सुश्रुत संहिता - गलगंडनिदान

सुश्रुतसंहिता केवळ शल्यकर्म अशी अनेकांची समजूत आहे , परंतु आयुर्वेदाचे तत्वज्ञान , त्याचा व्यवहारात उपयोग कसा करावा याचेही ज्ञान सुश्रुताने जगाला दिले .


आता ‘‘ग्रंथि , अपचि , अर्बुद , गलगंडनिदान ’’ नावाचा अध्याय सांगतो . जसे भगवान् धन्वंतरींनी सांगितले आहे .

वातादि तीन दोष प्रकुपित होऊन मांस व रक्त दोन्ही दूषित करून दोषानुरूप तीन वेगवेगळ्या गाठी उत्पन्न करितात . त्याचप्रमाणे कफप्रकोपाने मेद दूषित होऊन मेदोजन्य गाठ उत्पन्न होते . ही गाठीच्या रूपाची जिवाटोळी उंच व अतिशय कठीण अशी असते . म्हणून याला ग्रंथि (गाठ ) असे म्हणतात . त्रिदोषापासून दोन तीन , मेदोजन्य दोन शिरोजन्य एक असे गाठीचे पाच प्रकार आहेत .

वातजन्य गाठीत आतून ओढ लागून ताणल्याप्रमाणे वेदना होतात . अतिशय ठणका असतो . टोचणी लागते . फेकल्याप्रमाणे किंवा तोडल्याप्रमाणे पीडा होते . फुटते , तिचा रंग काळसर असून ती बस्तीच्या आकाराप्रमाणे लांबट असते आणि ती फुटली असता तिच्यामधून स्वच्छ रक्त वाहते .

पित्तापासून झालेली गाठ विस्तवासारखी धगधगीत असते . तिच्यातून धूर निघाल्याप्रमाणे वाटते . ओढल्याप्रमाणे पीडा होते . लवकर पिकते . त्याठिकाणी पेटल्याप्रमाणे दाह होतो . ह्या गाठीचा रंग तांबूस पिवळा असतो . ही फुटली असता तिजमधून अतिशय उष्ण रक्त वाहते .

कफजन्य गाठ थंड , त्वचेच्या रंगाची , फार पीडा न करणारी व अतिशय कंडुयुक्त असून ती दगडाप्रमाणे कठीण व मोठी असते . ती सावकाशपणाने वाढते आणि फुटली दाट व पांढरा असा पू तिजमधून येतो .

मेदोजन्य गाठ त्या मनुष्याचे शरीर ज्या मानाने स्थूल किंवा कृश असेल त्या मानाने मोठी किंवा लहान असते . तसेच ती स्निग्ध मोठी , किंचित वेदनायुक्त व अतिशय कंडुयुक्त असते . ही फुटली असता हिच्यामधून तिळाचा कल्क घट्ट तूप झाल्यासारखा मेद बाहेर पडतो .

अशक्त मनुष्याने अति श्रमाची कामे केल्याने कुपित झालेला वायु शिराजालांना ओढुन , दाबून , संकुचित करून व शुष्क करून वाटोळी व उंच अशी गांठ उत्पन्न करितो , त्याला शिराजन्यग्रंथी म्हणतात . ती वेदनायुक्त व हालणारा असेल तर कष्टाने साध्य होते . आणि न दुखणारी , न हालणारी मोठा व मर्मस्थानी असेल तर असाध्य म्हणून सोडावा .

हनुवटीचा सांधा , काख (काखेचा सांधा ) मानेचा किंवा गळ्याचा खालचा सांधा , कोपराचा सांधा मान व गळा ह्या ठिकाणी संचित झालेला भेद व कफ कठीण , वाटोळा किंवा लांबट , स्निग्ध व किंचित वेदनायुक्त अशी गाठ उत्पन्न करितात . ती गाठ दुसर्‍या आवळ्यातील बीप्रमाणे आकाराच्या व त्वचेच्या वर्णासारख्या गाठींनी व दुसर्‍या कित्येक माशांच्या अंड्याएवढ्या गाठीनी व्याप्त होते . तिला संचयाच्या प्रकर्षामुळे अपचि असे म्हणतात . त्या गाठींना कंडु असते . किंचित् वेदना असतात . त्या फुटतात . पाझरतात नाहीशा होतात . दुसर्‍या पुनः उत्पन्न होतात . हा व्याधि , मेद व कफदोषापासून होतो . हा वर्षानुवर्ष राहतो . हा बरा होण्यास फार कठीण आहे ॥१ -२॥

अर्बुद निदान शरीराच्या कोणत्याही भागावर वाढलेले वातादिदोष मांसाला दुषित करून वाटोळी , कठीण , किंचित् वेदनायुक्त , मोठी , मूळ फार खोल असलेली , फार उशीरा सावकाश वाढून फार दिवसांनी पिकणारी मांसयुक्त अशी सूज उत्पन्न करितात , तिला वैद्यशास्त्रवेत्ते ‘अर्बुद ’ (आवाळुं ) असे म्हणतात .

हे वातजन्य , पित्तजन्य , रक्तजन्य , मांसजन्य असे सहा प्रकारचे आहे . ह्याची लक्षणे ग्रंथीच्या लक्षणासारखीच असतात .

प्रकुपित झालेला दोष रक्त व शिरा ह्यांना संकुचित करून व दाबून किंचित् पिकणारा असा मांसपिंड वर उचलून आणतो . त्याजवर मांसाचे अंकूर असतात . हा लवकर वाढतो . ह्यातून सारखे दूषित रक्त वाहते . ह्याला रक्तजन्यअर्बुद म्हणतात . हे असाध्य आहे . ह्यातून रक्त वाहत असल्यामुळे त्या मनुष्याच्या अंगातील रक्ताचा क्षय होतो व त्यामुळे तो पांढरा फटफटीत होतो .

मुष्टीघातादिकांनी अंग चेचले असता त्या ठिकाणचे मांस दूषित होऊन वेदनारहित , स्निग्ध , त्वचेच्या वर्णाची , न पिकणारी , दगडाप्रमाणे कठीण व स्थीर अशी सूज उत्पन्न करिते . त्याला ‘‘मांसार्बुद ’’ असे म्हणतात . हे अतिशय मांस खाणार्‍या मनुष्याचे मांस दूषित झाल्यामुळे होते . हे असाध्य आहे .

साध्यअर्बुदामध्ये पुढील अर्बुदे वर्ज करावी . (असाध्य समजावी . जी ) स्रवणारी , मर्मस्थानी झालेली , स्रोतोमार्गात झालेली , अचल (न हालणारी , कठीण ) ही अर्बुदे बरी होण्यासारखी नाहीत म्हणून सोडावी .

पूर्वी झालेल्या आवाळूवर पुनः दुसरे जे आवाळु होते त्याला वैद्य ‘‘अध्यर्बुद ’’ असे म्हणतात .

जी दोन अर्बुदे एकदम किंवा एकामागून एक एक अशी जवळ जवळ उत्पन्न होतात त्यांना ‘‘द्विरर्बुद ’’ असे म्हणतात . ते असाध्य असते .

विशेषतः कफ , भेद , प्रचुर असल्याकारणाने व त्यातील दोषही स्थिर व ग्रंथीयुक्त (बद्ध ) असल्यामुळे सर्वच अर्बुदे निनर्गतःच अपक्व (न पिकणारी ) असतात ॥१३ -२१॥

वात , कफ व मेद हे गळ्य़ाच्या ठिकाणी वाढून मानेचा आश्रय करून अनुक्रमाने आपआपल्या लक्षणांनी युक्त अशी गाठ उत्पन्न करितात . तिला ‘‘गलगंड ’’ गालगुंड असे म्हणतात .

टोचणी व काळ्या शिसनीयुक्त असून काळसर व मवस असे गालगुंड वातजन्य असते . ते कालांतराने जेव्हा मेदाने युक्त होते त्यावेळी ते स्निग्ध व वेदनारहित होते . हे खरखरीत असून सावकाश वाढते व पिकत नाही . कदाचित् पिकलेच तर आपोआप पिकते . त्या मनुष्याचे तोंड बेचव असते आणि टाळ्याला व घशाला कोरड असते .

अचल , त्वचेच्या वर्णाचे , किंचित् वेदनायुक्त , अतिशय कंडुयुक्त , थंड व मोठे असे गालगुंड कपत्मक कंडुयुक्त , थंड व मोठे असे गालगुंड कपत्मक असते .

हे फार उशीराने वाढते . ह्यात किंचित् वेदना असल्यास कदाचित् ते पिकते . त्या मनुष्याचे तोंड गुळमट असते आणि घशाला व टाळ्याला चिकटा असतो .

मेदोजन्य गालगुंड स्निग्ध , मऊ , पांढुरके , दुर्गंधयुक्त , किंचित् वेदनायुक्त व अतिशय कंडुयुक्त असते . ह्याचे मूळ फार खोल नसल्यामुळे ते भोपळ्याप्रमाणे लोंबल्यासारखे दिसते . हे ज्याला झाले आहे त्याचा देह जसा स्थूल किंवा कृश असेल त्या मानाने ते लहान अगर मोठे असते . त्या मनुष्याचे तोंड स्निग्ध असते . आणि घशांतून सारखा आवाज होतो .

कष्टाने श्वासोच्छ्वास करणारा , ज्याचे सर्व शरीर मृदु झाले आहे असा , ज्याच्या गालगुंडाला एक वर्ष होऊन गेले आहे तो , ज्याच्या तोंडाला चव नाही असा , क्षीण झालेला व ज्याचा आवाज बिघडला आहे असा गालगुंडाचा रोगी असाध्य म्हणून सोडावा .

गालगुंडाचे सामान्य लक्षण -ग्रंथीसारखी व वृषणाप्रमाणे गळ्याच्या बाजूस लोंबल्यासारखी दिसणारी अशी लहान किंवा मोठी जी सूज तिला गलगंड (गालगुंड ) असे म्हणतात .

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP