मे २१ - साधन

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


नामाइतके सूक्ष्म आणि स्थूल साधन नाही . एखादी गोष्ट अगदी कळकळीने सांगायची झाली म्हणजे ‘ अगदी बेंबीच्या देठापासून सांगतो ’ असे आपण म्हणतो . त्याप्रमाणे नामही बेंबीच्या देठापासून घ्यावे , कारण सर्व वासनांचा उगम तिथेच आहे . आपण नामाची वस्ती तिथे ठेवून दिली म्हणजे आपोआप वासनाक्षय होईल . उगीच वरवर नामस्मरण करु नये . ते अट्टाहासाने आणि अंत :करणपूर्वक घ्यावे , यातच खरे हित आहे . आता वासनाच मेली तर आम्ही विषय कसे भोगू , याची नाही काळजी करु .

भगवंताची सत्ता जाणली की त्याला सहज जाणता येते . जो जाणेल भगवंत त्याला म्हणवे संत . आपण खेड्यात गेलो की तिथले सभ्य आणि प्रतिष्ठित कोण त्याची चौकशी करतो . पाटील आम्हाला दिसतो , लोक सांगतात , म्हणून आम्ही त्याची भेट घेऊ शकतो . पण परमात्मा निर्गुण , निराकार , त्याची ओळख कशी करुन घ्यावी कळत नाही . आम्हाला कळत नाहीत त्या सर्वच गोष्टी आम्ही कधी खोट्या मानतो का ? आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे . नास्तिकाचासुध्दा पूर्णत्वाकडे ओढा असतो . तेव्हा या तळमळीला हेच औषध आहे . कोणतीही गोष्ट तळमळीवाचून चांगली होत नाही . प्रत्येक जीवाला तळमळ आहे खरी , पण ती कशासाठी हवी ते चुकले . ती तळमळ विषयाकडे गेल्याने जीवाला खरे समाधान मिळत नाही . आपला जन्म वासनेत होतो , म्हणून वासनातृप्तीची तळमळ स्वाभाविक लागते . तिकडून काढून ती भगवंताकडे लावणे , यात माणसाची खरी कर्तबगारी आहे . काय केले तर मी भगवंताचा होईन , अशी तळमळ लागावी . ती न लागली तर आपले चुकले . वासनेच्या मागे जाणारी तळमळ भगवंताकडे लावण्यासाठीच सगळी साधने आहेत . तळमळ निर्माण झाली की भगवंत हात देतो .

जगामध्ये असे कोणतेही दु :ख नाही , की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालील . प्रत्येकाला आनंद पाहिजे आहे , आनंद हेच भगवंताचे स्वरुप आहे . म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी . भगवंत जर आपले मूळ स्वरुप आहे , तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय प्रयोजन ? तर त्याचे कारण हेच , की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे . भगवंत हा प्रेममूर्ती आहे , म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरुन टाकावे . दुसरा काय करतो हे न पाहाता , आपण काय करायला पाहिजे याचा अगोदर विचार करावा .

N/A

References : N/A
Last Updated : May 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP