स्वामीपदी अनन्य सर्वस्वे ॥२९४॥

एकतरी माझा सदगुरु । तो सहजानंद दिगंबरु । दुसरा माझा पिता निर्धारु । भक्तराज शिरोमणी ॥२९५॥

नाव ज्याचे हनुमंतराये । अवस्थात्रयी गुरुसी ध्याये । सर्वाभूती गुरुसी पाहे । गुरुविण दैवत न पाहिले ॥२९६॥

गुरुगीतेत जे सांगितली भक्ती । तद्वतचि ते आचरती । तनुमन धन संपत्ती । गुरुस अर्पिती सप्रेमे ॥२९७॥

ज्यास बालपणा पासुन । पर नारी माते समान । पर धनासी पाहती वमनावत जाण । ऐसे ते गुरुभक्तराज ॥२९८॥

त्यांची भार्या काशीबाई । धन्य ती माझी माता निश्चयी । तिची वृत्ती रंगली पती पायी । पतीविण दैवत नसेची ॥२९९॥

धन्य ती पतीव्रता शिरोमणी । जीस पती सेवेची आवड अनुदिनी । सेवे वाचून न राहे एकक्षणी । सेवाचि गोड तिजलागी ॥३००॥

असो ते उभयता माझे शिरी । चिरकाल राहुनी निर्धारी । ते पुण्यश्लोकांच्या उदरी । हे शरीर प्राप्त असे ॥३०१॥

ते उभयता अंतःकरणाने । या शरीरास ठेविले नाम कृष्णे । आपुले छंदी आपणे । पाहती झाली वात्सल्यपूर्ण ॥३०२॥

असो यापरि गुरुपरंपरा । चालत आली असे साचारा । पुढे सदगुरु श्रीदिगंबरा । त्यापासुन चालले क्रम सहज ॥३०३॥

दिगंबर स्वामींचे पायीचे पैजार । माझे जीवन समग्र । हाचि वर द्यावेजी कृपा पुरस्कार । श्रोते तुम्ही दयाळु ॥३०४॥

धन्य ते पूर्णानंद सर्वेश्वरु । मी तो केवळ मतीमंद पामरु । आपुले चरित्र आज्ञे करविती निर्भरु । का वदविलेती तेचि जाणे ॥३०५॥

धन्य ती पूर्णानंद माऊली । धन्य त्यांची वंशावळी । अगाध लीला या भूमंडळी । दाविते झाले निजसत्ते ॥३०६॥

धन्य ते तिम्मण दीक्षित । जन्मांतरी काय आराधिले भगवंत । तरीच त्यांचे उदरी निश्चित । अवतरले पूर्णानंद नारायण ॥३०७॥

मातापित्याचे निमित्य करुन । आपण गेले काशीस जाण । तेथे ब्रह्मानंदास शरण जाऊन । ब्रह्मानंद सुख सहज सर्वासी दिले ॥३०८॥

तेथे निजशक्ती चेतवी तोषून । येऊन देऊळी देवत्व दर्शन । स्वानंदे तिजसह वर्तमान । यात्रा करितसे सप्तवारी ॥३०९॥

यात्रा करुनी सप्तवार । तोषविती सदगुरु कृपासागर । त्या आनंदे गुरुभक्ति निर्धार । पुत्र होवोनि अवतरले त्याउदरी ॥३१०॥

ते पुत्र भार्ये सहित वर्तमान । निजकल्याणी तिष्ठे निशिदिन । निज जना द्यावया कल्याण । अढळ वृंदावनी विराजली ॥३११॥

धन्य ते पूर्णानंद पिता । धन्य ती लक्ष्मी माता । धन्य तो पुत्र तत्वता । शिवराम स्वामी समर्थ ॥३१२॥

ते त्रिवर्गही अवतारी त्रिनेत्र । अवतार लीलेसी दाऊनी विशेष । पुढे भक्तास्तव अतीहर्ष । कल्याणपट्टणी विराजिले ॥३१३॥

हे चरित्र सुखसागर । आधीच जगाचे श्रवणपात्र । भरले असे निर्धार । आज्ञे सवे व्दिरावृती ॥३१४॥

ऐसे आज्ञापिती स्वप्नी आपण । यास पूर्णानंदाची असे कारण । का वदविले ही पुनर्लेखन महान । तेची जाणती गुरुवचनांशी ॥३१५॥

एक चरण लिहिताची पूर्ण । पुढील चरणासी दाविती लक्षण । चौ वाचा ज्यापासुनी उत्पन्न । त्यास नवल हे काय असे ॥३१६॥

ज्याची कृपा होताचि देख । पाषाण पाठी पिकेल पीक । रंकास करी ब्रह्मांडनायक । अतर्क्य कौतुक प्रभूंचे ॥३१७॥

मज नसे शास्त्र व्युत्पत्ती । ठाऊक नसे भावभक्ती । मी तो केवळ मंदमती । हे तरी जाणती सर्व जग ॥३१८॥

उदर पोषणास करितसे चाकरी । कैची गुरुभक्ति चित्त वित्त वाहे दप्तरी । द्रव्य कमाई ठेऊनी निर्धारी । वेचिले संपूर्ण जीवन ॥३१९॥

माझे वय संपूर्ण । ईशणात्रयी वेचिले जाण । मज कैची गुरुभक्ती ज्ञान । पतीतामाजी पतीत ब्रहत्तर ॥३२०॥

नेणो दिगंबर राजाची करणी । निजपादाश्रयी पोसीतो क्रपेनी । मज पामरा ठेविले निज चरणी । त्याचे क्रती तोचि जाणे ॥३२१॥

यापरी मी पतित पामर । अभक्त अज्ञान अपराधी थोर । तरी हे पूर्णानंद चरित्र व्दिवार । वर्णन करविले अगाध महिमे ॥३२२॥

सदगुरुंचे स्वसत्तेनी । नित्य मज पामराकडूनी । आपुले चरित्र देवोनी । वदविलेसे व्दिरावृती ॥३२३॥

या चरित्राचे मूळ बीज । गुंडोबाबा महाराज । पूर्णानंद आज्ञा दीधले व्दिवार । सहज चरित्रासी बोलविले ॥३२४॥

तरी गुंडोबाबा कोठील कोण । ऐसे म्हणतील श्रोते जाण । तेही ऐकावे सांगेन । स्वानंदचित्त सादरे ॥३२५॥

शिवराम प्रभूंचे बंधू कुमर । ते प्रभूस पोषण दिल्हे निर्धार । तो भक्तराज प्रतापी थोर । नाम त्याचे नारायण ॥३२६॥

त्यास दोन पुत्र जाले पूर्ण । कल्याण वैकुंठ नामाभिधान । त्या उभयतांची कीर्ती पूर्ण । भरली असे जगामाजी ॥३२७॥

ते कल्याण अप्पाचे सूतैक । वैकुंठअप्पा दिले दत्तक । नाम ज्याचे अच्युत । निश्चीत महान गुरुभक्त या जगी ॥३२८॥

कालत्रयी नसे ज्यास च्युती । नाम ठेविले अच्युती । ज्याचे पुत्र गुंडोबाबा निश्चिती । भक्तराज शिरोमणी ॥३२९॥

त्याचे मुख समुद्रातूनी । लीला चरित्रकथा प्रवाहिनी । ग्रंथरुपी प्रबंध विवेचनी । आकार दिधले या चरित्री ॥३३०॥

त्या माळेच्या पदकी ब्रह्मांतरी । झळके पूर्णानंद हिरा परिकरी । त्या तेजे शशि आणि दिनकरी । तेजा आकारी झगमगीत ॥३३१॥

तरी सदभक्त श्रोते आगळी । हे चरित्र मौक्तिकमाळी । श्रीमुर्तीच्या आज्ञे व्दिरावृत्ती लेखिली । तुळशी गंधे स्वयं प्रसादिले ॥३३२॥

हे चरित्र पूर्णानंद । श्रोते तुम्ही पूर्णानंद । निजचरित्र निजानंद । श्रवण लेखनी व्दिरावृत्ती मकरंद पूर्ण केले ॥३३३॥

जेवी क्षीरसिंधूचे क्षीर घेऊन । क्षीरसिंधूस नैवेद्य दीधले पूर्ण । तेवी या ग्रंथा पुर्नलेखून । मूर्तिराजा प्रसन्निले ॥३३४॥

एक हेमी अनेक भूषण । एक मृत्तिका घट भिन्नभिन्न । तेवी श्रोतावक्तामाजी पूर्णानंद चरित्र लेखन । असता प्रार्थना येणेपरी ॥३३५॥

मी करतो प्रार्थना वंदन । म्हणता मी माझे दिसे पूर्ण । पूर्णानंदाची परिपूर्ण । श्रोतावक्ता तोची जाणे ॥३३६॥

सत्यचि अभेद तरंग आणि सागर । तथापि तरंग नव्हे की समुद्र । तेवी तुम्ही पूर्णानंद समुद्र । मी लहरच असे की ॥३३७॥

तुम्ही तो कृपाळु पूर्ण । तुमची कृपा अमाप मजवरी पूर्ण । तुमच्या आशि पुनर्लेखन । मनोरथी सेवापूर्ण केली ॥३३८॥

पूर्णानंद श्रीदिगंबर । निज चरित्र परम पवित्र । पूर्णानंद करुनी निर्धार । पूर्ण करविते पै जाले ॥३३९॥

नाम ज्यांचे पूर्णानंद नारायण । स्थान ज्यांचे कल्याणपट्टण । कल्याण करितसे श्रोतया संपूर्ण । श्रवणमात्रे सर्वस्वी ॥३४०॥

निज जनास करावे कल्याण । यास्तव लक्ष्मीसह वर्तमान । कल्याणी तिष्ठे निशिदिन । कल्याणकारक ती मूर्ती ॥३४१॥

कल्याणास जाऊ ऐसी इच्छा मनी वाहता । आधी कल्याण संकल्प करवितसे भक्ता । कल्याण मठीची बिरुदांकिता । सहजानंद श्रीसदगुरुदेव ॥३४२॥

सारिखे संकल्पमाने प्रति । कल्याणी ग्रंथ वाहवे त्वरिती । समय काल कर्मसंयोगाची रीती । त्याच्या हातीच विधान हे ॥३४३॥

हे चरित्र पूर्णानंद । श्रोतेवक्तेचि पुरवीती मनाचा छंद । यास्तव श्रोतृ संकल्प सुखद । माझ्या करे निभवीती ॥३४४॥

पूर्णानंदालयाचा कलश पूर्ण । हा अध्याय अठरावा महान । यात विराले लक्ष्मीरमण । पूर्णानंदची सर्वस्वे ॥३४५॥

ही अठरा भारीय वनस्पती । यात पूर्णानंद संजीवनी व्याप्त असती । श्रवण संजीवनी घालुनी निश्चिती । उध्दरती भक्तजना ॥३४६॥

किंवा हे अठराखणी दामोदर । यात भरले असे पूर्णानंद भांडार । पूर्णानंदे श्रवण करिती साचार । पूर्णानंद धन प्राप्त असे ॥३४७॥

अठरा अध्याय अठरा पुराणे । वर्णिली असे श्रीनारायणे । नारायण क्षीराब्धि शयने । दर्शन घ्यावे श्रवणार्थीये ॥३४८॥

ही अठरा खणी वृंदावन । तेथे गुरुभक्ति तुलसी वृंदावन । श्रीपूर्णानंद राधा रमण । लक्ष्मी सहीत विराजे ॥३४९॥

श्रवणांशी जे दर्शन घेती । किंवा सहभावे प्रदक्षिणा करिती । त्यास राधा रमण निश्चिती । पूर्णानंद करी सर्वथा ॥३५०॥

आता येथून ग्रंथपूर्ण । पूर्णानंद करविले निज कृपेने । पूर्ण झाले पाहे म्हणणे गौण । पूर्णानंद परिपूर्ण कालत्रयी ॥३५१॥

पूर्णानंद संप्रदाय क्रम । पूर्वी ऐकिले की सप्रेम । तीच परंपरा सर्वोत्तम । पुनरपि मनी स्मरावी ॥३५२॥

आधी गुरु शिवराय । तेथून श्रीदत्तात्रेय । त्याचा अनुग्रह निश्चय । सदानंद स्वामीस जाणावे ॥३५३॥

सदानंद स्वामींचा उपदेश । जाला रामानंद मुनीस । त्यांचा अनुग्रह विशेष । अमलानंदासी जाणावे ॥३५४॥

तयाचा जनार्दन विमल जाण । शिवकृष्ण योगीश्वर चरण । हा क्रम अडीच हजार वर्षीय निगमन । त्रिस्तरीय परंपराही ॥३५५॥

काशीमठ कल्याणमठ आणी इतर उपमठ सविस्तर । काशीसह कल्याण पीठक्रम थोर । येणे विधानी परंपरा ब्रहत्तर । विशालपणी परिवाहे ॥३५६॥

मुख्य मुख्य क्रम लेऊन । सांकेत वदतो ओळखा संक्षेपन । आंम्ही प्रापंचिक परंपरीय क्रमवर्णन । आधी पाच अंतीम पाचाशी स्मरतसो ॥३५७॥

याक्रमी भाग्वतेंद्र श्रीधर । तेतीसावे ओळखा क्रमस्तर । पूर्व सहजानंद काशी पीठवाशी प्रखर । सहज विज्ञानेश्वर ऐकेचाळीस बेच्याळीशी स्मरताती ॥३५८॥

अपर सहजानंद षष्ठीतम । पूर्णानंद एकषष्ठी क्रम । दत्तानन्द पासष्ठी धर्म । पीठक्रम आजवरिचे ॥३५९॥

संसारी जीव अल्पज्ञ जाणा । आद्यंत पांच स्मरती चरणा । याचि प्रकारे आजवरिच्या स्मरणा । अल्पमती स्मरणाशी ॥३६०॥

सर्वही पीठी विव्दान । भाष्यावरी करिती लेखन । सर्वही अधिकार पूर्ण । आनन्दाम्नाया परिवहती ॥३६१॥

त्यांचे कृपा कटाक्षे पूर्ण । गंभीरानंदास जाण । त्यांचे स्वानुभाव ज्ञान । ब्रह्मानंदासी पै प्राप्त ॥३६२॥

त्यांचा अनुग्रह पूर्ण । सहजानंदी प्रवेश । ते महाराज जगदीश । समाधी ज्यांची कल्याणी ॥३६३॥

सहजानंदांसाठी संख्यो अनुग्रह पूर्ण । पूर्णानंदास एकशष्टी परिपूर्ण । त्यांचा अनुग्रह जाण । ब्रह्मानंदास बासष्ट संख्ये ॥३६४॥

त्या ब्रह्मानंद स्वामींचा अनुग्रह पूर्ण । पूर्णानंद नारायणा संपूर्ण । ज्यांचे चरित्री शब्दखूण । वर्णन घडले पै असे ॥३६५॥

त्यांचे कृपेस पात्र । शिवराम जाले होऊनी पुत्र । जो पूर्ण अवतारी शिवशंकर । जगदोध्दारा अवतरले ॥३६६॥

त्यांचा अनुग्रह जाण । राजमणी स्वामीस पूर्ण । राजमणीचा अनुग्रहपूर्ण । वैकुंठप्रभूसी प्राप्त असे ॥३६७॥

त्याचा कृपानुग्रह सूर्य । केशवराज ह्रदय गगनी जाला उदय । त्याचा उपदेश निश्चय । स्वामीस माझ्या प्राप्त असे ॥३६८॥

माझा स्वामी तो ह्रदय गगनीचा दिवाकरु । अज्ञान तमाचा करिल संहारु । ऐसे सहजानंद दिगंबरु । त्याचे पायी मम मस्तक असे ॥३६९॥

त्या महाराजांच्या पादुका । मस्तकी वाहतो निष्कलंका । त्यांनी जिव्हाग्री बसुनी देखा । वदविलेसे चरित्र पूर्णानंदीय ॥३७०॥

मी तो आळशी पामर । पूर्णानंद चरित्र महासागर । स्वसत्तेने वदवि निर्धार । वाणीस पावित्र्य पै दिधले ॥३७१॥

आता त्यांचे उपकारा । पासोनि उत्तीर्ण नसे साचारा । ते माझ्या ह्रत्पद्मीच्या दिवाकरा । अखंड प्रकाश ह्रत्पद्मी ॥३७२॥

त्यास नमस्कार करुनी सप्रेम । सांगो ग्रंथाध्याय क्रम । ते ऐकावे श्रोते सर्वोत्तम । कृपा करुनी बाळावरी ॥३७३॥

प्रथम अध्यायीची कथा पूर्ण । गणपती सरस्वती गुरुस्तवन । पूर्णानंद नारायणाचे जन्म आणि लग्नसंधान । मंगलमय ते सफलांशी ॥३७४॥

द्वितीयोध्यायी कथा । नारायणा भेटी निज पिता । पिता असता काशीस तत्वता । ग्रहस्थाचे संयोगे भेटवाही ॥३७५॥

तृतीयेची कथा सुरस । पूर्णानंदास उपदेश । ब्रह्मानंद स्वामींचा विशेष । झाला असे सत्यत्वी ॥३७६॥

चतुर्थोध्यायीच्या पोटी । मणिकर्णिकेच्या घाटी । पूर्णानंद नारायणाचे भेटी । रामभट्टजीसी पै जाले ॥३७७॥

पंचमोध्यायी कथा पूर्ण । पूर्णानंद भेटले लक्ष्मीस पूर्ण । पूर्णानंद शिवार्चे पूर्ण । मंगलायतन सर्वासी ॥३७८॥

सहाव्याची कथा परिकर । पूर्णानंद यात्रा करुनी रामेश्वर । ब्रह्मानंदास भेटती निर्धार । लक्ष्मीस अनुग्रह करविती ॥३७९॥

सप्तमीचे प्रकरणी । पूर्णानंद घेऊनी नरावणी । बापु पंतास भेटूनी । निश्चय केले गोदूसी ॥३८०॥

आठवे अध्यायी कथन । काशीस गुरु सन्निधान । करुनि दिधले कन्यादान । बापू पंडितासी यथावत ॥३८१॥

नववीचे कथा सुरस । गुरुशिष्याचा संवाद ब्रम्हघोष । ब्रह्मानंद बोले पूर्णानंदास । उदरा येईन पुत्ररुपे ॥३८२॥

दहावे अध्यायी मंगल परम । शिवराम प्रभूचा जाहला जन्म । जन्म निर्वाहक ती कथा उत्तम । बोलिलोति यथावत ॥३८३॥

एकादशीचे कथन निश्चिते । सुमनहार पंढरीनाथे । प्रभूसी दिधले स्वहस्ते । जे अति रसाळ कथा असे ॥३८४॥

द्वादश अध्यायीची कथा पूर्ण । रुक्मिणि पंतासी संतोषऊन । प्रभु विजयलक्ष्मी घेऊन । भेटले निज पित्यासी ॥३८५॥

त्रयोदशध्यायीची कथा सुरस । गोदूबाईस प्रार्थिती विशेष । पूर्णानंद होऊनी हर्ष । उपदेश केले प्रभूसी ॥३८६॥

चौदाव्या अध्यायात निगुती । वर्णिती प्रभूचे कवित्व ख्याती । राजमणी स्वामीची गुरुभक्ती । हे ही कथा संवाहिली ॥३८७॥

पंचदशध्यायीचे निरुपण । केशवस्वामी आणि रंगनाथाचे दर्शन । प्रभूस जाले असे जाण । सप्रेमयुक्त त्याकाळी ॥३८८॥

षोडषोध्यायीची कथा अदभूत । सदानंद स्वामी उठवले प्रेत । कल्याणी संजीवन समाधिस्त । हेचि कथा पै वाहिले ॥३८९॥

सप्तदशध्यायीचे कथन । प्रभूचे प्रार्थनेवरुन । पूर्णानंद प्रगटले विहीरीतून । सगुण मूर्ती सावळी ॥३९०॥

अष्टादश प्रकरणी निरुपण । पूर्णानंद राहिले कल्याणी पूर्ण । दत्तानंद मठीचे वर्णन । मंगलप्रद ऐकलीत ॥३९१॥

हे चरित्र पुर्णानंद । सबाह्य भरला असे पूर्ण ब्रम्हपद । पूर्णानंद तारितील श्रोतृवृंद । शरण मात्रे सर्वस्वी ॥३९२॥

श्रवणे होय मनोरथ सिध्दी । श्रवणे प्राप्त सहज समाधी । श्रवणे हरे आधी व्याधी । कल्याणकारक ही कथा ॥३९३॥

कल्याण करीति श्रोत्या वक्त्यासी । असे वर दिले पूर्णानंद अविनाशी । जे भक्तवत्सल स्वानंदराशी । सहजानंद प्रसादनी ॥३९४॥

त्याचे अभयकर असता माझ्या माथा । हा ग्रंथ पूर्ण जाहला तत्वता । त्याचे चरणी वाहूनी माथा । हीच इच्छितो हनुमदात्मज ॥३९५॥

प्रेमपूर नायक म्हाळसा रमण । माझ्या कुळीचे कुळदैवत पूर्ण । त्याचे चरण प्रसादे लेखनी गतिमान । या ग्रंथी पूर्णता संवाहिले ॥३९६॥

साष्टांग नमन करितो संतचरणी । हीच भगवदभक्ती आपुल्या साक्षीनी । आणिले वेदशास्त्र पुराणी । त्याचे अभय असो मज लागुनी ॥३९७॥

शके सतराशे त्रेपन्न । खरनाम संवत्सर जाण । चैत्र शुध्दपौर्णिमेसी संपूर्ण । पूर्णानंद चरित्र प्रथमांशेशि वाहिले ॥३९८॥

माझी जन्मभूमी आहे बीदर । भागानगरी असता रोजगार । तेथे रहात असता निर्धार । तेथेच ग्रंथा आलेखिले ॥३९९॥

श्रीसहजानंद कृपा प्रेरणे । श्रीपूर्णानंद चरणी वाहिली प्रथम लेखने । परतूनि व्दितीय लेखली आज्ञा वाहणे । तेही विधान अंगिकारिले ॥४००॥

आज शके सतराशे छप्पन्न । जयनाम संवत्सर पूर्ण । वैशाख शुध्द त्रितीया पुण्यदिन । व्दितीया लेखना पूर्णकेले ॥४०१॥

श्रीपूर्णानंद कृपा वाहोनि । हनुमदात्मज जीवन साफल्यपणि । पुनःपुनः चरणी अनन्यपणी । सर्व स्तरी समार्पिलो कीं ॥४०२॥

आनंद उमाळा वरिवरि । उभरोनि येतसे आंतर भेदोनि कृपास्तरी । जीवनी भाग्या वाहोनि गहिवरि । ओवाळिला सर्वस्वची ॥४०३॥

हनुमंत पिता काशीबाई माता । या उभयातांच्या स्मृतिपथी सर्वथा । कृष्णे लिहिले पूर्णानन्द चरिता । कृपाबळे सर्वांच्या ॥४०४॥

त्यांसी नमूनी श्रध्दा विशेषे । पूर्णानंदी विरालो कृपा वरांशे । त्यांच्या महिमे भक्ततोषे । तडीस गेला ग्रंथोत्तम ॥४०५॥

आता संत श्रोते यांच्या चरणी । हनुमदात्मजे नमस्कारुनी । प्रार्थना करीतसे अनुदिनी । कृपापूर्ण वरे वर्षावी ॥४०६॥

सहजानंद श्रीदिगंबरु । अखंड राहो ह्रदयाभ्यंतरु । हीच प्रार्थना वारंवारु । हनुमदात्मज गुरुचरणी करीतसे ॥४०७॥

इति श्रीपूर्णानंद चरित्र । पूर्णानंद घडे श्रवण मात्र । जे स्वसुखाचे सुखसूत्र । अष्टदशोध्याय पूनरानुवर्तित ॥४०८॥

वारंवार मनी संकल्प उदित । म्हणे पूर्णानन्द मूर्तीच्या चरणी समर्पावे चरित्र । राहवेना सातत्यपणी संकल्प उन्मळित । सहज प्रवाही आंतर्मनी अहर्निशी ॥४०९॥

तो दिवस क्रतीत येण्यास । लाधले तीन वरुष । तयाची कृपा भक्तवरास । येणेपरी आज्ञांशीय प्रकाशिले ॥४१०॥

ॐनमःपूर्णानंदा गुरुचरण सेवेत वहनी । स्वियःकृतिने मार्गा सहज सकला दाविशि झणि । अशा संश्रेष्ठाब्जा मन क्रमवचांशेसि वहनी । नमोनंन्तःसाक्षी परमगुरु सदानन्द स्मरणी ॥४११॥

इति श्रीपूर्णानंद गुरु शिवरामार्पणमस्तु । श्रीरायेश्वरार्पणमस्तु । शुभं भवतु । शके १८४३ दुर्मती नामाब्दे आषाढ शुध्द १५ सोम वासरे संपूर्ण । श्रीराम समर्थ । श्रीगुरुदत्तात्रेयायनमः । रायेश्वर गुरु

N/A

References : N/A
Last Updated : September 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP