उद्धवहंसाख्यान - टाकळीस आगमन

श्रीमत्सद्‍गुरूहंसराजस्वामींची शिकवण म्हणजे मोक्षरूपी ध्येय गाठण्याकरितां श्रुति , युक्ति व अनुभूति यांच्या आधाराने साधकांच्या सोयीकरितां तयार करून दिलेली ज्ञानयोगाची सोपानपरंपराच आहे .


हंसरूपें श्रीसदगुरुनाथ । जगीं वाढवावया परमार्थ । व्यक्ति धरोनि करिती सनाथ । मुमुक्षुसाधकां ॥१॥

उद्धवहंस समर्थाचि दुसरा । तेथें कां पडावें साधन व्यापारा । परी सांग करितसे लोकोपकारा । जैसा जैसा विधि ॥२॥

समर्थ गेलियानंतर । पुरश्चरण करी सुंदर । तो कैसा प्रतिदिनीचा प्रकार । सावध ऐका ॥३॥

प्रातःकाळीं गंगास्नान । प्रातःसंध्या विधिविधान । नंतर मारुतीचें पूजन । पुष्पगंधधूपदीपें ॥४॥

एकांत स्थळीं आसन रचिलें । चैलिजिनकुश आंथरिले । आसनविधि करी वहिलें । भुशुद्धयादि ॥५॥

नंतर श्रीगुरुची मानसपूजा । यथासांग करितसे वोजा । तें ध्यान धरोनिया सहजा । जपही आरंभी ॥६॥

न्यास जैसे आपणासी करावे । तेवी मूर्तिलागी कल्पावे । ध्यान तो निरंतर असे स्वभावें । समाप्ति पावेतों ॥७॥

काष्ठमाला कीं रुद्राक्षमाला । यासी कदापि नाहीं स्पर्शला । प्रतिमंत्रासी एक वर्ण लाविला । वर्णमाला तेचि ॥८॥

ध्यान मूर्तीपासुन जैसा । उच्छ्वासु होतसे सहसा । जप हा चालिला अखंड ऐसा । अविच्छिन्न ॥९॥

मध्याह्न होतांचि उठावें । मध्याह्नसंध्येसी सारावें । तैसेंचि मधुकरीसी जावें । अकरा घरीं ॥१०॥

मारुतीसी नैवेद्य समर्पून । भोजन करावें आपण । कांहीसें करावें शयन । मग बैसावें जनांसह ॥११॥

कोणी भोजनासी बोलावितांही । न जाय घरा कोणाचेही । मातापित्याचे सदना सहसाही । न जाय सर्वथा ॥१२॥

कोणी ह्मणतां तुज उपेक्षुनी । गेले समर्थ वनीं सोडुनी । त्यासी बोलतसे प्रति वचनीं । कीं समर्थ आतां येती ॥१३॥

असो अस्तमान जालियावरी । सायंसंध्यापुजादि सारी । धूपदीप आरती पुर्वीलपरी । यथासांग मारुतीची ॥१४॥

मग स्कंधीं विणा चिपळ्या हातीं । पायीं चाळ व्यक्ति ध्यान चित्तीं । मुखीं समर्थ आतां येती । रक्षावया मज दीना ॥१५॥

हंस सद्‌गुरु आतां येती । आह्मां दीना उद्धरिती । हेच मुखीं भजनाची स्थिति । सप्रेम होतसे ॥१६॥

एक याम लोटतां रजनी । पुनः बैसे जपालागुनी । मध्यान्हरात्र होता क्षणीं । फलहार घ्यावा ॥१७॥

नंतर निद्रा मारुतीसमोर । अरुणोदयीं पूर्ववत् प्रकार । एवं हा सांगितला व्यापार । आठाही प्रहरांचा ॥१८॥

आतां मारुती केवी करी रक्षण । तेंचि बोलिजे ऐका सावधान । सर्व जनांचें अंतरीं राहून । मनें वेधी बाळकाकडे ॥१९॥

सर्वांसी वाटे खसदनें त्यागुन । बाळापाशी रहावें जाऊन । धंदा करितांही आठवण । तया बाळकाची ॥२०॥

कांहीं उत्तम पदार्थ देखिला । तो बाळासी पाहिजे अवश्य दिधला । कितेकीं कामधंदा सोडिला । मठाकडे धांवती ॥२१॥

कित्येकीं तो निश्चय केला । कीं बाळ जातसे मधुकरीला । अति श्रम होती तयाला । तरी तेथेंचि जाऊन राहूं ॥२२॥

मग मठाभोवतीं घरें केलीं । बाळकासी विनविती जाली । येथेंचि मधुकरी पाहिजे घेतली । ग्रामाकडे न जातां ॥२३॥

कितेंकीं बाजार तेथें भरविला । नाना प्रकारें व्यापार चालिला । पाहती वारंवार बाळकाला । न देखतां कष्टती ॥२४॥

फळमुळें केळें नारळ । आणोनि ठेविती आवडी सकळ । ऐसा त्या स्थळीं होतसे सुकाळ । आनंदाचा ॥२५॥

एक ह्मणती बाळ नाहीं जन्मला । केवळ देवाचि भूमी अवतरला । एक ह्मणती महासांधु भला । जन्मापासुनी ॥२६॥

एक ह्मणती आमुच्या भाग्यकारणें । समर्थेंचि दुजी व्यक्ति धरणें । येरव्ही पांच वर्षाचें बाळ तान्हें । या रीती कैसें वतें ॥२७॥

ऐसी आवडी सर्वाप्रती । स्त्रीपुरुष बाळेंहि न विसंबिती । कित्येक तो उपदेश द्यावा ह्मणती । आह्मालागीं ॥२८॥

तंव बाळ ह्मणे मज नाहीं ज्ञान । तरी उपदेश करीना मी आपण । तरी समर्थ आतांचि येऊन । तुम्हाआह्मां उपदेशिती ॥२९॥

समर्थे आज्ञा नाहीं केली । तरी मी स्वबुद्धि न प्रेरी वहिली । आतांच येईल समर्थ माउली । तेव्हा उपदेश घ्यावा ॥३०॥

तों काल तुम्हीं भजन करा । सद्‌गुरूसी तोपवा अंतरा । ऐसें ऐकतां जनांचिया नेत्रा । उदक प्रेमें येतसे ॥३१॥

असो मुख्य मारुतीही गुप्तरूपें । बाळा भोंवतीं असे साक्षेपें । कोणी नसतां जवळ भलतिया रूपें । धरूनि परामर्श करी ॥३२॥

जें जें उद्धवाचें मनोगत । तें तें सर्वही सिद्धिस जात । सर्व पदार्थ दाटती मठांत । आणि बहुत सेवाधारी ॥३३॥

परी बाळ तयाकडे न पाहे । व्यवहार कांहींच करूं न लाहे । सदा उदासीनत्वें राहे । भजनपूजाजपध्यानीं ॥३४॥

श्रोते हो ऐका सावधान । यापरी लोटले बहुत दिन । द्वादश वर्षे लोटतां पुरश्चरण । समाप्तीस आलें ॥३५॥

एक दिन सुदिन उदेला । रात्रीं जप करीत असतां वहिला । उद्धव स्वामीचे मनीं तो स्फुरला । भाव कांहीं ॥३६॥

समर्थहंस आता येतों ह्मणोनी । उपदेश न करितां मज गेले त्यागुनी । पुरश्चरणही संपलें तरी अझुनी । समर्थ कां न येती ॥३७॥

समर्थ कृपाळू तरी अती । परी मज अनन्याचा का अंत पाहती । मज कोनती दुजी आहे गती । हें का न कळे प्रभूसी ॥३८॥

मी तये वेळेसीच चुकलों । समर्थासी जाऊं देता जालों । आणि समागमेंही नाहीं गेलों । चरणसेवेसी ॥३९॥

ध्नय तया भाग्य देशाचें । धन्य वैभव त्या सांगतियाचें । अहा काय हें प्रारब्ध आमुचें । जवळी असतां दुरी गेले ॥४०॥

आतां सद्‌गुरु मज कधीं भेटती । अपरोक्षज्ञान केव्हा बोधिती । अहा मारुतिराया तुजही कळवळा चित्तीं । न ये माझा ॥४१॥

हें कैसें विपरीत जालें । कंठ सद्गद नेत्रा उदक आलें । अंतःकरण कैसें खळबळीलें । न बोलवें तें ॥४२॥

याचि नावें आंतरशुद्धि । ऐसी जाली पाहिजे दृढबुद्धि । मग तो सद्‍गुरुहंस कृपानिधी । दुरी नसे साधका ॥४३॥

असो या रीती अवस्था उद्धवस्वामीची । पाहतां वृत्ति कळवळली मारुतीची । तत्क्षणींच व्यक्ति धरूनिया साची । भेटी देती जाहले ॥४४॥

मारुतीची मूर्ति पाहतां । घालितां सप्रेमें दंडवता । मारुतीहि उचलुनी आलिंगिता । होय स्वामीसी ॥४५॥

बापा तुझें काय मनोगत । तें सांग मी करीन क्षणांत । अथवा मागसी जो पदार्थ त्वरीत । देईन ये क्षणीं ॥४६॥

ऐसें बोलतांचि स्वामी हांसती । ह्मणती हें काय ठकविता मजप्रती । परी एक माझी असे विनंति । सद्‌गुरु समर्थ भेटवा ॥४७॥

आणिक कवणेही काळीं । अन्य बुद्धी न व्हावी समुळीं । एक सद्‌गुरुहंस सन्निध जवळीं । असावें हे मागतों ॥४८॥

ऐकतांचि मारुती ह्मणे तूं परम । गुरुभक्त अससी निस्सीम । तैसेचि षुरती तुझे मनोधर्म । वरप्रसादें आमुच्या ॥४९॥

आतांचि पाहे पाहे येक्षणीं । भेटवीन सज्जनालागुनी । ऐसें बोलोनि उडाला गगनीं । पातला समर्थापाशीं ॥५०॥

उठी उठी काय निद्रा घेसी । अवस्था लागलीसे उद्धवासी । ऐसें ऐकतांचि कर्णपुटासी । उठिले समर्थ ॥५१॥

आगा मारुति ! तुवां रक्षिलें । तें बाळक माझें असेल थोर जालें । तें मज भेटवी ह्मणोनि वंदिले । तूं कैवारी आमुचा ॥५२॥

तेव्हां मारूतीनें समर्थासी । खांदा घेउनी आला वेगेसी । येऊन ह्मणतसे उद्धवासी । हे घे गुरु तुझा तूं ॥५३।

बाळकें पाहतांचि आनंदलें । साष्टांग चरणावारीं घातिलें । सप्रेमें नेत्रोदकें क्षाळिलें । मग बोलता जाला ॥५४॥

आपुली सत्यचि केली वाणी । आतांचि आले परतोनी । समर्थे हसोनी कुरवाळिला वदनीं । पुनः पोटिसी घरियेलां ॥५५॥

ऐसी गुरुशिष्यांची जाली भेटी । आनंदे दुमदुमली सृष्टी । पुढें उपदेश होईल उठाउठी । चिमाणियां बाळासी ॥५६॥

हति श्रीमद्धंसंगुरुपद्धति । ग्रंथरूपें ज्ञानाभिव्यक्ति । उद्धव हंसाख्यान निगुती । चतुर्थ प्रकरणीं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 22, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP