अध्याय तेहतीसावा - श्लोक १५१ ते २००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


तो श्रीराम परब्रह्म चित्स्वरूप ॥ त्याचिया अवताराचें केले रूप ॥ आपुला वाढविला प्रताप ॥ चंद्रार्कवरी रावणें ॥५१॥

श्रीराम म्हणे बिभीषणाप्रती ॥ तूं केवळ विवेकमूर्ती ॥ नाशिवंताचा शोक चित्तीं ॥ कायनिमित्त धरियेला ॥५२॥

हा जगडंबर पसारा केवळ ॥ मायिक जैसें मृगजळ ॥ कीं वंध्यावल्लीचें फळ ॥ मुळापासूनि लटिकेचि ॥५३॥

पिंड ब्रह्मांड नाशिवंत ॥ आकार तेथें विकार सत्य ॥ तरी मुळींच जें अशाश्वत ॥ त्याचा शोक कासया ॥५४॥

ऐसें बोलत रघुनंदन ॥ उगाच राहे बिभीषण ॥ तों सकळ स्त्रियांसहित धांवोन ॥ मंदोदरीही तेथें आली ॥५५॥

कवळूनियां पतीचे प्रेत ॥ मंदोदरी शोक करित ॥ ऐशीं सहस्र स्त्रिया आल्या पिटीत ॥ वक्षःस्थळ धबधबां ॥५६॥

मंदोदरी म्हणे प्राणनाथा ॥ तुजविण आम्ही सर्व अनाथा ॥ जयलक्ष्मी देऊन रघुनाथा ॥ राम जामात पैं केला ॥५७॥

लंकागजमस्तकीं अद्भुत ॥ केसरी चढला हा रघुनाथ ॥ काढोनियां दिव्य मुक्त ॥ रणमंडळीं टाकिलें ॥५८॥

सौभाग्यतारूं लंकानाथ ॥ आजि बुडालें अकस्मात ॥ कीं वेदांचें सांठवण समस्त ॥ फुटलें आजि रणांगणी ॥५९॥

सीतेच्या मिषेंकरून ॥ जवळी आणिला रघुनंदन ॥ बाहेर विरोध अंतरीं भजन ॥ दशकंधरें पै केलें ॥१६०॥

फणसासी कांटे दिसती वरी ॥ परी अत्यंत गोड अंतरीं ॥ तैसीच रावणें केली परी ॥ विरोध बाहेर दावूनियां ॥६१॥

ऐसी मंदोदरी शोक करित ॥ भोंवते विलोकिती समस्त ॥ मग बिभीषणासी रघुनाथ ॥ काय बोलता जाहला ॥६२॥

ज्येष्ठबंधूची राणी ॥ मंदोदरी हे ज्ञानखाणी ॥ पतिव्रतांमाजी शिरोमणी ॥ इचें स्मरणीं दोष नुरे ॥६३॥

इचें प्रातःकाळीं करितां स्मरण ॥ उद्धरतील पापीजन ॥ बिभीषण तूं करी धरून ॥ निजमंदिराप्रति धाडीं ॥६४॥

ऐसें बोलता रघुनंदन ॥ मयजेपासीं आला बिभीषण ॥ तियेतें स्वकरी धरून ॥ म्हणे माये चाल सदनाप्रति ॥६५॥

मयजेस म्हणे चापपाणी ॥ माये तूं ज्ञानविचारखाणी ॥। मुळीं दृष्टी घालोनी ॥ अद्वरज्ञानें पाहें पां ॥६६॥

अहंकार तितुका नाशिवंत ॥ आत्मस्वरूप पूर्ण शाश्वत ॥ ऐसें जाणोन किमर्थ ॥ शोक व्यर्थ करावा ॥६७॥

ऐसें बोलतां सच्चिदानंद ॥ मयकन्या उगीच स्तब्ध ॥ नमोनि रामचरणारविंद ॥ निजधामा चालिली ॥६८॥

मयकन्येसह सर्व अंगना ॥ बिभीषणें पाठविल्या सदना ॥ मग पुसोनि रघुनंदना ॥ राजदेह उचलिला ॥६९॥

सर्वांत सरिता पावन ॥ सिंधुसंगमी प्रेत नेऊन ॥ प्रळयवन्हि चेतवून ॥ आंत घातलें कलेवरा ॥१७०॥

तेथेंच उत्तरक्रिया समस्त ॥ स्वयें ब्रह्मदेव सांगत ॥ तैसी बिभीषण करित ॥ शास्त्ररीतींप्रमाणें ॥७१॥

असो त्यावरी बिभीषण ॥ सुवेळेसी आला परतोन ॥ तों लंकेचे प्रजाजन ॥ बिभीषणासी भेटों आले ॥७२॥

विद्युज्जिव्ह प्रधान ॥ उरलें सकळ राक्षससैन्य ॥ श्रीरामापुढें येऊन ॥ लोटांगण घालिती ॥७३॥

काष्ठ भस्म होतां समग्र ॥ विझोनि जाय वैश्वानर ॥ तैसें समस्त विरालें वैर ॥ रावण रणीं पडतांचि ॥७४॥

सूर्योदयी निरसे तम ॥ ज्ञानोदयीं निरसे अज्ञान ॥ तैसा पडतांचि रावण ॥ अणुमात्र वैर नसे ॥७५॥

सुवेळेसी आले रजनीचर ॥ म्हणती आम्ही बिभीषणाचे आज्ञाधार ॥ लंकेत जाऊन वानर ॥ पाहती नगर चहूंकडे ॥७६॥

असो यावरी बिभीषण ॥ श्रीरामापुढें कर जोडून ॥ मृदु मंजुळ वचन ॥ प्रेमयुक्त बोलतसे ॥७७॥

म्हणे राजीवदलनयना ॥ पुराणपुरुषा सीतारमणा ॥ ब्रह्मांडनायका गुणसंपन्ना ॥ लंकेसी आतां चलावें ॥७८॥

विरिंचहिस्तनिर्मित नगर ॥ आपण दृष्टीं पहावे समग्र । मग घेऊनि सीता सुंदर ॥ अयोध्येसी जाइंजे ॥७९॥

ऐसें बिभीषण बोले वचन ॥ तो जगद्रुरु सुहास्यवदन ॥ म्हणे तुज लंका दिधली दान ॥ तेथें आगमन आमुचें नव्हे ॥१८०॥

जैसें केलिया कन्यादान ॥ तियेचे गृही न घेती अन्न ॥ विप्रासी दिधले दिव्य सदन ॥ तेथें आपण न जावें ॥८१॥

सत्पात्रीं दिधलें गोदान ॥ मग तिचें दुग्ध घ्यावें काढून ॥ तैसे लंकेत माझे आगमन सर्वथाही न घडेचि ॥८२॥

त्यावरी भरतभेटीविण ॥ मी न करींच मंगलस्नान ॥ नानाभोग तांबूल भोजन ॥ व्रत संपूर्ण धरिलें असे ॥८३॥

मग सौमित्र आणि मित्रपुत्र ॥ तयांस म्हणे शतपत्रनेत्र ॥ तुम्ही वानर घेऊन सर्वत्र ॥ लंकेप्रति जाइंजे ॥८४॥

सुमुहूर्त पाहूनि सत्वर ॥ धरावें बिभीषणावरी छत्र ॥ बंदीचे राजे देव समग्र ॥ मान देऊनि मुक्त करावे ॥८५॥

बहुतांचिया वस्तू हरूनी ॥ रावणें ठेविल्या लंकाभुवनीं ॥ ज्यांच्या वस्तू त्यांलागूनि ॥ देऊनि सर्वां सुखी करा ॥८६॥

ऐशी आज्ञा होतां सत्वर ॥ चालिले सुग्रीव सौमित्र ॥ बिभीषण नमस्कार ॥ घाली साष्टांग रामातें ॥८७॥

श्रीराम बोले आशीर्वचन ॥ जैसा बळी ध्रुव उपमन्य ॥ त्यांचे पंक्तींत तूं बिभीषण ॥ चिरंजीव राहें सुखीं ॥८८॥

आज्ञा घेऊन ते अवसरी ॥ प्रवेशले लंकेभीतरी ॥ मुहूर्त पाहून झडकरी ॥ सर्व सामग्री सिद्ध केली ॥८९॥

वेदघोषेंमंत्रेंकरून ॥ सिंहासनी बैसविला बिभीषण ॥ दिव्य छत्रें वरी धरून ॥ सोहळा बहुत केला हो ॥१९०॥

बहुत -वस्त्रें भूषणे देऊन ॥ गौरविले सुग्रीव लक्ष्मण ॥ यावरी सकळ वानरसैन्य ॥ वस्त्राभरणीं गौरविले ॥९१॥

मग लंकेची समस्त रचना ॥ दाविली सुग्रीवलक्ष्मणां ॥ पाहतां धणी न पुरे नयनां ॥ आनंद मना जाहला ॥९२॥

असो आज्ञा मागोनि बिभीषणासी ॥ परतोन आले सुवेळेसी ॥ जाहलें वर्तमान रामासीं ॥ संागते जाहले तेधवां ॥९३॥

तों इंद्र आणि ब्रह्मा रुद्र ॥ तेतीस कोटी देव समग्र ॥ दृष्टीं पाहावया रघुवीर ॥ सुवेळाचळीं उतरले ॥९४॥

अष्ट वसु एकादश रुद्र ॥ मरुद्रणादि द्वादश ॥ गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ सिद्ध -चारण उतरले ॥१५॥

अष्ट नायिका अष्ट दिक्पाळ ॥ आठ्यायशीं सहस्र ऋषिमंडळ ॥ छप्पन्न देशीचें भूपाळ ॥ रामदर्शना धांवन्निले ॥९६॥

सप्तद्वीप नवखंडीचें जन ॥ पाताळवासी काद्रवेयगण ॥ उपदेव कर्मदेव संपूर्ण ॥ सुवेळेसी पातले ॥९७॥

असंख्य वाद्यांचा गजर ॥ दिशा दणाणिती समग्र ॥ असो सुवेळेसी सुरेश्वर ॥ चहूंकडून मिळाले ॥९८॥

देवभारीं मुख्य तिघेजण ॥ ब्रह्मा इंद्र आणि ईशान ॥ परी कोणी कैसा रघुनंदन ॥ देखिला तें सांगतों ॥९९॥

दृष्टीं देखतां रघुवीर ॥ मनांत भावी अपर्णावर ॥ माझे हृदयीं तो सीतावर ॥ नामें शीतळ जाहलों मी ॥२००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP