सुश्रुत संहिता - कंठरोग

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


गळ्य़ाचे रोग -पाचरोहिणी , कंठशालूक , अधिजिव्ह , कल्प , बलास , एकवृंद , वृंद , शतन्धी , गिलायु , गलविद्रधि , गलौध , स्वरन्ध , मांसतान व विदारी असे अठरा गलरोग आहेत . (वास्तविक ते सतराच आहेत , पण येथे वृंद व एकवृंद हे दोन धरल्यामुळे अठरा झाले .)

गळ्य़ामध्ये (घशात ) वातपित्त व कफ हे प्रकुपित होऊन पृथक् पृथक किंवा एकत्र मिळून रक्त व मांस ह्यांना दूषित करून घशाचा रोग करणारे असे अंकूर उत्पन्न करितात , त्या विकाराला ‘‘रोहिणी ’’ असे म्हणतात . ही प्राणहारक आहे .

ज्या रोहिणी विकारांत जिभेच्या आसपास वेदना असतात व मांसाचे अंकूर घशात मार्ग बंद करितात , तिला वातजन्यरोहिणी म्हणतात . यामध्ये वातदोषाची सर्व लक्षणे तीव्र असतात .

ज्या रोहिणीचे अंकूर फार लवकर उत्पन्न होऊन फार लवकर पिकतात , ज्यामध्ये अतिशय दाह होतो व ज्वर फार असतो . ती रोहिणी पित्तजन्य असते .

घशाचा अवरोध करणारी व उशीरा पिकणारी , मोठ्या व कठीण अंकुराची जी रोहिणी ती कफजन्य असते .

त्रिदोषजन्य रोहिणीचा पाक (पिकणे ) फार खोलपर्यंत असतो . ही प्रतिकार करण्यास अशक्य असून हिजमध्ये तीनही दोषांची लक्षणे असतात .

रक्तदोषजन्यरोहिणी ही बारीक फोडांनी युक्त असून तिजमध्ये पित्तजन्यरोहिणीची सर्व लक्षणे असतात .

गळ्यामध्ये (घशात ) बोराच्या आठीप्रमाणे आकाराची एक गाठ उत्पन्न होते आणि तिजवर कुसळासारखे काटे असतात . ती कठीण व खरखरीत असते . ह्या कफदोषजन्यव्याधीला ‘‘कंठशालूक ’’ असे म्हणतात . ही शस्त्राने साध्य आहे .

कफरक्तदोषाने जिभेच्या मुळाच्या ठिकाणी जिभेच्या शेंड्याप्रमाणे एक प्रकारची सूज येते , ह्या विकाराला ‘‘अधिजिव्ह ’’ असे म्हणतात . हा पिकला असता असाध्य आहे .

कफदोषाने घशात लांबट व उंच अशी सूज येते . तिजमुळे अन्न जाण्याचा मार्ग बंद होतो . हा विकार सर्वथैव असाध्य आहे . ह्याला ‘‘वलय ’’ असे म्हणतात . ह्याजवर उपचार करणे सोडावे .

वात व कफ हे प्रकुपित होऊन गळ्यांत एक प्रकारची सूज उत्पन्न करितात . तिजमुळे श्वास व वेदना हे विकार असतात . हा मर्मभेदक आहे . ह्याला ‘‘बलास ’’ असे म्हणतात . हा बरा होण्यास फार कठीण आहे .

गळ्यात वाटोळी व उंच अशी एक सूज येते तिजमध्ये दाह व कंडु हे विकार असून ती न पिकणारी , मऊ व मोठी असते . ह्या कफरक्तजन्यव्याधीला ‘‘एकवृंद ’’ असे म्हणतात .

वरीलप्रमाणे वाटोळी व उंच सूज असून तिजमध्ये दाह अतिशय असतो आणि ज्वरही तीव्र असतो , त्याला ‘‘वृंद ’’ असे म्हणतात . हा रक्त व पित्तप्रकोपाने होतो . आणि वात व रक्तजन्य असेल तर त्यात टोचल्याप्रमाणे पीडा असते .

त्रिदोषामुळे वातीसारखी लांबट व घशाचा रोध करणारी अशी सूज येते आणि तिजवर मांसाचे अंकूर असतात . हिजमध्ये नाना प्रकारच्या वेदना असतात . ह्या शतघ्नीप्रमाणे (एक प्रकारचे काटेरी शस्त्र ) असणार्‍या व्याधीला ‘‘शतघ्नी ’’ असे म्हणतात .

कफरक्तदोषाने घशात आवळ्य़ाच्या बी एवढी कठीण व किंचित वेदनायुक्त अशी गाठ येते . तिजमुळे अन्न वगैरे खाल्ले असता ते घशात अडकते . ह्या विकाराला ‘‘गिलायू ’’ असे म्हणतात . हा शस्त्राने साध्य होणारा आहे .

सर्व गळा धरून जी सूज येते व तिच्यामध्ये सर्व प्रकारच्या वेदना असतात . ह्याला गलविद्रधि म्हणतात . हा त्रिदोषजन्य असतो . ह्यामध्ये त्रिदोषजन्यविद्रधीची लक्षणे असतात .

कफरक्तदोषाने अन्न व पाणी खाली न जाऊ देणारी अशी मोठी सूज येते . तिजमुळे वायूचा (श्वासाचा ) ही मार्ग बंद होतो आणि तीव्र ज्वर असतो . ह्या विकाराला ‘‘गलौध ’’ असे म्हणतात .

कफाने वायूचा मार्ग बंद केला असता श्वासोच्छ्वास करिताना फार कष्ट पडून डोळ्य़ापुढे अंधार्‍या येतात ., सारखा दमा लागतो , आवाज बसतो व घसा कोरडा होतो व त्याने गिळता येत नाही . ह्या वातजन्यविकाराला ‘‘स्वरघ्न ’’ असे म्हणतात .

गळ्य़ाला पसरणारी व अत्यंत कष्टदायक अशी सूज येते व ती क्रमाने (वाटेल तशी ) गळ्य़ाचा रोध करिते . ह्या गळ्य़ाशी लोंबण्यासारखी असणार्‍या सुजेला मांसत्तान असे म्हणतात . हा त्रिदोषजन्य असून प्राणनाशक आहे .

गळ्य़ाच्या आतील भागी दाह व टोचणी ह्यांनी युक्त अशी तांबूस व मोठी सूज येते व तिजमधून कुजट व दुर्गंधी मास येते . ह्या पित्तजन्य व्याधीला ‘‘विदारी ’’ असे म्हणतात . हा विकार मनुष्य विशेषतः ज्या कुशीवर सारखा निजतो त्या बाजूस होतो॥४६ -६३॥

सर्व मुख्यव्यापीरोग -हे वात , पित्त , कफ व रक्तदोषापासून होणारे मिळून चार होतात . (तथापि रक्तदोषाचा रक्तदोषात अंतर्भाव असल्याने ते तीनच आहेत .)

तोंड आतील बाजूने बारीक फोडांनी व्याप्त होते व त्यात टोचणी असते . ह्याला ‘‘वातजन्यसर्वसर ’’ असे म्हणतात .

तांबुस रंगाचे , पिवळट , दाहयुक्त व बारीक अशा फोडांनी तोंड आतून व्यापते त्याला ‘‘पित्तजन्यसर्वसर ’’ असे म्हणतात .

कंडुयुक्त , किंचित् , दुखणारे व त्वचेच्या वर्णाचे जे फोड तोंडात येतात त्याला ‘‘कफजन्यसर्वसर ’’ म्हणतात .

रक्तापासून होणारा सर्वसर हा वेगळा नसून पित्तजन्य व रक्तजन्य हे एकच आहेत . काही आचार्य ह्या ‘‘सर्वसर ’’ मुखरोगाला ‘‘मुखपाक ’’ असे म्हणतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP