अध्याय पंचवीसावा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


केवढा पुरुषार्थ करूनी ॥ राक्षसेंद्रासी गांजोनी ॥ मंडप गेला घेउनी ॥ सवेंच आणून ठेविला ॥१॥

असो राघवापुढें वाळिनंदन ॥ सांगे लंकेचें वर्तमान ॥ नानापरी बोधिला रावण ॥ परी तो नेणें दुष्टात्मा ॥२॥

गिरिमस्तकीं वर्षें जलधर ॥ परी तेथे न राहे अणुमात्र नीर ॥ तैसा बोधिला दशकंधर ॥ स्थिर नोहे बोध तेथें ॥३॥

नित्य दुग्धें न्हाणिला वायस ॥ परी तो कदा न होय राजहंस ॥ दह्यांमाजी कोळसा बहुवस ॥ घालितां उजळ नव्हेचि ॥४॥

सिकता शिजविली बहुकाळ ॥ परी ते कदा नव्हे मवाळ ॥ कीं परीस नेऊन तात्काळ ॥ खापरासी व्यर्थ लाविला ॥५॥

जन्मांधापुढें दीप जाणा ॥ कीं बधिरापुढें वाजविला रुद्रवीणा ॥ सारासार समजेना ॥ शतमुर्खा जैसा कां ॥६॥

कीं शर्करेमाजी नेऊन ॥ कडू दुधिया ठेविला बहुदिन ॥ परी त्याचें अंतर पूर्ण ॥ गोड नव्हे अणुमात्र ॥७॥

षोडशोपचारें पूजिलें प्रेत ॥ परी ते गेलें जैसे व्यर्थ ॥ तैसा बोधिला लंकानाथ ॥ परी तो नायक सर्वथा ॥८॥

जोंवरी शशी चंडकिरण ॥ तोंवरी केला राजा बिभीषण ॥ एकवचनी तूं सीतारमण ॥ तुझें वचन व्यर्थ नव्हे ॥९॥

युद्ध केलियावांचोनी ॥ कदा नेदी जनकनंदिनी ॥ राघवेंद्रें ऐसे ऐकोनी ॥ चंड दोर्दंड पीटिले ॥११०॥

जैसा रजनी अंतीं वासरमणी ॥ अकस्मात पूर्वेस देखिजे जनीं ॥ तैसी कोदंडाची गवसणी ॥ नरवीरोत्तमें काढिली ॥११॥

कीं ते मेघांतूनि वेगळी ॥ प्रळयचपळा निवडिली ॥ तैसी गवसणी काढितां प्रभा पडली ॥ कोदंडाची अकस्मात ॥१२॥

क्षण न लागतां चढविला गुण ॥ उभा ठाकला सीतारमण ॥ ओढी ओढितां आकर्ण ॥ थरथरिली सप्त द्वीपें ॥१३॥

काळाचे मनीं बैसे दचक ॥ तैसी सुग्रीवें दिधली हांक ॥ अठरा पद्में वानर देख ॥ गर्जना करीत उठले पैं ॥१४॥

बाहात्तर कोटी रीस ॥ हाकेसरिसे भरिती आकाश ॥ पृथ्वी डळमळितां नागेश ॥ ग्रीवा खालीं सरसावी ॥१५॥

दिग्गजांची बैसली टाळीं ॥ कूर्मपृष्ठी तेव्हां थरथरली ॥ यज्ञवराह पृथ्वी तळीं ॥ सांवरीत दंतानें ॥१६॥

एकदांचि कपीचे भुभुःकार ॥ ऐकतां दचकले निर्जर ॥ धुळीनें दिशा दाटल्या समग्र ॥ मेरुमांदार कांपती ॥१७॥

वीस कोटी वानर घेऊन ॥ लंकेवरी धांवला सुषेण ॥ जेवीं वारणचक्रावरी पंचानन ॥ गर्जत धांवे निःशंक ॥१८॥

सकळ पापासी रामनाम ॥ जैसें जाळूनि करी भस्म ॥ तैसा तो वानरोत्तम ॥ अंजनीतनय धांविन्नला ॥१९॥

सकळ वानरेसीं सेनापति ॥ नीळ धांविन्नला समीरगती ॥ धुळीनें लोपला गभस्ती ॥ वाटे कल्पांत मांडला ॥१२०॥

झाला एकचि हाहाःकार ॥ गजबजिलें लंकानगर ॥ वेळा सांडोनि नदेश्र्वर ॥ बुडवूं पाहे उर्वीतेंं ॥२१॥

उदकावरी तुंबिनीफळ ॥ तैसें डळमळे भूमंडळ ॥ वरी आसुडती निराळ ॥ भगणें भडभडां रिचवती ॥२२॥

मेरूऐसे लंकेचे हुडे ॥ वरी रचिले शस्त्रांचे जुंबाडे ॥ प्रळयविजूचेनि पाडें ॥ नग्न शस्त्रें झळकती ॥२३॥

लंकादुर्गावरी सत्वर ॥ बळें चढती प्रतापशूर ॥ केशीं धरूनि रजनीचर ॥ आसुडोनि खालीं पाडिती ॥२४॥

उल्हाटयंत्रांचे भडिमार ॥ कोट्यनकोटी करिती असुर ॥ भिंडिमाळा शस्त्रें अपार ॥ राक्षस वरून भिरकाविती ॥२५॥

कोट्यनकोटी पर्वत थोर ॥ एकदांच झोंकिती वानर ॥ वरिले यंत्रे होती चूर ॥ रजनीचरांसहित पैं ॥२६॥

दुर्गावरूनि राक्षस पाहीं ॥ वानर झोडिती शस्त्रघाईं ॥ दुर्गपरिघ ते समयीं ॥ राक्षसप्रेतांनी बुजियेले ॥२७॥

पुच्छ दोराकार टाकोनी ॥ असुरांचे ग्रीवेस गोवुनी ॥ एकदांच पाडिती आसुडोनि ॥ खंदकामाजी प्रेतवत ॥२८॥

एक अकस्मात् वानर उडोनी ॥ राक्षसांस पायीं धरूनी ॥ गरागरां भिरकाविती गगनीं ॥ आपटोनि धरणी मारिती ॥२९॥

एक राक्षसांचीं पोटें फोडिती ॥ एक चरणकरनासिकें तोडिती ॥ एक प्रेत उचलोनि मागुती ॥ भिरकाविती लंकेत ॥१३०॥

आटले बहुत रजनीचर ॥ गोपुरावरूनि दशकंधर ॥ विलोकित दिशा अंबर ॥ तो वानरमय दिसतसे ॥३१॥

स्वसैन्यासी दशकंधर ॥ म्हणे काय पाहतां निघा बाहेर ॥ आटोनि समस्त वानर ॥ माजवा समरभूमि वेगें ॥३२॥

चतुरंग दळसागर ॥ निघे लंकेतून बाहेर ॥ कोट्यनकोटी असुर ॥ पाईंचे पुढे तळपती ॥३३॥

पर्वतासमान रजनीचर ॥ विक्राळ तोडें भाळी शेंदुर ॥ बाबरझोटी दाढी शुभ्र ॥ जिव्हा आरक्त लळलळित ॥३४॥

खदिरांगार लखलखित ॥ तैसे नेत्र त्यांचे आरक्त ॥ मद्यपानें झाले मस्त ॥ शस्त्रें घेऊन तुळती ॥३५॥

सुरांची शिरे रेखूनी ॥ ब्रीदे बांधिली चरणीं ॥ यमदंष्ट्रा झळकती जधनीं ॥ आवेशेंकरून गर्जती ॥३६॥

वोडण असिलता शक्ति ॥ शूळ तोमर घेऊनि हातीं ॥ गदा परिघ चक्रें झळकती ॥ दंडीं पिंजारिती चामरें ॥३७॥

वानरांचे करून पुतळे ॥ रुळत चरणीं घातले ॥ हांका देती परम बळें ॥ एकदांचि सर्वही ॥३८॥

दणाणत उर्वीमंडळ ॥ म्हणती देवांनो धांवा सकळ ॥ तुमच्या रामासहित दळ ॥ रणांगणीं ग्रासिलें ॥३९॥

तयांपाठीं अश्र्वभार ॥ नानाजातीचें मनोहर ॥ वरी बैसले राऊत असुर ॥ असिलता घेऊनियां ॥१४०॥

तयांपाठी गजभार ॥ ऐरावती समान थोर ॥ वरी शूळ घेऊनि बैसले असुर ॥ ध्वजीं अंबर भेदिती ॥४१॥

तयां पाठीसी चालिले रथ ॥ रत्नजडित चाकें झळकत ॥ तुरंग जुंपिले चपळ बहुत ॥ गगनचुंबित ध्वज बहु ॥४२॥

संग्राम संकेत भेरी ॥ असुरीं ठोकिल्या ते अवसरीं ॥ रणातुरें आणि मोहरी ॥ तेथें धडकती विशाळ ॥४३॥

वैरियांचीं आणि स्वदळें ॥ एकवटलीं दोन्ही दळें ॥ एकचि घनचक्र मांडिलें ॥ नादें कोंदलें अंबर ॥४४॥

जय यशस्वी अयोध्यानृपवर ॥ म्हणोनि धांवती वानरवीर ॥ वृक्षाघायें रजनीचर ॥ झोडोनि समरीं पाडिती ॥४५॥

कृतावंत धांवती वानर ॥ टाकिती पर्वत पाषाण अपार ॥ असुरांचे अस्थिपंजर ॥ चूर होती लागतां ॥४६॥

उठावले राक्षस बळें ॥ तोडिती कपींचीं शिरकमळें ॥ कीं उसळती नारिळें ॥ कोट्यनकोटी आकाशीं ॥४७॥

जैसीं इक्षुदंडांचीं खंडें ॥ तैसीं करचरणांचीं दुखंडें ॥ एकदांच पडती प्रचंडें ॥ असुरहस्तें करूनियां ॥४८॥

खेटकाआड असुर दडती ॥ कुंतशक्तीनें बळें खोंचिती ॥ वानरां विदारून पाडिती ॥ ठायीं ठायीं असंख्य ॥४९॥

अकस्मात कपि धांवती ॥ काळिजे राक्षसांचीं काढिती ॥ प्रेते तेथें पडलीं किती ॥ नव्हे गणती कोणातें ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : June 06, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP