मूळस्तंभ - अध्याय ५

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नमः ॥

मग इतुकियवरी ॥ देवासि म्हणॆ शैलकुमारी ॥ जाहली पृथ्वीची कुसरी ॥ कीं आणिक असे ॥१॥

मग म्हणॆ त्रिनयन ॥ देवी आणिक असे परगहन ॥ तो एक चित्त देऊन ॥ विस्तार मेदिनीचा ॥२॥

ही चारी एक झालीं ॥ भरतखंडीं विस्तारलीं ॥ आणि चारी पीठें बोलिली ॥ तीं ऐक देवी ॥३॥

औटपीठनामें प्रथम वोडियाणा पीठ ॥ द्वितीय तें जालधंरपीठ ॥ तृतीय जाण पुण्यगिरीपीठ ॥ किन्नरपीठ चवथें ॥४॥

ऐसीं चारी पीठें सुंदर ॥ जंबुद्वीपीं अतिपवित्र ॥ चार क्षेत्रें असती विचित्र ॥ तीं ऐक देवी ॥५॥

हरिक्षेत्र कुरुक्षेत्र ॥ मृगक्षेत्र प्रयागक्षेत्र ॥ हीं चर क्षेत्रं अति पवित्र ॥ असती पैं ॥६॥

आतां जंबुद्वीपी जाण ॥ हीं नाव तीर्थें असती गहन ॥ त्यांची नामें कोण कोण ॥ तीं ऐक देची ॥७॥

अग्नि कर्ण शुक्लतीर्थ ॥ महीजग्रह , भार्गवाहा ढारावाहातीर्थ ॥ गुरुवाहा रत्नवाहा तीर्थ ॥ आणि नवमरुपवाहा ॥८॥

या जंबुद्वीपी ही नव तीर्थें असती ॥ आणि अष्टमहा पट्टण आहेती ॥ त्यांची नामें तुजप्रती ॥ सांगतो ऐक देवी ॥९॥

प्रथम तें वीटपट्टण ॥ त्याचा वीस सहस्त्र विस्तार जाण ॥ द्वितीय पुरवपट्टण ॥ अठरा लक्ष विस्तार त्याचा ॥१०॥

मंडळीकपट्टण दहा सहस्त्र ॥ चक्रवर्तीपट्टण ब्यायशीं सहस्त्र ॥ साडेबाराकोटी नवसहस्त्र ॥ बोरीपट्टण जाण देवी ॥११॥

माधवपट्टण एकवीस सहस्त्र ॥ देवकीपट्टण ऐशीं हजार ॥ आणि शामितीपट्टण सहस्त्र चार ॥ जाण देवी ॥१२॥

ऐसीं हीं आठ पट्टणें ॥ तेथें मनुश्यें कवण कवणॆ ॥ तीं सांगेन तुजकारणें ॥ आदिशक्ती वो ॥१३॥

शाकद्वीप असे उद्वस ॥ कौचद्वीपी असती राक्षस ॥ पुष्करद्वीपीं परियेस ॥ वेंदातराची वस्ती ॥१४॥

शाल्मलद्वीपीं परियेस ॥ तेथें पुरुषांचा असे वास ॥ गोमेदद्वीपीं रहिवास ॥ देवांचा जाण ॥१५॥

षडद्वीपीं देव कन्यांची वस्ती ॥ त्यांची सप्त अप्सरा म्हणती ॥ त्यांची नामें आदिशक्ति ॥ सांगतो ऐक ॥१६॥

रंभा ऊर्वशी मेनका ॥ तिलोत्तमा सुकेशी वज्रघोषा देखा ॥ आणि घृतात्मजा ह्या सप्तकन्यका ॥ तेथें असती पैं ॥१७॥

आतां जंबुद्वीप एककोटी उरलेंसे ॥ त्यांत एकलक्ष उद्वस असे ॥ बत्तीसलक्ष वसती असे ॥ परियेसीं देवी ॥१८॥

त्यांत चाळीसलक्ष एकाकार असे ॥ एकलक्ष वर्णावर्ण असे ॥ तो ऐक सांगतसे ॥ तुजला देवी ॥१९॥

तेथें शहाण्णव कोटी ग्राम असती ॥ एकलक्ष पट्टणे वसती ॥ एकलक्ष वेळाकुळें राहती ॥ जाण देवी ॥२०॥

सोळासहस्त्र राजे असती ॥ एकलक्ष मंडळेश्वर राहती ॥ आतां देशांची संख्या किती ॥ ती ऐक वो पार्वती ॥२१॥

एककोटी वालुकादेश जाण ॥ आणि एककोटी असे खुरासन ॥ एककोटी देश गाजन ॥ तैसाची पैं ॥२२॥

एककोटी सातलक्ष काश्मीर ॥ एकसहस्त्र कनोज विचित्र ॥ सहशतें आणि आठ सहस्त्र ॥ पंचकोटीचा देश असे ॥२३॥

एकसहस्त्र जालंधर असे ॥ नवलक्ष डाहाळी असे ॥ आणि नवलक्ष उंच असे ॥ पार्वती वो ॥२४॥

नवलक्ष स्वयंभराचा देश ॥ नवलक्ष ब्रह्यावाहा सुरस ॥ एकलक्ष असे ह्योटदेश ॥ जाण देवी ॥२५॥

एकलक्ष चीनदेश ॥ एकलक्ष गाळीवांवस ॥ एकलक्ष देवी परियेस ॥ सोरठ देश पैं ॥२६॥

एकलक्ष कर्नाटक ॥ गंगापार वसे सहस्त्र एक ॥ आणि एकसहस्त्र सहजानंदक ॥ देश असे जाण ॥२७॥

एकसहस्त्र देश कल्हार ॥ शाळींवदेश एकसहस्त्र ॥ एककोटी मीसकवाड विचित्र ॥ पार्वती वो ॥२८॥

एकसहस्त्र सनकनगरी असे ॥ एकसहस्त्र वैराट वसे ॥ एकसहस्त्र गुजराथ परियेसें ॥ नवसारी एकसहस्त्र ॥२९॥

एकसहस्त्र भावेरी असे ॥ एकलक्ष रामखंड वसे ॥ एकसहस्त्र चंदेरी असे ॥ कळंब असे एकलक्ष ॥३०॥

एकलक्ष भौरवाडी सुंदर ॥ शंखयाचा देश एकसहस्त्र ॥ एकलक्ष कानड देश विचित्र ॥ वैरागर एक लक्ष ॥३१॥

लाहुरदेश लक्षएक ॥ आणिक लक्षएक पारिजातक ॥ मळिवाळ सहस्त्रएक ॥ एकसहस्त्र मागध देश ॥३२॥

एकलक्ष नंदनदेश ॥ एकसहस्त्र मारवाडदेश ॥ आणि एकलक्ष सुरस ॥ हस्तनापुर जाण ॥३३॥

एकलक्ष जयंती असे ॥ एकसहस्त्र नेवाड वसे ॥ एकसह्स्त्र मलबार असे ॥ आणि द्राविड एकसहस्त्र ॥३४॥

एकलक्ष असे उज्जयिनी ॥ एकलक्ष तैशीच त्रिवेणी ॥ एकसह्स्त्र दिल्ली जाणीं ॥ एकलक्ष तैलंगण ॥३५॥

एकलक्ष लंकाभुवन असे ॥ एकसहस्त्र हुर्मज असे ॥ ऐसे हे देश परियेसे ॥ पार्वती वो ॥३६॥

ऐसीं देशनामें ऐकुनी ॥ हर्षित झाली भवानी ॥ मग प्रश्न करी शंकरालागुनी ॥ तो परिसावा श्रोतीं ॥३७॥

या देशांमध्ये पशुपती ॥ वसते देश किती असती ॥ आणि उद्वस देश किती ॥ तें सांगा स्वामी ॥३८॥

आणि पुरें पट्टणें किती असती ॥ त्यांची सांगावी गणती ॥ तीं ऐकता होईल तृप्ती ॥ माझिया मनाची ॥३९॥

ईश्वर उवाच ॥ मनुष्यांचा देश एक लक्ष असे ॥ मागें सांगितलें ते उद्वसे ॥ त्यांत वसते देश कोण कैसे ॥ संख्या प्रमाण तें ऐक॥४०॥

सप्तसमुद्रा आरुते ॥ मेरुतळवटा भोंवते ॥ देश कोण किती वसते ॥ सांगेन आतां ॥४१॥

छत्तीसलक्ष कन्होज पवित्र ॥ ब्याण्णवलक्ष मालिवा सुंदर ॥ आणि चौ -यायसीं लक्ष अहीर ॥ नवलक्ष डहाळा ॥४२॥

छत्तीसलक्ष गुजराथ ॥ चौदालक्ष कोंकण वसत ॥ महाराष्ट् तो लक्षसात ॥ सहासहस्त्र बेचाळीस चीन देश ॥४३॥

बावन्नलक्ष व -हाड ॥ तेरा लक्ष द्राविड ॥ पांचलक्ष पंचगौड ॥ तैलंगणदेश नवलक्ष ॥ ४४॥

कर्नाटक देश नवसहस्त्र ॥अठरासहस्त्र बेरड सुंदर ॥ बारासहस्त्र बालकनोर ॥ वीस सहस्त्र दाशार्ह ॥४५॥

एकुणतीसलक्ष पाहाडीय ॥ सवालक्ष वोडिय ॥ पंधरासहस्त्र भुवासह ॥ बाबरीय सवालक्ष जाण ॥४६॥

घोडमुख नऊ हजार ॥ बोरमंडळ ब्याण्णवसहस्त्र ॥ पिंगळदेश सत्तावीससहस्त्र ॥ चौदासहस्त्र जालंधर पैं ॥४७॥

वीससहस्त्र चक्रकोट ॥ रविमीन सहस्त्रचोहट ॥ सत्रासहस्त्र जांजानगर चोखट ॥ वैरार आठसहस्त्र ॥४८॥

गौंडदेश चौदासहस्त्र ॥ चौदासहस्त्र गोरक्षपुर ॥ नैषधदेश त्रिंशत्सहस्त्र ॥ दीडसहस्त्र काश्मीर पैं ॥४९॥

नैमिषारण्य बत्तीससहस्त्र ॥ आणि मुलतान चोवीसहजार ॥ बेचाळीसलक्ष चौफेर ॥ दिल्ली बोलिजे ॥५०॥

बेचाळीससहस्त्र गाजीनगर ॥ चव्वेचाळीससहस्त्र जाल्होर ॥ पंधरासहस्त्र वेताळपुर ॥ जाण देवी ॥५१॥

साठसहस्त्र सुमर ॥ पांचलाख मलेपंचोर ॥ सवालक्ष अति पवित्र ॥ काशिक्षेत्र पैं ॥५२॥

शहाण्णवलक्ष खूरासन ॥ त्रेचाळीसलक्ष खरपर जाण ॥ चौपन्नलक्ष हयवदन ॥ पार्वती वो ॥५३॥

सोळालक्ष स्त्रीमंडळ ॥ वीससहस्त्र चोरमंडळ ॥ अठरासहस्त्र हरिताळ ॥ देश असे पैं ॥५४॥

एक शिंग अठ्ठावीससहस्त्र ॥ द्वादशसहस्त्र रत्नाकर ॥ गजकर्णदेश लक्षशहात्तर ॥ असे जाण ॥५५॥

शहात्तरलक्ष नभुटिकादेश ॥ एक्याण्णवलक्ष गौरमुखदेश ॥ शायशींसहस्त्र कलापदेश ॥ असे पार्वती वो ॥५६॥

आठसहस्त्र नाजानिक ॥ अठ्ठावीससहस्त्र महीक ॥ आणि ऐशींसहस्त्र एक रंक ॥ चंद्रवाक बावीससहस्त्र ॥५७॥

तारणदेश नवसहस्त्र ॥ अकरा सहस्त्र रविगंधापुर ॥ तेरासहस्त्र बोधनगर ॥ गिरिवया नगर सहस्त्रवीस ॥५८॥

सवालक्ष देश खास ॥ संख्या नाहीं येरा देशास ॥ आणि दाहीदिशा उद्वस ॥ गणित नाहीं तयासी ॥५९॥

सत्तरलक्ष गजमुख ॥ सहासहस्त्र अर्धमुख ॥ अठरासहस्त्र मुगाक्षपुर देश ॥ पंचाण्णवसहस्त्र रहिवास असे देवी ॥६०॥

सत्याण्णवसहस्त्र अजामुख ॥ सत्तरसहस्त्र कार्मुख ॥ ऐशींसहस्त्र वक्रमुख ॥ अठ्यायशीं सहस्त्र मागधदेश ॥६१॥

साळीव देश सातहजार ॥ नीळशाम देश अकरासहस्त्र ॥ आणि अकरासहस्त्र गंधर्वपुर ॥ बावीससहस्त्र चंपकदेश ॥६२॥

बावीससहस्त्र लागमंडळ ॥ अकरालक्ष हरिताळ ॥ शतसहस्त्र हरिणामंडळ ॥ बारासहस्त्र निंदक देश ॥६३॥

तेरासहस्त्र कोतमापूर देख ॥ एकलक्ष सर्पमुख ॥ एकलक्ष सूकरमुख ॥ काहाकराचा देश एकलक्ष ॥६४॥

एकलक्ष मारवाचा देश जाण ॥ एकलक्ष देश नंदन ॥ एकसहस्त्र दागान ॥ आणि वनवास एकलक्ष ॥६५॥

एकलक्ष ज्वालामुखी देश ॥ आणि एकलक्ष कैकाट देश ॥ एकलक्ष महिपाळसुरस ॥ दीडलक्ष काउर जाण ॥६६॥

एकलक्ष जांलधरपुरीं ॥ चौसष्टसहस्त्र पोवळपुरीं ॥ बारासहस्त्र अवधारीं ॥ हरिशिखर असे ॥६७॥

ऐसें हें पिंडब्रह्यांड ॥ सप्तद्वीपवती नवखंड ॥ हें रचिलें महावितंड ॥ मजमाजी ॥६८॥

माझी आज्ञा ब्रह्ययासी ॥ तेणें ब्रह्यांडे रचिलीं कैसी ॥ एकएक विशेष परियेसीं ॥ उभवणी केली ॥६९॥

तेणें केली पाताळापासून रचना ॥ एकवीस स्वर्ग खाणाप्रमाणा ॥ ती विश्वकर्मा रचना ॥ करिता जाहला ॥७०॥

ऐसें हें रचिलें स्थावर ॥ परी नुरवे वोडंबर ॥ यामाजी वस्तीचा विस्तार ॥ रचिता होय ॥७१॥

रचिल्या चारी खाणी ॥ चौ -यायशीं लक्ष भूतयोनी ॥ तेहतीसकोटी देव ज्यापासुनी ॥ भूतजातें ॥७२॥

परी णूलोक पुरें पट्टणें ॥ जेथें रावासी राहणें ॥ मेरु शिखरा अष्टकोणें ॥ सहित उभारिलीं ॥७३॥

तेथें यक्ष किंपुरुष किन्नर ॥ रुद्रागण साठी सहस्त्र ॥ सुरुतरु कामधेनु अति सुंदर ॥ आणि द्वादशादित्य सांगतो ॥७४॥

॥ श्लोक ॥ ॥ आदित्य : प्रथम :प्रोक्तो द्वितीयश्व दिवाकर : ॥ तृतीयो भास्कर : प्रोक्तश्वतुर्थश्व प्रभाकर : ॥१॥

पंचमश्व सहत्रांशुं : षष्ठश्वैव विभावसु : ॥ सप्तमो हरिदश्वश्वाप्यश्टमश्व विभाकर : ॥२॥

नवमो वै दिनकरो दशमी द्वादशात्मवान् ॥ एकादशस्त्रिमूर्तिश्व द्वादश : सुर्य एवच ॥३॥

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं य : पठेन्नर : ॥ महत्पापं च कुष्ठं च दारिद्रयं तस्य नश्यति ॥४॥

टीका ॥ ऐसे द्वादशादित्य विख्यार ॥ एकापासाव एक हन्मत ॥ ऐसेचि युगपरत्वें ठाकर ॥ नाममूळस्थान ॥७५॥

अथ ईश्वराचीं नामें ॥ ॥ अनंतयुगीं अव्यक्त ईश्वर ॥ अद्भुभुतयुगीं आदिनाथ ईश्वर ॥ तामधयुगी स्वंयभू भूतेश्वर ॥

तारकारणेश्वर तारजयुगीं ॥७६॥

तांडजयुगीं हरिश्वंडॆश ईश्वर ॥ भिन्नजयुगीं भर्गोदेव ईश्वर ॥ भिन्नयुक्तयुगीं भामेश्वर ॥ देवमहेश्वर अभ्यागतयुगीं ॥७७॥

अव्यक्तयुगीं श्रीमहादेव ईश्वर ॥ मनरण्ययुगीं जटाशंकर ईश्वर ॥ विश्वावसुयुजीं विश्वेश्वर ईश्वर ॥ श्रीकंठेश्वर तांबुजयुगी ॥७८॥

विस्तारणयुगी विश्वारदंती ईश्वर ॥ अलंकृतयुगीं एकांबर ईश्वर ॥ कृतयुगीं सोमेश्वर ईश्वर ॥ सदाशिव ईश्वर त्रेतायुगीं ॥७९॥

द्वापारयुगी जगन्नाथ ईश्वर ॥ कलोयुगी श्रीमहादेव ईश्वर ॥ ऐसे हे अठरायुगी अठरा ईश्वर ॥ पार्वती जाण ॥८०॥

हे जयांत सर्व असे ॥ तो सर्वामाजी दिसे ॥ हें द्वैताद्वैत नासे ॥ जेणें करुनी ॥८१॥

तेंचि कर्म होय विर्विकल्प ॥ निरुपम निर्माया निर्लेप ॥ अनादिसिद्व जंगमरुप ॥ सर्वार असे श्रेष्ठ तो ॥८२॥

ऐसीं जंगमनामें जेणें उच्चारें ॥ अव्यक्त तीन अक्षरें ॥ तें बरवें सांगिजेल सविस्तरें ॥ परियेसीं देवी ॥८३॥

ॐकारे जगत्रय आकारे ॥ मग म्हणतीं गहिवरें ॥ मग म्हणतां परात्परें ॥ महालिंग ॥८४॥

जकार जंगमविवर्जित ॥ गकारें मन गहिंवर छेदत ॥ मकारें मरणरहित ॥ जंगमलिंगें ॥८५॥

जकारी जंगम जन्मलें ॥ गकारी ज्ञान गमलें ॥ मकारीं मूर्ति पावलें ॥ जंगमलिंग ॥८६॥

जकारी जागृती ती स्वयंतेज ॥ गकारी गंभीर ज्ञानबीज ॥ मकारी मक्षर महाकाश सहज ॥ जंगमलिंग ॥८७॥

जकारीं विंरची मुनिराज ॥ गकारीं बोलिजे गरुडध्वज ॥ मकारी महेश्वर निज ॥ अतीत जंगमस्थळ ॥८८॥

तंव देवासी शक्ति म्हणे ॥ युगायुगीं जन्मलिंग तें कैसें सांगणे ॥ आणि तो त्रिविध महिमा निस्तरणें ॥ सागिजे परात्पर ॥८९॥

ईश्वर उवाच ॥ अतीतयुगीं निरामय जंगम ॥ भक्त तो निराभास निरुत्तम ॥ नित्य निश्वळ परागम ॥ लिंगवर्णविरहीत ॥९०॥

जंगम अद्वैतयुगीं अगोचरु ॥ भक्त अनुमय अनातरु ॥ लिंगसुवर्णमय परात्परु ॥ महाप्रकाश ॥९१॥

विस्तारणयुगीं अतीतजंगमू ॥ भक्त अविनाश निरागमू ॥ लिंग श्रीवर्ण अनुपमू ॥ निराकार ॥९२॥

अनंतयुगी जंगम परमसिद्व ॥ भक्त आराध्य परमकंदु ॥ वर्ण अकळीत अभेदु ॥ प्राणलिंग ॥९३॥

जंगम अद्भुभुतयुगीं नित्यानंद ॥ भक्त आराधक निराळकंद ॥ अनंत छायावर्ण विविध ॥ परमलिंग ॥९४॥

तामधयुगीं जंगम अनादिसिद्व ॥ भक्त आराधक अनिलकंद ॥ त्रिशून्य स्वर्गवर्ण अगाध ॥ परात्परलिंग ॥९५॥

तारजयुगीं तत्वप्रकाश जंगम ॥ भक्त आनंदकंद निजनिर्मळ नाम ॥ वर्णअलोहीत अनुपम ॥ प्राणलिंग ॥९६॥

तांडजयुगी जरामृत्यु परम कारण ॥ भक्तप्रकाशक निर्वाण ॥ आदित्य तेजोमयवर्ण ॥ प्रभातलिंग तें ॥९७॥

जंगम भिन्नजयुगीं निजमूर्ति ॥ भक्त अनादिकंद निजस्थिति ॥ निर्मळ वर्ण निजभक्ति ॥ पूर्णलिंग ॥९८॥

भिन्नयुक्तयुगीं आगमनसमूर्त ॥ जंगम व्यापक अमूर्त ॥ सोमप्रकाश भक्त ॥ लिंग परिपूर्ण ॥९९॥

अभ्यागतयुगीं परम स्थिति ॥ जंगमू अजन्म महामूर्ति ॥ भक्त भीमाकंद कपिलिका ती ॥ प्राणलेप प्राणलिंग ॥१००॥

मनरण्ययुगीं सहजस्थिती ॥ जंगम निर्वाण सोहंमूर्ती ॥ भक्त आराधक निरुती ॥ ज्योतिवर्णलिंग ॥१॥

अव्यक्तयुगीं जंगम अखंडित ॥ नित्यकाया जगविख्यात ॥ आराधक विमळभक्त ॥ लिंग अमृतवर्ण ॥२॥

तांबुजयुगीं साहात ॥ जंगम अममूर्त ॥ भीमकंद षट्पूजक भक्त ॥ लिंग विचित्रवर्ण ॥३॥

विश्वावसुयुगीं परमजंगम ॥ परमदेव स्वर्यें अगम ॥ भक्त घटकर्म सवर्म ॥ लिंगतारवर्म ॥४॥

अलंकृतयुगीं निष्कलंक ॥ जंगम संकेत सकळिक ॥ भक्त विश्ववरदायक ॥ लिंग अनुरागवर्ण ॥५॥

कृतयुगीं जंगम सुनीकाया ॥ शामवर्ण रुपकाया ॥ भक्त सुनिळलया ॥ प्राणलिंग ॥६॥

त्रेतायुगीं स्थूळ काय जंगम ॥ सकल विश्वांत परमागम ॥ महाकंद सहजधर्म ॥ लिंग नीललोहित ॥७॥

द्वापारयुगीं अतुमीसया जंगम ॥ नित्य निवांत चार परम आगम ॥ पशुपति भक्त वर्णश्याम ॥ लिंग शिलामय ॥८॥

कलियुगीं अलमाप्रभु जंगम ॥ सत्य सदाचार परम आगम ॥ भक्त सर्वस्व राजसवर्म ॥ लिंग शिलामय ॥९॥

परमात्मा लिंग साक्षात ॥ आत्मा भक्तजण विख्यात ॥ साकार निराकारवंत ॥ निजस्वरुप तें ॥११०॥

प्राणलिंग ऐसे ईश्वर सांगती ॥ प्राणलिंगाची उत्पत्ती ॥ आतां मेरु अष्टकोणा निगुती ॥ उभारिला तें ऐक ॥११॥

तंव शक्ति म्हणे महादेवा ॥ कवणे परी कवणाचा ठेवा ॥ हा मजप्रती सांगावा ॥ तुम्हीं शूळपाणी ॥१२॥

मग सांगे शूळपाणी देवी ऐक याची करणी ॥ एकवीस स्वर्गाची उभवणी ॥ आपण केली ॥१३॥

प्रथम देवीपासूनि बीजें ॥ घेउनी रचलें सहजें ॥ हें त्रिभुवन माझेनि तेजें ॥ भरलें देवी ॥१४॥

ऐसें ऐकोनी गुह्यांतर ॥ शक्ति म्हणे देवा तुं अपरंपार ॥ तुझा नकळेजी पार ॥ निजबीजा ॥१५॥

जयजयाजी जगदीश्वरा ॥ कृपांवता दयासागरा ॥ तूं अचोजजी विश्वंभरा ॥ कृपानिधी ॥१६॥

वाखाणिती आगमपुराणें ॥ वायां भ्रमली षडदर्शनें ॥ नकळसी तुं तर्कअनुमानें ॥ शूळपाणी ॥१७॥

आगम निगम स्मृतिपुराणें ॥ नेति नेति म्हणतीं मनें ॥ न गवससी शेषादिकां वचनें ॥ पिनाकपाणी ॥१८॥

निश :ब्द ही सिद्ववाणी ॥ ही तुमची सिद्व करणी ॥ ही बोलिले साधुजनीं ॥ प्रेमभावें ॥१९॥

वक्ष :स्थळी साजे रुद्रमाळा ॥ लखलखीत विभूतीचा टिळा ॥ लक्षांत न येसी गणपाळा ॥ चंद्रमौळी तुं ॥१२०॥

ऐशा नाना स्तुतिउत्तरीं ॥ शक्तिनें वर्णिला त्रिपुरारी ॥ मग म्हणे तो त्रिनेत्री ॥ पार्वतीसी ॥२१॥

अहो तुझिया स्मरणस्तुती ॥ कविवादें भरले नेणों किती ॥ ऐसी तुझी संगती ॥ महादेवी वो ॥२२॥

विश्वीं स्वयंभू अससी ॥ आणि विश्वीं विश्व होसी ॥ ब्रह्यांड तुझॆ वामकुशी ॥ इंद्रादिकांसहित ॥२३॥

जैं तूं बाळलीला खेळसी ॥ तैं एकवीसस्वर्गाची घरकुली करिसी ॥ तेहतीसकोटी देवांची बाहुलीं विशेंषीं ॥ खॆळावया ॥२४॥

चारी मेघ तुझ्या माथनियां ॥ सप्तसागर भरुनियां ॥ बाळलीला खॆळोनियां ॥ करिसी सर्व देवा ॥२५॥

मजपासुनी सर्व साकार ॥ हें इच्छाशक्ति वोडंबर ॥ तुजपासाव अंकुर ॥ देवत्रयाचे ॥२६॥

तुझें स्वरुप पाहिलें ॥ तें तेजीच जन्मलें ॥ तेजोमय प्रकाशले ॥ त्रिगुणेंसी त्रिभुवन ॥२७॥

तुजसंदे भुलले वेदविद ॥ समाधिस्थासी साधक सिद्व ॥ इंद्रादिक देववृंद ॥ पडिले घडामोडी ॥२८॥

मग या उत्तरावरी ॥ शक्ति म्हणे जी त्रिपुरारी ॥ हे अवतार किती जाहले हरी ॥ तें सांगा मज ॥२९॥

मज तुम्हीं केलें अज्ञान ॥ म्यां भुलविले साधुजन ॥ तरी मज अवतरण ॥ असे कीं नसे ॥३०॥

देवा तुं निबंध बोलसी ॥ तो मी धरीन मानसीं ॥ आणि उद्वरण सर्व जीवांसी ॥ होईल तेणें ॥३१॥

मग शिव बोले वचनबंध ॥ जो अठरायुगीचा प्रसिद्व ॥ तेथें दुजा शास्त्रसंबंध ॥ असेचि ना ॥३२॥

या शिवनिबंधापासुनी शास्त्रपुराणें ॥ आणि सर्व देवांची जन्मस्थानें ॥ तेथे दुसरें नाहीं माकोणें ॥ साक्ष द्याववा ॥३३॥

आदिअंती मी एकला ॥ तुजपासुनी विष्णु जन्ला ॥ विष्णुपासुनी जाहला ॥ जन्म ब्रह्ययासी ॥३४॥

ब्रह्या जन्मला तामधयुगामधीं ॥ त्यासी म्यां उपदेशिलें आधीं ॥ मग तो घडामोडी सर्व जीवादि ॥ करिता होय ॥३५॥

सर्व शास्रें यापासुनी ॥ हा निबंध आद्य मद्वाणी ॥ वेद ते माझ्या श्वासापासुनी ॥ ही टिका केली ॥३६॥

वेदांपासुनी उपनिषदें पुराणें ॥ श्रुति कथनें केली ब्रह्ययानें ॥ मज जाणतेपणी नेंणें ॥ वेदज्ञानें केलीं ॥३७॥

वेद रचिले विश्वावसुयुगीं ॥ रचिल्यावरी वर्षे दोन कोटी जाहली चांगी ॥ यांची रचना अवघी ॥ युगी अठरा ॥३८॥

हें समस्त आदी ॥ मागें सांगितलें बोधीं ॥ परी शिवनिबंध हा आदि ॥ अनंतयुगापासुनी ॥३९॥

आतां असो बहु प्रसंगिक ॥ हा शिवनिबंध आधिकाधिक ॥ येथें दुसरें नाही आणिक ॥ सांगो काई ॥४०॥

विशेष कवि तें करी कथनें ॥ साक्ष ठेविती शास्त्रें पुराणें ॥ तैसीं शिवनिबंधे कवणें ॥ साक्ष दीजेल ॥४१॥

म्हणोनी हा शिवनिबंधु ॥ वेदशास्त्राहुनी अगाधु ॥ सर्वशास्त्रांचा बोधू ॥ यापासुनी जाहला ॥४२॥

याची काढुनी नाना अंगें ॥ तीं शास्त्रें केलीं चांगें ॥ साही दर्शनें याच्यामागें ॥ लागली असती ॥४३॥

हा अठरा युगांचा मुमुक्षु ॥ पुढें अवतार सांगिजेल असंख्य ॥ हे भिन्नजयुगींची मुख्य ॥ टीका केली ॥४४॥

ऐसें शंकर बोलिले ॥ येथुनी भिन्नजयुग संपले ॥ पुढें भिन्नयुक्त युग विस्तारलें ॥ तें म्हणे श्रीमहादेवो ॥१४५॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे पंचमोऽध्यायः ॥५॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP