अध्याय सत्तावीसावा - श्लोक १५१ ते १८७

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


यावरी बोले कुंभकर्ण ॥ तूं जन्मांतरीचा शत्रु पूर्ण ॥ हें आम्हांसी आहे ज्ञान॥ मूळची खूण सर्वही ॥५१॥

आपुलें सामर्थ्य वार्णिलें ॥ परी मजपुढें कदा न चाले ॥ कपिदळ गिळीन सगळें ॥ दांतांसी दांत न लावितां ॥५२॥

तुवां वधिले खर त्रिशिरा दूषण ॥ वाळी मारिला कपटेंकरून ॥ परी मजपुढें तो अभिमान ॥ न चले कदां मानवीया ॥५३॥

अरे निद्रार्णवीं जाहलों निमग्न ॥ नातरी नुरते त्रिभुवन ॥ तुज वीर म्हणतां जाण ॥ हांसे मज येतसे ॥५४॥

वनचरांसी पीडी कुंजर ॥ परी मृगेंद्रापुढें जर्जर ॥ कीं मेघापुढें वणवा अपार ॥ विझोनि जाय क्षणार्धें ॥५५॥

तैसें तुज येथे करीन ॥ सोडी तुझे निर्वाण बाण ॥ हें ऐकोनि रघुनंदन ॥ ओढी आकर्ण शर तेव्हां ॥५६॥

जैशा प्रळयविजा अनिवार ॥ तैसे राघवाचे येती शर ॥ असुरें मुख पसरिलें थोर ॥ गिळी अपार बाणांते ॥५७॥

भयभीत वानर तेथें ॥ विलोकिती कुंभकर्णाचे सामथ्यातें ॥ बाण गिळिले असंख्यातें ॥ नव्हे गणित तयांचे ॥५८॥

सागरीं मिळती गंगापूर ॥ तैसे मुखीं सांठवी शर ॥ मग हातीं घेऊन मुद्रर ॥ रामावरी धांविन्नला ॥५९॥

हांक फोडिली प्रचंड ॥ तेणें डळमळलें ब्रह्मांड ॥ जळचर वनचर उदंड ॥ गतप्राण जाहले ॥१६०॥

मुद्रर भोवंडी चक्राकार ॥ रामावरी घालूं पाहे असुर ॥ मग तो रणरंगधीर ॥ दिव्य शर काढीत ॥६१॥

मंत्राच्या आवृत्ति करूनी ॥ बाणाग्नीं स्थापिला प्रळयाग्नी ॥ आकर्ण ओढी ओढूनी ॥ बाण सोडी राघव ॥६२॥

मुद्ररासहित हस्त ॥ बाणें तोडिला अकस्मात ॥ भेदीत गेला गगनपंथ ॥ सपक्ष उरग जयापरी ॥६३॥

रामबाण हाचि सुपर्ण ॥ गेला हस्तसर्प घेऊन ॥ सवेंच सूर्यबीज जपोन ॥ रघुनंदन शर सोडी ॥६४॥

तेणें खंडिला दुजा हस्त ॥ गेला गगनीं अकस्मात ॥ दोन्ही भुजा भूमीवरी पडत ॥ विंध्याचळाचिया परी ॥६५॥

परी भुजा होऊनि जित ॥ जाती कपींचे भार रगडीत ॥ वानर उचलोनि पर्वत ॥ हस्त ठेंचिती असुराचे ॥६६॥

सांडूनि संग्रामाची भूमी ॥ वानर पळती गिरिवृक्षगुल्मी ॥ परी अचळ ठाण संग्रामीं ॥ रघुत्तमाचें चळेना ॥६७॥

मग काढिले दोन शर ॥ गुणीं योजोनियां सोडी सत्वर ॥ त्यांही दोन्ही चरण समग्र ॥ कटीपासूनि खंडिले ॥६८॥

चरण गडबडाट थोर ॥ खालीं पाषाण होती चूर ॥ महावृक्ष घेऊनि वानर ॥ ताडिती बळें ठायीं ठायीं ॥६९॥

असो मुख पसरोनि ते काळीं ॥ राक्षस धांवे पोटचालीं ॥ विमानीं सुरवर ते वेळीं ॥ आश्चर्य करिती तयाचें ॥१७०॥

नासिकीं लोचनी वदनीं ॥ ज्वाळा सोडी क्रोधेकरूनी ॥ इकडे भीमकाळास्त्र बाणीं ॥ अयोध्यानाथें स्थापिलें ॥७१॥

करी वायूचें खंडण ॥ ऐसा राघवाचा दिव्य बाण ॥ आकर्ण ओढी ओढून ॥ न लागतां क्षण सोडिला ॥७२॥

वजे्रं तुटे शैलशिखर ॥ तैसें बाणें उडविलें शिर ॥ भेदीत गेलें अंबर ॥ करीत प्रळयगर्जना ॥७३॥

विमानें घेऊनि पळती सुरवर ॥ भयभीत शशीदिनकर ॥ तों शिर उतरोनि सत्वर ॥ लंकेवरी पडियेले ॥७४॥

बहुत सदनें मोडून ॥ कित्येक असुर पावले मरण ॥ ते वेळीं वृंदारकगण ॥ पुष्पें वर्षती श्रीरामावरी ॥७५॥

जाहला एकचि जयजायकार ॥ विजयी जाहला रघुवीर ॥ दुंदुभि वाजवी सुरेश्वर ॥ आनंद अंबरीं न समाये ॥७६॥

धांवती सकळ वानरगण ॥ वंदिती रघुपतीचे चरण ॥ कुंभकरर्णाचें उरलें सैन्य ॥ लंकेमाजी प्रवेशले ॥७७॥

सभेसी येऊनि घायाळ ॥ वर्तमान सांगती सकळ ॥ ऐकतां रावण पडला विकळ ॥ सिंहासनावरूनि ॥७८॥

म्हणे गेलें कुंभकर्णनिधान ॥ बंधूविणें दिशा शून्य ॥ ऐसा शोकसमुद्रीं पडतां रावण ॥ आला धांवूनि इंद्रजित ॥७९॥

रावणासी सांवरून ॥ म्हणे राया पाहे विचारून ॥ या मृत्युलोकासी येऊन ॥ चिरंजीव कोण राहिला ॥१८०॥

यावरी आमुचा विपरीत काळ ॥ वानर मारिती राक्षसदळ ॥ खद्योते गिळिलें सूर्यमंडळ ॥ मशक भूगोळा हालवी ॥८१॥

पतंगपक्षेवातेंकरूनी ॥ कैसा विझाला प्रळयाग्नी ॥ भूतांनी काळ नेउनी ॥ कुटके करून भक्षिला ॥८२॥

कुंभकर्ण वीरकेसरी ॥ रणीं मारिला नरवानरीं ॥ विपरीत काळाची परी ॥ ऐसीच असे विचारा ॥८३॥

रावणाचें विंशति नेत्र ॥ पाझरती दुःखें नीर ॥ त्या काळी सहा जण वीर ॥ उभे ठाकले संग्रामा ॥८४॥

रामविजयग्रंथ विशेष ॥ युद्धकांड माजला वीररस ॥ तो श्रवण करा सावकाश ॥ ब्रह्मानंदेकरूनियां ॥८५॥

रणरंगधीर रघुवीर ॥ भक्तवत्सल परम उदार ॥ अभंग अक्षय श्रीधरवर ॥ विजयी साचार सर्वदा ॥८६॥

स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ सप्तविंशतितमोध्याय गोड हा ॥१८७॥

अध्याय ॥२७॥ ओंव्या ॥१८७॥

॥श्रीरामचंद्रार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP