श्रीभानुदासांचे अभंग - रामनाममहिमा

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्री कृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


४३

श्रीराम आम्हां सोयरा सांगाती । नाहीं पुनरवृत्ति जन्म कर्म ॥१॥

तुटती यातना देहाचा संबध । श्रीराम बोध ठसतां जीवीं ॥२॥

वेरझार खुटली वासना तुटली । वॄत्ती हे जडली श्रीरामपायीं ॥३॥

भानुदास म्हणे कुळींचे दैवत । श्रीराम समर्थ अयोध्येचा ॥४॥

४४

भवसिंधू तरावया सोपें हे वर्म । मुखीं तो श्रीराम जप सदा ॥१॥

यमाची यातना न घडे बंधन । तुटेल हें जाणा कर्माकर्म ॥२॥

योग याग तपें घडती तीर्थाटन । मुखीं गातां नारायण जोडे सर्व ॥३॥

भानुदास म्हणे कलिमाजी सोपें । नामस्मरण जपे श्रीविठ्ठलाचें ॥४॥

४५

बैसोनी अनुष्ठान रामनाम ध्यान । यापारि साधन नेणें कांहीं ॥१॥

एकविध भाव दृढता हें मन । यापरि साधन आन नाहीं ॥२॥

परद्रव्य परदारेचा विटाळ । यावीण निर्मळ तप नाहीं ॥३॥

भानुदास म्हणे रामनाम गुढी । लावली चोखडी कलियुगी ॥४॥

४६

पशुपक्षी श्वापद कीटक भ्रमर । रामनामें उद्धार एकचि होय ॥१॥

म्हणोनियां करा नामाचें चिंतन । तुटेल बंधन यमपाश ॥२॥

सोपें वर्म तुम्हां सांगितलें गुज । भानुदास निज जप करी ॥३॥

४७

शरणागत जाहलिया उपेक्षीना देव । हा आहे अनुभव माझे देहीं ॥१॥

हो का राव रंक कुळ यातिहीन । करतां नामस्मरण न वंची देव ॥२॥

भानुदास म्हणे स्मरा त्या रामासी । चुकेल चौर्‍यांयंशी वेरझार ॥३॥

४८

कल्पना अविद्या सांदोनिया । गोडी रामनाम जोडी करी बापा ॥१॥

येर ते मायीक नको पडूं छंदा । आठवीं गोविंदा एकपणें ॥२॥

द्वैताची ते वाढ़ी छेदूनियां काढी । नामाची तुं गुढ़ी उभवीं सदा ॥३॥

भानुदास म्हणे सांडोनी कल्पना । चिंतीं तूं चरणा विठोबाच्या ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP