अध्याय तेहतीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


पाषाणघायेंकरून ॥ जरी दुःख पावे प्रभंजन ॥ गरुड सर्पासी येईल शरण ॥ पतंग अग्नीस गिळील जरी ॥५१॥

हेंही एक वेळ घडे ॥ परी तुज जानकी दृष्टी न पडे ॥ रावण बोलतां गडाडे ॥ मेघ जैसा आकाशीं ॥५२॥

रघूत्तम म्हणे दशकंठा ॥ तुज मृत्युसमयीं फुटला फांटा ॥ माझे बाणांचा प्रताप मोठा ॥ साहें आजि समरांगणी ॥५३॥

रामें चाप टणत्कारून प्रचंड ॥ शर सोडी जैसा काळदंड ॥ दोघे वीर परम प्रचंड ॥ रण वितंड माजविलें ॥५४॥

मांडिलें एकचि घनचक्र ॥ रणतुरें वाजती अपार ॥ सीताजननी थरथर ॥ कंपित होय क्षणाक्षणां ॥५५॥

अलातचक्रें जेवी फिरती ॥ तेवीं उभयचापें झळकती ॥ चपळेऐशा तळपती ॥ मुद्रिका हातीं दोघांचे ॥५६॥

भुजंगअस्त्राचा प्रयोग ॥ रावण करी तेव्हां सवेग ॥ दशदिशा फुटोनि पन्नग ॥ कपिकटकावरी येती ॥५७॥

जैसें निबिड जलदजाल ॥ तैसा सर्पीं व्यापिलें सकळ ॥ ऐसें देखोनि तमालनीळ ॥ गरुडास्त्र बाण योजिला ॥५८॥

सोडितां सुपर्णास्त्र बाण ॥ पृथ्वी आणि आकाश फोडून ॥ असंख्य धांवती विनतानंदन ॥ सर्प संपूर्ण भक्षिले ॥५९॥

सर्प संहारून मस्तक ॥ गरुड सवेंचि जाहले गुप्त ॥ जातवेदास्त्र दैदीप्य ॥ विंशतिनेत्रें सोडिले ॥६०॥

पाखंड उच्छेदी पंडित ॥ तेवीं जलदास्त्र प्रेरी रघुनाथ ॥ रावणें वातास्त्र अद्भुत ॥ तयापरी प्रेरिलें ॥६१॥

रामें आड घालून पर्वत ॥ प्रभंजन कोंडिला समस्त ॥ वज्रास्त्र प्रेरी लंकानाथ ॥ फोडिले पर्वत तात्काळीं ॥६२॥

मग असंभाव्य शस्त्रजाळ ॥ रावणें प्रेरिलें तत्काळ ॥ एकचि बाण अयोध्यापाळ ॥ छेदोनियां टाकीतसे ॥६३॥

रावणें योजिला एक शर ॥ दिनकरमुख तेज अपार ॥ तो चापीं योजोनि सत्वर ॥ राघवावरी सोडिला ॥६४॥

रघुत्तमें केलें संधान ॥ परी तो अनिवार शर पूर्ण ॥ श्रीरामचरणांतें लागला येऊन ॥ भेदून गेला पलीकडे ॥६५॥

राघवचरण सुकुमार ॥ वामपाद फोडूनि गेला शर ॥ ऐसें देखोनि वानर वीर ॥ उठिले सर्व एकदांचि ॥६६॥

रणीं पडली होती शस्त्रें ॥ ती वानरी घेतलीं अपारें ॥ मारीत उठिले एकसरें ॥ अनिवार काळासी जे ॥६७॥

परमार्थबळेंकरूनि सबळ ॥ ज्ञानी विध्वंसिती प्रपंचदळ ॥ तैसे रामउपासक निर्मळ ॥ असुर सकळ रगडिती ॥६८॥

अभिमानाचे मुकुट थोर ॥ परमार्थबाणें केले चूर ॥ त्रयावस्थांची कवचें अपार ॥ सूर्यखङ्गे तोडिली ॥६९॥

समवृत्तीचीं शस्त्रें घेऊन ॥ द्वेषधनुष्यें छेदिलीं पूर्ण ॥ नैराश्यचक्रेंकरून ॥ लोभभाते उडविले ॥७०॥

स्वरूप साक्षात्कारबाणीं ॥ सिद्ध पातकां सांडी खंडूनी ॥ बोधफरशेंकरूनी ॥ मोहध्वज छेदिले ॥७१॥

अनुसंधानपरिघ घेऊन ॥ अविद्यारथ केला चूर्ण ॥ द्वैत रथांग छेदून ॥ अभेदपट्टिश टाकिलें ॥७२॥

निवृत्तिअसस्त्रें घालून ॥ प्रवृत्तिशस्त्रें केलीं चूर्ण ॥ विरक्तिगदा घेऊन ॥ कामकुंजर विदारिले ॥७३॥

क्रोध मद मत्सर अहंकार ॥ हे पुढें होते पायभार ॥ शम दम अस्त्रें अनिवार ॥ त्यांनीं चूर्ण केले ते ॥७४॥

संकल्प द्वेष कुटिल ॥ हे असुरांचे तुरंग सबळ ॥ हे समाधानशक्तीनें सबळ ॥ विदारून पाडिले ॥७५॥

आशा मनशा कामना पूर्ण ॥ ह्या भिंडिमाळा येती दारुण ॥ मनोजयाचें पुढें वोडण ॥ रामभक्त करिती हो ॥७६॥

आतां असो पाल्हाळ ॥ वानरीं रगडिलें असुरदळ ॥ रावण घाली बाणजाळ ॥ मायापडळ जयापरी ॥७७॥

रथारूढ लंकानाथ ॥ जैसा नगरमस्तकीं बलाहक ॥ पृथ्वीवरी अयोध्यापालक ॥ ठाण मांडून उभा असे ॥७८॥

वाचस्तीसी म्हणे इंद्र ॥ राजाधिराज श्रीरामचंद्र ॥ त्रिभुवनेश्वर गुणसमुद्र ॥ उदार धीर गुणाब्धि ॥७९॥

सीतेचें करूनि निमित्त ॥ आम्हां करावया बंधनमुक्त ॥ युद्ध करीत रघुनाथ ॥ धाडावा रथ ये समयीं ॥८०॥

मातली सारथि चतुर जाण ॥ तयासी सांगे सहस्रनयन ॥ शस्त्रास्त्रीं भरून स्यंदन ॥ अश्वरत्नें दिव्य जीं ॥८१॥

माझा रथ तेजागळा ॥ सत्वर नेईं सुवेळाचळा ॥ मातली आज्ञा वंदोनि ते वेळां ॥ निघाला परम वेगेंसी ॥८२॥

त्रुटीं न वाजतां तत्काळीं ॥ रथ आणी रामाजवळी ॥ खालीं उतरून ते काळीं ॥ वंदी मातली रामातें ॥८३॥

म्हणे राजीवाक्षा तमालनीला ॥ रहस्राक्षें रथ्ज्ञ पाठविला ॥ यावरुतें आरूढोनियां येवेळां ॥ मग युद्धासी प्रवर्तावें ॥८४॥

माझें नाम मातलीं ॥ रथ फिरवीन रणमंडळी ॥ ऐसें ऐकतां ते वेळीं ॥ जगदात्मा संतोषला ॥८५॥

म्हणे धन्य धन्य शचीनाथ ॥ समय पाहून केलें उचित ॥ जैसा क्षुधित देखोनि अत्यंत ॥ भोजन त्यासी देइंजे ॥८६॥

कं तृषितासी जीवन शीतळ ॥ कीं रोगियासी रसराज निर्मळ ॥ कीं मरतयासी तत्काळ ॥ सुधारस पाठविला ॥८७॥

दुर्बळासी दीजे धन ॥ कीं रणीं पाठिराखा ये धांवोन ॥ तैसा पुरंदरें स्यंदन ॥ समयोचित पाठविला ॥८८॥

मग प्रदक्षिणा करून ॥ रथीं चढला रघुनंदन ॥ उदयाचळीं सहस्रकिरण ॥ कीं नारायण सुपर्णीं ॥८९॥

जगद्वंद्य तो दशरथी ॥ रणमंडळीं जाहला महारथी ॥ पुढें मातली चपळ सारथी ॥ त्वरें धुरेसी बैसला ॥९०॥

रघुनाथे बैसला देखोन ॥ आनंदले वानरगण ॥ म्हणती धन्य शचीरमण ॥ पाठिराखा पूर्ण होय ॥९१॥

रामासी देवेंद्र धाडिला रथ ॥ दृष्टीं देखोनि लंकानाथ ॥ दुःखें दाटला अत्यंत ॥ दांत खात करकरां ॥९२॥

दृष्टीं देखोनि राजहंस ॥ परम संतापे वायस ॥ कीं सभाग्य देखोनि दुर्जनांस ॥ महाद्वेष उपजे पैं ॥९३॥

कीं देखोनि संतांची लीला ॥ निंदकांसी उपजे कंटाळा ॥ शिवप्रतिमा देखोन डोळां ॥ म्लेंच्छ जैसे संतापती ॥९४॥

कीं हरिकीर्तन ऐकोन ॥ विटे भूतप्रेतांचें मन ॥ तैसा क्षोभला रावण ॥ रथ देखोनि ते काळीं ॥९५॥

इंद्रजित पडिला रणीं ॥ त्याहून दुःख वाटलें मनीं ॥ मंदोदरी विटंबिली वानरगणीं ॥ दुःख त्याहून हें वाटे ॥९६॥

असो परम क्रोध रावण ॥ सोडी बाणांपाठीं बाण ॥ अचुक रामाचें संधान ॥ करी चूर्ण सवेंचि ॥९७॥

सिंहासारिखे दोघेजण ॥ घे घे शब्द करिती दारुण ॥ एकमेकांवरी टाकिती बाण ॥ मंडप वरी घातला ॥९८॥

भयभीत त्रिभुवन ॥ आकाश न दिसे बाणेंकरून ॥ विमानें सोडोनि सुरगण ॥ पळों लागले तेधवां ॥९९॥

बाण दाटले अद्भुत ॥ न चालती शशिमित्ररथ ॥ वायूस फिरावया तेथ ॥ रीघ सर्वथा नसेचि ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP