मूळस्तंभ - अध्याय ४

‘ मूळस्तंभ ’ पोथी म्हणजे शिव- पार्वती संवादरूपातील शिवपुराणावरील शोधनिबंध आहे.


श्रीगणेशाय नम : ॥

भिन्नजयुगीं अंड भिन्न झालें ॥ तें महाजीवातें व्यालें ॥ मग त्यापासाव झालें ॥ अध ऊर्ध्व ॥१॥

ऊर्ध्व म्हणजे आकाश ॥ अध हें नाम पाताळास ॥ यांत मेरु विशाळ परिस ॥ स्थावरिला देवी ॥२॥

तो स्थावरिला पाताळावरी ॥ एकवीस स्वर्गे त्याचे कड्यावरी ॥ जैसी पूर्वीची होती कुसरी ॥ तैशाच परी रचियेली ॥३॥

पूर्वीचें होतें जंत्र ॥ तैसेच उभविले विचित्र ॥ तैं पांचही पांचाळ पवित्र ॥ उभारिते झाले ॥४॥

तंव शक्ति म्हणे शूळपाणी ॥ तुम्हीं सांगितली ब्रह्ययाची करणी ॥ तरी हे पांचाळ किठुनी ॥ झाले देवा ॥५॥

महादेव म्हणे भवानी ॥ हे जन्मले आदिब्रह्यापासुनी ॥ या ब्रह्यांडाची करावया करणी ॥ पार्वती वो ॥६॥

ते पांचही महा चाळक ॥ पांच मुखापासाव झाले एक ॥ ते रचिते झाले सुरेख ॥ ब्रह्यांड हें ॥७॥

जे गायत्रीपासाव बीज ॥ तीं पंचभूतें सतेज ॥ सप्त धातु चार खाणी सतेज ॥ दैत्य देव रचियेले ॥८॥

मग ब्रह्या घेऊन महिमा ॥ पांचजण लाविले कामा ॥ मेरु स्थापुनि व्योमा ॥ चारी कों साधिले ॥९॥

त्या चौकोनाउपरी ॥ अष्ट लोकपाळ कुसरी ॥ कोणां साधूनि करी ॥ त्याची अष्ट दिशा ॥१०॥

तो मेरु करुनि मध्यू ॥ त्या मेरुचे गणितभेदू ॥ भोंवते सप्तही सिंधू ॥ तयांमाजी सप्त द्वीपें दिशा ॥११॥

ऐसा ऐकोनि मूळस्तंभू ॥ शक्ति म्हणॆ महाभेदू ॥ तया मेरुचें गणित विधू ॥ सांगा देवा ॥१२॥

त्या स्वर्गाचा अवकाश निका ॥ त्या जाणिला विश्वव्यापका ॥ तरी सांग पांचभौतिकां ॥ रचिले कैसें ॥१३॥

मग बोले जाश्वनीळ ॥ हें सर्वही लाघव माझा खेळ ॥ मीच लपवी ब्रह्यांड गोळ ॥ अंगामाजी ॥१४॥

जैं प्रळयकाळ मी दावीं ॥ तैं हे सृष्टी लपवी ॥ सकळ आज्ञेंनें खेळवीं ॥ मही ठेवीं जटेमाजी ॥१५॥

मी खेळें अद्दश्य मायावी ॥ तैं अग्निनेत्रीं सामावीं ॥ मग सर्वांसी प्रगटवी ॥ महा वेगवायु ॥१६॥

मग स्वलीलें ब्रह्यचारी ॥ पवन लपवीं तया भीतरीं ॥ आणि सर्वांसी प्रगट करी ॥ आपणांत ॥१७॥

साकार होतें जितुकें ॥ तें आंगांत लपवीं ऐक्यें ॥ ऐसे अवघेंच दाविलें म्यां एकें ॥ हा निराकार देवी ॥१८॥

दिसे भूमंडळ जळीं विरालें ॥ जळ तेजीं मिळालें ॥ तेज प्रभंजने ग्रासिले ॥ ऐकें पार्वती ॥१९॥

पवन मभें गिळिला देखे ॥ ऐसा भूगोल लपवी निकें ॥ जीं नाना ब्रह्यांडगोळकें ॥ याचिपरी मी खेळें ॥२०॥

ऐसा खॆळ खेळे महींद्रा ॥ विष्णु ब्रह्यादि रुद्रा ॥ हे माझी दीर्घ निद्रा ॥ माजी जीवसृष्टी भंगे ॥२१॥

ऐसें सामर्थ्य खॆळें पाही ॥ त्यासी अंत पार नाहीं ॥ नेणू जाणें कांहीं ॥ ते प्रकृतीसी ॥२२॥

तिचे शक्ति शरीर प्राण ॥ ते सोहं स्वरुपी लीन आपण ॥ परी त्यांसीही मीच निर्वाण ॥ बीजाक्षर देवी ॥२३॥

लाघवीयाचें लाघव जाणें लाघवी ॥ वीराचा मार जाणें वीर स्वभावी ॥ मजवीण भुली आघवीं ॥ असें गुरुत्वें जाण ॥२४॥

तंव शक्ति म्हणे ऐसें ॥ त्वां लाघव केलें केसें ॥ लपबून दाविलें जैसें ॥ तें सांग देवा ॥२५॥

मग देव करी अनुवाद ॥ म्हणे ऐक प्रश्नोत्तर सुबुद्व ॥ उयतांसि संवाद ॥ अनुभवी यांसी ॥२६॥

हे ब्रह्या विष्णु महेश्वर ॥ यांसी जाणिवेचा गर्व थोर ॥ आणि अहंमती अपार ॥ असे जाणिवेची ॥२७॥

माझिया शरीरामधीं ॥ घरांत घरकुल करिती आधीं ॥ म्हणती इतुकीच सृष्टी वृद्वी ॥ ऐसे भ्रांती गुंतले ॥२८॥

ब्रह्या जनांसी चालवी ॥ वेदशास्त्रें खेळवी ॥ परी त्या त्रेलोक्यासि भुलवी ॥ भ्रांतित्वें देवी ॥२९॥

वेदेकरुनि लाविला वेधू ॥ एकासी शास्त्राचा मदू ॥ म्हणती आम्ही जाणते हा छंदू ॥ धरुन ठेले ॥३०॥

मग ते एकमेकां उपदेशिती ॥ बीजमंत्र हाच म्हणती ॥ येरां शिवभक्तांतें निंदिती ॥ जाण तेणें ॥३१॥

ऐसें संवादले जन ॥ शिव -ज्ञानियां म्हणती अज्ञान ॥ जरी एकाद्यासी होय ज्ञान ॥ तरी त्यासी नष्ट म्हणती ॥३२॥

मुळीं -ब्रह्ययानें लाविली भ्रांती ॥ ते दोहीच प्रतिपादिती ॥ परि मी स्वयें ऐसें नेणती ॥ वायां अभिमानानें गुंतलें ॥३३॥

ब्रह्ययाने रचिली कुळें ॥ ब्रह्यांडगोळकाची ढिसाळें ॥ तीं देवी जाण तुझीं कुळें ॥ कुळें जाळें गोविली पैं ॥३४॥

मी अखंड परमेश्वर ॥ ते नेणती माझा पार ॥ त्या धर्माचा विचार ॥ अपार आड ठाकला ॥३५॥

तंव बोले पार्वती ॥ याची मज कळली जन्मरीती ॥ आतां ब्रह्ययाची करणी किती ॥ तें सांगा स्वामी ॥३६॥

तें तांडज युगींचें अंडें ॥ मेरु मुख्य करुनी नवखंडें ॥ नाना जीव जाती उदंडें ॥ तो रची कैसा ॥३७॥

मग सांगे शूळपाणी ॥ पंचभूतांची उभवणी ॥ तेणें तो मेरु स्थावरोनी ॥ केलें काय ॥३८॥

देवीस म्हणे ईश्वरु ॥ त्या मेरुचा किती विस्तारु ॥ तो पंच्भूतात्मक अवडंबरु ॥ सांगतो ऐक ॥३९॥

प्रथम कराळीपासाव उद्वव नादास ॥ नादापासून आकाशास ॥ आकाशाचे गुण परियेस ॥ कोणकोण ते ॥४०॥

राग आणि द्वेष जाण ॥ लोभ चिंता भय पूर्ण ॥ हे परम पांव गुण ॥ आकाशाचे ॥४१॥

मग द्वितीय कराळीपासुन ॥ बिंदु जाहला असे उत्पन्न ॥ बिंदुपासुनी आप जाण ॥ आपाचे गुण परियेसीं ॥४२॥

लाळ मूत्र शुक्र शोणित ॥ आणि स्वेद हें परम गुणित ॥ पांच गुण आपाचे बोलिजेत ॥ जाण देवी ॥४३॥

आतां तृतीय दि पशुपती ॥ पशुपतीपासुन ज्योती ॥ ज्योतीपासून तेजोत्पत्ती ॥ तेजाचे पांच गुण ॥४४॥

क्षुधा तृषा आळस ॥ जांभई निद्रा विशेष ॥ हे परम गुणित पांच सुरस ॥ तेजाचे असती ॥४५॥

आतां चतुर्थ उमापती ॥ तयापाशुनी काळ निगुती ॥ काळापासूनी वातू निश्विती ॥ तयाचे पांच गुण ॥४६॥

चलन वलन धावन ॥ विकास आणि आकुंचन ॥ ऐसे परम गुणित पांच गुण ॥ परियेसीं देवी ॥४७॥

आतां पंचम सदाशिव ॥ शिवापासूनि पृथ्वीउद्वव ॥ तया पृथ्वीचे स्वयमेव ॥ पांच गुण असती पैं ॥४८॥

अस्थि मांस मेद ॥ त्वचा नाडी प्रसिद्व ॥ हे परम गुणित पांच भेद ॥ पृथ्वीचे असती ॥४९॥

ऐसी पांच भूतें जाण ॥ एकएकाचे पांच गुण ॥ ऐशाचें नाम पंचीकरण ॥ जाण देवी ॥५०॥

ऐसी पंचभूतोत्पत्ती ॥ सांगितली तुजप्रती ॥ हीं तांडजयुगीं वर्तती ॥ परस्परें जाण ॥५१॥

वर्तती एक विचारें ॥ या चराचरविस्तारें ॥ एकएक वैराकारें ॥ जाण देवी ॥५२॥

ऐसी पंचभूत संख्या जाण ॥ तंव देवी म्हणे यांचा कैसा वर्ण ॥ वाचा आणि आहारठसा कोण ॥ तो सांगावा मजलागीं ॥५३॥

ईश्वर उवाच ॥ पृथ्वी ते असे पिंवळी ॥ वातु निळा रंग झळाळी ॥ तेज तें अलोहीत सकळी ॥ आप श्वेत आकाश काळें ॥५४॥

हे यांचे पांच वर्ण ॥ आतां यांच्या स्वादालागुन ॥ सांगेन तुजप्रती जाण ॥ ऐक ते देवी ॥५५॥

आतां मुख आणि आहार ॥ यांचा दाऊं विचार ॥ हा अष्टधा प्रकृतीप्रकार ॥ तो परियेसीं देवी ॥५६॥

आकाशाचे मुख श्रवण ॥ आहार तो शब्द जाण ॥ तेजाचें मुख नयन ॥ देखणें आहारु ॥५७॥

वायुचें मुख नासिक ॥ आहार परिमळ घेणें ऐक ॥ आपाचें मुख शिश्न देख ॥ आहार बिंदु ॥५८॥

पृथ्वीचें मुख रसन ॥ आहार पंचामृत भोजन ॥ आहार मुखें ऐसीं जाण ॥ पार्वती वो ॥५९॥

याचीं मुखें आणि आहार ॥ सांगितले सविस्तर ॥ अष्टधा प्रकृती सर्व शरीर ॥ तें परियेसीं देवी ॥६०॥

रज तें ब्रह्या जाण ॥ सत्वापासूनि विष्णु उत्पन्न ॥ तया विष्णुपासून ॥ सोमराज ॥६१॥

तम तो जाण रुद्र ॥ रुद्रापासून राग थोर ॥ ऐसा हा त्रिगुण विचार ॥ जाण देवी ॥६२॥

तों मागील पंचतत्वें ॥ आणि सत्व रज तम आठवें ॥ हे अष्टधा प्रकृती येणें नावें ॥ बोलेजे वो ॥६३॥

हीं पांचही तत्वें विशेखें ॥ परमेश्वराचीं पंचमुखें ॥ तें पांचही पांचाळ देखें ॥ यापासून जन्म ॥६४॥

तंव शक्ति म्हणें पांच कारण ॥ इही रचिलें त्रिभुवन ॥ संगें आणिले कोण ॥ तें सांगा स्वामी ॥ ६५॥

मग म्हणे ईश्वर ॥ देवी ऐक तो प्रकार ॥ पंचतत्वांचा विचार ॥ सांगेन आतां ॥६६॥

ॐकार हें बीज आदि ॥ या भवयांमधीं ॥ हुताशन वायु मधीं ॥ जाण देवी ॥६७॥

हुताशनामध्ये तोय ॥ आपामध्यें वसुधंरा होय ॥ रचिली याच प्रकारें पाहें ॥ सांगेन तुज ॥६८॥

आकाशापासून वायू जन्मला ॥ वायूपासून अभि जाहला ॥ तेजापासाव तो भला ॥ आपासीं जन्म ॥६९॥

आपापासाव जन्मली ॥ ते पृथ्वी उभविली ॥ तिचा मेरु जाहला त्यावेळीं ॥ पार्वती वो ॥७०॥

तंव शक्ति म्हणे जी देवा ॥ या भूतांचा मेरु जाहला बरवा ॥ त्यांचा विस्तार तो सांगावा ॥ मजलागीं ॥७१॥

मग बोलिले चंद्रचूड ॥ आकाशापासाव एक कोड ॥ आकाशापासाव चवदा कोड ॥ वायू बोलिजे ॥७२॥

वायूपासाव तेज दोन कोटी ॥ तेजापासाव आप चारकोटी ॥ आपापासाव पृथ्वी छप्पन्न कोटी ॥ बोललीसे ॥७३॥

या माजीं सत्व रज तम जाण ॥ आणि पंचभूतें असतां व्यापून ॥ यांत मेरु उभारिला विस्तीर्ण ॥ जाण देवी ॥७४॥

यांत तम चौदा कोटी ॥ रज जाण तीस कोटी ॥ सत्व तें सोळा कोटी ॥ भूमी गोळ हा ॥७५॥

इतुकें पंचभूतांचें गणित ॥ आतां सांगेन मेरुचें परिमित ॥ ऐकंता होय तें व्यक्त ॥ शिवज्ञान ॥७६॥

हेंच पाहिजे ब्रह्यांडीं ॥ हेंच जाण असे पिंडी ॥ हें जाणितल्यावरी गोडी ॥ जाणती शिवज्ञानी ॥७७॥

आतां मेरुचा विस्तार ॥ गणित किजे साचार ॥ दीर्घ रुंदीचा प्रकार ॥ भूमीसी गणित ॥७८॥

मेरुचा विस्तार अति गहन ॥ किती असे तो तुजकारण ॥ सांगतो ऐक चित्त देऊन ॥ पार्वती वो ॥७९॥

किती तें ऐक मेरुचें प्रमाण ॥ बाह्या तीन म्हणजे एक धांवा जान ॥ धांवा तीन म्हणजे पांड पूर्ण ॥ पांड साठ ते एक पदसया॥८०॥

त्या पदसया छप्पन्न शत ॥ झालिया होय एक कोस गणित ॥ ऐसे चार कोस जे होत ॥ तयासि म्हणिजे एक गांव ॥८१॥

ऐसे गांव एक कोटी पूर्ण ॥ आणि वीस लक्ष दोन सहस्त्र जाण ॥ इतुकें मेरुचें रुंदीप्रमाण ॥ असे देवी ॥८२॥

त्या मेरुची उंची जाण ॥ तीन कोटी तीन लक्ष गहन ॥ दोन सहस्त्र दोन शर योजन ॥ गणित ऐसें ॥८३॥

इतुका उंच शेषापासूनी ॥ त्या मेरुप्रती वेष्ठउनी ॥ किती असे ती कुंभिनी ॥ तें सांगतों आतां ॥८४॥

पांच शत एक कोटी योजन ॥ असे भूमिका विस्तीर्ण ॥ भिन्न जाहली असे जाण ॥ नवां ठाई ॥८५॥

तीच नवखंडॆं बोलली घडामोडी ॥ मेरुपासून उत्तर चवदा कोडी ॥ आणिक दिशांची प्रौढी ॥ ऐक देवी ॥८६॥

दक्षिणेस चौदा कोटी योजन ॥ पूर्वेस चवदा कोटी प्रमाण ॥ पश्चिमेस तितुकेंच गणन ॥ ऐसे मिळून छप्पन्न कोटी ॥८७॥

आतां सांगेन मेरुचें प्रमाण ॥ एकवीस स्वर्ग ते कोण कोण ॥ एकवीस कडे त्याचे जाण ॥ तेचि एकवीस स्वर्ग ॥८८॥

तंव पार्वती म्हणे शिवाकारण ॥ देवा ते कडे कवण कवण ॥ तें सांगाजी मज प्रमाण ॥ किती योजन असे ॥८९॥

मग बोले विश्वमूर्ति ॥ देवी ऐक एकचित्ती ॥ त्यां मेरुकड्यांची गणती ॥ सांगेन तुज ॥९०॥

यमबंधकडा जाण ॥ नवकोटी पंचाण्णव लक्ष संख्या पूर्ण ॥ आणि पंचाण्णव सहस्त्र योजन ॥ उत्तरकडा जाण देवी ॥९१॥

एक कोटी आठशे योजन ॥ पूर्वकड्यांचे प्रमाण ॥ सात कोटी पंचाण्णव सहस्त्र ॥ योजनप्रमाण असे साक्ष ॥ दक्षिणकड्याची ॥९३॥

ऐशा चतुर्दिशा जाण ॥ आतां चार कोन ते कोण कोण ॥ तेहीं गणित सांगेन ॥ ऐक देवी ॥९४॥

साठ कोटी पंचाण्णच लक्ष ॥ पंचाण्णव सहस्त्र जाण दक्ष ॥ योजनप्रमाण प्रत्यक्ष ॥ नैऋत्यकड्याचें देवी ॥९५॥

पांच कोटी पंचाण्णव लक्ष जाण ॥ आणि पंचाण्णव सहस्त्र योजन ॥ वायव्यकड्याचें प्रमाण ॥ जाण देवी ॥९६॥

चार कोटी पंचाण्णव लक्षजाण ॥ इतुकीं योजनें प्रमाण ॥ आग्नेयकडा असे जाण ॥ पार्वती वो ॥९७॥

दोन कोटी पंचाण्णव प्रमाण ॥ पांच योजन गणितमहिमान ॥ ईशान्यकडा असे गहन ॥ जाण देवी ॥९८॥

ऐसिया कड्याचें परिमित ॥ आणि मेरुचें गणित ॥ तेथें स्वर्ग बोलिजेत ॥ ते कोण कोण परियेंसीं ॥९९॥

शेषापासून सप्त पाताळें ॥ वरी एकवीस स्वर्गे विशाळें ॥ त्यामाजी रचिलीं ब्रह्यकुळें ॥ ती सांगेन देवी ॥१००॥

आतां मृत्युलोकींच्या माळिया म्हणती ॥ त्या चवदा ठायीं भिन्नलिया असती ॥ तीं चौदा भुवनें बोलिजेती ॥जाण देवी ॥१॥

मेरु ऊर्ध्व स्वर्गमाळिया असती ॥ त्यांचे भेद एकवीस बोलिजेती ॥ तेच एकवीस स्वर्ग निगुती ॥ वैकुंठपर्यत ॥२॥

तरि आतां त्यांची नांवे ॥ तीं सांगेन तुज स्वभावें ॥ एकाग्रचित्तें एकभावें ॥ परिसिजे तुवा ॥३॥

अव्याहत ब्रह्यस्थान ॥ दावीन खगाकार गगन ॥ एकवीस स्वर्गाचे गणन ॥ त्याचमाजी ॥४॥

आतां स्वर्गाची नावें आळ माळ ॥ विशाळ सुकाळ आणि दुकाळ ॥ सहावा तो व्याकुळ ॥ गोकुळ जाण वो सातवा ॥५॥

लकार भकार निरु ॥ नकार भार्कर येकारु ॥ ऐसी तेरा स्वर्गे सुंदरु ॥ पार्वती वो ॥६॥

निधूम धुमसुनी निर्सुनी ॥ बुध बुधाकार जाणी ॥ विमळपूर्ण हे भवानी ॥ एकवीस स्वर्ग ॥७॥

ऐसीं एकवीस स्वर्गे मनोहरें ॥ त्या मेरुवरी असती पुरे ॥ तेथें नांदती सविस्तरें ॥ कोण लोक ते परियेसीं ॥८॥

मातापुरी अमरपुरी ब्रह्यपुरी ॥ इंद्रपुरी यमपुरी विष्णूपुरी ॥ रुद्रपुरी आणि कुबेरपुरी ॥ हीं आठ पुरें ॥९॥

हीं मेरुमस्तकावरी विस्तारें ॥ सुखें वसती अष्टपुरें ॥ हीं अष्टदिशांसीं परिकरे ॥ वसती देवी ॥११०॥

येर एकवीस स्वर्गामध्यें अपारें ॥ भूतजाति नांदती सविस्तरें ॥ तैं मेरुचिया आधारें ॥ असती पैं ॥११॥

त्या भूमंडळाभीतरीं ॥ मेरुचेनि आधारावरी ॥ आपुल्या मंडळाचे व्यापारी ॥ वर्तताती ॥१२॥

त्या लोकपालांचीं स्वस्थानें ॥ ते दिसती विश्वावरी उंचमानें ॥ आज्ञा मर्यादा म्हणिजे यांचे लेणें ॥ लागत असे ॥१३॥

तंव पार्वती म्हणे शूलपाणी ॥ एकवीस स्वर्गे एकापासुनी ॥ किती योजन दूर स्थानी ॥ मुख्य कोण ॥१४॥

मग म्हणे विश्वंभर ॥ एकवीस स्वर्गांचा विस्तार ॥ तो परियेसीं विचार ॥ पार्वती वो ॥१५॥

एकवीस स्वर्गाचे प्रमाण ॥ एक लक्ष योजन भानुमंडळ जाण ॥ आणि दोन लक्ष योजनें पूर्ण ॥ चंद्रमंडळ उंच असे ॥१६॥

तीन लक्ष तारांगण जाण ॥ ध्रुवमंडळ चार लक्ष योजन ॥ पांच लक्ष वायुचक्र पूर्ण ॥ धूम्रस्थान ज्वाळामय तें ॥१७॥

सहा लक्ष अमरगण ॥ सात लक्ष सप्तभाव जाण ॥ अष्ट महासिद्वींचे स्थान ॥ आठ लक्ष देवी ॥१८॥

नवलक्ष नव नेत्र ॥ दहा लक्ष दिक्पाळ सर्वत्र ॥ एकादश रुद्र पवित्र ॥ ते अकरा लक्ष ॥१९॥

बारा लक्ष बारा आदित्य ॥ तेरा लक्ष चंडपर्वत ॥ स्वर्गद्वारपाळ विचरत ॥ चवदा लक्ष जाण ॥१२०॥

आपुल्या भावें स्वतंत्र ॥ अपरिमित असंख्यात पवित्र ॥ तें पंधरालक्ष सर्वत्र ॥ रुद्रस्थान म्हणिजे वो ॥२१॥

सोळा लक्ष योजनकर्ण ॥ वर्तती साठ सहस्त्र गण ॥ आणि सतरा लक्ष जाण ॥ लोक पैं ॥२२॥

सर्व देवांच्या बाहिया ॥ सर्व जीवांच्या साह्या ॥ तो अठरा लक्ष वर्तलिया ॥ तारक धर्मराय ॥२३॥

एकुणीस लक्ष विष्णुपुरें ॥ वीस लक्ष शक्तिमंदिरें ॥ दोन शतकोटी थोरें ॥ पूर्णचंद्रमंडळ ॥२४॥

कनकगिरी सुवर्णशिखर ॥ तेहतीसकोटी गंभीर ॥ महास्थूळ परिकर ॥ ऐक देवी ॥२५॥

ऐसी ब्रह्यांडाची रचना व्यक्त ॥ हें मेरुचें असे गणित ॥ या परतें निजस्थान अखंडित ॥ तें निरामय निर्गुण ॥२६॥

सुर्याचे मंडल भ्रमण ॥ ते चालीपासाव दिनमान ॥ व्यक्त चंद्राचेनी जाण ॥ सर्वत्रांसी ॥२७॥

राहुकेतू व्यतीपात संक्रमण ॥ तिथिवासर योग क्रमण ॥ हें सर्व मेरिसी प्रदक्षिण ॥ करीत असती पैं ॥२८॥

ऐसा मेरु बहुवस ॥ वर्ते शणन्यमंडलीं सरस ॥ चतुर्थरुद्री पैंस ॥ तो तीन खर्वे देवी ॥२९॥

आतां मेरुखाली सप्त पाताळें ॥ तीं कोण कोण विशाळे ॥ अंधकार तमोतळें ॥ ऐक देवी ॥१३०॥

अहीतळ महीतळ ॥ सुतळ आणि कर्मतळ ॥ वितळ आणि शंकातळ ॥ रसातळ सातवें ॥३१॥

या सप्तपाताळींचे लोक ॥ यथार्थ सांगतों नि :शंक ॥ स्वस्थचित्तें करुनी ऐक ॥ पार्वती वो ॥३२॥

कुंतललोक तपिलोक ॥ सुतललोक महीतललोक ॥ तळातळलोक रसातळलोक ॥ पाताळलोक सातवा ॥३३॥

आतां जी सप्तद्वीपें असतीं ॥ तीं कोणकोण सांगिजेती ॥ तें अवधारिजे चित्तीं ॥ शंभु म्हणे देवी ॥३४॥

एकलक्षयोजन जंबुद्वीप ॥ दोनलक्षयोजन पुष्पद्वीप ॥ तीनलक्षयोजन शाल्मलीद्वीप ॥ जाण देवी ॥३५॥

कुशद्वीप चारलक्षयोजन ॥ पुष्करद्वीप पांचलक्ष जाण ॥ कौचद्वीप सहालक्षयोजन ॥ पार्वती वो ॥३६॥

सातलक्षयोजन ॥ गोमेदद्वीप असे जाण ॥ हें सप्तद्वीपांचे कथन ॥ जाण देवी ॥३७॥

ऐसी सप्तद्वीपें रहाती ॥ यासी सप्तसमुद्र वेष्टून असती ॥ ती सांगेन वो युक्ति ॥ कोण कोण ॥३८॥

चारलक्षयोजन लवणसमुद्र ॥ पांचलक्षयोजन इक्षुरससमुद्र ॥ सहालक्षयोजन दुग्धसमुद्र ॥ पार्वती चो ॥३९॥

दधिसमुद्र सातलक्षयोजन ॥ घृतसमुद्र आठलक्षयोजन ॥ नवललक्षयोजन जाण ॥ सुरासमुद्र ॥४०॥

श्रीहरीचा घृतसमुद्र ॥ दहालक्षयोजनें पवित्र ॥ तेथें स्वयें शार्ड् .धर ॥ लक्ष्मीसहित राहे पैं ॥४१॥

ही सप्तसमुद्रसंख्या सुरस ॥ दोनकोटी चौपन्न लक्ष ॥ आतां भूमंडळविशेष ॥ तें परियेसी देवी ॥४२॥

ऐसे हे सप्तसमुद्र जाण ॥ मेरुसी असती वेष्टून ॥ यांत अष्ट कुळाचळ गहन ॥ असती देवी ॥४३॥

ते पर्वत कोणकोण ॥ मेरुसी असती वेष्टून ॥ ते देवी तुज सांगेन ॥ प्रमाणेंसीं ॥४४॥

तीनलक्ष योजनें मेरुचें प्रमाण असे ॥ भोंवतें अष्ट कुळाकुळ मिरविती कैसे ॥ ऐकिलिया बुद्वी प्रकाशे ॥ सृष्टीरचनेसी ॥४५॥

नवलयोजन रत्नांचा पर्वत ॥ आठलक्षयोजन सोन्याचा पर्वत ॥ सहालक्षयोहन हि -यांचा पर्वत ॥ जाण देवी ॥४६॥

रत्नपर्वत सातलक्षयोजन ॥ किरकोळ पर्वत पांचलक्षयोजन ॥ मंदारपर्वत चारलक्षयोजन ॥ जाण देवी ॥४७॥

दोनलक्षयिजन विख्यात ॥ मुक्तमणियांचा पर्वत ॥ हे सात पर्वत जगविख्यात ॥ जाण देवी ॥४८॥

ऐसे हे सात पर्वत ॥ आठवा मेरु जगविख्यार ॥ यामाजी अष्टलोकपाळ नांदत ॥ ते परियेसी ॥४९॥

इंद्र , अग्नि , यम , वरुण ॥ निऋति आणि वरुण ॥ वायू , कुबेर , ईशान ॥ हे अष्टदिक्पाळ ॥१५०॥

हे अष्टदिशा वेष्ठून निगुती ॥ पर्वतामध्यें असती ॥ आतां शेषपृथ्वी असे किती ॥ ती परियेसीं देवी ॥५१॥

तीनक्षौणीयोजन ॥ गगनामाजी व्यापून ॥ वातचक्राचें असे भ्रमण ॥ जाण देवी ॥५२॥

अष्टदिशांमाजी पार्वती ॥ नाथाच्या अष्ट मूर्ती असती ॥ सेवक सात कोटी भूतावळी राखिती ॥ अलग अपुलाले ॥५३॥

काळभैरव काळकेतू काळभिन्न ॥ रक्ताक्ष पिंगाक्ष रक्तजन ॥ क्षेत्रपाळ आणि बाबरी जाण ॥ ऐसे आठ नाथ असती ॥५४॥

या ब्रह्यांडगोळकाची करणी मांडली ॥ तों मोडूं पाहती भूतावळी ॥ म्हणून कर्त्यानें हे महाबळी ॥ रक्षणा ठेविले असती ॥५५॥

आणि अष्टपाळ लोक राजे ॥ त्यांचे तीन लक्ष परिवार असती जे ॥ त्यांची नामें परियेसीजे ॥ सांगेन तुज ॥५६॥

ब्रह्यांडाहुन परियेसी ॥ पन्नास कोटी योजनें उंच असे ॥ सूर्याचा फेर सात सहस्त्र सातसें ॥ बत्तीस योजन उंच पैं ॥५७॥

तो नित्य सहस्त्रकिरण ॥ अष्टप्रहरांमाजी जाण ॥ मेरुसी करी प्रदक्षिण ॥ आदिशक्ती वो ॥५८॥

त्र्याहात्तर कोटी पृथ्वीचें प्रमाण ॥ त्यांत कोणाचा व्यापार सांगेन ॥ तरी सावचित्त करुन ॥ परिस देवी ॥५९॥

बेचाळीस कोटी योजनें सूर्याचा व्यापार ॥ चवदा कोटी योजने अंधकार ॥ तेथें असती अकरा रुद्र ॥ ऐक देवी ॥१६०॥

अभेद अच्छेद अमर ॥ अचुक तपतापु आविचार ॥ संध्या वामदेव अघोर ॥ अत्योखका आणि ईशान्य ॥६१॥

हे अकरा रुद्र असती जेथें ॥ त्यांचा प्रकाश पडे तेथें ॥ यापरी निस्तरती ते ॥ महा अंधकार ॥६२॥

तेथें नवमहामुनी असती ॥ ते परियेसी सांगिजेती ॥ ऐकिलिया येईल प्रचीती ॥ तुजकारणेम ॥६३॥

स्फुटिकामुनी शिवहस्तकामुनी ॥ गर्भिव , गरुड , नीलभद्रमुनी ॥ हराडलिया , केसर , साळुर , जाणी ॥ आणि मुक्तिकामुनी नवम ॥६४॥

ऐसे नव मुनी तेथें असती ॥ तेजोमय बोलिजेती ॥ ऐसी भिन्नजयुगीचीं गणती ॥ केली पार्वती वो ॥६५॥

आतां सातकोटी योजनें ॥ पृथ्वी रुंदली असे वनें ॥ ती सांगेन कोणकोण ॥ परियेसीं देवी ॥६६॥

पूर्वदिशेस चैत्ररथवनें रोधिलीसे ॥ दक्षिणदिशी गंधमादनें रोधिलीसे ॥ पश्विमेस धूर्जवनें रोधिलीसे ॥ उत्तर रोधिली नंदनवनें ॥६७॥

यामध्यें नव खण्डें जाण ॥ सप्तद्वीपपवतीत कोण कोण ॥ सांगितलीया परिमाण ॥ होईल साक्षिभूत ॥६९॥

प्रथम तें भरतखंड ॥ दुसरे जाण पुष्करखंड ॥ तिसरें असे हरिखंड ॥ रम्यखंड चतुर्थ ॥१७०॥

सुवर्णखंड ईलावृतखंड ॥ कौरवखंड किरळखंड ॥ आणि नवम तें केतुळाखंड ॥ असे पैं ॥७१॥

ऎसी ही नव खंडें जाणी ॥ हीच सप्तद्वीपवती मंदिनी ॥ सांगितली तुजलागुनी ॥ पार्वती वो ॥७२॥

आतां कोणे खंडी कोण अरण्य ॥ तें सांगिजेल तुतें प्रमाण ॥ त्यावरुन स्वस्थ मन ॥ करुनि साच मानीं ॥७३॥

त्या मेरुच्या विभागें ॥ अधोपारी कडा दक्षिणांगें ॥ जबुंवृक्ष जांबुरंगे ॥ मेरुपर्वतीं ॥७४॥

तो जंबुवृक्ष परियेसें ॥ अठराकोटी योजन उंच दिसे ॥ बत्तीसकोटी गांवे विस्तार असे ॥ तयाचा पैं ॥७५॥

त्या वृक्षास पार्वती ॥ हस्ती येवढी फळॆं येती ॥ तीं फळे पिकोन पडती ॥ पूर्णकाळें ॥७६॥

तीं फळें पडतांची फुटती ॥ त्या रसापासाव नदी उत्पत्ती ॥ तिचें नाम जंबुसरिता म्हणती ॥ जाण देवी ॥७७॥

ते जंबुनदीचे ओघ आले ॥ ते दक्षिणेसी उतरले ॥ म्हणून जंबुद्वीप नाम झाले ॥ या पृथ्वी विभागासी ॥७८॥

त्या जंबुद्वीपी अरण्य़ें ॥ चार असती जाणें ॥ त्यांची नामें कवण कवण ॥ तीं ऎके देवी ॥७९॥

प्रथम तें दंडकारण्य ॥ दुसरे जाण स्वकारण्य ॥ तिसरें असे नैमिपारण्य़ ॥ धर्मारण्य चतुर्थ ॥१८०॥

जंबुद्वीपीं चार अरण्ये असती ॥ ईश्वर सांगे पार्वतीप्रती ॥ आतां पुढील कथा निगुती ॥ परियेसी म्हणे शूळपाणी ॥८१॥

इति श्रीमूळस्तंभे शिवनिबंधे ईश्वरपार्वतीसंवादे चतुर्थोऽध्यायः ॥४॥

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

शुभंभवतु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP