मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
निजवदनीं या गजवदनाचें ...

रामजोशी - निजवदनीं या गजवदनाचें ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


निजवदनीं या गजवदनाचें स्तवन घडावें गड्या ।

का विफ़ळ गमाविसि घड्या ॥ध्रु०॥

शंकरसुत अभयंकर त्याचा किंकर हो झडकरी ।

तरि मानव तनु ही खरी ॥

एकदन्त गुणवन्त कलानिधि महन्त भुवनोदरीं ।

हा त्रिभुवनमंगलकरी ॥

लंबोदर सुखदायक विद्यांभोनिधिअंबुज निज अंतरी ।

हा विघ्नगजावरी हरी ॥

आहे हा यास्तव निशिदिनिं भजा ।

धरा निजशिरी चरणिंच्या रजा ।

असा सुर सुखकर नाहीं दुजा ।

भजनें गात रोकड्या बा भवार्णवांतिल किड्या ॥१॥

शुंडादंड-सुमंडित-गंडस्थलिं दूर्वांकुर नवे ।

मधुपांचे फ़िरती थवे ॥

मरकत मणिचे कनक किरीटी जसे बसविले जवे ।

ही शोभा नच बोलवे ॥

पायस मोदक लाडु खोबरें खडिसाखरेचे रवे ।

ही भक्षायाची सवे ॥

असे हा धणिवर ठाउक जगा ।

मोडिल्या किती असुरांच्या रगा ।

अशाच्या पदकमळीं कर लगा ।

वागामृताच्या वड्या या म्हणूं नये वावड्या ॥२॥

इन्दु शिरावरी सिंधु बुध्दिचा बंधु करुन घे कसा ।

धर याच्या पदसारसा ।

सात्विक त्याला सत्व तमासी तम राजस राजसा ।

हा जसा भाविला तसा ॥

कार्यसिध्दिकर इतर दैवता बारा वर्षे बसा ।

हा आज आठ, चौदिसा ॥

अरे हा सतत ठेवा मनीं ।

विनायक भाद्रचतुर्थी दिनीं ।

पहावा अधिक सुखप्रद जनीं ।

या चरणासी जड्या हो कविरायाहुन पड्या ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP