जानेवारी ३० - नाम

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.


तुम्ही सर्व भाविकजन । ऐकावे माझे वचन ॥ माझे भेटी सदा राहावे । मुखाने रामनाम घ्यावे ॥ जो नामात राहिला । तो अखंड माझ्या दर्शनात बसला ॥ जेथे नामाचे स्मरण । ते माझे वसतिस्थान ॥ जेथे रामाचे नाव । तेथे माझा ठाव । हे आणून चित्ती । सुखे राहावे प्रपंचाप्रति ॥ नामात ठेवा मन । हेच माझे खरे दर्शन ॥ नेहमी रामाचा ध्यास । हाच माझा सहवास ॥ तुम्ही सुज्ञ माझे प्राण । नाम करा तेवढे जतन ॥ नामात ठेवावे प्रेम । तेथे माझी वसति जाण ॥ ज्याने ज्याने इच्छा धरावी व्हावे माझे । त्याने नाम कधी न सोडावे वाचे ॥ एवढे देईल जो नामदान । त्याला अर्पण करुन घेईन जाण ॥ जेथे नाम । तेथे माझे धाम ॥ नामापरते न मानी सुख । तेथेच माझे राहणे देख ॥ तुम्ही शक्य तितके राहावे नामात । हेच माझे सांगणे तुम्हांस ॥ शक्य तो नामस्मरण करावे । म्हणजे मी तुमचेजवळ अखंड आहे असे समजावे ॥ जेथे परमात्म्याचे नाव । तेथे माझा आहे ठाव ॥ जेथे नाम तेथेच मी । हा भरवसा बाळगून असावे तुम्ही ॥

नाही केले वेदपठण । शास्त्राचे नाही झाले ज्ञान । श्रुतिस्मृति उपनिषदे यांची नाही ओळखण । असा मी अज्ञान जाण ॥ तरी एक भजावे रघुनाथासी । अर्पण होऊन जावे त्यासी । ऐसे जाणून चित्ती । खंड नाही समाधानवृत्ति ॥ मी सतत आहे तुमच्यापाशी हा ठेवा निर्धार । न सोडावा आता धीर ॥ ठेवावा एक विश्वास । मी आहे तुम्हाजवळ खास ॥ श्रीदासबोध नामस्मरण । याचे असावे वाचन । मी त्यातच मानावे जाण । कृपा करील रघुनंदन ॥ मी तेथे आहे हे नक्की समजावे । राम सर्व ठिकाणी आहे हे लक्षात ठेवावे ॥ उपाधिरहित मी तुमचेजवळ सतत आहे ॥ मी नाही अशी कल्पना करु नये । तुमचे जवळ आहे हे खात्रीने समजावे ॥ मी नाही सोडून गेलो कोणाला दूर । माझी वसति तुमच्या शेजारी जाण ॥ माझे येणे जाणे तुमचे हाती । तुम्हा सर्वांहून नाही परती ॥ रामापरता मी । जैसा प्राणापरता देह जाण ॥ सदा सर्वकाळ माझ्याशी वास । हाच धरावा हव्यास ॥ त्याला न जावे लागे कोठे । घरबसल्या राम भेटे ॥ जे जे करणे आणिले मनी । रामकृपे पावलो जनी ॥ आता पाहा मला रामात । आनंद मानावा नामात ॥ सर्वांनी राखावे समाधान । जे माझे प्राणाहून प्राण जाण ॥ माझे ऐकावे सर्वांनी । सदा राहावे समाधानी ॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP