अध्याय सदतीसावा - श्लोक १५१ ते २१३

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


वाल्मीक म्हणे हे दोघेजण ॥ अनिवार जाहले पूर्ण ॥ बह्महत्त्या करून ॥ कैसे आलां वनांतरी ॥५१॥

बंधूचें उत्तरकार्य सकळिक ॥ विधियुक्त करोनि वाल्मीक ॥ जानकीजवळ तात्काळिक ॥ वर्तमान सांगितलें ॥५२॥

तंव बोले जानकी हांसोन ॥ ताता सूर्यवंश अतितीक्ष्ण ॥ त्यावरी सकळकळाप्रवीण ॥ तुम्हींच केलीं बाळके ॥५३॥

परम धीट अनिवार ॥ तुमचा तुम्हां फळला मंत्र ॥ आतां याच्या दोषास परिहार ॥ करावा जी समर्था ॥५४॥

तों वाल्मीक बोलें वचन ॥ सुवर्णकमळें सहस्र आणून ॥ भावें अर्चावा उमारमण ॥ तरीच जाईल ब्रह्महत्त्या ॥५५॥

तंव ते दोघे तये वेळे ॥ ताता कोठें तीं सुवर्णकमळें ॥ तीं सांगिजे येचि वेळे ॥ घेऊन येतों दोघेही ॥५६॥

मग बोले मुनीश्वर ॥ अयोध्येसमीप ब्रह्मसरोवर ॥ तेथें कमळें अपार ॥ परी रक्षिती वीर रामाचे ॥५७॥

ती ब्रह्मकमळें नेऊन ॥ राघव करितो शिवार्चन ॥ महाबळी रक्षिती पूर्ण ॥ रात्रंदिवस सभोंवते ॥५८॥

गदागदां हांसती दोघेजण ॥ कमळें आणूं न लागता क्षण ॥ तरीच तुमचे शिष्य जाण ॥ निश्चयेसीं मुनिराया ॥५९॥

तेथें कृतांत असेल रक्षण ॥ त्यासीही शिक्षा लावूं पूर्ण ॥ जरी स्वयें आला रघुनंदन ॥ त्यासही धरून आणूं येथें ॥१६०॥

धनुष्यासी लावूनि बाण ॥ चपळ चालिले दोघेजण ॥ जैसें सिंह दिसती लहान ॥ परी प्रताप अतिविशेष ॥६१॥

कीं शशी सूर्य लघु दिसती ॥ परी प्रकाशें उजळे क्षिती ॥ लहान दिसे विप्र अगस्ति ॥ परी सरितापति प्राशिला ॥६२॥

तैसे ते धाकुटे वीर ॥ वेगें पावले ब्रह्मसरोवर ॥ कुश प्रवेशोनि समग्र ॥ कमळें तेव्हां तोडीतसे ॥६३॥

तंव ते वीर खवळले ॥ लहूनें तेव्हां शर सोडिले ॥ रक्षक बहुत प्रेत केले ॥ उरले पळाले अयोध्येसी ॥६४॥

रामासी सांगती वर्तमान ॥ ऋषिबाळ आले दोघेजण ॥ ते सबळ युद्ध करूनि जाण ॥ कमळें घेऊन गेलें पैं ॥६५॥

आश्चर्य करी रघुपती ॥ पाहा केवढी बाळांची शक्ती ॥ असो इकडे दोघे निघती ॥ कमळें घेऊनि त्वरेनें ॥६६॥

वाल्मीकापुढें कमळें ठेविती ॥ ऋषि आश्चर्य करी चित्तीं ॥ तटस्थ पाहे सीता सती ॥ अद्भुत कर्तव्य बाळकांचे ॥६७॥

मग नूतन शिवलिंग निर्मून ॥ सहस्रकमळीं केले पूजन ॥ ब्रह्महत्त्येचे पाप पूर्ण ॥ निरसोन गेले तेधवां ॥६८॥

एके दिवशी दोघे जण ॥ चुरीत जो जानकीचे चरण ॥ तंव तो कुश काय वचन ॥ बोलता जाहला ते काळीं ॥६९॥

आम्ही जन्मलों कोणें देशीं ॥ कोण ग्राम कोणे वंशीं ॥ आमुचा पिता निश्चयेसीं ॥ सांगे कोण तो आमुतें ॥१७०॥

सीता म्हणे अयोध्यानगर ॥ सूर्यवंशी अजराजपुत्र ॥ दशरथनामें नृपवर ॥ प्रचंड प्रताप तयाचा ॥७१॥

त्यासी राम लक्ष्मण भरत ॥ चौथा शत्रुघ्न विख्यात ॥ त्यांत रावणांतक प्रतापवंत ॥ तो तुमचा पिता जाणिजे ॥७२॥

रजकें निंदिलें म्हणोनी ॥ बा रे मज सोडिलें घोरवनीं ॥ तेव्हां जगन्मातेचें नयनीं ॥ अश्रु आले बोलतां ॥७३॥

वर्तमान ऐकोनि समस्त ॥ दोघेही परम तप्त ॥ मग सीतेचे समाधान बहुत ॥ करिते जाहले ते काळीं ॥७४॥

तों द्वादशवर्षेपर्यंत ॥ अवर्षण पडिलें अयोध्येंत ॥ सीता सती क्षोभली अद्भुत ॥ श्री समस्त गेली पैं ॥७५॥

जैसें उद्वस कां दग्ध कांतार ॥ तैसें कलाहीन अयोध्यानगर ॥ घन न वर्षेच अणुमात्र ॥ गाई विप्र गांजले ॥७६॥

वसिष्ठास पुसे रघुनंदन ॥ कां हो पडिले अवर्षण ॥ येरू म्हणे अपराधाविण ॥ सीता बाहेर घातली ॥७७॥

जानकीऐसें चिद्ररत्न ॥ सकळ प्रतिव्रतांचें मंडण ॥ लक्ष्मी गेली निघोन ॥ तरीच अवर्षण पडियेलें ॥७८॥

तरी अश्वमेघ महायज्ञ ॥ राघवा करावा संपूर्ण ॥ घोडा पाहून श्यामकर्ण ॥ पृथ्वीवरी सोडावा ॥७९॥

मग शरयूतीरीं एक योजन ॥ मंडप घातला विस्तीर्ण ॥ दूत पाठवून संपूर्ण ॥ मुनीश्वर मेळविले ॥१८०॥

बिभीषणा आणि सुग्रीवास ॥ बोलावूं पाठवी राघवेश ॥ ते दळासहित अयोध्येस ॥ येते जाहले ते काळीं ॥८१॥

नळ नीळ अंगद जांबुवंत ॥ शरभ गवाक्ष बळ अद्भुत ॥ वानर पातले समस्त ॥ अष्टादश पद्में पैं ॥८२॥

सर्व सामग्री केली पूर्ण ॥ मग वसिष्ठ रघुनंदन ॥ अश्वशाळेंतूनि श्यामकर्ण ॥ निवडिती पूर्ण सुलक्षणी ॥८३॥

सुवर्णपत्रिका ते वेळी ॥ बांधिली श्यामकर्णाचे भाळीं ॥ वसिष्ठें त्यावरी लिहिल्या ओळी ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥८४॥

अयोध्याप्रभु दशरथनंदन ॥ रावणांतक सुरबंधमोचन ॥ सकळनृपश्रेष्ठ रविकुळामंडन ॥ श्यामकर्ण सोडिला तेणें ॥८५॥

जो कोणी असेल बळवंत ॥ तेणें हा घोडा धरावा यथार्थ ॥ षोडशपद्में दळांसहित ॥ शत्रुघ्न राखित पाठीसीं ॥८६॥

घोडा पूजोनि राजीवनेत्र ॥ मस्तकीं बांधिलें दिव्य पत्र ॥ शत्रुघ्न करून नमस्कार ॥ दळभारेंसीं निघाला ॥८७॥

शत्रुघ्नासी म्हणे रघुनंदन ॥ सोळावे दिवशीं यावें परतोन ॥ सकळ पृथ्वी जिंकून ॥ नृप सांगातीं आणिजे ॥८८॥

मग सुवर्णप्रतिमा सुंदर ॥ जानकीची निर्मिली परिकर ॥ मग ते प्रतिमेसहित रघुवीर ॥ यज्ञदीक्षा घेत पैं ॥८९॥

जैसा किरणचक्रांत दिवाकर ॥ कीं निर्जरांत अमरेश्वर ॥ तैसा यज्ञमंडपीं रघुवीर ॥ ऋषींसहित शोभला ॥१९०॥

सुग्रीव बिभीषण मारुती ॥ यज्ञमंडपाभोंवते रक्षिती ॥ सुमंत भरत ऊर्मिलापती ॥ सदा तिष्ठत राघवापाशीं ॥९१॥

जे जे साम्रगी लागेल पूर्ण ॥ ते ते तत्काळ देती आणून ॥ तो सोहळा देवगण ॥ विमानी बैसोन पाहाती ॥९२॥

इकडे छप्पन्न देश जिंकित पूर्ण ॥ जात महावीर शत्रुघ्न ॥ सकळ राजे येती शरण ॥ करभार देऊनि सांगातें ॥९३॥

तेच काळीं पाताळी वरुण ॥ आरंभिता जाहला महायज्ञ ॥ तेणें वाल्मीक बोलावून ॥ नेला होता आधींच ॥९४॥

पाताळास गेला जेव्हां ऋृषी ॥ तेणें आज्ञा केली लहूसी ॥ बा रे माझिया उपवनासी ॥ रक्षावें तुवां निरंतर ॥९५॥

ऐसें बोलूनि पाताळा ॥ वाल्मीक गेले तये वेळां ॥ कुशही दूर वना प्रवेशला ॥ कंद मुळें आणावया ॥९६॥

लहू उपवन रक्षित ॥ सवें बटु बाळें बहुत ॥ नानाक्रीडा विनोद करित ॥ वृक्षछायेस बैसली ॥९७॥

अष्टवर्षीं दशवर्षीं कुमर ॥ कटी मौंजी कौपीन सुंदर ॥ मस्तकीं शिखा परिकर ॥ खेळतां उडती तयांच्या ॥९८॥

तो श्यामकर्ण धांवत । आता त्याचा पंथें अकस्मात ॥ ऋषिपुत्रास लहू दावित ॥ पाहा रे येथें घोडा कैसा हा ॥९९॥

मग सीतेसुतें धांवून ॥शेंडीसी धरिला श्यामकर्ण ॥ कपाळींचें पत्र तोडून ॥ वाचिता जाहला तात्काळीं ॥२००॥

पत्रार्थ पाहूनि समस्त ॥ लहू गदगदां हांसत ॥ बळिया काय रघुनाथ ॥ त्रिभुवनीं थोर जाहला ॥१॥

काय त्यासीच व्याली जननी ॥ काय निर्वीर जाहली अवनी ॥ तरी कैसा घोडा सोडोनी ॥ नेईल आतां पाहूं पां ॥२॥

माझी प्रतिज्ञा हेच आतां ॥ धरिला घोडा न सोडीं मागुता ॥ नातरी सीतेउदरीं तत्वतां ॥ जंत होऊनि जन्मलों ॥३॥

अश्वोत्तमाचे नेत्र पुसोन ॥ कौतुकेंकरून थापटी मान ॥ उत्तरीय चीर गळां घालून ॥ बांधोन ठेविला केळीसी ॥४॥

ऋषिपुत्रांस तेव्हा म्हणत ॥ पाहा रे घोडा कैसा नाचत ॥ तों ऋषिबाळें समस्त ॥ पोट बडविती भयेंकरूनी ॥५॥

कोण्या राजाचा घोडा आला ॥ तो तुवां बळेंचि धरिला ॥ तरी आम्ही सांगूं तयाला ॥ लहूनें बांधिला म्हणोनी ॥६॥

लहू तयांप्रति बोलत ॥ आमुचीच निश्चयें हे वस्त ॥ आपुली आपण घेतां यत्य ॥ शंका येथें कायसी ॥७॥

काळासी शिक्षा करूनियां ॥ लया पाववीन सर्व क्षत्रियां ॥ तों वीर आले धांवूनियां ॥ अश्वरक्षक पुढील जे ॥८॥

विप्रकुमर देखोन ॥ वीर पुसती दटावून ॥ कोणी रे हा श्यामकर्ण ॥ कर्दळीसीं बांधिला ॥९॥

लेकुरें बोलती भिऊन ॥ पैल किशोर आरक्तनयन ॥ आम्ही वारितांही ठेवीत बांधून ॥ त्याचेच कान कापा हो ॥२१०॥

रामविजय ग्रंथ पावन ॥ त्यामाजी लहूकुशआख्यान ॥ कथा गोड अमृताहून ॥ भक्तचतुरीं परिसावी ॥११॥

ब्रह्मानंद श्रीधरवर ॥ जानकीहृदयकमलभ्रमर ॥ अगाध तयाचें चरित्र ॥ सविस्तर संख्या शतकोटी ॥१२॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तत्रिंशत्तमोध्याय गोड हा ॥२१३॥

अध्याय ॥३७॥ ओंव्या ॥२१३॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 04, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP