गीतापद्यमुक्ताहार - अध्याय चवथा

‘ गीतापद्यमुक्ताहार ’ या ग्रंथाची आवृत्ती वाचून श्रीमज्जगद्गुरू शंकरचार्य मठ श्रृंगेरी शिवगंगा यांनी पुस्तककर्त्यास ‘ महाराष्ट्रभाषाचित्रमयूर’ ही पदवी दिली .


भगवान अर्जुनास म्हणतात --

हा योग आहे विजया ! अनादी

सूर्यास मी सांगितलाच आधी ।

तोही मनूला कथि आदराने

इक्ष्वाकुला सांगितला मनूने ॥१॥

परंपरेनेच असा मिळाला

राजर्षिंनाही श्रुत झाला ।

बा ! तोच की उत्तम योग इष्ट

कालांतराने परि होय नष्ट ॥२॥

आता तुला सकळ मी कथिलाहि तोच

आला जसा प्रथमपासुनि हा तसाच ।

सांगीतले तुजशि थोर रहस्य आज

की मत्सखा परम तू प्रिय भक्तराज ॥३॥

अर्जुन --

आलीकडे जन्म तुझा दिसे हे

भानू अनादी उघडेच आहे ।

सांगीतला योग कसा तयाते

हे स्पष्ट सांगे तरि आज माते ॥४॥

भगवान --

म्या घेतले जन्म अनंत बापा !

झाले तुझेही बहु शत्रुतापा !

सारे कळे ईश म्हणूनि माते

जीवत्त्वयोगे न कळे तुला ते ॥५॥

माते कधी नाश न जन्म साचा

मी ईश आहे सकला जिवांचा

माझीच माया गुतवूनि घेतो

माझाच मी घेउन जन्म येतो ॥६॥

जेव्हा जेव्हा अर्जुना ! जीर्ण धर्म

होवोनिया वृद्धि पावे अधर्म ।

तेव्हा तेव्हा मीच की साह्य होतो

जन्मोनिया मीच लोकांत येतो ॥७॥

तारावया सज्जन साधुवृंद

मारावया दुर्जन गर्वधुंद ।

स्थापावया धर्म पुन्हा जगात

मी घेतसे जन्म युगायुगात ॥८॥

मज्जन्म ऐसे मम दिव्य कर्म

जाणेल पार्था ! जन सत्य मर्म ।

तो देह टाकूनि मलाच पावे

लागे पुन्हा त्या नच येथ यावे ॥९॥

जे क्रोध काम भय सोडुनि नित्य मुक्त

ध्याने मदाश्रय करोनि सदा विरक्त ।

ज्ञाने तपे करुनि जे बहु शुद्ध होती

ते पुण्यवंत जन मत्स्वरुपांत येती ॥१०॥

जे ज्याप्रमाणे भजतात माते

मी त्याप्रमाणे फळतो तयांते ।

हे अर्जुना ! तू जगतात पाहे

माझ्याच मार्गें जन वागताहे ॥११॥

जे कर्मसिद्धी धरुनी सदैव

लोकांमध्ये पूजिति इष्ट देव ।

ह्या मृत्युलोकी तरि कर्मयोगे

त्या कर्मसिद्धी फळतात वेगे ॥१२॥

केले निर्माण पार्था सकल जगभरी वर्ण हे चार मीच

कर्माच्या द्विगभावे गुणअवगुण हे पाहुनी उंच नीच

त्यांचा कर्त्ता खरा मी जरि तरि समजे सत्य कर्त्ताहि नाही ।

राहे मी भिन्न सारे करुनि मज पहा नाशहि सत्य नाही ॥१३॥

मी लिप्त कर्मा नच सव्यसाची !

इच्छा नसे की मज तत्फलाची ।

जाणेल ऐशा मज जो विशुद्ध

कर्मामधे तोहि न होय बद्ध ॥१४॥

पूर्वी ऐशी जाणुनी सर्व मर्मे

मोक्षार्थ्यांनी आचरीली स्वकर्मे ।

ह्यासाठी तू आचरी कर्म हेच

केले जे का पूर्वजांनी तसेच ॥१५॥

ज्ञात्यासही होइल मोह जाण

की कर्म हे कोण अकर्म कोण ।

त्यांतील आता कथितोच हेतू

ते मुक्त होशी अशुभांतुनी तू ॥१६॥

जाणावे की कोणते काय कर्म

किंवा आहे कोणते ते विकर्म ।

की जाणावे कोणते ते अकर्म

कर्माचे ह्या खोल की फार मर्म ॥१७॥

कर्मामध्ये जो बघतो अकर्म

किंवा अकर्मात बघेल कर्म ।

सर्वज्ञ तो थोर जगांत युक्त

सारे करोनी जन तोच मुक्त ॥१८॥

जो कामसंकल्प समस्त टाकी

आरंभ कर्मास करीत लोकी ।

ज्ञानाग्निने जाळुनि कर्मजात

ज्ञाते तया पंदित बोलतात ॥१९॥

इच्छा फलाची अगदीच टाकी

निराश्रये तृप्त सदा विलोकी ।

कार्मी प्रवर्ते जरि सर्व पाही

पार्था ! तरी तो न करीच काही ॥२०॥

स्वाधीन यद्देह मनःप्रवृत्ति

आशा न की पाशहि अन्य चित्ती ।

कर्मे करी केवळ शारिरीक

त्याला नसे दोष कधी विलोक ॥२१॥

होईल लाभ सहजांत तयांत तुष्ट

निर्द्वंद्व की तिळ न मत्सरही अनिष्ट ।

हो कार्यभाग अपुला अथवा न हो की

ज्या एक तो कधिहि बद्ध न होय लोकी ॥२२॥

जो मुक्त संगे अथवा विरक्त

आत्मस्वरुपी स्थिर चित्त मुक्त ।

यज्ञार्थ कृत्ये करि नित्य हाते

तत्कर्म सारेच लयास जाते ॥२३॥

जो अग्नि , पात्र , हवि , अर्पण सर्वकाही

ब्रम्हस्वरुप सगळेच मनात पाही ।

ब्रम्ही अशी सतत तल्लिन बुद्धि झाली

ब्रम्ही मिळे पुरूष तो बहु भाग्यशाली ॥२४॥

जाणोनिया देवतांचा विभाग

कोणी योगी साधिती यज्ञयाग ।

कोणी ब्रम्हाग्नीत ही यज्ञरीती

होमोनिया योगिही मुक्त होती ॥२५॥

कोणे करून जन संयम हा हुताश

श्रोत्रेंद्रियादि मग जाळिति सावकाश ।

जे इंद्रियांप्रति हुताशन मानतात

शब्दादि ते विषय त्यांतचि जाळतात ॥२६॥

कोणी कर्में सर्वहि इंद्रियांची

किंवा अन्य प्राण इत्यादिकांची ।

ज्ञाने आत्मध्यानाग्निस्वरूप

विस्तारोनी जाळिती जेवि धूप ॥२७॥

द्रव्ययज्ञ तपयज्ञह कोणी

योगयज्ञ करिती जन कोणी ।

ज्ञान वेदपठण व्रतरत्ने

साधुनी करिति यज्ञहि यत्ने ॥२८॥

प्राणासहि जाळिती की अपानी

प्राणी अपाना करि दग्ध कोणी ।

दोन्हीहि वायू करतात बद्ध

जे का महा प्राणनिरोधसिद्ध ॥२९॥

आहाराचे नियम करुनी कंठिती काल कोणी

प्राणा प्राणज्वलन करुनी जाळिति त्यांत कोणी ।

ऐसे सारे असति जन हे जाण की यज्ञवेत्ते

क्षालीती ते सकल दुरिते यज्ञकर्मानिमित्ते ॥३०॥

जे यज्ञशेषामृत हे पितात

ब्रम्हास ते निश्चित पावतात ।

अयाज्ञिकांना नच हाहि लोक

कैचा तयांना मग अन्यलोक ॥३१॥

ऐसे अनेकविध यज्ञ जगी सुखाने

विस्तारले प्रथम जे विधिच्या मुखाने ।

आहेत ते सकल कर्मज कर्मयुक्त

ऐसे कळेल जन होइल तोहि मुक्त ॥३२॥

जाणावे द्रव्ययज्ञाहुनि अधिक असे थोर हा ज्ञानयज्ञ

सर्वांना श्रेय देतो विमलतर बरा बोलती तोच सुज्ञ ।

कर्में हे लौकिकाची बहुविध विजया ! वेदकर्मानुसारी

ज्ञानी जाती लयाते तिळहि न उरती निश्चये जाण सारी ॥३३॥

जे प्रश्न संतांस करुनि भावे

सेवूनि पादांबुजहि नमावे ।

तत्वज्ञ शास्त्री मग जे सुशील

ते ज्ञान तूते उपदेशितील ॥३४॥

पार्था ! असे ज्ञान मिळेल जेव्हा

हा मोह येईल पुन्हा न केव्हा ।

तू भूतमात्री मन ठेविशील

आत्मस्वरूपी मज पाहशील ॥३५॥

लोकी जरी तू असशील पापी

पाप्यांतहि थोर असा तथापी ।

ही ज्ञाननौका उतरील थोर

पार्था ! तुझा पापसमुद्र घोर ॥३६॥

पेटे पार्था अग्नि जेव्हा अपार

होतो सारा दग्ध ते काष्ठभार ।

ज्ञानाग्नीने त्यापरी कर्म - जाती

वेगे सर्या भस्म होवोनि जाती ॥३७॥

ज्ञानापरि ह्या जगतात काही

पार्था दुजे श्रेष्ठ पवित्र नाही ।

ज्ञाता स्वये साधुनि योगसिद्धी

कालांतरे ते मिळवी त्रिशुद्धी ॥३८॥

श्रद्धा जयाची दृढ आणि शुद्ध

जिंकावया इंद्रियसंघ सिद्ध ।

त्याला जगी ज्ञान मिळून खास

शांतीहि मोठी मिळते तयास ॥३९॥

बुडे अज्ञ की सशयी भक्तिहीन

नसे ज्ञान की सौख्य त्या होय दीन ।

सुखाचा नसे लेशहि संशयाला

नसे हाहि की अन्यहि लोक त्याला ॥४०॥

निःसंदेही ज्ञान जो नित्य भोगी

संन्यासी तो जाण बा ! कर्मयोगी ।

आत्मत्वाला जाणतो जो विशुद्ध

होईना तो अर्जुना ! कर्मबद्ध ॥४१॥

ह्यासाठी तू आज ह्या ज्ञानखड्‍गे

अज्ञानाच्या संशया तोड वेगे ।

पार्था ! युद्धा ऊठ रे आधी

योगाने हे आपुले कर्म साधी ॥४२॥

चौथा अध्याय समाप्त .

N/A

References : N/A
Last Updated : May 31, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP