मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
राधा मुखरण मधें मिळाल्...

रामजोशी - राधा मुखरण मधें मिळाल्...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


राधा मुखरण मधें मिळाल्या आणिक त्या गवळणी ।

विरहातुर बोलती सख्यांनो गेला यदुकुलभूषणमणी ।

कोठें होती जपून विवशी मथुरेमधिं वाकडी ।

सांड मिळाली कुब्जा त्याला कशि वाटलि फ़ांकडी ।

आम्ही येथें किती रडावें हरि दासींचा गडी ।

बाळमित्र म्हणुं नये कशी ग बाई तिकडेच दिधली बुडी ।

याणें जाउनि तिथेच रहावें ही तर कशी आवडी ।

यांत सुगर म्हणूं नये जळो गाई बटकिची किती परवडी

॥चाल॥आम्ही बुडालों परंतु कुबडी ती तर खरी ।

यत्न न करितां बसले जागा तिणें मिळविला हरी ।

सार्‍या आम्ही उदास बसलों बाई यमुनेच्या तिरीं ।

या विरहामधि कसें जगावें रतिरंगाचा धनी ।

टाकुनि गेला अम्हांसि आतां कैंची वेणीफ़णी ॥१॥

ज्याच्यासाठीं आम्ही पतीची मर्यादा सोडिली ।

गोष्पद मानुनि दिनांत शतदां यमुना वोलांडिली ।

कुंजलतेचा महाल मानुनि रमलों आम्ही मुली ।

जनांत याचेसाठिं कुळाची अपकीर्ती साहिली ।

शेवट केला असा तयानें दासी अवलंबिली ।

काय करावें दुर्दैवाची गति आम्हां भोवली ।

॥चाल॥ त्याला आमुची दया नसो पण लज्जा नाहीम कशी ।

कोठें होती रांड कळेना कोण सवत घरघुशी ।

या कपट्याशी संगत करुनी पडलों आम्ही फ़र्शी ।

पहिल्यापासुन ठाऊक होता हा नंदाचा गुणी ।

संगत यासी करुं नये परि मसलत पडली उणी ॥२॥

प्राणावांचुन तनु तशा हरिवांचुन झालों पहा ।

नवस करा रांडांनो काहीं तरि देवाला वहा ।

जोशी पंचाक्षरी जाणता कुणि एखादा पहा ।

दैवावर घालवूं नका गे यत्न करावे दहा ।

रांडेच्या नादास गुंतला पुनरपि येतो न हा ।

धन्य म्हणा गे सुत नंदाचा कीर्ति मिळविली अहा ।

॥चाल॥ याचें अमुचें विरुध्द नसतां कसा कापिला गळा ।

लालुच दाउन गडे बुडविलें याणें अमुच्या कुळा ।

सोळा सहस्त्र गोपी टाकुनी किति बटकीचा लळा ।

गोकुळ सोडुन कविरायानें मथुरेमधि छावणी ।

केली, याचें निदान ऐका हरि दासींचा ऋणी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 17, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP